Friday, 3 November 2023

भ्रष्टाचार निर्मुलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

 भ्रष्टाचार निर्मुलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

           

            मुंबईदि. 02 : देशभर 30 ऑक्टोबर  ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. 

            राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करतानाभ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागमुंबई विभाग91सर पोचखानवाला मार्गवरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064दूरध्वनी क्रमांक 022-24921212संकेतस्थळ acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा ईमेल acbwebmail@mahapolice.gov.inaddlcpacbmumbai@mahapolice.inफेसबुक www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप acbmaharashtra.net, एक्स (ट्विटर) - @ACB_Maharashtra आणि 9930997700 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विजय पाटील यांनी केले आहे.

००००

मुंबई लोकलचे धावते जग*

 *मुंबई लोकलचे धावते जग*


   मुंबई मध्ये लोकलने प्रवास करणाऱ्यांचे एक स्वतंत्र जग आहे.....प्रत्येकाचा एक ७.५९- 

९.१३, ५.२३, ६.०३ अशा लग्नाचा मुहूर्त असल्यासारख्या वेळा असलेल्या गाड्याचे ग्रुप असतात. आपली नेहमीची ट्रेन इंडिकेटरला लावलेली असली की तो एकदम कम्फर्टेबल असतो चढायला कितीही गर्दी असली तरी 

त्याला त्याची चिंता नसते....

आणखी एक खासियत असते. प्रत्येकाचा डबा ठरलेला, डब्याला तीन दरवाजे असतात, त्यातला दरवाजा ठरलेला, इतक्यावर थांबत नाही, त्या दरवाज्यातून आत शिरल्यावर डावीकडे मुसंडी मारायची की उजवीकडे हेदेखील ठरलेलं असतं.... अर्जुनाला जसा फक्त पोपटाचा डोळा दिसत असतो तसं त्याला आपण पकडायची सीट दिसत असते....नेहमीची जागा पकडली की आजचा दिवस चांगला जाणार ह्याची त्याला 

खात्री पटते.....जागेवर बसल्या नंतर शेजारी आपले सखे सोबती आहेत ना याची खातरजमा केली जाते....मग गप्पा ,भंकस,तर काही ग्रुप मध्ये भजन,तर काही जण पत्ते काढतात....

Ladies डब्यात अशीच परिस्थितीअसते .....

भजन, पत्ते मात्र नसतात,

तिथेही आपला सगळा ग्रुप जमला की नाही ते बघितलं जातं.....गप्पा लगेचच सुरू होतात....त्यात एकमेकींच्या साड्या, ड्रेस, हेअर स्टाईल, मुलंबाळं, त्यांची आजारपणं,  

शिक्षणातली प्रगती.....अनेक विषय....क्वचित घरच्या,ऑफिसच्या कुरबुरी.....ह्या ग्रुप मध्ये वय वर्षे २० ते ६० एवढी 'रेंज'असते.....प्रत्येकीचा वाढदिवस साजरा करण्यात येतो, शिवाय केळवण,डोहाळेजेवण, कोणी रिटायर होणार असेल तिला सेन्डऑफ....त्याशिवाय हळदीकुंकू भोंडला....सगळं यथासांग पार पाडलं

जातं...... खायचं प्यायचं एकेक जण स्वतः करून किंवा विकत घेऊन येणार....पेपर डीश, चमचे, टिशू पेपर सगळं साग्रसंगीत.


आपल्या नेहमीच्या गाडी बद्द्ल प्रत्येकाला विशेष जिव्हाळा असतो.....दसऱ्याला लवकर येऊन त्या गाडीचे प्रवासी गाडी, आपला डबा सजवतात. गाडीचा मोटरमन, गार्ड रिटायर होतो तेव्हा गाडीचे नेहमीचे प्रवासी त्याला निरोप देतात.....प्लॅटफॉर्म वरच.....अतिशय हृद्य असा सोहळा असतो तो.....


लोकल मधलं शॉपिंग हा आणखी एक पैलू..... सकाळच्या वेळी,टिकल्या, रुमाल, पर्सेस, कानातले, बांगड्या, हेअरपीन्स ,थंडीत स्कार्फ, मफलर ह्या गोष्टी विकणाऱ्यांचा सुळसुळाट..... आणखी एक व्हरायटी स्टोरमध्ये मिळतात तेव्हढ्या वस्तू विकणारा असतो.... लायटर, बॅटरी, सेलोटेप, नेलकटर, कात्री, इअरबड्स, नाडी बंडल.....हे सगळं एका हुक वर अडकवलेले.....

चार साडे चार नंतर भाजीवाल्या, फळवाल्या, फ्रायम ,वेफर्स, चकल्या,राजगिरा लाडू यांची छोटी छोटी पाकिटं विकणारे.....त्यात भाजीवाल्यांना जास्त डिमांड.....कारण भाजी खरेदी झाली की मोठं काम झालं....अनेक बायका पालेभाजी घेतली तर ती निवडायचं काम पण गाडीतच उरकून घेतात....

फुलवाल्या, गजरेवाल्याचाही फेरा होतो .मुसळधार पाऊस पडत असतांना सोनचाफ्याची फुलं, मोगऱ्याचे, जाई जुई चे गजरे विकणारी चढली की अख्ख्या डब्याला वर्दी मिळते.....ह्या फेरीवाल्यांची चढायची उतरायची स्टेशन ठरलेली असतात .... सेंट्रल रेल्वे वर विद्याविहार, कांजूर, नाहूर..... जिथे एक आणि दोन प्लॅटफॉर्म एकत्र असतात.....एक चिकुवाली किंवा संत्र वाली असेल तर ती गाडीतूनच आवाज देणार "चिकुवाली हाय गं" म्हणजे प्लॅटफॉर्म वर कोणी चिकुवाली असेल तर ती गाडीत चढणार नाही......एकाच डब्यात दोन दोन चिकुवाल्यांचा 'बिझिनेस' कसा होणार? शाळेचं तोंड सुद्धा न पाहिलेल्यांची ही 'बिझिनेस मॅनेजमेंट'

कौतुकास्पदच......


या प्रवाशांची परिभाषा पण ठरलेली असते ..... किचन ..म्हणजे डब्यातील सगळ्यात टोकाचा छोटा भाग.

पूर्वी गाड्या बारा किंवा नऊ डब्याच्या असत.... सतत इंग्लिश मध्ये बोलणाऱ्या तामिळ ,केरळी बायका सुद्धा त्या गाड्यांना, बारा डब्बा, नऊ डब्बा' असेच म्हणणार....


समानता हे ह्या जगाचं वैशिष्ट्य रेल्वे स्टेशन बाहेर बायका कोणीही असोत एकदा का गाडीत चढल्या की सगळ्या 'प्रवासी'होतात....बँकेत मोठ्या हुद्द्यावर असणारी, कोर्टात वकिली करणारी, दुकानात सेल्स गर्लचं काम करणारी, कोणी प्रायव्हेट कंपनीत काम करणारी....सगळ्या जणी गुण्यागोविंदाने डब्यात नांदत असतात.....


 या जगात सचोटी तर ओतप्रोत भरलेली असते.... कुठल्याही विक्रेत्याचे पैसे बुडत नाहीत.....कानातले विकणारा, कानातल्याचे बॉक्स खरेदी करणाऱ्या बाई कडे देऊन दरवाज्यात हवा खायला जातो....आपण समोर नसताना एखादं कानातले कोणी पर्स मध्ये टाकेल अशी शंका सुद्धा त्याच्या मनात येत नाही ......त्याचा विश्वास अगदी सार्थ असतो..... उलट त्याला उतरायची घाई असेल आणि पैसे पर्स मधून काढेपर्यंत तो उतरला तर खिडकीतून त्याला हाका मारून, किंवा प्लॅटफॉर्म वरच्या एखाद्या दुसऱ्या विक्रेतीचं लक्ष वेधून तिच्याकडे ते पैसे कानातलंवाल्याला द्यायला सांगितले जातात....ती पण त्याचा शोध घेऊन त्याचे पैसे देते.....यातलं कोणीही फारसं श्रीमंत नसतं.... पैसे ढापले,बुडवले तरी पकडलं जाण्याची शक्यता नसते....तरी कोणी कोणाला फसवत नाही......चिकू वाली चिकूची मोठी टोपली एका ठिकाणी ठेवून डबाभर फिरत असते पण तिच्या टोपलीतून चिकू निवडून घेताना एखादा जास्त चिकू घेतला जात नाही....


