खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातील
भूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण करणार
- खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. ११ :- खाण क्षेत्रातील नियंत्रित स्फोट (कंट्रोल ब्लास्टिंग) आणि त्याचा जलस्रोतांवर होणारा परिणाम याबाबत खाणीच्या दहा किलोमीटर परिसरातील भूजल पातळीबाबत वेगळे सर्वेक्षण केले जाईल, अशी माहिती खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी दिली.
खनिकर्म मंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्यात सध्या २७ खाणींना परवानगी आहे, त्यापैकी १७ खाणी कार्यरत आहेत. मागील पाच वर्षांत झालेल्या १२ विहिरींच्या निरीक्षणानुसार भद्रावती आणि बल्लारशाह या भागांमध्ये पाणीपातळी वाढलेली आहे, तर काही भागांत अंशतः घट झाली आहे.
खाणीमधील ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांना तडे जात असल्याबाबत जिल्हा प्रशासनाकडे अशी निवेदने प्राप्त झाली असल्यास यासंदर्भात महसूल व खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सर्व्हे केला जाईल. तसेच खाणपट्ट्यातील समस्यांबाबत लवकरच बैठक घेतली जाईल, असेही श्री. देसाई यांनी उत्तरात सांगितले.
खाणपट्ट्यातील लोकांच्या पुनर्वसनासंदर्भात खाण मंजुरीच्यावेळी अटी आणि शर्तींमध्ये पुनर्वसनाचा समावेश असल्यास, संबंधित खाण कंपन्यांना याबाबत सूचना दिल्या जातील. खाणीमुळे बाधित झालेल्या गावातील रस्ते खराब झाल्यास अशा रस्त्यांना पर्यायी मार्ग देण्यात येऊन नागरिकांची गैरसोय दूर करण्यात येईल व याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले.
सदस्य किशोर जोरगेवार यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य विजय वडेट्टीवार, संजय देशमुख, आशिष देशमुख, सुधीर मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment