Wednesday, 1 May 2024

देवमाणूस

 


बघा हे चंद्रकांत जी गोखले...


असा देवमाणूस खरोखरच अस्तित्वात होता,कोणाचा विश्वास बसणार नाही.


सच्चा रणभुमी  मागील योद्धा...असे सामाजिक कार्य  जमणार आहे का ?? 


चंद्रकांत गोखले यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रतिवर्षी एक लाख 

रुपये कारगिल शहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी दिली.आज हा आकडा कमी वाटत असला तरी चार दशकापुर्वी तो एक कोटीप्रमाणे होता .सैनिकांसाठी खर्च करता यावा यासाठी ते केवळ  एकच वेळ जेवन करत ,कुणाचीही पण  एक पै ची पण मदत घेत नसत ,स्वतःला मिळणाऱ्या पेन्शन मधून,ते हे आभाळाएवढे समाजकार्य करत होते का ? तर  भारतमातेसाठी शाहिद झाल्याच्या घरात कुणी उपाशी राहू नये. रेशनींगच्या रांगेत  शेवटपर्यंत उभा राहणारा ,मराठी दिग्ग्ज अभिनेता.


मराठी रंगभूमी,आणि चित्रपटात आघाडीचा नायक ,नेहमी बसने व  पायी प्रवास करत.आपल्या विक्रमला ,तू मला भेटायला २००० रु चे पेट्रोल जाळून मुंबईहून पुण्याला  येऊ नकोस असे निक्षून सांगणारे  चंद्रकांत गोखले .कितीही अडचणी आल्या तरी कारगिल शहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी प्रतिवर्षी एक लाख रुपये मदत थांबविली नाही.

-----------------------------------------------------------------------------------

अशी माणसं खरोखरच दुर्मिळ..


०२.०९.१९९९ ची गोष्ट.. मी सकाळी सकाळीच कुठल्याशा नाटकाच्या जाहिरातीचं अर्जंट काम करत घरी बसलो होतो, तेवढ्यात खालून खणखणीत आवाजात हाक ऐकू आली... "कुमार, आहेस का घरात?"

दोनतीन मिनिटांत जिन्याच्या पायऱ्या चढून शेजारच्या बिल्डिंगमधे राहणारे चंद्रकांत गोखले (बाबा) हजर झाले.

मला घाईघाईत म्हणाले,

"कुमार, एक तातडीचं, महत्त्वाचं काम होतं..! मला कारगिल जवानांच्या मदतीसाठी 100,000 रु. पाठवयचेत, पण 16,000 रु कमी पडताहेत..मला मिळतील का उसने?"

मी म्हणालो, "बाबा, आत्ता माझ्याकडं एवढे पैसे नाहीत, पण संध्याकाळपर्यंत बँकेतून काढून दिले तर चालेल का?"

तर "चालेल, मी येतो संध्याकाळी" म्हणाले आणि आनंदात घरी गेले...

मी संध्याकाळी बँकेतून आणून 16,000 रु. तयार ठेवले...

संध्याकाळी 4-4.30 च्या सुमारास बाबा पुन्हा माझ्या घरी आले आणि म्हणाले,

"मला येणे होते ते 3500 रु. आत्ताच एकाकडून मिळाले, तर आता तू मला फक्त 12,500 रुपयेच दे"

मग कापडी पिशवीतून एक पिवळा पडलेला, नीट घडी घातलेला कागद माझ्या हातात देत म्हणाले,

"हा कागद असू दे तुझ्याकडं.."

मी कुतूहलानं कागद पाह्यला, तर त्यांच्या मातोश्री कमलाबाई यांच्या नावे असलेल्या ट्रस्टच्या जुन्या लेटरहेडवर, (सकाळी हवी असलेली) 16,000 ची रक्कम माझ्याकडून उसनी घेत असल्याचं आणि ती डिसेंबर 99 च्या आत परत करणार असल्याचं त्यांनी 'लिहून' दिलं होतं, एवढंच नव्हे, तर, 'मी जिवंत नसलो, तर माझा मुलगा विक्रम आपले पैसे परत देईल' असंही लिहिलं होतं..!!!

त्यांच्या कल्पनेप्रमाणे दोन 'रेव्हेन्यू स्टँप्स' लावून, त्यावर सही करून तो 'कागद' (त्यांच्या परीनं) त्यांनी 'प्रमाणित'ही केला होता..!

मी म्हणालो, "बाबा काय गरज आहे ह्या कागदाची? जमतील तेव्हा द्या पैसे परत. पण मी हा कागद ठेवून घेणार नाही!"तर डोळ्यांत पाणी आणून आर्जवपूर्वक तो ठेवून घ्यायला त्यांनी मला भाग पाडलं.

तीनचारच दिवस होतात, न होतात, एवढ्यात बाबा पुन्हा माझ्याकडे आले, आणि (डिसेंबरचा 'वायदा' असताना) पिशवीतून पैशांचा गठ्ठा काढून मला देत म्हणाले,

"अरे.. योगायोग बघ कसा आहे..! कालच मला एका चित्रपटाचं काम आलं आहे, आणि त्यांनी अ‍ॅडव्हान्सही दिलाय.. आता ती चिठ्ठी आण, आणि माझ्यासमोर फाडून टाक..!"

मी म्हटलं, "मुळीच फाडून टाकणार नाही..! माझा ठेवा आहे तो..!"

मी त्याच कागदावर तारीख टाकून आभारपूर्वक पैसे परत मिळाल्याचे लिहिले, आणि (.. मी 'नको' म्हणत असताना बाबांनी आवर्जून लिहून आणलेला) तो 'कागद' जपून ठेवला..!

ह्या आमच्या 'व्यवहाराची' माहिती कदाचित विक्रम गोखल्यांनाही नसावी.. (मीही सांगितली नाही अजून.. पण आता कधीतरी आवर्जून सांगायलाच हवी..!)

सोबत : त्या 'कागदपत्राचा' फोटो, आणि पूर्वी मी टिळक स्मारक मंदिराच्या पायऱ्यांवर, फिल्म कॅमेऱ्याने काढलेला बाबांचा फोटो.


एक वेळ उपाशी राहुन प्रतिवर्षी सैनिकांना एक लाख रुपये देनारा अभिनेता चंद्रकांत गोखले...जन्म - ७ जानेवारी १९२१..मृत्यु - २० जुन २००८.

परिवार - अभिनेते विक्रम गोखलेंचे वडील ,

अभिनय प्रवास..वयाच्या नवव्या वर्षी रंगभूमिवर पदार्पण..सात दशकात ६० पेक्षा जास्त नाटक व त्याहिपेक्षा जास्त चित्रपटात काम ,चंद्रकांत गोखले यांनी कोणताही गाजावाजा न करता प्रतिवर्षी एक लाख रुपये शहिद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी दिली.या देशप्रेमी कलावंतास भावपूर्ण आदरांजली .


सच्चा रणभुमीमागील योद्धा...असे जाज्ज्वल्य  सामाजिक कार्य  करायचे म्हटले तर आज कुणाला जमणार आहे का ??  


आजही अभिनेते विक्रम गोखले आपल्या वडिलांचा वसा पुढे चालवत आहेत.


लेखक अज्ञात

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi