आकांक्षित जिल्हे देशासाठी गतीवर्धक- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
विकासाच्या दऱ्या सांधण्यासाठी सांघिक प्रयत्न आवश्यक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सेंट्रल किचनने पुरवला आश्रमशाळेतील 11 हजार विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार
नंदूरबारच्या अनोख्या संकल्पनेची नीती आयोगाकडुन विशेष दखल
मुंबई दिनांक 22 : नंदूरबार जिल्ह्यात आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या 30 आश्रमशाळा तसेच एकलव्य शाळांमधील 11 हजार विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सेंट्रल किचनमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याची विशेष दखल आज नीती आयोगाने केलेल्या सादरीकरणात घेण्यात आली व या उपक्रमाचा उत्तम संकल्पना (बेस्ट प्रॅक्टीस ) म्हणून गौरव देखील केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील काही आकांक्षित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
आकांक्षित जिल्हे हे विकासाच्या मार्गावर मार्गस्थ होताना देशासाठी गतिरोधक नाही तर, गतीवर्धक म्हणून काम करत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आकांक्षित जिल्ह्यांना विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न नेटाने होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी त्या-त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे.
आकांक्षित नसलेल्या पण विविध विकास निर्देशांकामध्ये एक किंवा दोन निर्देशांकात मागे असलेल्या देशातील 142 जिल्ह्यांची निवड केंद्र सरकारने केली आहे. या जिल्ह्यांच्या विकासाकडेही केंद्र शासन विशेष लक्ष देणार असून काही उद्दिष्टांची निश्चिती करत आहे. त्यांनी आकांक्षित जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतूक करताना केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून सर्वसामान्यांच्या आयुष्यातील चांगल्या बदलाचे साक्षीदार होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनास केले. प्रत्येक जिल्ह्याने पुढील दोन वर्षात स्वत:चे व्हिजन तयार करताना तालुका पातळीवर जाऊन, तेथील प्राथमिकता विचारात घेऊन हे नियोजन करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
नंदुरबारचा अनोखा उपक्रम
उत्तम पॅकेजिंग, स्वच्छ हाताळणी आणि वेळेत पुरवठा ही या सेंट्रल किचनची वैशिष्ट्ये असून, यातून सर्व विद्यार्थ्यांना एकसारखा दर्जेदार आहार मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यात सुधारणा दिसून आली असल्याचेही या सादरीकरणादरम्यान नीती आयोगाने स्पष्ट केले. भविष्यात अतिदुर्गम भागातील अंगणवाडी आणि आश्रमशाळांसाठी सेंट्रल किचनची संकल्पना राबविण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरवले असल्याचेही आयोगाने आपल्या सादरीकरणात नमूद केले आहे.
विकासाच्या दऱ्या सांधण्यासाठी सांघिक भावनेने प्रयत्न आवश्यक- मुख्यमंत्री
राज्याच्या सर्वसमावेश प्रगतीसाठी विविध क्षेत्रातील विकासाच्या दऱ्या सांधल्या जाणे आवश्यक असून सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी परस्पर सहकार्य आणि समन्वयातून सांघिक प्रयत्न करावेत, असे करताना नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घ्यावेत अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. सामाजिक विकासाची दिशा ही तेव्हाच उपयुक्त सिद्ध होते जेव्हा सर्वसामान्यांच्या मुलभूत गरजा आणि त्यांच्या इच्छा आकांक्षांची पुर्तता होते. त्यामुळे केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणून काम न करता त्यांच्यातीलच एक होऊन काम करणे, त्यासाठी अचूक नियोजन, उपलब्ध संसाधनांचा उत्तम वापर करणे, स्थानिकांना या विकास संकल्पनेत सहभागी करून घेऊन, त्यांच्या गरजा समजून घेऊन काम करणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
आजच्या बैठकीत आरोग्य, शिक्षण, कृषी, कौशल्य विकास व वित्तीय समावेशन, पर्यटन, ग्रामीण विकास अशा विविध विषयांवरील सादरीकरण करण्यात येऊन या आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या योजनांची स्थिती आणि अंमलबजावणीची दिशा याची माहिती देण्यात आली. नीती आयोगाच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आकांक्षित जिल्ह्यांच्या प्रगतीची माहिती देणारे सादरीकरण केले. बैठकीत केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाचे सचिव नागेंद्र सिन्हा यांच्यासह आरोग्य, शिक्षण, कृषी, कौशल्यविकास मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते त्यांनी ही विविध योजनांच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजना व राज्यांना भविष्यात द्यावयाच्या उद्दिष्टांबाबत माहिती दिली. या बैठकीस निमंत्रित राज्यांचे मुख्यमंत्री, मुख्यसचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील गडचिरोली, नंदुरबार उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदूर्ग, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
000
राज्यपाल आर्लेकर - कोश्यारी भे
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
HP Governor Rajendra Arlekar meets Governor Koshyari
Governor of Himachal Pradesh Rajendra Arlekar met Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai on Saturday (22 Jan). This was a courtesy call.
वृत्त क्र. 224
प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ चित्ररथ सज्ज
नवी दिल्ली, 22 : राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताकदिनी होणा-या पथसंचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ विषयावरील चित्ररथ सज्ज झाला असून येथील कँटोन्मेंट परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम पूर्णत्वास येत आहे.
येथील कँटोन्मेंट परिसरातील रंगशाळेत आज केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनी राजपथावर सादर होणा-या चित्ररथाविषयी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी महाराष्ट्रासह 12 राज्यांची आणि 7 मंत्रालयांची चित्ररथ सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्रातर्फे ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ आहे.
‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ चित्ररथाविषयी
यंदाच्या चित्ररथावर दर्शनी बाजूस भव्य ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंची आणि 6 फूट रूंद पंखाची देखणी प्रतिकृती आहे. तसेच दीड फूट उंच दर्शविणारे राज्यफुल ‘ताम्हण’ याचे अनेक रंगीत गुच्छ दर्शविले आहेत. त्यावर इतर छोटी आकर्षक फुलपाखरांची लोभस प्रतिकृती आहे. चित्ररथावर 15 फूट भव्य असा ‘शेकरू’ राज्यप्राणी तसेच युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेल्या ‘कास पठारा’ची प्रतिमा दर्शविण्यात आलेली आहे. चित्ररथाच्या दर्शनी भागात कास पठारावर आढळणारा सरडा ‘सुपारबा’ ३ फूट उंच दर्शविला आहे, त्यामागे राज्यपक्षी ‘हरियाल’ पिवळा कबुतराची प्रतिकृतीही दिसते. चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेला राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती आणि शेवटी राज्यवृक्ष ‘आंबा’ वृक्षाची प्रतिकृती सुमारे 14 ते 15 फूट उंचीचा आहे. दुर्मिळ ‘माळढोक’ पक्षी, महाराष्ट्रात नव्याने सापडलेली ‘खेकड्या’ची तसेच, मासा प्रजाती वाघ, आंबोली झरा, फ्लेमिंगो, मासा, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या 4 ते 5 फूट उंचीच्या प्रतिकृती दिसत आहे. यासह सुंदर कलात्मक दृष्टिकोनातुन जैवविविधता दिसेल असे देखावेही दर्शनी भागावर आहेत. यासर्वांचा समावेश चित्ररथात करून चित्ररथ अधिक देखणा व मनमोहक करण्यात आल्याची माहिती राज्यातील कार्य संस्कृतिक संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे यांनी यावेळी दिली.
या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची असून त्याला प्रत्यक्षात उतरविणाऱ्या कलाकारांचा चमु काम करीत असून हे काम आता अंतीम टप्प्यात आहे. महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण जैव वारश्यावरील कवितेच्या ओळी संगीतबद्ध करून गेय रूपात राजपथावर ऐकू येणार आहेत. यासोबतच राजपथावरून सरकणाऱ्या चित्ररथासोबत डावी व उजवीकडे दोन-दोन असे चार कलाकार नृत्य सादर करतील.
आज आयोजित पत्रकार परिषदेनंतर ज्या राज्यांना आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमात पुरस्कार मिळाले त्यांचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राने गोंधळ ही लोककला सादर केली होती. या स्पर्धेत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आला असून यावेळी महाराष्ट्राच्या लोककलेचे सादरीकरण करण्यात झाले.
वृत्त क्र. 223
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ
-वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 22: वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
या निर्णयानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नव्याने वाढविण्यात आलेली महाविद्यालय निहाय प्रवेश क्षमता याप्रमाणे आहे.
मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज व नायर चॅरीटेबल रुग्णालयात डी.एम. नेफ्रॉलॉजी (D.M. Nephrology) या विषयाकरिता विद्यार्थी प्रवेश क्षमतावाढ 1 वरुन 3 करण्यात आली आहे. तर यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी.ॲनेस्थेसियोलॉजी (MD Anesthesiology) या विषयात सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश क्षमता चार असणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे एम.डी. जनरल मेडिसीन (MD General Medicine) आणि एम.एस.जनरल सर्जरी या दोन विषयातील अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत अनुक्रमे तीन वरुन सहा आणि तीन वरुन पाच इतकी वाढ करण्यात आली आहे.
कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी मायक्रोबॉयलॉजी (M.D. Microbiology), एम.डी पॅथोलॉजी (M.D. Pathology), एम.डी फार्माकॉलॉजी (M.D. Pharmacology), एम.डी रेसपीरेटरी मेडिसीन (M.D. Respiratory Medicine) या चार अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 3, 4,3 आणि 2 इतकी विद्याथी प्रवेश क्षमता नव्याने करण्यात आली आहे. याशिवाय याच वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी ॲनेस्थेसियोलॉजी (M.D. Anaesthesiology), एम .डी (M.D. Otorhinolarynegology), एम.डी जनरल मेडिसीन (M.D. General Medicine), एम.एस जनरल सर्जरी (M.S. General Surgery), एम.एस अबस्टेट्रीक्स आणि गॉयनाकॉलॉजी (M.S.Obstetrics & Gynaecology), एम.डी बॉयो केमिस्ट्री (M.D. BioChemistry), आणि एम.एस ऑपथलमोलॉजी (M.S. Opthalmology), या 7 अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे 4,3,9,3,3,4 आणि 2 इतकी विद्याथी प्रवेश क्षमता वाढ करण्यात आली आहे.
एम.डी रेडिओ डॉयगॉनासिस (M.D. Radio- diagnosis) आणि एम.डी पेडियॉट्रीक्स (M.D. Paeduatrics) या 2 विषयात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश क्षमतेत अनुक्रमे 5 वरुन 6 आणि 4 वरुन 6 इतकी वाढ करण्यात आली आहे.
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी डरमॅटोलॉजी, वेनेरीओलॉजी आणि लेप्रोसी (M.D. Darmatology, Venereology & Leprosy) या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली असून येथील विद्यार्थी प्रवेश क्षमता 3 असणार आहे.
पुण्यातील बे.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी ईमरजंन्सी मेडिसीन (M.D Emergency Medicine), हा अभ्यासक्रम 3 विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment