Sunday, 8 August 2021

 *अलिबागची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि येथील मंदिरांची निर्मिती*


 आजचे अलिबाग पुर्वी रामनाथ भागातच बहुतांशी सिमीत होते.खुद्द सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वास्तव्य रामनाथ येथील वाड्यात होते.ज्या अलिबाग शहराची आपण माहिती करून घेत आहोत तो भाग समुद्राने व्यापलेला होता.काही किनार्‍यावर मोकळी जागा होती तिथे नारळी पोफळीच्या विस्तृत बागा अली नावाच्या श्रीमंत व्यक्तीच्या मालकीच्या होत्या त्यांनी अलिबागच्या विस्तारासाठी जागा उपलब्ध करून दिली त्यावरून अलिबाग हे नाव पडले अशी या नावामागची आख्यायिका सांगितली जाते.पुढे रामनाथहून अलिबागकडे केंद्र  सरकत गेले.खुद्द आंग्रे यांचा वाडा अलिबाग मध्ये आला.आंग्रेकालीन इमारतींची निर्मिती झाली.पेशवेकालीन कागदपत्रातून अलिबाग हा उल्लेख आढळून येतो.काही ठिकाणी श्रीबाग असेही क्वचितच नमूद केलेले आहे.

 या लेखात अलिबाग मधील मंदिरांचा अत्यंत थोडक्यात परिचय करून देत आहे.

    सर्वप्रथम गणेश मंदिरे पाहुया. अलिबागमधे गणेशाची  दोन मंदिरे आहेत. एक ब्राह्मण आळीत आहे.दुसरे कामत आळीत आहे. ब्राह्मण आळीतील मंदिर पुरातन आहे. कामत आळीतील मंदिर खाजगी आहे . या देवळात अतिशय सुंदर देखणी संगमरवरी गणेश मुर्ति आहे.तसेच रंगीबेरंगी काचेच्या तुकड्यांनी बनविलेले flouring आतिशय कलात्मक आहे.आता पाहुया अलिबागच्या  जोगळेकर नाक्यावरील शंकराचे मंदिर! हे सर्वात प्राचीन मंदिर आहे.(1721) परदेशी नावाच्या गृहस्थास दृष्टांत झाला आणि ही मुर्ती उंदेरी किल्ल्यातून आणून सध्याच्या मंदिरात तिची विधीवत स्थापना करण्यात आली.या मंदिरासमोर एक मोठी विहीर होती त्या विहीरीत अलिबागकरांच्या अनेक पिढ्यांनी पोहण्याचे धडे घेतले.ती विहीर बुजविण्यात आली आता तिथे छत्रपती शिवाजीमहाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा बसविला असून तो अलिबागची शान आहे.तेथुन जवळच  सरखेल कान्होजी आंग्रे यांची आणि त्या कुटुंबातील सदस्यांच्या समाध्या आहेत. कान्होजीची समाधी उत्कृष्ट शिल्पकामाचा नमुना आहे.मराठ्यांची सागरी सत्ता प्रस्थापित करणा-या आंग्रे यांच्या समाधीसमोर आपण आपोआपच नतमस्तक होतो.अलिबागची आन मान शान म्हणजे हे पवित्र स्थान आहे.

    अलिबागचे बालाजी मंदिर म्हणजे उत्कृष्ट स्थापत्य शास्त्राचा नमुनाच होय! याची रचना,बांधकाम हेमाडपंती असून मंदिरा बाहेरील आणि आतील  शिल्पकाम डोळ्यांचे पारणे फेडणे.या मंदिराची निर्मीती गोपाळशेठ दलाल यांनी केली. 

    अलिबागचे दुसरे शंकर मंदिर हे अत्यंत महत्वाचे असून ते आंग्रेवाड्याजवळच आहे.आंग्रेचे दिवाण सरदार बिवलकर यांनी ते बांधले त्यावरील कळस हा सोन्याचा आहे असे म्हणतात.तेथील कोरीव काम पाहण्यासारखे आहे.एस टी बस स्थानकाजवळ हे मंदिर आहे.

    मोघे खाणावळी समोर विष्णुमंदिर व पोखरण लक्षवेधी आहे त्याची निर्मीती आंग्रेकालीन आहे.बालाजी नाक्यावरील श्री काळंबादेवी ही अलिबागची ग्रामदेवता असून नवरात्र उत्सवासाठी हे मंदिर भगिनिवर्गाचे श्रद्धास्थान  आहे.

      अलिबागचे मारूती मंदिर हे महत्वाचे आहे.या मंदिराच्या साक्षीने अनेक राजकीय  सामाजिक आणि सांस्कृतिक घटना घडल्या आहेत. अलिबागची हद्द येथपर्यंत होती तिथे स्मशानभूमी होती.येथून पुढे अलिबागचा समुद्र हटविण्यात आला.रेक्लेमेशनचा प्रयोग फार वर्षापूर्वीच झाला होता.या मंदिराची स्थापना सर्मथ रामदास यांच्या शिष्यानी केली अशी मान्यता आहे.येथे आसपास सतीच्या शिळाही सापडल्या आहेत व काही कोरलेली तुळशी वृंदावने आढळून आली आहेत: अशी अनेक इतरही मंदिर आहेत. ब्राह्मण आळीतील राम मंदिराचा समावेश करावा लागेल आता त्याचे नूतनीकरण झाले आहे.तसेच जोगळेकर नाक्याजवळ एक विठ्ठल मंदिर आहे तेही हेमाडपंथी पध्दतीचे आहे. बादजारपेठेतही एक राधाकृष्णाचे  मंदिर आहे एका छोटेखानी मंदिराचा उल्लेख करणे आवश्यक आहे.राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे कार्यालय मारुती नाक्यावर आहे त्याच्या मागच्या बाजुला एक घुमटी आहे त्यात देवतांच्या मुर्ति आहेत.त्यांना  सात आसरा(अप्सरा) म्हणतात.लहान मुलांना पूर्वी  देवी/ कांजण्या/गोवर/डांग्या खोकला असे जीवघेणे आजार होत असत तेव्हा या आसरांना नवस बोलला जाई .त्या काळातील आयाबायांची ती एक श्रध्दा होती. अलिबागच्या वास्तु आणि त्यांचे महत्व पुढील लेखात !

        डाॅ.भास्कर धाटावकर, निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन


*फेसबुक वरून साभार*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi