*दातांचे आरोग्य.*
दाताचे दुखणे सगळ्यात वाईट असे आपण नेहमी ऐकतो. दातदुखीमुळे येणारी कळ थेट डोक्यात जाते आणि आपले दैनंदिन जीवन विस्कळीत होते. दात खराब होण्याची अनेक कारणे आहेत. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, खाल्ल्यानंतर दात स्वच्छ न घासणे यांमुळे दात किडणे, दात दुखणे, दात कमकुवत होऊन पडणे अशा समस्या निर्माण होतात. दातांची निगा राखणे हे दातांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. पण दातांची स्वच्छता ठेवली नाही तर तुमचे संपूर्ण आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे दातांचे आरोग्य चांगले ठेवायचे असल्यास काही गोष्टी पाळणे गरजेचे असते. यामध्ये आहाराला जास्त महत्त्व आहे, दात चांगले ठेवायचे असल्यास काही पदार्थ टाळणे आवश्यक आहे. अन्यथा दातांना लागणारी कीड आणि त्यावर करावे लागणारे उपचार यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. पाहूयात कोणते पदार्थ टाळल्यास दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
कोणत्याही प्रकारच्या मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते. त्यामुळे तुमच्या आहारात गोडाचे प्रमाण जास्त असेल तर तुम्हाला दात किडण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे तुम्हाला दातांच्या आरोग्याविषयी काळजी असेल तर मिठाई खाण्याचे प्रमाण निश्चितच कमी करायला हवे. सध्या बाजारात साखरविरहीत गोड पदार्थ मिळतात. लोकांनाही हे पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरात साखर जात नाही आणि दात सुरक्षित आहेत असे वाटते. मात्र प्रत्यक्षात तसे नसून या साखरविरहीत मिठाईनेही दात किडण्याची शक्यता असते. त्यामुळे दातांच्या उत्तम आरोग्यासाठी कोणत्याही प्रकारची मिठाई टाळणे किंवा अगदी कमी प्रमाणात खाणे हा उत्तम उपाय आहे.
चहा किंवा कॉफी
सध्या आपल्या सगळ्यांचीच जीवनशैली काहीशी तणावाची आहे. कामाचा ताण असल्याने किंवा इतरही अनेक कारणांमुळे भारतात चहा किंवा कॉफी घेण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र ही दोन्ही पेये आरोग्यासाठी अतिशय घातक असून त्यामुळे दात खराब होतात. चहा आणि कॉफी या दोन्हीमध्ये टॅनिक अॅसिड असते. दातांवर असणाऱ्या इनॅमल कोटींगसाठी हा घटक घातक असतो. त्यामुळे दातांचा रंग बदलतो. तसेच दातांवर चॉकलेटी रंगाचे डाग दिसू लागतात.
सायट्रीक फळे.
सायट्रीक अॅसिड म्हणजेच व्हिटॅमिन सी असणारी फळे दातांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. ही फळे आरोग्यासाठी उपयुक्त असली तरीही दातांसाठी मात्र ती त्रासदायक ठरु शकतात. संत्री, मोसंबी यांसारख्या आंबट फळांचा यामध्ये समावेश होतो. या फळांमुळे दात कमकुवत होऊन पिवळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा फळांचा ज्यूस घेतल्यास जास्त उपयुक्त. या फळांच्या बाबतीत तुम्हाला दातांबरोबरच तुमच्या जीभेची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते.
लोणची.
भारतीय आहारात लोणच्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. खारवलेली विविध प्रकारची लोणची जेवणाची लज्जत वाढविण्यासाठी उपयुक्त असली तरीही दातांसाठी मात्र ती नुकसानकारक ठरतात. लोणच्यामध्येही अॅसिडीक घटक असतात जे दातांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. लोणच्यामध्ये असणाऱ्या व्हिनेगरमुळे दातदुखी तसेच दातांची जळजळ होते. याशिवाय दात किडण्याचे एक मुख्य कारण लोणचे ठरु शकते.
प्रमोद पाठक.
No comments:
Post a Comment