Wednesday, 25 October 2023

माझी लाज तुला पांडुरंगा🚩

 🚩माझी लाज तुला पांडुरंगा🚩


🌻 🌻 संत दामाजी पंत 🌻🌻


"पंत दरवाजा खोलो"

"पंत दरवाजा खोलो'

दारावर जोरजोरात धक्के बसू लागले.

"पंत दरवाजा खोलो...."

पंत जेवायला बसले होते. दुष्काळ असल्यामुळे त्यांच्या पंक्तीला आणखी ही

काही अतिथी होते.

पंतांच्या पत्नीने दरवाजा उघडला. बाहेर हत्यारबंद दोन यवन शिपाई उभे होते.

"दामाजी पंत कहा है ? सरकार का हुक्म है..." ते यवन शिपाई गरजले.

"आपण आत यावे" पंतांची बायको म्हणाली

यवन शिपाई आत आले. आत मध्ये जेवणाची पंगत बसली होती. प्रथे प्रमाणे पंतांच्या पत्नीने गुळपाणी दिले. तसे ते शिपाई म्हणाले,"माई जी खाने को कुछ मिलेगा ?"

"हा हा, क्यू नही, बैठीए",पंत अदबीने म्हणाले आणि पत्नीला चार पानं मांडायला सांगितली,.

दुपारची वेळ होती, उन्हाचा कडाका होता. शिपायांना भूक लागली होती. दोघे जण जेवायला बसले. संतांच्या घरचे ते सात्विक अन्न पोटात गेले आणि शिपायांच्या वृत्तीत बदल होऊ लागला. ते शांत झाले.

त्यांनी थैलीतून एक कागद बाहेर काढला आणि पंतांच्या हातात ठेवला. पंतांनी तात्काळ जाणले त्या कागदात काय लिहिलेले आहे. तो कागद घेऊन पंत देवघरात गेले आणि तो कागद पांडुरंगाच्या मूर्ती पुढे ठेवला आणि म्हणाले,

"माझी लाज तुला पांडुरंगा".

कागद परत घेऊन पंतांनी तो उघडून वाचला. मंगळवेढ्यातले धान्य कोठार लुटल्याचा आरोप दामाजी पंतांवर ठेवून पंतांना काढण्या लावून दरबारात हजर करावे असा हुकूम होता.

दामाजी पंत पत्नीचा निरोप घेऊन त्या शिपायांबरोबर जायला निघाले. ही बातमी वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आणि पंतांच्या वाडयासमोर गर्दी लोटली.

पंतांना घेऊन ते शिपाई वाड्याबाहेर आले. आणि गावकऱ्यांनी शिपायांना वेढा घातला. पंत हात जोडून गावकऱ्यांना म्हणाले

"ते बादशहाचे शिपाई आहेत त्यांना सरकारी कामात अडथळा करू नका."

एव्हढ्यात पंतांची पत्नी शिपायांना म्हणाली,"तुम्ही एकदम बेदरला जाऊ नका आधी पंढरपूरला जा आणि मग बेदरला जा".

शिपाई म्हणाले "आम्हाला तसा हुकुम नाही".

पंतांच्या पत्नीने हातातून सोन्याच्या बांगड्या काढून शिपायांच्या हातात ठेवल्या तसे शिपाई म्हणाले," हां माईजी , जैसा आप कहेंगे वैसा होगा". 

त्याप्रमाणे शिपायांनी पंतांना आधी पंढरपूरला नेले.

पंत विठ्ठलाला म्हणाले,

 "लाज राख पांडुरंगा"

श्रीहरीला दंडवत घालून दामाजीपंत शिपायांबरोबर

बेदरला जायला निघाले.


इकडे श्रीविठ्ठल रुक्मिणीला म्हणाले," दामाजी पंत काही प्राणाची भीक मागणार नाही. मलाच काहीतरी केले पाहिजे. तू तुझे सर्व दागिने मला दे. परत देताना मी दुप्पट करून देईन."

तेंव्हा रुक्मिणी माता म्हणाल्या, " दागिने नेताना सर्व नवरे असेच म्हणतात".

रुक्मिणी मातेनी सर्व दागिने काढून पांडुरंगाच्या हवाली केले. पांडुरंगाने त्या दागिन्यांचे सुवर्ण मोहरात रूपांतर केले. स्वतःचा वेष बदलून ते महार बनले. आणि 

झाला महार पंढरीनाथ !

पंढरीनाथांनी सर्व मोहरा पागोट्यात गुंढाळल्या, पागोटे डोक्यावर ठेवले आणि क्षणात

बादशहाच्या दरबारात हजर झाले.

बादशहाने विचारले," कौन हो तुम ?"

पंढरीनाथ म्हणाले,"विठू महार म्हणत्यात मला. मी दामाजी पंतांकडे कामाला असतो. तसेच काम निघाले म्हणून मालकांनी मला पाठवले. आमच्या मालकांनी धान्यकोठार लुटलेलं नाही तर ते धान्य गावकऱ्यांना विकले. त्याचे हे पैसे आणले आहेत", असं म्हणून पंढरीनाथांनी डोक्यावरचे पागोटे काढून त्यातल्या सुवर्ण मोहरा बादशहापुढे ओतल्या.

बादशहा मनात म्हणाला माझा खजिना पण एव्हढा नाही. बादशहाने पैसे मिळाल्याची पावती विठू महाराचे हाती ठेवली.

आणि विठू महाराला बादशहाने विचारले की,

"दामाजीपंत तुला किती पगार देतात ?"

"एक लक्ष देतात" विठू महार म्हणाला.

मी तुला दोन लक्ष पगार देतो, माझ्याकडे काम कर".

यावर विठू महार म्हणाला,

"मला दोन लक्ष चालत नाही. एक लक्ष संसारात आणि एक लक्ष दरबारात मला चालत नाही. मला एकच लक्ष लागते".

बादशहाला काहीच उमगले नाही !

बाहेर येताच विठू महार अंतर्धांन पावला. 

पंढरीनाथांनी ती पावती पंतांच्या घरी जाऊन त्यांच्या देवघरातल्या पोथीत ठेवली.


इकडे दरबारात यवन शिपायांनी दामाजीपंतांना हजर केले. तेंव्हा 

बादशहांनी दामाजीपंतांना सांगितले तुमच्या विरूद्ध कोणताही आरोप नाही. तुम्ही ज्या विठू महाराला पाठवले होते त्याने सर्व रक्कम दरबारात जमा केली आहे. दामाजीपंतांना आश्चर्याचा धक्काच बसला.

हा कोण विठू महार ? त्याने कोठून पैसे भरले ?

बराच वेळ विचार केल्यावर दामाजीपंतांच्या लक्षात आले की विठू महार म्हणजे खुद्द पंढरीनाथ दरबारात येऊन गेले, पंतांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या.बादशहाला स्वतः पंढरीनाथांनी दर्शन दिले., पंत मनात म्हणाले हे बरंय पंढरीनाथा ? वर्षानुवर्षे आम्ही तुझी भक्ती करावी आणि दर्शन मात्र तू बादशहाना दिलेस ?


पंत घरी आले आणि थेट देवघरात गेले. पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि त्यांना जाणवले पांडुरंग मिस्किलपणे हसताहेत.

त्यांचे लक्ष उघड्या पोथीकडे गेले त्यात एक कागद होता. तो हातात घेऊन वाचला, बादशहाच्या

शिक्क्याची ती पावती होती

"धान्याची रक्कम मिळाली"

पंतांना गहिवरून आले. पुन्हा डोळ्यातून पाणी वाहू लागले.


🔔🚩🌷🔔🚩🌷🔔🚩

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi