भारतीय ज्ञानाचा खजिना
*सूर्य मंदिरांचे गूढ*
- प्रशांत पोळ
'सूर्य' या शब्दातच मुळात गूढता भरलेली आहे. आज एकविसाव्या शतकाचा पाव हिस्सा संपत आल्यानंतरही, सूर्याबद्दलचे आकर्षण आणि बऱ्याच प्रमाणात अज्ञान, अजूनही कायम आहे.
मानव जातीच्या उन्नतीच्या आणि उत्क्रांतीच्या काळात, जवळपास सर्वच जमाती या निसर्गपूजक होत्या. दक्षिण अमेरिकेतील इंका / माया संस्कृती असो, ग्रीक आणि इजिप्शियन सभ्यता असो की रोमन, हिंदू आणि चिनी परंपरा... सर्वत्र निसर्गाच्या पूजेबरोबरच सूर्याची पूजाही होत होती. त्या सुरुवातीच्या काळात, तत्कालीन मानव जातीला हे उमजले असेल की आपल्याला मिळणारी ऊर्जा ही सूर्यापासून येते. दिवस / रात्र आणि ऋतूंचे बदलही सूर्यामुळे होतात. त्यामुळे वेगवेगळ्या नावांनी सूर्यदेवतेची उपासना ही सर्व ठिकाणी होत होती. युरोपियन्सनी या निसर्गपूजकांना सरसकट 'पेगन' हे लेबल लावले होते, जे तुच्छतादर्शक आणि हीन लेखणारे होते.
भारतातही सूर्याची उपासना आदी काळापासून होतेय. यजुर्वेदात एक सूक्त आहे - 'सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च' (७ / ४२) अर्थात 'सूर्याला सर्व स्थावर - जंगम पदार्थांचा आत्मा' म्हटले आहे. शुक्ल यजुर्वेदात 'सूर्य सूक्त' किंवा 'मैत्र सूक्त' या नावाने एकूण १७ श्लोक दिलेले आहेत. *अर्थातच भारतात होणारी सूर्य पूजा ही फक्त एखाद्या अनाकलनीय निसर्ग देवाची पूजा नसून, सूर्याचे सर्व तत्व आणि गुणधर्म माहीत असताना केलेली उपासना आहे.* ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळात ५८७ ते ५९९ ही सूक्तं, सूर्याचे वर्णन करणारी सूक्तं आहेत. यात 'सूर्याचे सप्त वर्णी किरण असतात' असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणूनच भारतात प्राचीन काळापासून सूर्यदेवतेची जी मंदिर आहेत, त्यात ही वैज्ञानिक माहिती ठासून भरलेली आहे. त्यातील काही आपल्याला 'डीकोड' करता आली, तर बरीचशी अजूनही न सुटणाऱ्या कोड्यासारखी आपल्यासमोर मांडलेली आहेत.
भारतातील या सूर्य पूजेला, प्राचीन काळात अनेक देशांनी आपलंसं केलं. सूर्याचं संस्कृत नाव आहे, ‘मित्र’. आपल्या १२ सूर्यनमस्कारांची सुरवातही ‘ॐ मित्राय नम:’ ने होते. सूर्याचे हे ‘मित्र’ नाव, इजिप्शियन संस्कृति पासून तर युरोप पर्यंत, अनेक ठिकाणी आढळते. जर्मनीत फ्रॅंकफर्ट च्या जवळ ‘झालबर्ग’ या रोमन काळातल्या किल्ल्यात एक संग्रहालय आहे. त्यात पहिल्या / दुसऱ्या शतकातल्या सूर्यदेवतेची प्रतिमा, ‘मित्रा’ या नावाने दाखवलेली आहे. मित्रा (किंवा सूर्य) या शब्दाचा आणि त्या देवतेच्या पूजेचा संबंध, भारताबरोबर स्पष्टपणे दाखवला आहे.
पूर्वीच्या विशाल अशा एकसंघ आणि अखंड भारतात सूर्याची अनेक मंदिरं होती. कालांतराने इस्लामी आक्रमकांच्या 'बुतशिकन' वृत्तीतून अनेक मंदिर पाडल्या गेली, ध्वस्त करण्यात आली. यातील काहींचेच पुनर्निर्माण झाले.
ज्या सर्वात प्राचीन सूर्य मंदिराचा उल्लेख इतिहासात आढळतो ते 'आदित्य सूर्य मंदिर' हे आज पाकिस्तानात असलेल्या मुलतान मध्ये आहे. या सूर्य मंदिराचा उल्लेख ग्रीक सेनानी 'एडमिरल स्कायलेक्स' ने केलेला आढळतो. तो ख्रिस्त पूर्व सन् ५१५ मध्ये या भागात आला होता. त्या काळात मुलतान हे त्याच्या 'काश्यपपुर' या मूळ नावाने ओळखल्या जात होते. हे मंदिर किमान पाच हजार वर्षे जुने असावे असे म्हटले जाते.
नंतर आलेल्या चिनी प्रवासी ह्युएन त्सांग याने सन् ६४१ मध्ये या मंदिराला भेट दिल्याचा उल्लेख आहे. तो लिहितो, 'हे आदित्य मंदिर अतिशय भव्य आणि विपुलतेने सजलेले आहे. यात सूर्यदेवतेची प्रतिमा ही सोन्याने मढवलेली असून ती मौल्यवान आणि दुर्मिळ रत्नांनी अलंकृत आहे'.
पुढे अल्-बिरुनी या अरब इतिहासकाराने अकराव्या शतकात केलेल्या मुलतान दौऱ्यात या मंदिराचा उल्लेख येतो. आठव्या शतकात, अर्थात सन ७१२ मध्ये, उमय्याद साम्राज्याच्या तत्कालीन खलिफा ने, मोहम्मद बिन कासिम ला सिंध प्रांतात आक्रमण करण्यास पाठवले. या मोहम्मद बिन कासिम ने राजा दाहीर ला युद्धात परास्त करून, मुलतान सकट अधिकांश सिंध प्रांत आपल्या अधिपत्यात आणला. त्याच्या लक्षात आले की मुलतानचे आदित्य मंदिर आणि त्याच्या आसपासचा बाजार हे त्याच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहे. त्यामुळे त्याने हे मंदिर पाडले नाही. पुढे, जेव्हा आजूबाजूचे हिंदू राजा मुलतान वर आक्रमण करून, मुस्लिम आक्रांतांना पळवून द्यायला यायचे, तेव्हा हा त्यांना धमकवायचा की "मुलतान वर चालून आलात तर याद राखा. तुमचं आदित्य सूर्य मंदिर मी ध्वस्त करून टाकेन."
त्या काळात या सूर्य मंदिराची ख्याती इतकी जबरदस्त होती की ते मंदिर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून इतर राजेही मुलतान वर आक्रमण करायला बिचकायचे. एका अर्थाने, त्या आदित्य मंदिराला ओलीस ठेवून, मुहम्मद बिन कासिमने बरीच वर्ष युद्धाविना काढली..!
पुढे सन् १०२६ मध्ये मोहम्मद गजनीने हे मंदिर पूर्णपणे उध्वस्त केले. असं म्हणतात, या मंदिरात सूर्यासंबंधी बरीच गूढ माहिती, विविध मुर्त्या आणि विशिष्ट रचनेद्वारे दर्शवली होती. सांब पुराणात या मंदिराचा उल्लेख आहे.
सध्याच्या आपल्या खंडित भारतातही अनेक लहान-मोठी सूर्य मंदिरं आहेत. ही सूर्य मंदिरं, आपल्या पूर्वजांना सूर्य मालिकेसंबंधी असलेली माहिती, आपल्यासमोर ठेवत आहेत. *या मंदिरांमध्ये, पूर्वेला ओडिशा मध्ये असलेले कोणार्कचे सूर्य मंदिर, उत्तरेत जम्मू-काश्मीर मध्ये असलेले मार्तंड सूर्य मंदिर आणि पश्चिमेला गुजरात राज्यात असलेले मोढेरा चे सूर्य मंदिर, ही तीन मंदिरे एक त्रिकोण तयार करतात.*
यापैकी जम्मू-काश्मीर राज्यात, अनंतनाग जवळचे 'मार्तंड सूर्य मंदिर' हे आठव्या शतकात, सन् ७६४ मध्ये, बांधलेले आहे. कार्कोट वंशाच्या चंडप्रतापी राजा ललितादित्य मुक्तापीड ने हे मंदिर उभारले. यासाठी ललितादित्य ने काश्मीर खोऱ्यातले असे पठार निवडले, जेथून पूर्ण खोरे नीट दिसू शकेल. अत्यंत भव्य अशा या सूर्य मंदिरात अनेक खगोलशास्त्रीय गोष्टी कोरलेल्या होत्या.
मात्र पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला, सिकंदर शाह मिरी या क्रूरकर्मा अफगाण शासकाने हे मंदिर ध्वस्त केले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर खगोलशास्त्रीय इतिहास ही त्या मंदिराच्या अवशेषांमध्ये दबून गेला / विरून गेला.
गुजरातच्या मोढेराचे सूर्य मंदिर हे तसे नंतरचे. सन् १०२६-२७ मधे, आजच्या गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात, चालुक्य राजवंशाच्या भीम - १ ह्या राजाने हे मंदिर बांधले. कदाचित या जागी एखादे लहानसे सूर्य मंदिर असेल आणि राजा भीम १ ने भव्य प्रमाणावर त्याचे पुनर्निर्माण केले असेल, असेही शक्य आहे. त्या काळात पुष्पावती नदीच्या काठावर, खगोलशास्त्रीय रित्या योग्य म्हणून, या जागेची निवड करण्यात आली. गूढ मंडप, सभा मंडप आणि मध्यभागी असलेले कुंड अशी या मंदिराची रचना असून हे पूर्वाभिमुख आहे.
*या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर कर्क रेषेवर उभारण्यात आले आहे.* *या मंदिराचे अक्षांश - रेखांश आहेत -
23" 58' - 72" 13'.
*आजपासून एक हजार वर्षांपूर्वी, त्या काळच्या मंदिर निर्मात्यांनी, बरोबर कर्क रेषेवर मंदिर कसे उभारले असेल, हे एक आश्चर्य आहे !*
या मंदिराच्या गर्भगृहाची रचना अशी आहे की दिवस आणि रात्र समान असणाऱ्या दिवशी, अर्थात २१ मार्च आणि २३ सप्टेंबरला, जेव्हा सूर्य विषुववृत्त ओलांडतो तेव्हा, सूर्याची पहिली किरणं, आतील सूर्याच्या प्रतिमेला उजळवतात. तसेच वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात मोठी रात्र असलेल्या दिवशी, या मंदिराची सावली पडत नाही. (सध्याच्या या मंदिरात सूर्यदेवतेची मूर्ती नाही). मंदिरावर अनेक प्रकारच्या मूर्ती आणि आकृत्या कोरलेल्या आहेत. यात सूर्यमालिकेचा आणि पंचमहाभूतांचा (वायू, पृथ्वी, आकाश, अग्नी, जल) संबंध दाखविला आहे. हे मंदिर ५२ स्तंभांवर उभे आहे, जे वर्षाच्या ५२ आठवड्यांचे प्रतिनिधित्व करतात.
सूर्य मंदिरांच्या प्रसिद्ध अश्या त्रिकोणातले तिसरे मंदिर आहे, ओडिशा चे कोणार्क सूर्य मंदिर. तुलनेने हे सर्वात अलीकडे बांधलेले सूर्य मंदिर आहे. मात्र हे बरेच जुने असावे. नवव्या शतकातले, या मंदिराच्या संदर्भातले उल्लेख सापडतात. नंतर ते नव्याने भव्य स्वरूपात बांधल्या गेले असावे.
तेराव्या शतकात भारतात इस्लामी आक्रांतांचा प्रवेश झालेला होता. बख्तियार खिलजीने नालंदा आणि इतर विद्यापीठं फोडूनही झालेली होती. तरीही भारताच्या पूर्व किनाऱ्यावर, या आक्रमकांचा उपद्रव अजून सुरू झालेला नव्हता. उत्कल प्रांतात अद्यापही हिंदू राजांचे राज्य होते. पूर्ब गांग (रुधी गांग किंवा प्राच्य गांग) राजवंशाचे राज्य टिकून होते. अशा या राजवंशातील नरसिंहदेव (प्रथम) या राजाने, सन १२५० मध्ये समुद्राच्या काठावर, कोणार्कचे हे सूर्य मंदिर बांधून पूर्ण केले.
कोणार्कचे पूर्वीचे नाव हे 'कैनपारा' असे होते. सातव्या - आठव्या शतकापर्यंत हे पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचे प्रमुख बंदर (पोर्ट) होते. मात्र सूर्य मंदिरामुळे याचे नाव कोणार्क झाले. कोणार्क याचा अर्थ, कोण + अर्क. संस्कृत मध्ये सूर्याला अर्क असे नाव आहे. त्यामुळे 'सूर्य मंदिरामुळे तयार झालेला कोण' असा याचा ढोबळ अर्थ होतो.
हे मंदिर अतिशय भव्य स्वरूपात बांधण्यात बांधण्यात आले होते. आज मंदिराचे जे अवशेष आहेत त्यावरून याच्या भव्यतेची कल्पना येते. *सात घोड्यांच्या रथात भगवान सूर्यदेव बसलेले आहेत, असे या मंदिराचे स्वरूप आहे. आणि रथ ही किती मोठा? तर एकूण २४ मोठ्या चाकांचा रथ, १२ - १२ चाकं दोन्ही बाजूला.*
*या रथाला जोडलेले जे सात अश्व आहेत, ते प्रतीक आहेत सूर्यातील सात रंगांचे (ऋग्वेदात याचा स्पष्ट उल्लेख आहे) किंवा आठवड्यातील सात दिवसांचे.* या मंदिराची वास्तुकला हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. संपूर्ण मंदिर फक्त आणि फक्त दगडांनी बांधलं गेलंय. यात कुठेही चुना, गारा वगैरे वापरण्यात आलेले नाही. बांधकामातली दगडं सुद्धा किमान ३५ किलोमीटर अंतरावरून आणलेली आहेत. मंदिरात अनेक भूमितीय आकार आणि आकृत्या आहेत. खगोलशास्त्र, भूमिती आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम या मंदिरात दिसून येतो.
हे सूर्य मंदिर असल्यामुळे यात खगोलशास्त्राची माहिती आणि खगोल शास्त्रातल्या गमती असतील, हे ओघानं आलंच. मंदिराच्या रथाला जी २४ चाकं लागलेली आहेत, ती वैशिष्ट्यपूर्ण आणि गूढ अर्थ भरलेली आहेत. *मुळात रथाचे चाक म्हणजे 'सूर्य घड्याळ' (Sun Dial) आहे. जगातील एकमेव सूर्य घड्याळ, जे उभं (Vertical) आहे.* जगात अनेक ठिकाणी सूर्य घड्याळं आहेत, जी दिवसाची वेळ दाखवतात. मात्र ती सर्व आडवी (Horizontal) आहेत. पुढे काही वर्षांनी जयपूरच्या सवाई जयसिंह या राजा ने बांधलेल्या जंतर-मंतरमध्ये असणारी सूर्य घड्याळ सुद्धा आडवीच आहेत. दिवसाच्या विशिष्ट वेळी, सूर्याच्या पडणाऱ्या सावलीप्रमाणे वेळ दर्शवण्याची सोय या सूर्य घड्याळ्यात असते.
कोणार्कच्या रथाची चाकं ही अशीच अचूक वेळ दाखवतात. यात प्रत्येक चाकाला आठ आरे (spoke) असतात. हे आठ आरे दिवसाच्या आठ प्रहरांना दर्शवतात. पूर्वीच्या काळी कालमापनासाठी 'प्रहर' हा घटक मानला जायचा. एक प्रहर तीन तासांचा असतो. मात्र या आठ मोठ्या आर्यांच्या मधोमध, प्रत्येकी एक बारीक आरा (spoke) आहे. अर्थात एका प्रहराचे दोन भाग केलेले आहेत. प्रत्येक भाग दीड तासांचा आहे. अर्थातच ९० मिनिटांचा.
पण यात अजून एक गंमत आहे. जे आठ बारीक आरे आहेत, त्या आर्यांवर ३० मणी समान अंतरांवर लावलेले आहेत. म्हणजे ९० मिनिटे भागिले ३० केले तर एका मण्याची किंमत येते तीन मिनिटे. आता हे मणी सुद्धा पूर्णपणे गोल नाहीत. त्यांची रचना अशी आहे की त्यावर पडणाऱ्या सावलीप्रमाणे त्यांचे तीन भाग होतात. म्हणजे आता या सूर्य घड्याळ्याचा, कालमापनाचा सर्वात छोटा घटक झाला, १ मिनिट.
आता, त्या चाकाच्या अक्षावर एखादी बारीक छडी ठेवली तर त्या बारीक छडीच्या, चाकावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या सावलीवरून, आपल्याला दिवसाची अचूक वेळ काढता येते..!
पण सूर्याचा प्रवास तर सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायन, असा असतो. मग अशा स्थितीत कालमापन कसे होईल?
याच्यासाठी रथाच्या दोन्ही बाजूंना चाकं आहेत. रथाची दिशा ही अशा प्रकारे ठेवल्या गेली आहे की उत्तरायणात एका बाजूच्या चाकावरून वेळ बघायची, तर दक्षिणायनात दुसऱ्या बाजूच्या चाकाने !
*किती अद्भुत आहे हे..!*
*पावणेआठशे वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी इतक्या कुशलतेने ह्या सूर्य घडाळ्याची रचना केली आहे, की जणू आजच्या काळातल्या भिंतीवरच्या घड्याळावर आपण वेळ बघतो आहोत. आपले पूर्वज हे अचूकतेचा ध्यास घेतलेले परिपूर्णवादी (Perfectionist) होते, याचा अजून कुठला पुरावा हवा?*
कोणार्क मधील रथाच्या चाकांवरून दिवसाची अचूक वेळ करू शकते, हे सुद्धा फार उशिराने कळले. काही वर्षांपूर्वी एक साधू, एक बारीक काठी घेऊन त्या चाकांवर पडणाऱ्या सावलीतून काहीतरी बघत होता. त्यावरून लोकांना समजलं की यातून वेळ बघता येते.
पण ही वेळ फक्त सूर्यप्रकाशातच बघणं शक्य आहे. रात्रीचं काय? असं म्हणतात, रथाच्या याच चाकांमध्ये 'चंद्र घड्याळ' सुद्धा दडलेलं आहे. या चंद्र घड्याळाचा वापर करून, रात्रीची वेळ सुद्धा अचूकतेने काढता येते. सूर्य घड्याळासाठी रथाची फक्त दोन चाकंच पुरतात. बाकीच्या २२ चाकांचं काय? कारण प्रत्येक चाकावरची कलाकुसर वेगळी आहे. दिवसा / रात्रीच्या त्या - त्या प्रहरात, लोकांची दिनचर्या कशी असते, ते यावर कोरलं आहे. मात्र दुर्दैवानं या 'चंद्र घड्याळाला' डीकोड करण्याचं आपल्याला अजूनही जमलेलं नाही. ते अद्यापही गूढच आहे.
*ही सूर्य मंदिरं भारताच्या पटावर ज्या पद्धतीने उभारल्या गेली आहेत, ती आपल्याला खूप काही सांगू इच्छितात. आपलं दुर्दैव असं की आपल्या पूर्वजांची ही कूट भाषा, आजही आपल्याला नीटशी उमजलेली नाही.*
एक उदाहरण देतो -
मध्य प्रदेशात, सागर जिल्ह्यात, रहेली नावाचं एक छोटसं गाव आहे. मराठी माणसांसाठी रहेलीचं महत्व वेगळं आहे. सागरच्या गोविंदपंत (खेर) बुंदेला यांच्या मृत्यूनंतर, खेर परिवारातल्या लक्ष्मीबाई खेर यांनी, १७९० मध्ये रहेलीला विठ्ठल-रखुमाईचं एक सुरेखसं मंदिर बांधलंय. त्यामुळे रहेलीला सध्या येथील मराठी भाषिक, 'प्रति पंढरपूर' म्हणतात.
पण रहेलीचं महत्व यापेक्षा बरंच वेगळं आहे. या रहेलीमध्ये, सुनार - देहार ह्या नद्यांच्या संगमावर, एक लहानसं आणि उपेक्षित असं प्राचीन सूर्य मंदिर आहे. *या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे कर्कवृत्तावर असलेलं हे मंदिर, मोढेरा आणि कोणार्क या सूर्य मंदिरांच्या बरोबर मध्ये आहे..!*
होय. बरोबर मध्ये.
अक्षांश - रेखांशांना बघून आपल्याला हे समजू शकेल.
कोणार्क मोढेरा रहेली
19" 53' 23" 58' 23" 37'
86" 05' 72" 13' 79" 06'
रेखांशांचं गणित बघा -
कोणार्क 86" 05' उणे मोढेरा 72" 13' = 13" 92'.
याला दोन ने भागिले तर येतात 6" 96'.
आता मोढेराच्या रेखांशात याला जोडलं तर,
72" 13' + 6" 96' = 79" 09'. रहेलीच्या सूर्य मंदिराचे हे रेखांश आहेत.
या अक्षांश - रेखांशांना दोन मिनिटे बाजूला ठेवू. मोढेरा आणि कोणार्कचे वायू अंतर (air distance किंवा सैन्याच्या भाषेत, crow fly distance) काढले तर त्याच्या अगदी मधोमध हे रहेलीचे, उपेक्षित असे लहानसे सूर्य मंदिर येते !
*हजार वर्षांपूर्वी, आपल्या पूर्वजांजवळ, पृथ्वीच्या मोजमापाची अशी काय अचूक पद्धत होती की ते ह्या सूर्य मंदिरांची अशी रचना करू शकले?*
*हे सारंच अनाकलनीय आहे. गूढ आहे.*
*आपल्या पूर्वजांचे खगोलशास्त्रातले ज्ञान जबरदस्त होते. सखोल होते. त्यांनी मंदिरांच्या, आकृत्यांच्या, मुर्त्यांच्या माध्यमातून, ते ज्ञान आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय.*
आपण मात्र आधुनिकतेचा टेंभा मिरवत, आहे तेच ज्ञान, अर्थात आपलं संचित, नीट समजू शकलेलो नाही..!
- प्रशांत पोळ
_(पूर्व प्रसिद्धी - 'एकता' मासिक. मार्च, २०२४)_
No comments:
Post a Comment