राज्यात नदीजोड प्रकल्पांद्वारे जलसंपत्ती व्यवस्थापनासाठी ऐतिहासिक पाऊल
- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई, दि. 21 : नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पामुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील आणि वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील पाणी टंचाईची समस्या सोडवून विदर्भ दुष्काळमुक्त होऊ शकेल. या प्रकल्पांमुळे पाण्याचे प्रादेशिक वाद टळतील आणि पाणीटंचाईच्या भागांना दिलासा मिळेल. हे प्रकल्प राज्याच्या जलसंपत्तीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी मोठे पाऊल ठरणार असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभेत 293 अंतर्गत च्या चर्चेला उत्तर देताना जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले,नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाव्दारे नाशिक व जळगाव जिल्हयातील 49 हजार 516 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. वैनगंगा-नळगंगा नदीजोड या प्रकल्पाचे लाभक्षेत्र 3 लाख 71 हजार 277 हेक्टर आहे. या प्रकल्पाचा लाभ नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलढाणा या सहा जिल्हयांना होणार आहे. राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करणे आणि महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार कोटी रुपये किमतीची कामे नाबार्ड अर्थसहाय्याच्या पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्याचा वापर आणि व्यवस्थापन करून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी उपलब्ध पाणी साठ्यामध्ये पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठेवून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment