Sunday, 8 August 2021

 भविष्यातील घडामोडींचा अंदाज आपल्याला निकटच्या अभ्यासावरून  येऊ शकतो, असे सांगून डॉ. रेमंड दुराईस्वामी म्हणाले, अरबी समुद्रातील सारे बाष्पीभवन एकवटून ते घाटमाथ्याच्या दिशेने येईल आणि म्हणूनच कदाचित भविष्यात चेरापुंजी नव्हे तर महाबळेश्वर हे जगातील सर्वाधिक पाऊस होणारे ठिकाण असेल. २०१९ साली केलेल्या नोंदीनुसार, कोकणात आंबोली येथे ६४७२ मिमी पाऊस झाला. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यमध्ये सरासरी ४००० मिमी पाऊस त्या वर्षी झाला. तर महाबळेश्वरजवळ असलेल्या लामज या गावी तब्बल ७२०० मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरची पावसाची नोंद सरासरी ५८२० मिमी अशी आहे. यंदा आतापर्यंत तर केवळ ३० टक्केच पाऊस झाला आहे.


भूगर्भशास्त्र असे सांगते की, अतितीव्र पावसात डोंगरावरची माती, राडारोडा सारे काही वेगात खाली येते. केवळ मातीच असेल तर ती पाणी शोषते. तिचे वजन वाढते आणि अशा वेळेस मातीचा हा ढिगारा डोंगरउतारावर असेल तर त्याचा गुरुत्वमध्य वजनामुळे खालच्या दिशेला सरकतो आणि डोंगराच्या टोकाच्या भागासह सारे काही खाली कोसळते. अनेक ठिकाणी अलीकडे एकाच दिवसात तब्बल २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. अशा अधिकच्या पावसात

अशा घटना होणे अगदीच साहजिक आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी असेच झाले आहे.  आपल्याकडे खासकरून सह्यद्रीमध्ये डोंगरमाथ्याला बसॉल्ट आहे. त्यामधील भेगादेखील अशा प्रकारच्या दरडी कोसळण्यास कारणीभूत ठरतात. शिवाय दक्षिण कोकणात डोंगरमाथ्यावर पठारावर जांभा दगड आहे. त्यात पावसाच्या वेळेस त्यामधील खनिजे निघून जातात व तो सच्छिद्र होत जातो. अशा वेळेस अशा प्रकारच्या घटना खूपच साहजिक असतात. त्यामुळेच डोंगराची भूगर्भशास्त्रीय पाहणी करून नोंदी करणे आणि दरडी कोसळण्याची भीती असलेल्या परिसरात काही होण्यापूर्वीच काळजी घेणे म्हणजे शक्य असेल या घटना रोखण्यासाठीच्या उपाययोजना किंवा त्याखाली असलेल्या वस्ती इतरत्र हलविणे असे उपाय करता येतील.


महाबळेश्वरला तर ५९२ मिमी पावसाची नोंद एकाच दिवसात झाली आहे. २४ तासांत एवढय़ा मोठय़ा प्रमाणावरपाऊस होतो, त्या वेळेस आपल्याला धोरणात्मक बदल करावा लागपाऊसणार आहे, हे निश्चित.  एक काळ असा होता की, टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी डॉ. मोहन धारिया यांनी पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना अतिशय यशस्वीरीत्या राबविली. त्याचे चांगले फायदेही महाराष्ट्राने अनुभवले. मात्र आता जागतिक वातावरण बदलाला सामोरे जाताना जिथे मोठय़ा प्रमाणावर पावसात वाढ झाली आहे, तिथे तरी वेगळी उपाययोजना करावी लागेल. तिथे पाणी अडवा, पाणी जिरवा चालणार नाही.  त्यासाठी वेगळ्या उपाययोजनेसाठी आपण वेळीच प्रयत्न करायला हवेत, असे डॉ. दुराईस्वामी सांगतात.


काही ठिकाणी नद्यांचे पाट खुले ठेवायला हवे. जेजुरीला सर्व पाणी अडवत होतो. कऱ्हा नदीमध्ये ११८ टक्के पाणलोट क्षेत्रात कामे झाली. त्याचा परिणाम असा की,  त्यामुळे मोरगाव आदी क्षेत्रांत क्षारयुक्त पाण्यात वाढ झाली. याला रेसिडेन्स ऑफ टाइम असे म्हणतात. म्हणजेच आपण वापरलेले एक चमचा मीठ ते पुढची तब्बल १७६ वर्षे पाणलोट क्षेत्रात राहते. सगळेच पाणी अडवले तर त्यामुळे पलीकडे क्षारतेत वाढ होते. तापीमध्ये किंवा सांगलीसाताऱ्यात वाढलेली क्षारता हा त्याचाच परिणाम आहे. आता वाढलेल्या पावसामुळे आपल्याला परिस्थिती बदलण्याची संधी आहे. जिथे मोठय़ा प्रमाणावर पाऊस होतो आहे तिथे सुरुवातीचे पावसाचे पाणी आपण वाहून द्यायला हवे. खासकरून कोल्हापूरसारख्या परिसरात ऑगस्टनंतरचा आणि परतीचा असे दोन्ही पाऊस अनुभवता येतात. अशा ठिकाणी अखेरचा २० टक्के पाऊस कोल्हापूर बंधारा पद्धतीने अडवला जाऊ शकतो. त्याने क्षारता मोठय़ा प्रमाणावर कमी करण्याची संधी या अधिकच्या पावसामुळे मिळणार आहे.


पुणे विद्यापीठातील विद्यार्थी डॉ. बाबाजी मस्कारे यांनी दरडी कोसळ्याची शक्यता असलेल्या पठारावरील प्रदेशांचा अभ्यास त्यांच्या पीएचडीच्या शोधप्रबंधामध्ये केला असून त्यात नकाशासह सारे काही उपलब्ध आहे. त्याचा वापर राज्य शासनास करता येऊ शकतो. रायरेश्वरचे पठार वगळता पाचगणी- महाबळेश्वर, ठोसेघर, कास आणि पाटण यांचा अभ्यास झाला पूर्णपणे करण्यात आला असून दरडी कोसळण्याची शक्यता असलेली ठिकाणेही शास्त्रीय अभ्यासाने शोधण्यात आली आहेत. कोकणामध्येही अशाचप्रकारचा भूगर्भशास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे.


बोर्गेवाडी हे पाटणच्या पठाराजवळचे गाव असून तिथे सातत्याने दरडी कोसळत होत्या. मात्र अशा प्रकारच्या शास्त्रीय अभ्यासानंतर तिथे शासनाने पुनर्वसन केले आहे. अशाच प्रकारे पुनर्वसन भिलारमध्येही पार पडले. त्यामुळे मनुष्य व वित्तहानी टाळता येते हे सिद्ध झाले आहे, असे सागून डॉ. दुराईस्वामी म्हणाले की, एक महत्त्वाचा बदल आपल्याला आपल्या मानसिकतेमध्ये आणि धोरणनिर्णयामध्ये करावाच लागेल. आपण आजवर ब्रिटिशांची नियोजन पद्धती आदर्श मानली. त्यानुसार गेल्या ५०-१०० वर्षांतील घटनांचा, नोंदीचा अभ्यास करून त्यानुसार प्रकल्पांची बांधकामे केली जातात. यापुढे भविष्यात वातावरणबदलाची शास्त्रीय अभ्यासपूर्ण सर्वेक्षणे लक्षात घेऊन पुढच्या ५० वर्षांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या मॉडेल्सचा अभ्यास करत नियोजन करावे लागेल म्हणजे मग आपला द्रुतगती महामार्गच पाण्याखाली गेला अशा प्रसंगांना सामोरे तर जावे लागणार नाहीच, शिवाय मोठय़ा प्रमाणावर होणारी मनुष्य व वित्तहानीही टाळता येईल.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi