Sunday, 23 October 2022

लोकाभिमुख उपक्रमांद्वारे

 लोकाभिमुख उपक्रमांद्वारे मुंबईचा कायापालट करणार


- जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांचे प्रतिपादन.

            मुंबई, दि. 19- मुंबईत पर्यटनाला मोठा वाव आहे. या अनुषंगाने मुंबईचा पर्यटनदृष्ट्या विकास करून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. याचबरोबर जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून मुंबईचा कायापालट करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.


            जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून मुंबई जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आढावा बैठक पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीत 2022-23 मधील विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राजीव निवतकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री. सुपेकर यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री.केसरकर म्हणाले, मुंबईत पर्यटन विकास आणि त्याअनुषंगाने रोजगार निर्मितीला मोठा वाव आहे. महालक्ष्मी, मुंबादेवी, सिद्धीविनायक, बाणगंगा, हाजिअली अशा अनेक ऐतिहासिक महत्त्व असलेल्या परिसरात भाविक पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. त्यांच्या सोयीसाठी प्रार्थना सभागृह, वाहनतळ, परिसराचे सुशोभिकरण आणि सौंदर्यीकरण करणे, फोर्ट परिसरात ‘टुरिझम स्ट्रीट’ची संकल्पना राबविणे, वरळीतील इमारती, समुद्र किनारा, किल्ला परिसराचे लाईटनिंगद्वारे सुशोभिकरण करणे आदी बाबींना प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली.


            शहरातील कोळीवाडे हे मुंबईचे वैभव आहे. मासेमारी कशी करतात हे जाणून घेण्याबरोबरच मच्छिमारांची जीवनशैली सर्वांना समजावी यादृष्टीने शहरातील कोळीवाडे, ससून डॉक, भाऊचा धक्का आदी परिसराचे सुशोभिकरण आणि सौंदर्यीकरण करून त्यांचाही पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे निर्देश श्री. केसरकर यांनी दिले. ताजे मासे विकल्यानंतर शिल्लक माशांपासून विविध पदार्थ तयार करण्याजोगी रोजगार निर्मिती होईल असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत. यासाठी सोलार ड्रायर, शीतपेट्यांचा वापर करून महिलांसाठी स्वच्छतेचे प्रशिक्षण देऊन कौशल्यआधारित रोजगार उपलब्ध करून द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.


            श्री. केसरकर म्हणाले, मुंबईतील झोपडपट्टी भागात बदल घडवून नागरिकांचे जीवनमान उंचावयाचे आहे. त्यांचे आरोग्य हा महत्त्वाचा विषय आहे, याअनुषंगाने फिरते रूग्णालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. यासाठी सामान्य तपासणीसह एक्सरे, दात, डोळे, महिलांसाठी कॅन्सर आदी तपासण्या होतील अशी फिरती व्हॅन सुरू करावी असे निर्देश त्यांनी दिले.


            नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत अंगणवाडी हा शाळेचाच भाग होणार आहे. त्यादृष्टीने अंगणवाडी विकासासाठी उपक्रम राबवावा. भिक्षेकरी मुक्त मुंबई उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक संस्था, पोलीस, महानगरपालिका यांच्यासह नागरिकांचा सहभाग घ्यावा. बालकामगार, बाल भिक्षेकरी यांना शाळेत सामावून नवीन आयुष्य जगता येईल असे उपक्रम प्राधान्याने राबवावेत, अशी सूचना पालकमंत्र्यांनी केली. दुर्लक्षित महिला आणि बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याचबरोबर मुंबईत वृद्धाश्रमासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधावा, विद्यार्थी आणि वाचकांसाठी रिडींग रूम्स, कामगार मैदानाचा दर्जेदार पद्धतीने विकास करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi