Monday, 25 December 2023

भवतल

 चेरापुंजीचा पाऊस आणि २३ वर्षांची प्रतिक्षा !

(मेघालय डायरी)


दोन मित्र. जगातल्या सर्वाधिक पावसाच्या ठिकाणी पाऊस पडत असताना जायचं ठरवतात. पुरेसे पैसे जमत नाहीत. शिवाय ऑफिसची सुट्टी, त्या भागातली अनिश्चितता या सर्व गोष्टींचे अडथळे असतात. त्यामुळे सारं काही बारगळतं. पण २३ वर्षांनंतर त्यांचा तिथं जाण्याचा योग येतो. मात्र, दिवस हिवाळ्याचे असतात. 

मग नेमकं काय होतं??

...


समीर कोडिलकर आणि माझी मैत्री १९९९-२००० पासूनची. मी पुण्यात ‘लोकसत्ता’ मधे आणि तो ‘प्रभात’ मधे असताना आम्ही भेटलो. आमचा बीट क्राइम. त्यामुळे पोलीस-प्रेसरूममधे भेटणं, बातम्या करणं, गप्पा – टप्पा, त्या निमित्ताने फिरणं. मैत्री घट्ट होत झाली. त्या वेळी मी हौस म्हणून हवामान, पर्यावरण असे त्या काळी फारसे महत्त्वाचे समजले न जाणारे विषयही हाताळायचो. तेव्हाची माझी फॅण्टसी होती- जगातल्या सर्वाधिक पावसाच्या चेरापुंजीचा धो-धो पाऊस अनुभवायचा. समीरला बोललो. त्यालाही कल्पना आवडली. तिकडं जायचं तर दोन गोष्टी महत्त्वाच्या- तीनेक आठवड्यांची सुट्टी (तेव्हा आमची झेप रेल्वेपर्यंतची) आणि खर्चासाठी पैसे. पैसे जमा करायला सुरुवात केली. पाच-सहा महिन्यांत माझ्याकडं काही पैसे जमले, त्याच्याकडंही तसेच काही. पण तेवढ्याने काही होणार नव्हतं. आणि मोठ्या सुट्टीचं काय? मग तो विषय मागं पडला.


अलीकडं मी *‘भवताल इकोटूर्स’* या उपक्रमाच्या निमित्ताने जुलै महिन्यात चेरापुंजीला गेलो होतो. गंमत म्हणजे आम्ही पूर्ण दोन दिवस तिथं होतो, पण पावसाचा एकही थेंब पडला नाही. (आधी सलग ५० दिवस पाऊस पडला होता.) याच उपक्रमासाठी नवनवी ठिकाणं, संकल्पना, वेगळी आकर्षणं यांचा शोध घेण्यासाठी आणि पूर्वतयारीसाठी नुकताच डिसेंबर महिन्यात पुन्हा मेघालय गेलो होतो. सोबत चार मित्र होते. त्यात समीरही होता. पावसाळा नाही तर नाही, निदान ठरवल्यानुसार चेरापुंजीला तरी भेट देता येईल, असा विचार करून समीर सहभागी झाला होता. २००० साली जायचं ठरवलेलं, प्रत्यक्षात तिथं जायला २०२३ साल उजाडलं. यावेळी अनेक भन्नाट गोष्टी एक्सप्लोर करता आल्या. त्याबद्दल लिहीनच. पण आता चेरापुंजीबद्दल.


चेरापुंजीत आमचे दोन मुक्काम होते. नेमकं त्या वेळी बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण झालं होतं. हवामान ढगाळ बनलं. रात्रीच्या वेळी छतावर टपटप आवाज सुरू झाला. डिसेंबर महिन्यात चक्क पाऊस पडत होता. आमची चेरापुंजीच्या पावसात भिजण्याची इच्छा इतकी तीव्र होती की जणू त्यासाठीच एवढं सारं जुळून आलं होतं... दुसऱ्या दिवशी उठल्यावर पावसात भिजलो. मग हवामान विभागाची वेधशाळा गाठली आणि जिथं सर्वाधिक पाऊस मोजला जातो, ते ठिकाणही पाहिले. तिथल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तिथला पाऊस, मान्सून समजून घेतला... जे ठरवले होते ते तब्बल २३ वर्षांनंतर प्रत्यक्षात येत होते.


- अभिजित घोरपडे


Exclusive Meghalaya - Kaziranga

नेहमीच्या गोष्टींपलीकडचं काही समजून घेण्यासाठी, चलो मेघालय

(Feb - March च्या सीमेवर)

9545350862 / bhavatal@gmail.com


.................................


भवताल

(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)

९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com


Bhavatal

(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)

954


5350862 / bhavatal@gmail.com

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi