ज्ञानवर्धक बोधकथा
भगवान महावीरा सोबत एक लहान मुलगा बसलेला असतांना त्यावेळेस तिथून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने भगवान महावीरांना विचारले "तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?"
महावीर म्हणाले "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल".
थोड्या वेळा नंतर त्या नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच महावीरांना म्हणाला " तो बघा अजून एक चोर आला",
महावीर म्हणाले "तो राजा आहे."
मुलगा महावीरांना म्हणाला " या दोघात काय फरक आहे ? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई होते."
महावीर म्हणाले "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वातंत्र नाही, शिपाई जिकडे नेतील तिकडे जायचं, शिपाई जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतःच्या मनाने काहीच करता येत नाही. कारण तो बंदिस्त आहे.....परंतु राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे ते राजा बरोबर जातील, राजा जे काही सांगणार ते सर्व ते करणार, जर राजा बोलला कि तुम्ही जा, मला एकटे राहू देत, तर निघूनही जातील, कारण राजा मुक्त आहे."
"आपले मन, आपल्या भावना म्हणजे द्वेष, तिरस्कार, राग, लोभ, मत्सर, अहंकार, असूया, कपट, गर्व हे सर्व विकार आपले शिपाई आहेत, आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत,
ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे."
जे जे विश्वी कोंदले ते विश्वकोशी नोंदले’- डॉ विजया वाड
ReplyDeleteनवी दिल्ली, दि. २३ : ‘जे जे विश्वी कोंदले ते विश्वकोशी नोंदले’ या पद्धतीने काम केल्याने मराठी विश्वकोश हा माहितीचा खजिना आहे. हा खजिना डिजीटल माध्यमातून जगभर पोहचल्याचे मत प्रसिध्द लेखिका तथा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाच्या माजी अध्यक्ष डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प गुंफताना ‘ध्यानी मनी विश्वकोश’ या विषयावर डॉ. वाड बोलत होत्या.
मराठी विश्वकोश ही माझ्या आयुष्यातील आनंददायी गोष्ट असून या माध्यमातून मराठी भाषेची सेवा करता आल्याचे सांगत त्यांनी ५३ वर्ष रखडलेल्या विश्वकोशाचे उर्वरीत खंड पूर्ण करण्याच्या निर्मिती प्रक्रियेचा पट यावेळी उलगडला. मुख्याध्यापिका पदावरुन निवृत्त झाल्यानंतर मुंबईतील पोतदार शिक्षण संस्थेत विश्वस्तपदावर असताना डिसेंबर २००५ मध्ये विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
यानंतर विश्वकोशाचा १७ वा खंड तयार करण्यासाठी केलेला सातारा जिल्हयातील वाई येथील मुक्काम . कामाला सुरुवात केली तेव्हा नोंदी तयार होत्या पण त्या ७ वर्ष जुन्या झाल्या होत्या. त्यातील प्रत्येक नोंदीचे परिशीलन करून पावणे दोन वर्षांच्या अथक परिश्रमातून ८८३ नोंदी पूर्ण करून सतारावा खंड पूर्ण होऊन त्याचे प्रकाशनही झाल्याचे त्यांनी सांगितले.
पावणे दोन वर्षात १८ वा खंड पूर्ण केला. १९ वा खंड ही झाला या दोन्ही खंडांचे प्रकाशन झाले.
विश्वकोशाचा २० खंड परिपूर्तीचा खंड होता. मंडळाच्या सदस्यांशी चर्चा करून १२०० पानाचा खंड न काढता पूर्वाध व उत्तरार्ध असे खंड काढण्याचे ठरले. पूर्वाध झाला होता. आता फक्त ४०० नोंदी शिल्लक असताना विश्वकोश मंडळ बरखास्त झाले. अशात राज्य सरकारने उर्वरीत नोंदी पूर्ण करण्याची जबाबदारी दिली व ४ महिने वाईला तळ ठोकून हा खंड पूर्ण केले. अखेर २४ जून २०१५ ला मराठी विश्वकोशाचे अंतिम प्रकाशन झाल्याचे डॉ. वाड म्हणाल्या.
विश्वकोशाच्या संगणकीकरणाची वाटचाल
२०११ मध्ये विश्वकोश संगणकीकरणाची घोषणा केली. सीडॅक या पुण्याच्या संस्थेत ११ महिन्यात टाईपींगचे कार्य पूर्ण झाले आणि विश्वकोश डिजीटल झाला. तत्पूर्वी ८ मार्च २००७ ला मराठी विश्वकोशाचे संकेतस्थळ तयार केले. नंतर विश्वकोश ६ सिडी संच स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्याचे डॉ. वाड यांनी सांगितले. विश्वकोशाविषयी जनजागृतीसाठी महाराष्ट्रातील १८० ठिकाणी वाचन स्पर्धांचे आयोजन व त्यातील अनुभवही त्यांनी कथन केले.
२० व्या खंडाच्या विज्ञान विभागाच्या ८ दीर्घ नोंदी पूर्ण करण्यात प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या मदतीने ४ महिन्यात पूर्ण झालेल्या नोंदी तसेच ‘कुमारकोश’ तयार करताना जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या सूचनेतून तयार झालेल्या दोन रंगीत पानांच्या पर्यावरण खंडाची रोचक माहितीही त्यांनी यावेळी दिली. ‘मराठीच्या वैभवाचा मानकरी विश्वकोश’ हे विश्वकोशाचे गीत २०११ मध्ये तयार झाले. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी हे गीत गायले तर प्रसिध्द संगीतकार अशोक पत्की यांनी या गीतास संगीत दिले आणि प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी ते अभिनीत केल्याचे त्यांनी सांगितले.
डिजीटल विश्वकोशाच्या कामगिरीसही कौतुकाची थाप मिळाली या उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाचा प्लॅटिनम पुरस्कार, कॉम्प्युटर सोसायटीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि मंथनचे आशियाई मानांकन मिळाले. विश्वकोशाच्या डिजीटल स्वरूपामुळे १५ लाख वाचक आणि १०५ देशात विश्वकोश वाचला गेला हा समाधनाचा भावही डॉ वाड यांनी व्यक्त केला.
दि. ३ एप्रिल १६८०, शनिवारचा दिवस, महाराज निघाले! चालले! सह्याद्रीचे महाराज निघाले! स्वराज्यांतील मुलाबाळांचे, भावाभावजयांचे, पशुपक्षांचे, सर्वांचे महाराज निघाले! पन्नास वर्षे सर्वांना लळा लावून, वेड लावून महाराज निघाले! रायगड दु:खाने काळवंडला. अवघ्या पन्नासाव्या वर्षी आमचे महाराज चालले? गडावर रामचंद्रपंत अमात्य, गंगाधरपंत हणमंते, रावजी सोमनाथ, बाळप्रभु चिटणिस, हिरोजी फर्जंद, बाबाजी घाटगे, बाजी कदम, सूर्याजी मालुसरे, महादजी नाईक पानसंबळ वगैरे कितीतरी सवंगडी चिंतेने अन दु:खाने व्याकुळ झाले होते. महाराजांनी आपल्या, नव्हे स्वराज्याच्या सर्व नातलगांना जवळ बोलाविले. सर्वजण आले. कोणाच्याहि मुखातून शब्द फुटेना. महाराज मात्र शांत होते. ते आता सर्वांचा अखेरचा निरोप घेत होते. महाराज सर्वांना म्हणाले "आपली आयुष्याची अवधि झाली! आपण कैलासास श्रीचे दर्शनास जाणार!" दु:खाचा एकदम टवका उडाला. सर्वांच्या डोळ्यांतून ढसढसा अश्रु वाहूं लागले. सर्वांच्या ह्रुदयांत आकांत उडाला. तोंडातुन शब्द उमटेना. केवढी धुरंदर माणसे ही ! पण दु:खाश्रुंचा लोंढा फुटला त्यांच्या काळजातून. स्व:ताच्या जिवाची पर्वा न करता महाराजांसाठी आपले प्राण देखील देणारी ही वेडी माणसे........ हिरोजी फर्जंद महाराजांना म्हणाले असतील कां हो? हो नक्कीच म्हणाले असतील की " महाराज आग्र्याला तुमच्या शय्येवर मी झोपलो होतो...तुम्हाला सुखरुप बाहेर काढण्यासाठी....महाराज आताहि तुमच्या या म्रुत्युशैय्येवर मी झोपतो...तुम्ही या म्रुत्युच्या कैदेतून सुखरुप बाहेर पडा !!!" महाराज अत्यंत शांतपणाने त्यांना म्हणाले "तुम्ही चुकार होऊं नका. हा तो म्रुत्युलोकच आहे. या मागे किती उत्पन्न झाले तितके गेले. आता तुम्ही निर्मळ सुखरुप बुद्धीने असणे. आता अवघे बाहेर बैसा. आपण श्रींचे स्मरण करतो" केवढी ही मनाची तयारी! अवघे मोहपाश दूर सारुन्, अवघी सुखदु:खे पूर्ण विसरुन महाराज अखेरच्या महायात्रेला निघाले! महाराजांनी सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. सर्वजण बाहेर आले. दुपारचे सुमारे बारा वाजले होते. आणि श्रींचे नामस्मरण करीत करीत महाराजांनी मृत्यूचे बोट धरले! आजवर जिंकलेले राज्य,किल्ले,हत ्ती,घोडे,धनदौलत सोडून देऊन, आजवर जोडलेले आप्त-इष्ट-मित्रांची मोहमाया सोडून, आजवर मिळविलेली सर्व यशकिर्ति तशीच टाकून देऊन आणि धारण केलेली छत्रचामरे, सिंहासन आणि बिरूदावली जशीच्या तशीच सोडून देऊन, कशाकडेहि मागे वळून न पहातां महाराज मृत्यूचे बोट धरून शांतपणे निघून गेले! आणि शिवभारत संपले !
ReplyDeleteछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा......... ऐसे राजे होणे नाही.
🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🚩🚩
बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावरील पुस्तकचे
ReplyDeleteराज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई, दि. 7 : प्राणांचे बलिदान देणारे बाजीप्रभू देशपांडे यांच्या पावनखिंडीतील पराक्रमाचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले.
‘गजापुरचा रणसंग्राम’ या शंतनू परांजपे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे स्वागत करताना महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे लिखाण हिंदी भाषेत देखील व्हावे अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. जगात कोणत्याही देशापेक्षा महाराष्ट्रात जास्त गडकिल्ले असून, या ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे असेही राज्यपालांनी सांगितले.
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला हेडविग मिडिया हाउस प्रकाशन संस्थेचे चिन्मय पंडित, मुद्रक विशाल देशपांडे, प्रदीप पंडित व अपूर्वा पंडित उपस्थित होते.
शिवाजी महाराजांची पन्हाळा वेढ्यातून सुटका आणि विशाळगडापर्यंत त्यांचा सुखरूप झालेला प्रवास, बाजीप्रभू आणि बांदल सेनेला करावा लागलेला घनघोर संघर्ष तसेच संघर्षात सामील असलेल्या सिद्दी जौहर, हेन्री रेव्हिंगटन, शिवा काशीद, बांदल घराणे व बाजीप्रभू घराणे यांचा इतिहास या पुस्तकामध्ये देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
उद्या महात्मा फुले जयंतीदिनी
ReplyDelete‘महात्मा फुले : एक क्रांतिकारक महामानव’ या विषयावर
प्रसिध्द वक्ते डॉ.श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान
नवी दिल्ली, दि. १० : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत उद्या ११ एप्रिल २०२१ रोजी प्रसिध्द वक्ते व इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे “महात्मा फुले : एक क्रांतिकारक महामानव” या विषयावर व्याख्यान होणार आहे.
महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेली ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’सुरु आहे. रविवारी ११ एप्रिल रोजी श्रीमंत कोकाटे हे सकाळी ११.०० वाजता व्याख्यान मालेचे २४ वे पुष्प गुंफणार आहेत. या विशेष व्याख्यानातून महात्मा फुले यांच्या महत्वपूर्ण योगदानावर प्रकाश टाकला जाणार आहे. सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या विषयी
प्रसिध्द व्याख्याते आणि इतिहास संशोधक म्हणून डॉ.श्रीमंत कोकाटे सर्वपरिचीत आहेत. उच्चविद्या विभूषीत डॉ.कोकाटे यांनी महाराष्ट्र ,गोवा, कर्नाटक,दिल्ली, हरियाणा या राज्यांमध्ये एकूण ३७०० पेक्षा अधिक व्याख्याने दिली आहेत. महाराष्ट्रातील विविध विद्यापिठांसह विदेशातही त्यांची व्याख्याने झाली आहेत.
‘छत्रपती शिवाजी महाराज’,‘छत्रपती संभाजी महाराज’,‘खरा शिक्षकदिन’,‘लढा विचारांचा’आदी त्यांची १० पुस्तके प्रकाशित आहेत. १९१२ मध्ये पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे आयोजित महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
शिवाजीराव डिसले पुरस्कार, सम्राट राष्ट्रीय पुरस्कार, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण
रविवार, 11 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारीत होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. हे व्याख्यान परिचय केंद्राचे मराठी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaGovtMic,हिंदी ट्विटर हँडल https://twitter.com/MahaMicHindi आणि इंग्रजी ट्विटर हँडल https://twitter.com/micnewdelhi वर लाईव्ह पाहता येणार आहे. तसेच कार्यालयाचे फेसबुक प्रोफाईल https://www.facebook.com/MICNEWDELHI , फेसबुक पेज https://www.facebook.com/micnewdelhiPR/ आणि फेसबुक मीडिया ग्रुप https://www.facebook.com/groups/525576297610799/?ref=share तसेच https://www.youtube.com/c/MahaInfoCentreNewDelhiयुटयूब चॅनेल वर पाहता येणार आहे.
महाराष्ट्राला लाभल्या समृध्द व वैविध्यपूर्ण रानवाटा
ReplyDelete- अरण्यऋषी मारुती चितमपल्ली
नवी दिल्ली,दि १२ : महाराष्ट्राच्या जंगलातील हिरवाई, पक्षी, प्राणी यांचा वैविध्यपूर्ण अधिवास आणि या जंगलातील अनाकलनीय व चमत्कृतिक घटनांचा अनुभव मला घेता आला. येथील रानवाटा समृध्द असल्याची माहिती अरण्यऋषी, पक्षीतज्ज्ञ, वृक्ष अभ्यासक व साहित्यिक मारूती चितमपल्ली यांनी आज दिली.
“महाराष्ट्राच्या रानवाटा” या विषयावर महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे रौप्य पुष्प (25 वे) गुंफताना श्री. चितमपल्ली बोलत होते.
वनाधिकारी पदवी शिक्षण पूर्ण करून वनअभ्यासक हुड यांच्या प्रेरणेतून निष्ठेने सुरु झालेला वन विभागातील प्रवास व या सेवेमध्ये महाराष्ट्रातील चमत्कृतिक रानवाटांतून सापडलेले ज्ञानभांडार असा पटच मारुती चितमपल्ली यांनी उलगडला.
१९५८-६० मध्ये तामीळनाडूतील कोईंबतुर शहरात वनाधिकारी पदवी शिक्षण घेताना, महाविद्यालयाच्या प्रथेनुसार अनाईमलाई पर्वतावर स्थित वनअभ्यासक हुड यांच्या समाधीचे दर्शन व त्याचा किस्सा श्री. चितमपल्ली यांनी सांगितला. हुड यांनी अनाईमलाई पर्वतावरील हजारो एकरावर फुलवलेली हिरवाई व त्यांची वनांप्रती असलेली निष्ठा बघून थक्क झालो. येथून वनांचा विकास आणि तेथील प्राण्यांचे संवर्धन त्यांचा वैविध्यपूर्ण अभ्यास हे जीवन ध्येय ठरल्याचे श्री. चितमपल्ली यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प येथील जबाबदारी पार पाडताना वन्यजीवन व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षी जगताविषयी केलेल्या संशोधन कार्यातील निरीक्षणांवर त्यांनी ओघवता प्रकाश टाकला. या सर्व परिपक्वातून राज्याच्या जंगलातील वैविध्यपूर्ण व चमत्कृतिक वैशिष्ट्ये विविध पुस्तकांच्या रुपात मांडता आली. येथील वनांतील पक्षी निरीक्षणाचा अनुभवही समृध्द करणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
रानकुत्र्यांना अभय
महाराष्ट्रातील रानवाटांचा अभ्यास करताना व प्रत्यक्ष कार्य करताना ठसठसीत आठवाव्या अशा अनुभवांमध्ये रानकुत्र्यांचे प्राण वाचविण्याचा अनुभव श्रेष्ठ असल्याचे सांगून श्री. चितमपल्ली यांनी स्वानुभव कथन केला. पूर्व विदर्भातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान आणि नागझिरा अभयारण्यात कार्यरत असताना रानकुत्र्यांबाबत सटीक अभ्यास करून शासनास सादर केलेल्या अहवालामुळे येथील रानकुत्र्यांचे प्राण वाचले. या भागात वाघाची संख्या कमी होण्यास रानकुत्रेच जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढून रानकुत्र्यांना मारण्याचे फर्मान देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पक्षीतज्ज्ञ सलीम अली यांच्यासोबत झालेल्या भेटीत त्यांनी रानकुत्र्यांचा साक्षेपी अभ्यास करून शासनाचा फर्मान थांबवा, अशा सूचना दिल्याचा संदर्भही श्री. चितमपल्ली यांनी यावेळी दिला. यासाठी २४ तास रानात पहारा देवून रानकुत्र्यांच्या खानपध्दतीचा अभ्यास केला व निरीक्षण नोंदवली. यासंदर्भात शासनास सविस्तर अहवाल सादर केला. अखेर वाघांची संख्या कमी होण्यास रानकुत्रे जबाबदार नसल्याचे मान्य झाले व त्यांचे प्राण वाचले हा आपल्या आयुष्यातील आनंदाचा क्षण ठरल्याचे त्यांनी सांगितले.
संस्कृत साहित्यात वन्यप्राण्यांची मोठी माहिती उपलब्ध असल्याने वयाच्या ४०व्या वर्षी संस्कृत भाषा शिकण्याचा व विद्यापीठात दुसरा क्रमांक पटकाविण्याचा अनुभवही श्री. चितमपल्ली यांनी सांगितला. ‘पालकाप्यम’ हा पाल ऋषीने लिहिलेल्या संस्कृत ग्रंथाचा अभ्यास व पुढे प्रत्यक्ष देशाच्या दक्षिण भागातील जंगलामध्ये जावून हत्ती या महाकाय प्राण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण क्रियाकलापाबाबतच्या अनुभवांवरही श्री. चितमपल्ली यांनी यावेळी प्रकाश टाकला.
राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट
ReplyDelete१८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश
४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी ९ लाख डोस प्राप्त
-- आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई, दि. ४: राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे ९ लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे १८ लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
मंत्रालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी साधलेल्या संवादातील प्रमुख मुद्दे असे:
• राज्यात ४५ वर्षांवरील सुमारे १ कोटी ६५ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. कालपर्यंत राज्यात या वयोगटाच्या लसीकरणासाठी केवळ २५ हजार डोस शिल्लक होते. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद होते.
• आज राज्याला ९ लाख डोस मिळाले आहेत. त्यातून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. ४५ वर्षांवरील सुमारे ३.५ कोटी लोकसंख्येपैकी ४५ टक्के नागरिकांना लसीकरण झाले आहे.
• दि. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास सुरूवात झाली. आतापर्यंत या वयोगटातील सुमारे १ लाख नागरिकांना लस देण्यात आली आहे. त्यांच्या लसीकरणाला गती येण्यासाठी कोविशिल्ड लसीचे १३ लाख ५८ हजार तर कोवॅक्सिन लसीच्या ४ लाख ८९ हजार असे एकूण १८ लाखांहून अधिक डोसेस खरेदी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.
• स्पुटनिक लस भारतात आली असून तिच्या दराबाबत चर्चा सुरू असून ते निश्चित झाल्यानंतर त्याचे डोस राज्यात मागविले जातील.
• तरुणाईने लसीकरणासाठी गर्दी करू नये. पोर्टलवर नोंदणी आणि दिनांक, वेळ निश्चिती नंतरच लस दिली जाईल. त्यामुळे संयम आणि शिस्त पाळण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले.
• राज्य शासनाने रेमडेसीवीर, ऑक्सिजन यासाठी काढलेल्या जागतिक निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. मदत व पुर्नवसन विभागाकडून त्याची छाननी आणि पुढील कार्यवाही सुरू आहे. या जागतिक निविदेच्या माध्यमातून राज्याला साडेतीन लाख रेमडेसीवीर, २० हजार ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, २७ स्टोरेज टॅंक उपलब्ध होतील. जेणे करून ऑक्सिजनचा बफर साठा करून ठेवता येईल.
• राज्यात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत १५० ऑक्सिजन प्लांट (हवेतून ऑक्सिजन शोषून घेणारे) खरेदीसाठी कार्यादेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यांमध्य ऑक्सिजन निर्मितीच्या प्रकल्पासाठी जिल्हा विकास व नियोजन आणि राज्य आपत्ती पुर्नवसन निधी यामधून निधी घेण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.
• केंद्र शासनाकडून राज्याला जे १० पीएसए प्लांट मंजूर आहेत त्यातील ९ प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे.
• सध्या केंद्र शासनाकडून राज्याला दररोज ४० हजाराच्या आसपास रेमडीसीवीर मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे ते कमी पडत आहेत. पुरवठा झालेले रेमडेसीवीर जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात जिल्हाधिकाऱ्यांना वाटप केले जात आहेत.
• राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
000
कुलगुरू शशिकला वंजारी यांच्या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन
ReplyDeleteमुंबई, दि. 1 : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ शशिकला वंजारी आणि डॉ रिटा सोनावत यांनी लिहिलेल्या 'अंडरस्टँडिंग अर्ली चाईल्डहुड एजुकेशन' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे संपन्न झाले.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात लहान मुलांच्या संगोपन आणि शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे. त्यामुळे लहान मुलांना शिक्षण देणाऱ्या प्रशिक्षित शिक्षकांची मागणी वाढली आहे. लहान मुलांचे संगोपन आणि शिक्षण हे व्यापक आणि जटील क्षेत्र आहे. सदर पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षक, प्रशासक, पालक व इतर संबंधितांना या क्षेत्राबाबत मार्गदर्शन करण्यात आले असल्याचे डॉ वंजारी यांनी यावेळी सांगितले.
ऑथर्स प्रेस प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या पुस्तकाला ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे.
राज्यात 5 ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम प्रगतीपथावर
ReplyDelete- अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
· उर्दू भाषेचा विकास, मराठी व उर्दू भाषेतील देवाणघेवाण वाढविण्यावर भर
मुंबई, दि. 30 : राज्यात उर्दू भाषेची वाड:मयीन प्रगती व्हावी, मराठी व उर्दू भाषेतील लेखक, कवी, विचारवंत इत्यादींमध्ये सृजनशील विचारांची देवाणघेवाण होऊन उर्दू भाषेचा वाड:मयीन विकास व्हावा यासाठी राज्यात 5 ठिकाणी उर्दू घर निर्मितीचे काम राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत हाती घेण्यात आलेले आहे. या उर्दू घरांची कामे लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत असून त्यांच्या व्यवस्थापनासंदर्भातही धोरण निश्चित करण्यात आले असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
नांदेड येथील उर्दू घरासाठी ८.१६ कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला आहे. आता या घराचे बांधकाम पूर्ण झाले असून लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येईल. सोलापूर येथे उर्दू घराचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून त्याकरिता आतापर्यंत 6.82 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. मालेगाव उर्दू घराचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित करण्याची कार्यवाही सुरु आहे. मुंबई येथे मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरात उर्दू घर बांधणे प्रस्तावित असून याबाबतचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाकडून शासनास सादर केला जाणार आहे. नागपूर येथील इस्लामिक कल्चरल सेंटरची इमारत उर्दू घर म्हणून विकसीत करण्यात येत आहे. यासाठी ५० लाख रुपये इतके अनुदान वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.
या उर्दू घरांची कामे लवकरात लवकर पूर्ण करुन ती उर्दू भाषेच्या विकासासाठी खुली करण्याच्या दृष्टीने विभागामार्फत कार्यवाही सुरु आहे. या घरांचा वापर, देखभाल, दुरुस्ती तसेच ती सुस्थितीत ठेवण्यासाठी मूळ धोरण शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले होते. आता त्यात काही नवीन मुद्यांची भर घालण्यात आली असून सविस्तर नियमावली जारी करण्यात आली आहे. तसेच या उर्दू घरांमध्ये आयोजित करावयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक समिती तसेच प्राधिकृत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.
उर्दू घरांमध्ये वर्षातील अधिकाधिक दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विविध भाषेतील पुस्तकांचे प्रकाशन इत्यादी स्वरुपाचे कार्यक्रम होतील. उर्दू घरातील वाचनालय, ग्रंथालयामध्ये उर्दू, मराठी आणि हिंदी भाषेतील वर्तमानपत्रे, उर्दू भाषेतील नियतकालिके, पुस्तके उपलब्ध असतील. नवी दिल्ली येथील नॅशनल काऊन्सिल फॉर प्रमोशन ऑफ उर्दू लँग्वेज संस्थेमार्फत चालविल्या जाणारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम, अभ्यासक्रम यांच्या धर्तीवर उर्दू घरांमध्ये प्रशिक्षण, अभ्यासक्रम चालविले जातील. यासाठी काऊन्सिलकडून अनुदान, मार्गदर्शन मिळविले जाईल. काऊन्सिलमार्फत चालविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाच्या धर्तीवर उर्दू भाषिक नसलेल्या समुदायाला उर्दू शिकविण्यासाठी उर्दू घरामध्ये वर्ग चालविणे जाणार आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
उर्दू भाषेच्या विकासाला चालना देणे याबरोबरच मराठी आणि उर्दू भाषेतील देवाणघेवाण वाढून राज्यात सांस्कृतिक चळवळ अधिक वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने उर्दू घरे महत्वपूर्ण भूमिका बजावतील, असा विश्वास मंत्री श्री.मलिक यांनी व्यक्त केला. लवकरच सर्व उर्दू घरांचे काम पूर्ण करुन व त्यांना चांगल्या सोयी-सुविधा देऊन उर्दू घरे सुरु करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.