Sunday, 30 June 2024

अवजड आवघड प्रवास तार पहा

 


शाश्वतचे सुख कसे लाभेल ?

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*


*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*


*🌸  प्रवचने  ::  २७ जून  🌸*


*शाश्वतचे  सुख  कसे  लाभेल  ?*


असे पाहा, एखादा प्रवचन करणारा घ्या; किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या; त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही, तो असमाधानातच असतो. कळू लागल्यापासून आपण सदाचाराने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही, याचे कारण काय ? तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते. आपण नीतिने वागतो ते लोकांच्या भितीने; कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील. लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पापकर्म करणार्‍यालाही समाधान लाभत नाही, कारण त्यालासुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, "देवापाशी काही न्याय नाही; तो अगदी अन्यायी आहे." मी त्याला विचारले, "असे झाले तरी काय ?" त्यावर तो म्हणाला, "मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलो; पण मी फक्त एकमजली घर बांधू शकलो, आणि माझ्या हाताखाली काम करणार्‍या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले !" मी त्याला विचारले, "मग तुम्ही का नाही पैसा खाल्ला ?" त्यावर तो म्हणाला, "मला तसे आवडत नाही; लोक नावे ठेवतील." तेव्हा, जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही. प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो, आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो; मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल ? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडे नेसले, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत ? तसेच, जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. या‍उलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असूनसुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल, तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही.


खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे, विद्वान लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल : एक, देहाने साधूची संगत; दुसरी, संतांच्या वाङ्‍मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण; आणि तिसरी, भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने, आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे.


*१७९ .   जग  काय  म्हणेल  म्हणून  वागणे  याचे  नाव  व्यवहार  ;   भगवंत  काय‌‌  म्हणेल  म्हणून ‌ वागणे ‌ याचे  नाव  परमार्थ‌ .*


*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत पथदर्शी ठरेल

 फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत पथदर्शी ठरेल

- केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल

Ø  फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग’ विषयावर परिषद

        मुंबईदि. ३० : देशात तीन नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून लागू होत असून.

या कायद्यांमुळे प्रत्येक नागरिकास न्याय मिळण्यासाठी सुलभता होईलतसेच फौजदारी न्याय प्रक्रियेत भारत आगामी काळात पथदर्शी ठरेल असा विश्वास केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी व्यक्त केला.

           भारतीय न्याय संहिता 2023भारतीय साक्ष अधिनियम2023आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हे तीन नवीन फौजदारी कायदे 1 जुलै,2024 पासून लागू होतील. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी केंद्र सरकारचे विधी व न्याय मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने मुंबईतील एन.एस.सी.आय. ऑडीटोरियम येथे "फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग" या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी श्री.मेघवाल बोलत होते.

          या परिषदेस मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्यायराजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मनिंद्र मोहन श्रीवास्तवपंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती गुरुमित सिंग संधावालियामुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती चंद्रकांत वसंत भडंगविधी व न्याय मंत्रालयाचे सचिव डॉ.राजीव मनीविधी व न्याय मंत्रालयांच्या अतिरिक्त सचिव डॉ.अंजू राठी राणापोलीस महासंचालक रश्मी शुक्लामुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच विविध राज्यातील उच्च न्यायालयाचे न्यायाधीशपोलिसकेंद्रिय तसेच राज्य विधी अधिकारीप्रबंधकविधी शाखेचे अभ्यासकविद्यार्थी आदी उपस्थित होते.

        केंद्रीय राज्यमंत्री श्री.मेघवाल म्हणाले कीशिक्षेवर भर देणाऱ्या वसाहतवादी प्रवृत्तीतून दंड संहिता तयार झाली. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली  भारतीय नागरिकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून भारतीय न्याय संहिता लागू होत आहे. आजच्या युगात तंत्रज्ञानात मोठे बदल झाले आहेत्यामुळे कायद्यातही सुधारणा करणे आवश्यक असल्याचे श्री.मेघवाल यांनी सांगितले.

        या नवीन तीन कायद्यांबद्दल केंद्रीय राज्यमंत्री श्री.मेघवाल म्हणाले कीभारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता सुधारणा करण्यासाठी संसदीय स्थायी समितीविविध राज्यांची मतेखासदारआमदार त्याचबरोबर सामान्य नागरिकांकडूनही सूचना मागविण्यात आल्या. मागणीनंतर हे विधेयक "विचारविनिमय समिती"कडे सुद्धा पाठविण्यात आले. यासाठी नवी दिल्ली येथे पहिली परिषद घेण्यात आली. त्याचबरोबर गृह मंत्रालयासोबत ५८ बैठकाही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

       श्री.मेघवाल म्हणाले कीयातील तांत्रिक मुद्दे भक्कम आहेत. याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी देशातील १६ हजार पोलीस स्टेशन्स सी.सी.टी.एन.एस. या प्रणालीशी जोडले गेले आहे. या कायद्यात मॉब लिंचींगसंघटित गुन्हेगारीआर्थिक गुन्हेगारीकम्युनिटी सर्व्हिस त्याचप्रमाणे झिरो एफ.आय.आर. आदीबाबत विचार केला गेला आहे. न्याय प्रक्रिया जलद गतीने होण्यासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

        देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षाचा अमृतकाळ देश अनुभवत असून हे नवीन कायदे पथदर्शी ठरतील असेही श्री.मेघवाल यांनी सांगितले.

       या परिषदेस माजी मुख्य न्यायमूर्ती श्री.भडंगमुख्य न्यायमूर्ती श्री.संधावालियामुख्य न्यायमूर्ती श्री.श्रीवास्तवमुख्य न्यायमूर्ती श्री.उपाध्याय यांनीही या कायद्यांबाबत आपले विचार व्यक्त केले.

विधी व न्याय मंत्रालयाचे सचिव डॉ.मनी यांनी प्रास्ताविक केले. या परिषदेच्या उत्तम नियोजनाचे काम विधी व न्याय मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव डॉ.अंजू राठी राणा आणि महाराष्ट्र शासनाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले.

0000

डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्यवाही सुरू

 डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्यवाही सुरू

 - उद्योगमंत्री उदय सामंत

 

            मुंबई,दि.29 : मुंबईत मोठ्या प्रमाणात एडीस डासांची उत्पत्तीस्थाने आहेत. ती नष्ट करण्यासाठी कार्यवाही सुरू असून राज्यभरात डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            याबाबतची लक्षवेधी सदस्य  प्रसाद लाड यांनी मांडली होती.

        मंत्री श्री.सामंत  म्हणाले कीमुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षी १४ मृत्यू डेंगूने झाले होते यंदा डेंगूने एकही मृत्यूची नोंद नाही. डेंगू या आजाराबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. गेल्या वर्षी १ लाख ३१ हजार ९८० एडीस डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली होती. यंदा ४३,४२८ एडीस डासांची उत्पत्तीस्थाने आतापर्यंत नष्ट केली आहेत. अळीनाशक फवारणी देखील केली आहे. तसेच डेंगूचा प्रादुर्भाव हा राज्यभरात दिसतो. यासाठी राज्याचा सार्वजनिक विभागही डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

        पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे. यातच पंढरपूरला जाणारे अनेक वारकरी पुण्यात दाखल होत आहेत. त्याअनुषंगाने त्वरीत उपाययोजना करण्याची सूचना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शासनास केली. यावर स्थानिक प्रशासनास उचित कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले जातील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

0000

 

८ व्हा आपली शाळा

 तिसरा अंतरा ऐकला अन अंतरबाह्य हललो.अप्रतिम - nostalgic.ज्यांनी मराठी शाळेमध्ये शिक्षण घेतले आहे,त्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही.धन्य ती माझी मराठी शाळा👌😭🙏


नागरिकांनी रस्ते अपघाताबाबत ९८३३४९८३३४,९५०३२१११००,९५०३५१११०० या महामार्ग सुरक्षा हेल्पलाईनवर संपर्क साधावा,

 रस्ते अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

 

            मुंबईदि.29 :  राज्यात विशेषतः मोठ्या महानगरांमध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. रस्ते अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी पोलीस आणि परिवहन विभागाने संयुक्तपणे ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

            विधानभवनात आज दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे ड्रंक आणि ड्राईव्ह रस्ता सुरक्षा याबाबत बैठक घेण्यात आली. त्यावेळी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवारराज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारीप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या कीरस्ते अपघाताची संख्या लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी पोलिस विभाग आणि परिवहन विभाग यांनी सायंकाळी सहा ते ते रात्री बारा वाजेपर्यंत

संयुक्तपणे तपासणी मोहीम राबवावी. त्याचे सूक्ष्म नियोजन करतानाच मद्यपाशन करून वाहन चालविणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी. विशेषत: मोठमोठ्या शहरालगतच्या ग्रामीण भागात अवैध दारू दुकानअवैध धाबे यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अल्पवयीन वाहन चालकांवरही नियमाप्रमाणे कारवाई करावी.

            पुणेनाशिकछत्रपती संभाजीनगर आणि नागपूर शहरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी.तसेच वाहतूक नियमांची समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ सूचना फलक लावणे आवश्यक आहे. ठिकठिकाणाच्या सिग्नल यंत्रणेची वेळोवेळी तपासणी करावी. ग्रामीण भागात नागरिकांच्या सोयीसाठी सिग्नल यंत्रणेचे सुलभीकरण करावे. ग्रामीण भागात एसटी बसस्थानकाच्या ठिकाणी सूचना फलक  आणि सिग्नल यंत्रणा उभारण्याची कार्यवाही करावी.

            नागरिकांनी रस्ते अपघाताबाबत ९८३३४९८३३४,९५०३२१११००,९५०३५१११०० या महामार्ग सुरक्षा हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ.गोऱ्हे यांनी केले.

            परिवहन आयुक्त श्री.भीमनवार यांनी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची सादरीकरणाव्दारे माहिती दिली.तसेच यावेळी बोलताना जास्तीत जास्त अपघात हे संध्याकाळी ६ ते ९ आणि ९ ते १२ च्या सुमारास होत असून, आपण अपघात झालेल्या ठिकाणांचे ब्लॅक स्पॉट शोधत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी बोलताना रवींद्रकुमार सिंगल (पोलीस आयुक्तनागपूर) यांनी सांगितले की११२ आणि १०८ हेल्पलाईन संदर्भात जागृती मोहीम करण गरजेचे असल्याचे  सांगितले.

तर प्रवीण पवार (पोलिस आयुक्तछत्रपती संभाजीनगर) यांनी बोलताना संभाजीनगर मधील अपघातच प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी झाले असल्याचे सांगितले. ब्लॅक स्पॉट संदर्भात पाहणी पूर्ण झाली असल्याचे त्यांनी सांगितले

            यावेळी बैठकीत बोलताना  अधिकारी मनोज पाटील (अतिरिक्त आयुक्त,पुणे) यांनी आतापर्यंत ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणातील १६८२ लोकांवर कारवाई केल्याचे सांगितले.तसेच पुढच्या तीन महिन्यांत ब्लॅक स्पॉट शोधून अहवाल सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माझी लाडकी बहिण योजना

 


सत्संग आणि आई ....*

 *सत्संग आणि आई ....*


दुपारच्या निवांत क्षणी फोन वाजला. स्क्रीनवर "आई" नाव वाचून मी सुखावले. आईबरोबर गप्पा म्हणजे वैचारिक मेजवानी. हा आनंदाचा ठेवा लुटायला मी नेहमी अधीर असते. 


माहेर दूर असल्याने प्रत्यक्ष भेटीचे योग दुर्लभच, त्यामुळे ह्या शब्दभेटीवर आम्ही मायलेकी समाधान मानतो.

        

ख्याली खुशालीची जुजबी चौकशी झाल्यावर आईने सांगितले, अगं, नुकतंच *गुरुचरित्राचे कथाप्रवचन* ऐकण्याचा योग आला. त्यातील सगळ्याच कथा अद्भभूत. ऐकताना तुझी आठवण झाली, म्हणून फोन केला.

        

आईकडून गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून मी खुश.

 

*गुरुभक्ती, नामसाधना, सत्संग*


असे अनेक विषय तिच्या रसाळ गप्पांतून मला प्रसन्न बनवत होते. आई सांगत होती, 


समोरच्या 'श्रावणधारा' हौसिंग सोसायटीत हा प्रवचन सोहळा संपन्न झाला. रोज होणाऱ्या कथांतून गुरूभक्ती - श्रद्धा यांचे दाखले देत किर्तनकार श्री. विवेकबुवा गोखले ( नृसिंहवाडी - जि. कोल्हापूर ) अवीट प्रवचन करीत होते. त्यांनी सांगितलेली घटना,

        

श्री. गोखलेबुवांचे एक मित्र, उभयतां पती-पत्नी वेंगुर्ल्याला आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. त्या डॉ. सौ. कडे आलेली ही केस.

        

साधारण चाळीशीच्या घरात वय असणारी एक अपटूडेट स्त्री त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी आली. तिला एका विचित्र समस्येला सामोरं जावं लागत होतं. गेल्या सहा महिन्यांपासून त्या स्त्रीला पुरूषां प्रमाणे दाढी - मिशा येत होत्या. दाट दाढी आणि मिशा.

       

ही महिला उच्चशिक्षित, मोठ्या कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी. कंपनीत तिच्या हाताखाली अनेक सुशिक्षित, तज्ज्ञ स्टाफ. माहेरही तसेच वेल एज्यूकेटेड. दहा लाख रुपये पगार घेणारी ही स्त्री ह्या विचित्र प्रकाराने गोंधळली. 


अनेक डॉक्टर्स केले, परदेशात जाऊन विविध प्रकारच्या टेस्ट केल्या, निदान अनुत्तरित. उपाय दिशाहीन. 

       

पुरूषांच्या चेहऱ्यावर वाढणाऱ्या दाढी-मिशी सारखी ही दाढीमिशी रोज शेव्हिंग करून ह्या महिलेला आँफिसला जावे लागे. कोणी तरी तिला वेंगुर्ल्याच्या ह्या डॉक्टरांची माहिती दिली,आणि त्या वेंगुर्ल्याला आल्या. 


ह्या उच्चपदस्थ ,स्त्रीची अनोखी समस्या डॉ. सौ. नी लक्षपूर्वक ऐकली. तिला विश्वासात घेत तिची केसहिस्टरी जाणून घेतली. तिचं शिक्षण, बालपण, ध्येय, तिचा स्वभाव, आवडनिवड सारं बारकाईने जाणून घेतलं. नाडी परिक्षा केली आणि संध्याकाळी पुन्हा यायला सांगितले.

        

सांगितलेल्या वेळी ती महिला अधिकारी हजर झाली. यावेळी डॉ. सौ. तिच्याशी मन मोकळेपणाने बोलल्या. त्या म्हणाल्या, "हे पहा मॅडम, तुम्ही सांगितलेल्या माहितीचा मी सखोल अभ्यास केला, 


त्यावरून मला जाणवलं, ते असं की, तुम्ही उच्चशिक्षित, नोकरी करणाऱ्या, अनेक अधिकारी व्यक्तींची बॉस ही तुमची प्रतिमा. कंपनीत जबाबदारीच्या पदावर काम करताना कंपनीचा उत्कर्ष व्हावा, ह्या भूमिकेतून तुम्हाला सदैव ठाम रहावं लागत असणार. कठोर निर्णय शिस्त आणि जोखमीने अंमलात आणावे लागत असतील. तो ताणतणाव, बॉसचा एटिट्युड हे सारं तुमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलंय, इतका तो बाणा तुमच्या नसानसात भिनलाय.

        

खरं तर एखादी जोखीम अंगावर घेणं, हे पुरूषी स्वभावाचे लक्षण आहे. *स्त्री ही प्रकृती आणि पुरुष निवृत्तीदर्शक आहे. लज्जा, सौजन्य, मार्दव हे स्त्रीचे अंगभूत गुणधर्म* तुमच्या नोकरीमुळे तुम्ही नकळतपणे दडपले आणि ऑफिस-रूटीनचे पुरूषी गुणधर्म इतके रोमरोमी भिनवले; 


की २०-२२ वर्षांच्या नोकरीत वावरताना या स्वभावाने तुमचे *हार्मोन्स* बदलले. 'स्त्रीत्व' संपून ते 'पुरुषी' बनू लागले. त्याचं मूर्तरुप म्हणजे चेहऱ्यावरील दाढी-मिशा.


बाई दचकल्या. हे निदान अनपेक्षित होतं तरीही वास्तव होतं. डॉक्टर मॅडम बोलत होत्या, "यावर उपाय आहे, 


तुमचा अँटिट्युड बदला. कपाळावर लाल रंगाची टिकली लावा, हातात एकेक तरी बांगडी घाला. एकपदरी का असेना, पण गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र घाला, त्यात चार मणी, दोन वाट्या काळ्या मण्यासह दिसून येऊ देत. पायात जोडवी घाला. 'स्त्री' सारख्या दिसा.


केस मोकळे ठेेवू नका. आपल्याला जाणवत नाही, पण वाईट शक्ती मोकळ्या केेसांकडे चटकन् आकर्षित होतात. इतके करून पहा अन् ही गोळ्या औषधे घ्या. दीड महिन्याच्या अखेरीस दाखवून जा.


बाई स्तंभित. डॉक्टरांनी सुचवलेले उपाय अनुसरले आणि दिड महिन्यात फरक जाणवला. दाढी वाढण्याचे प्रमाण बरेच कमी झाले. दर दोन दिवसांनी करावी लागणारी शेव्हिंग आता आठवड्याने होत होती, तीही विरळ.

         

डॉक्टर मॅडमनी हीच वर्तणूक सदैव ठेवण्याचा सल्ला दिला. स्त्रीचे सौभाग्य अलंकार फक्त शोभेसाठी नाहीत तर स्त्रीत्वाच्या संरक्षणासाठी आहेत, हे पटवून दिले. तीन चार महिन्यांत ह्या पेशंट पूर्णपणे रिकव्हर, नाँर्मल झाल्या.

         

आई थांबली, म्हणाली, घटना ऐकताना मला तुझी आठवण आली. तिने तिच्या नातींना आवर्जून ही घटना ऐकवली.

         

शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या लेबलखाली आपली संस्कृती कुठे गहाण टाकतोय आपण ? मग उद्भवतात, नको ते आजार, मानसिक त्रास. आणि दवाखान्याची वारी.

         

*सत्संगाचं महात्म्य सांगणाऱ्या आईला* धन्यवाद देत मी फोन ठेवला.

मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी

 मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे पंढरीची वारी

- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबई, दि. २९ : हेचि दान देगा देवा...तुझा विसर न व्हावा....विठ्ठलाचा विसर होऊ नये यासाठी निरंतर वारी सुरू आहे. मनावर विजय प्राप्त करण्याची ऊर्जा म्हणजे वारी होय. राज्याच्या जनतेची सेवा करून त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे बळ मिळावे. अशा शब्दांत  सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भावना व्यक्त केल्या.

            वारकऱ्यांचे प्रबोधन करावे आणि शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी सांस्कृतिक विभागामार्फत दोन चित्ररथ आषाढी वारीत सहभागी होणार आहेत. या चित्ररथाचा प्रारंभ आज मंत्रालय प्रांगणातून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. वारीत आस्थाअस्मिता आणि परंपरा घेऊन जाण्याचे काम आपले कलापथक करीत असल्याचा आनंद व्यक्त करीत वारीत जाणाऱ्या कलाकारांना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या.

            यावेळी प्रधान सचिव विकास खारगेसांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरेविभागाच्या उपसचिव नंदा राऊत यासह मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले कीइतरांनी हेवा करावा अशी राज्याची परंपरा आहे. वारकऱ्यांचे भाव पाहिले की कळते जगात सर्वात सुखी वारकरी आहेत. आस्था आणि अस्मितेचे प्रतिक असलेल्या पंढरपूरच्या वारीला वैशिष्ट्यपूर्ण अध्यात्मिक वारी म्हणून जागतिक नामांकन मिळावे यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे पंढरपूरची वारी होय. पंढरपूरची वारी अनुभवण्यासाठी देशातून आणि परदेशातून भक्त येत असतात. या चित्ररथांद्वारे संत सखूसंत निर्मलासंत कान्होपात्रासंत जनाबाईसंत मुक्ताबाईसंत महदंबा या स्त्री संतांची महती त्यांच्या अभंगांद्वारे भक्तांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. पोवाडापथनाट्य आणि भारूड या कलाप्रकारांच्या माध्यमातून भक्तगणांचे प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच पुणे येथून आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात उपाययोजनाआपत्ती आल्यास घ्यावयाची काळजीशासकीय मदत यासंदर्भातील माहिती चित्ररथामार्फत देण्यात येणार आहे.

            कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण...नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा....या विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला या संत केशवदास यांच्या रचनांवर कलापथकाने सादरीकरण केले. 'ज्ञानेश्वर महाराज की जयतुकाराम महाराज की जयया गजरात मंत्रालय परिसर दुमदुमला होता. पृथ्वी थिएटरच्या कला पथकातील २४ कलाकारांनी यावेळी सादरीकरण केले. शाहीर यशवंत जाधव यांनी अभंग सादर केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभेत निवेदन

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे विधानसभेत निवेदन

 

            मुंबईदि.२९ छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दरवर्षी तिथीनुसार करण्याची घोषणा रायगड येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आली आहे. शासनाकडून रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचे ठरवले असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.

            ही बाब केवळ छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्यापुरतीच मर्यादित आहे. किल्ले रायगड येथे असलेल्या शिलालेखावर राज्याभिषेकाची तारीख नसून तिथी ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी असा उल्लेख करण्यात आलेला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत निवेदनातून दिली.

             याबाबत विधानसभा सदस्य  जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला

जाहिरात फलकाच्या कायद्यांत सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणार

 जाहिरात फलकाच्या कायद्यांत सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करणार

- उद्योग मंत्री उदय सामंत

            मुंबई, दि. २९ : सार्वजनिक रस्ते व पदपथावरुन दृष्यमान होणाऱ्या जाहिरात फलकांचे ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आलेले असून जाहिरात फलकांच्या कायद्यासंदर्भात सुधारणा करण्यासाठी समिती गठीत करण्यात येणार आहे. याबाबत तज्ञांची नावेकाही सूचना आल्यास त्याचा स्वीकार करण्यात येईलअसे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत सांगितले.

            घाटकोपरमुंबई येथे १३ मे २०२४ रोजी महाकाय जाहिरात फलक पेट्रोलपंपावर कोसळून झालेल्या अपघाताबाबत उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.सामंत बोलत होते.

            मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले कीभविष्यात अशी घटना घडू नये यासाठी शासन प्रयत्नशील असून डिजीटल होर्डींग्ज संदर्भातही सर्वेक्षण केले जाईल. अनधिकृत असलेल्या होर्डिंग्जवर नियमानुसार कारवाई केली जाईल. या अपघातात जखमी व्यक्तींपैकी ज्या १३ व्यक्तिंनी ७ दिवसापेक्षा जास्त उपचार घेतले त्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून रु.१६ हजार प्रमाणे व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत प्रत्येकी एकूण रु.२ लक्ष १६ हजार इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे. जखमी व्यक्तींपैकी १३ व्यक्तिंनी ७ दिवसापेक्षा कमी उपचार घेतले त्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून रु.५ हजार ४०० प्रमाणे व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत प्रत्येकी रु.२ लक्ष इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे. या अपघात ग्रस्तांपैकी १७ मृत व्यक्तिंच्या वारसांना राज्य शासनाद्वारे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी रु.५ लाख या प्रमाणे एकूण रु.८५ लाखराज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून प्रत्येकी रु. ४ लाख याप्रमाणे एकूण रु.६८ लाख व पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधी अंतर्गत प्रत्येकी रु.२ लक्ष इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यानुसार मृत व्यक्तिंच्या वारसांना प्रत्येकी रु.११ लाख इतके अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

            या अपघाताच्या अनुषंगाने राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडून प्राप्त अहवालातील निष्कर्षांच्या आधारे शासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. समितीद्वारे पुढील चौकशीची कार्यवाही सुरु आहे तसेचतत्कालीन पोलीस आयुक्तलोहमार्ग मुंबई यांच्याकडून प्रथमदर्शनी अनियमितता झाल्याचे निर्दशनास आल्याने त्यांना शासनाने निलंबित केले आहे. संबंधित घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

            बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियमानुसार सार्वजनिक रस्ते व पदपथावरुन दृश्यमान होणाऱ्या जाहिरात फलकास परवानगी घेणे अनिवार्य आहे. शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आकाशचिन्हे जाहिरात प्रदर्शित करण्याकरिता नियमन व नियंत्रण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे उचित कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती, श्री.सामंत यांनी यावेळी दिली.

            या चर्चेत सदस्य सुनील शिंदेजयंत पाटीलशशिकांत शिंदेअनिल परबभाई जगतापअभिजित वंजारीसचिन अहिरआदी सदस्यांनी सहभाग घेतला.

००००

श्रीमती वंदना थोरात/विसंअ/


महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचे काम शेतकऱ्यांचे समाधान केल्यावरच

 महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाचे काम

शेतकऱ्यांचे समाधान केल्यावरच

-   सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे 

 

            मुंबई, दि. २९ : महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पवनार ते  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या दरम्यान होणा-या शक्तीपीठ महामार्गाचे काम संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्याचसोबत स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यानंतरच पुढे न्यावेअसे मुख्यमंत्री यांचे निर्देश असून जनभावनेचा आदर करुनच कार्यवाही करण्यात येईलअसे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत  सांगितले.

            राज्यात नव्याने शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहेयासंदर्भात सदस्य सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री श्री.भुसे बोलत होते.

            श्री. भुसे यांनी सांगितले की हा महामार्ग महत्वपूर्ण असून लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जात असून पुढे गोवा राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. १२ जिल्ह्यांमधील विविध देवस्थानेसंताची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबाजोगाई स्थित मुकुंदराज स्वामीजोगाई देवी तसेच औंढ नागनाथ व परळी वैद्यनाथ येथील २ ज्योर्तिलिंग व महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपुर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही जोडले जाणार आहेत. तसेच कारंजा (लाड)माहूरअक्कलकोटगाणगापुरनरसोबाची वाडीऔदुंबर ही दत्त गुरुची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल व इतर सर्व दळण-वळण कमी वेळेत होईल. वर्धा ते सिंधूदुर्ग हा प्रवास सध्या १८ तासांत होतो तो या महामार्गामुळे अवघ्या आठ तासात शक्य होणार आहे.यातुन वेळेचीइंधनाची बचत होईल व महामार्ग परिसराचा विकास होण्यास मदत होईलअशी माहिती मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिली.

            उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुढील आठवड्यात याबाबत सदस्यांसोबत  सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी बैठक घ्यावीअसे सूचित केले.

            या लक्षवेधीत सदस्य  शशिकांत शिंदे,भाई जगताप आदी सदस्यांनी सहभाग घेतला.

 

0000

आळंदी येथे तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 आळंदी येथे तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

 

            पुणेदि. : २९: आळंदी नगरपालिका निधीतून उभारण्यात आलेल्या तुळशी वृंदावन वास्तुशिल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

            यावेळी खासदार श्रीरंग बारणेमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटेनगर परिषदचे मुख्याधिकारी कैलास केंद्रेआळंदी संस्थानचे पदाधिकारीनगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी अंतर्गत वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटनही करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्यावतीने वारकऱ्यांना  छत्र्यांचे वितरण करण्यात आले.

            मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया निःशुल्क असून गेल्या २ वर्षात २७५ कोटींची वैद्यकीय मदत गरजूंना देण्यात आली आहे. त्यामुळे ३५ हजार रुग्णांचे प्राण वाचले आहेत.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कोणत्या आजारांसाठी देण्यात येतो व निधी  मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहितीही यावेळी देण्यात आली.

000


 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन 'ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन

'ज्ञानोबा माऊली'च्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान








 

            पुणेदि.२९ :  टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी....  'ज्ञानोबा माऊली', 'माऊलीमाऊलीचा गजर.... डोक्यावर तुळशी वृंदावनहाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी...अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

            आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळखासदार श्रीरंग बारणेप्रधान सचिव प्रवीण दराडेविभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवारजिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटीलप्रमुख जिल्हा  व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजननगर परिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रेश्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड. राजेंद्र उमापविश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथविश्वस्त डॉ.भावार्थ देखणेगुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार - आरफळकरह.भ.प राणा महाराज वासकरह.भ.प संग्राम बापू भंडारे महाराज आदी उपस्थित होते.

            मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा 'याचि देही याचि डोळाअनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

            अर्थसंकल्पीय अधिवेशनात वारकरी महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिकसांस्कृतिक परंपरा असलेल्या  पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणावारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपयांचे अर्थसाह्य आदी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल वारकरी संत महंत पाईक संघटना मधील प्रमुख महाराज यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वारकरी संप्रदायातील  मान्यवरांसोबत संवाद साधला. वारकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसे मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये लाभ देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल येथील महिलांच्यावतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

*वारकऱ्यांसाठी शासनातर्फे सुविधा

            आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनमंदिर संस्थानपुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोयविजेची सोयवैद्यकीय पथकेपालखी मार्गाचे वेळापत्रकमंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणासुलभ शौचालयपोलीस मदत केंद्रअग्निशमन यंत्रणारुग्णवाहिकानदी पात्रात बोटीची व्यवस्थासूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनिक्षेपणाद्वारे  सूचनाही देण्यात येत आहे.

0000

Saturday, 29 June 2024

तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या जनजागृतीसाठी रविवारी परिषदेचे आयोजन

 तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या जनजागृतीसाठी

रविवारी परिषदेचे आयोजन

 

            मुंबई,दि. 29 : भारतीय न्याय संहिता 2023भारतीय साक्ष अधिनियम, 2023आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हे तीन नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून  देशभर लागू होणार आहेत. या कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावीयासाठी केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाने एनएससीआय सभागृहवरळीमुंबई येथे रविवारी (30 जून 2024) फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग या विषयावर परिषदेचे आयोजन केले आहे.

            पूर्वीचे कायदे रद्द करताना नागरिक केंद्रीत आणि लोकशाहीच्या गरजा पूर्ण करणाऱ्या या नवीन तीन गुन्हेगारी कायद्यांना लागू करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 25 डिसेंबर 2023 रोजी मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहिता 2023भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023आणि भारतीय साक्ष अधिनियम, 2023 हे कायदे भारतीय दंड संहिता (1860 चा 45), फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 (1974 चा 2) आणि भारतीय पुरावा कायदा, 1872 (1872 चा 1) या पूर्वीच्या फौजदारी कायद्यांची जागा घेतील.

            या परिषदेचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकेंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवालउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या उपस्थितीत होणार आहे. या परिषदेला गुजरातपंजाबहरियाणाराजस्थानजम्मू-काश्मीरलडाख येथील न्यायमूर्तीविधी व न्याय मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

            दिवसभर चालणाऱ्या या परिषदेची सुरूवात उद्घाटन सत्राने होईल. त्यानंतर प्रत्येक कायद्यावर एक सत्र होणार आहे. या परिषदेला विविध उच्च न्यायालयेजिल्हा आणि कनिष्ठ न्यायालयांचे न्यायाधीश आणि माजी न्यायाधीशवकीलपोलीसकायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीचे प्रतिनिधीसीबीआयईडीआणि राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी यांचा समावेश असणारे प्रतिनिधी उपस्थित असतील. विधी विद्यापीठातील विद्यार्थी आणि प्राध्यापक देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा तंत्रज्ञानाच्या सहायाने डाटा संकलन पद्धती विकसित कराव्यात

 अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा

तंत्रज्ञानाच्या सहायाने डाटा संकलन पद्धती विकसित कराव्यात

-अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा

 

मुंबई, दि. २९ :- विकासाच्या विविध योजना राबविताना डाटा संकलन आणि विश्लेषणाच्या नवीन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे, असे नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.राजगोपाल देवरा यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज पद्मविभूषण प्रा. प्रशांत महानलोबीस यांच्या जन्म दिनानिमित्त नियोजन विभागाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयातर्फे १८ व्या राष्ट्रीय सांख्यिकी दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संचालनालयाचे संचालक डॉ. जितेंद्र चौधरीअपर संचालक (समन्वय) कृष्णा फिरकेउपसचिव दिनेश वाघभारतीय प्रौद्योगिक संस्थानचे सहायक प्राध्यापक परमेश्वर उदमले आदींसह संचालनालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. देवरा म्हणाले कीप्रा. प्रशांत महानलोबीस यांनी जी सांख्यिकीची पद्धत सुरू केली त्याचा आजही आपल्याला चांगला उपयोग होत आहे. या पारंपरिक पद्धतीचा अभ्यास करून नवीन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला असल्याने आपण त्यांचा वापर करत असताना एक नवीन डेटा तयार करीत असतो. पण तोच डेटा अचूक करण्यासाठीच्या पद्धतीचा अभ्यास करून त्याचा अवलंब करणे गरजेचे आहे.

डॉ. चौधरी म्हणाले कीसांख्यिकी माहिती नव युवकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. योजना राबविताना सांख्यिकीची अत्यंत आवश्यकता आहे. या वर्षीच्या सांख्यिकी दिनाची संकल्पना विदा (Use of Data for decision making ) अशी ठरविली आहे.

प्रा. उदमले यांनी ग्रामीण भागासाठी विविध कामांच्या डेटा संकलनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे पर्यायाबाबत माहिती दिली. सांख्यिकीय माहितीवर आधारित महाराष्ट्राची आर्थिक आकडेवारी २०२३राज्यातील जिल्ह्यांचे व भारतातील राज्यांचे निवडक निर्देशकपायाभूत सुविधा सांख्यिकी २०२१-२२ आणि २०२२-२३,शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोष अहवाल २०२३महाराष्ट्र राज्य सांख्यिकीय गोषवारा २०१९-२०राज्य शाश्वत विकास ध्येये प्रगती अहवाल २०२२-२३शाश्वत विकास ध्येये कॉमिक, न्यू सीरीज ऑन स्टेट डोमेस्टिक प्रॉड्यक्ट ऑफ महाराष्ट्रडीस्ट्रिक्ट डोमेस्टिक प्रॉडक्ट ऑफ महाराष्ट्रॲनालिसिस ऑफ स्टेट बजेट ऑफ महाराष्ट्रइस्टिमेट ऑफ ग्रोस फिक्स्डकॅपिटल फॉर्मेशनवार्षिक उद्योग पाहणी अहवाल २०२०-२१ या प्रकाशनांचे विमोचन यावेळी करण्यात आले.

०००

धामणा कारखान्यातील स्फोट प्रकरणी मृत कामगारांच्या वारसांना अधिक मदत देण्याबाबत विचार करणार

 विधानसभा लक्षवेधी :-

धामणा कारखान्यातील स्फोट प्रकरणी मृत कामगारांच्या वारसांना

अधिक मदत देण्याबाबत विचार करणार

- कामगार मंत्री सुरेश खाडे

 

            मुंबईदि.२९ : नागपूर जिल्ह्यातील धामणा (तुरागोंदी) येथील चामुंडी एक्सप्लोसिव्हज या कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या वारसांना संबंधित कंपनी व्यवस्थापनामार्फत २५ लाख आणि मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपये अर्थसाह्य देण्यात आले आहे. याबाबत अधिक मदत देण्याबाबतच्या मागणीवर राज्य शासन निश्चित विचार करेलअशी माहिती कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज विधानसभेत दिली. तसेच या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनधिकृत कारखान्याची विशेष तपासणी मोहीम राबविण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

            याबाबतविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

 

            मंत्री श्री. खाडे म्हणाले कीदि. १३ जून २०२४ रोजी या कारखान्यात फटाक्यांच्या वातीचे पॅकिंगचे काम सुरु असताना आग लागली व स्फोट झाला. या घटनेमध्ये ९ कामगार गंभीररित्या भाजले. त्यापैकी ५ कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू झाला व उर्वरित ४ जखमी कामगारांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या इमारतीमधील स्पिनिंग विभागात तयार होणाऱ्या फटाक्याच्या वाती पॅकिंग विभागात आणून त्या आवश्यक लांबीमध्ये कापून या वार्तीचे बंडल तयार केले जातात. ज्वलनशील असलेल्या फटाक्याच्या वातींचे बंडल प्लास्टिकच्या पिशवीत ठेऊन या पिशवीचे इलेक्ट्रीक सिलिंग मशीनद्वारे पॅकिंग सुरु असताना ज्वलनशील फटाक्याची वात गरम सिलिंग मशीनच्या संपर्कात आल्याने तेथे आग लागली. ही आग लगत असलेल्या पोर्टेबल मॅगझिन रुममध्ये पसरल्याने गन पावडरच्या ५० किलोचा साठा असलेल्या डब्यांमध्ये स्फोट झाला. संबंधित कारखान्याच्या व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सध्या हा कारखाना बंद करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

 

            या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य अनिल देशमुखयामिनी जाधवविश्वजित कदमराम कदमअस्लम शेखजितेंद्र आव्हाड आणि नाना पटोले यांनी सहभाग घेतला.

आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देणार

 आर्थिक सहाय्याच्या योजनांचे पैसे महिन्याच्या ५ तारखेला

लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देणार

- उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            मुंबईदि. २९ :- राज्यातील सर्वसामान्यवंचित-उपेक्षितआर्थिक दुर्बल घटकांसाठी शासनाने विविध योजना सुरु केल्या आहेत. पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ वेळीच मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनासंजय गांधी निराधार अनुदान योजनादिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांचे पैसे प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात येतीलअशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सदस्य बच्चू कडू यांच्याकडून दुर्बल घटकांना वेळेवर आर्थिक सहाय्य मिळत नसल्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांसंदर्भात माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले कीअधिवेशनातील आजच्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर वित्त विभागाच्या सचिवांशी चर्चा करून याबाबतच्या वस्तुस्थितीची माहिती घेण्यात येईल. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनासंजय गांधी निराधार अनुदान योजनादिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्याच्या योजनांसाठी राज्य शासनाने निधीची भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे या योजनांमधून मिळणारे आर्थिक सहाय्य वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे. सर्वच आर्थिक योजनांचे पैसे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मिळण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येतीलअसेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

-------०००-----


कोणताही खेळाडू शासकीय सेवेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणार

 कोणताही खेळाडू शासकीय सेवेच्या लाभापासून

वंचित राहणार नाही याची काळजी घेणार

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

 

            मुंबईदि. 29 : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचे अनेक खेळाडू उत्तम कामगिरी करीत आहे. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविण्याऱ्या या खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्दे समाविष्ट करण्यात येतीलअसे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले.

            उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या माध्यमातून सदस्य हिरामण खोसकर यांच्याकडून खेळाडू कविता राऊत हिला उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपअधीक्षक पदावर नोकरी देण्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यासंदर्भात माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले कीराज्यातील विविध खेळांनाखेळाडूंना शासनाकडून नेहमीच प्रोत्साहन देण्यात येत आहे. ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्तम कामगिरी करूनपदक प्राप्त करून राज्याचा लौकिक वाढविला आहेत्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचे निकषही निश्चित करण्यात आले आहेत. सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन या निकषांमध्ये आणखी काही मुद्दे समाविष्ट करण्याबाबत निश्चित विचार करण्यात येईलअशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

विमा भरण्यासाठी आगाऊ पैसे मागणाऱ्यांची कृषी हेल्पलाइनच्या व्हाट्सअपवर किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी

 विमा भरण्यासाठी आगाऊ पैसे मागणाऱ्यांची कृषी हेल्पलाइनच्या व्हाट्सअपवर

किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी

                               - कृषीमंत्री धनंजय मुंडे

 

            मुंबई, दि.29 : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी एक रुपयात पीक विमा भरणे प्रक्रिया सुरु आहे. मात्र राज्यात काही ठिकाणी सीएससी केंद्र चालक हे शेतकऱ्यांकडून एक रुपयाच्या वर अवैधरित्या काही आगाऊ रक्कमा वसूल करत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आगाऊ पैसे वसूल करणाऱ्या केंद्र चालकांची पुराव्यासह तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई करणार असून अशा लोकांची अजिबात गय केली जाणार नाहीअसा इशारा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

            मंत्री श्री. मुंडे यांनी शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागणाऱ्या सीएससी केंद्र चालकांची शक्य असेल त्या पुराव्यासह राज्य शासनाचा कृषी हेल्पलाइन व्हाट्सअप क्रमांक 9822446655 या क्रमांकावर व्हॉट्सअप द्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार द्यावी, असे आवाहन केले आहे. अशा केंद्र चालकांवर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल.

            शेतकऱ्यांना पीक विम्याचा एक अर्ज भरण्यासाठी एक रुपया इतकीच रक्कम पोर्टलवर भरणे अपेक्षित आहे, तर यासाठी संबंधित केंद्र चालकाला शासनाकडून प्रति विमा अर्ज 40 रुपये मानधन दिले जाते. मात्र, काही केंद्र चालक सात-बारा ऑनलाइन काढणेपेरणी प्रमाणपत्र यासारख्या बाबींच्या नावाने शेतकऱ्यांना आगाऊ पैसे मागत असल्याच्या तक्रारी येत आहेतया विरोधात आता मंत्री श्री. मुंडे यांनी कडक भूमिका घेतली आहे.

000000

डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्यवाही सुरू

  विधानपरिषद लक्षवेधी सूचना क्रमांक 2

 

डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्यवाही सुरू

 - उद्योगमंत्री उदय सामंत

 

            मुंबई,दि.29 : मुंबईत मोठ्या प्रमाणात एडीस डासांची उत्पत्तीस्थाने आहेत. ती नष्ट करण्यासाठी कार्यवाही सुरू असून राज्यभरात डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत सांगितले.

            याबाबतची लक्षवेधी सदस्य  प्रसाद लाड यांनी मांडली होती.

        मंत्री श्री.सामंत  म्हणाले कीमुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून गेल्या वर्षी १४ मृत्यू डेंगूने झाले होते यंदा डेंगूने एकही मृत्यूची नोंद नाही. डेंगू या आजाराबाबत सातत्याने जनजागृती केली जाते. गेल्या वर्षी १ लाख ३१ हजार ९८० एडीस डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट केली होती. यंदा ४३,४२८ एडीस डासांची उत्पत्तीस्थाने आतापर्यंत नष्ट केली आहेत. अळीनाशक फवारणी देखील केली आहे. तसेच डेंगूचा प्रादुर्भाव हा राज्यभरात दिसतो. यासाठी राज्याचा सार्वजनिक विभागही डेंगू प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे, असेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

        पुणे जिल्ह्यात झिका व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आले आहे. यातच पंढरपूरला जाणारे अनेक वारकरी पुण्यात दाखल होत आहेत. त्याअनुषंगाने त्वरीत उपाययोजना करण्याची सूचना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शासनास केली. यावर स्थानिक प्रशासनास उचित कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले जातील, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगित

Featured post

Lakshvedhi