लोकशाही ही संविधानातील सर्वात मोठी ठेव
संविधनातील उद्देशिका आपली आहे. आम्ही भारतीय लोक सांगतो, म्हणून हे जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. पाश्चिमात्य देशातील हे संविधान नाही. ठिकठिकाणी बंधुता हे शब्द दिसतात. हे गौतम बुद्धांचे तत्वज्ञान आहे. संधीची समानता त्यांनी दिली. जात, धर्म यांच्या आधारे संधी दिली जाणार नाही. सर्वांना समान संधी दिली जाईल. लंकेतील सीतेची सुटकादेखील संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये दाखवलेली आहे. ती यासाठी दाखवलेली आहे, की आम्हाला या संविधानाचा नारी सन्मानासाठी वापर करायचा आहे, हे त्यातून अभिप्रेत करण्यात आलेले आहे. गीतेचा उपदेश देखील याच संविधानात दाखवला आहे. या तत्त्वावर उभे राहिलेले हे संविधान आहे. या संविधानात सर्वात मोठी ठेव ही लोकशाही आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
भारतीय जीवन पद्धत ही संविधानाचा आत्मा
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महात्मा गांधी नेहमी म्हणायचे रामराज्य आणायचे आहे. राजा जेव्हा भेदभाव करत नाही, त्याला रामराज्य म्हणतात. समाजातील छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून त्यांना शक्ती राजा देतो. त्याला रामराज्य म्हणतात. हे पूर्णतः भारतीय मूल्यांवर तयार केलेले संविधान आहे. अशोक चक्र हे कायद्याचे व धर्माचे चक्र आहे. धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतीमान चक्र आहे. काळाच्या बरोबर चालण्याचे धैर्य दाखवले नाही, तर आपण पुढे जाऊ शकत नाही. भारतीय जीवन पद्धत ही संविधानाचा आत्मा आहे. संविधानाने मुलभूत हक्क बहाल केले आहेत. कायद्यासमोर समानता आहे. धर्म, भेद यावरून भेदभाव करता येणार नाही. सामाजिक समानता, समान संधी, कलम १५ मध्ये भेदभाव करता येणार नाही, असे बाबासाहेबांनी सांगितले आहे. पण एखादा समाज जर मागे राहिला असेल तर शैक्षणिक आरक्षण तरतूदही केली आहे.
संधीची समानता
संविधानाने सर्वांना संधीची समानता दिली आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा समान आहे. कुठल्याही व्यक्तीला जात, पंथ, धर्म या आधारावर संधी मिळणार नाही. प्रत्येकाची प्रतिष्ठा राहीली पाहिजे, असा प्रयत्न डॉ. बाबासाहेबांनी संविधानात केला आहे. संविधानातून राजकीय लोकशाही नको, सामाजिक, आर्थिक लोकशाही आली पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब सांगायचे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भारतीय संविधानाने पहिल्या दिवसापासून मतदानाचा अधिकार दिला आहे. भारत एक संघराज्य प्रणाली आहे. हे राज्य सांस्कृतिक एकतेवर अवलंबून आहे. कार्यपालिका, न्यायपालिका, विधीपालिका हे तीन स्तंभ भारतीय लोकशाहीचे आहे. तर अदृश्य स्तंभ हा प्रसार माध्यमे आहे. संविधानात राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिली आहे. या तत्वानुसार समान नागरी कायदा करण्याची जबाबदारी प्रत्येक राज्यावर दिली आहे. नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप समान नागरी संहिता लागावी, यासाठी राज्य प्रयत्नशील राहील, असेही या तत्वानुसार नमूद केले आहे. पशु, जनावरे यांच्या कत्तलीस मनाई करण्याचे तत्वही राज्य धोरण मार्गदर्शक तत्वामध्ये आहे.
No comments:
Post a Comment