संस्थेचे नाव महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ असे असले, तरी `बालभारती' या नावाने प्रकाशित होणारी भाषेची पाठ्यपुस्तके अल्पावधीतच इतकी लोकप्रिय झाली, की मंडळ `बालभारती' याच नावाने ओळखले जावू लागले. पाठ्यपुस्तक प्रकाशन क्षेत्रातील एक पायाभूत स्वायत्त संस्था असा मंडळाचा उल्लेख करावा लागेल. मंडळाने स्थापनेपासूनच संस्कारक्षम , आकर्षक व दर्जेदार पाठ्यपुस्तक तयार करण्याचे व्रत घेतले. अनेक अडचणींवर मात करून शिक्षण क्षेत्रातील पाठ्यपुस्तक प्रकाशनाचा पाया मजबूत केला. निव्वळ मुलांवरील प्रेमापोटी राज्यातल्या अनेक ख्यातनाम लेखक, कलावंत आणि विचारवंतानी बालभारतीच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. कल्पना कार्यक्षमता व कर्तृत्व यांचा एक सुंदर त्रिवेणी संगम मंडळाच्या आजवरच्या प्रवासात दिसून येतो.
पाठ्यपुस्तक मंडळाची रचना
पाठ्यपुस्तक मंडळ हे राज्यशासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. राज्याचे शिक्षणमंत्री हे या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय नियामक मंडळात घेतले जातात. पाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य काम विद्याविभागात चालते. विद्याविभागांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती या आठ भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण असे एकूण 14 विभाग आहेत.
विषय समित्या
पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी विषयवार समित्या असतात. मंडळातील त्या त्या विषयाचे अधिकारी विषय समित्यांमध्ये सदस्य-सचिव म्हणून काम करतात. जुन्या अभ्यासक्रमाच्या जागी नवीन अभ्यासक्रम येऊन पाठ्यपुस्तके बदलली जात नाहीत, तोपर्यंत या समित्या कार्यरत असतात. पाठ्यपुस्तके तयार करणे ही जटील प्रक्रिया आहे. मुलांचा वयोगट, त्याचं भावविश्व, त्यांची आकलन क्षमता, मजकुराची काठिण्यपातळी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन पाठ्यविषयांची निवड करणे आणि सोप्या भाषेत त्यांचे लेखन करणे हे एक प्रकारचे दिव्यच असते.
No comments:
Post a Comment