परोपकार हा तसा मुंबईचाच गुण..... त्यामुळे तो गाडीत दिसतोच दिसतो.... तुफान गर्दी असलेल्या ट्रेन मध्ये एखादीला चक्कर आली तर तिला सावरायला अनेक हात पुढे येतात..... महत्प्रयासाने मिळालेली विंडो सीट तीला बसायला दिली जाते....मग पाणी,लवंग,वेलची, आवळा सुपारी,कॅडबरी ह्या गोष्टी ऑफर केल्या जातात...... ती कुठे उतरणार आहे ते विचारुन त्या स्टेशन वर उतरणारी कोणीतरी तिची जबाबदारी घेते.....तिला हाताला धरून स्टेशन वर उतरते.....ती सावरली असेल तर रिक्षात बसवून दिले जाते.....आणि हे सर्व नावगाव सुद्धा माहीत नसलेल्या बाई करतात....आणि कसलीही अपेक्षा न ठेवता.....त्याचा गाजावाजा न करता....


अजून अनेक गोष्टी,किस्से सांगता येतील....त्याला अंत नाही....पण आता आवरतं घेते.....


 चैतन्य, उत्साह, सचोटी,आपुलकी, निरपेक्ष परोपकार,अशा दुर्मिळ गुणांनी 

ठासून भरलेल्या ह्या धावत्या जगाला सलाम.


*मेधा दीक्षित*

आणि मला दुर्गा सापडली*

 *आणि मला दुर्गा सापडली*


सिक्किमजवळच्या पेलिंगला नेमकी आमच्या यांची कॉन्फरन्स घोषित झाली. नवरात्राचे दिवस. यांच्या आग्रहामुळे मला जावच लागलं. मनात मात्र घरचं  नवरात्र हुकल्याची हुरहुर होती.  आमची गाडी त्या दिवशी सारखा त्रास देत होती.  गाडीच्या ड्रायव्हरच्या मावशीचं घर रस्त्यावरच होतं. वळणावळणाच्या त्या रस्त्यावर एका घराशेजारी गाडी थांबली. घरासमोर बरीच  मुलं  खेळत होती. लहान -मोठी, गोबर्‍या लाल गालांची, बसक्या नाकाची. गाडीचा आवाज ऐकून एक मध्यमवयीन बाई बाहेर आली आणि आमच्या  ड्रायव्हर भीमला म्हणाली,  ' ताबा तस खै ? ' कसा आहेस ? भीमने आमची ओळख करून दिली. ही कुंती, माझी मावशी. जरा कुरकुरणार्‍या   गाडीची डागडुजी  करायला   भीम गाडी घेऊन गेला.   कुंती अगदी चारचौघींसारखी दिसत होती. सिक्कीमी बायकांचा  गुडघ्यापर्यंत येणारा बाखू  तिने घातलेला. कान लोंबेपर्यंत, कानाची पाळी फाकवणारे कानातले झुमके, अकाली पडलेल्या सुरकुत्या आणि चेहेर्‍यावर हसू. तिचं  वय असेल सहज पन्नाशीला आलेलं. पण कुंती गरोदर होती. या वयाची बाई गरोदर बघून मला धक्काच बसला. एक बारकं  मूल तिच्या कडेवर होतं. एक पाठीशी झोळीत बसून तिच्या मागून वाकून मिचमिच्या डोळ्यांनी  आमच्याकडे बघत होतं. इतक्यात झोपडीतून नुकतीच चालायला लागलेली, नीट चालणारी पण शेंबूड पुसणारी आणखी दोन तीन पाठोपाठची मुलं  बाहेर आली. कुंतीनं  आमचं  स्वागत केलं. तिने हाक मारल्यावर झोपडीच्या मागच्या उतारावर शेतात काम करणारा एक चौदा पंधरा वर्षांचा मुलगा धावत आला. आणि आम्हाला बसायला त्यानं  एक बाक आडवा केला.  कुंतीला तोडकं  मोडकं  हिन्दी येत होत. पण तिथल्या एका मुलाला  नीट हिन्दी येत होती. त्याच्या मदतीने आमचा संवाद सुरू झाला. 

        माझ्या चेहर्‍यावरचं  आश्चर्य बघून कुंतीनेच संभाषणाची  सूत्र हातात घेतली. ' दीदी , ही सगळी माझीच मुलं. ' ' तुझी म्हणजे, तुझी स्वत:ची ? ' मी उडालेच. ' हो. माझी, माझ्या पोटची. ' पण .. आपला कायदा आहे ना ..दो या तीन .. 'कुंतीला या प्रश्नांची अपेक्षाच असावी. ' हो, आहे ना कायदा. आणि मुलांची संख्या वाढवली तर सरकारवर त्यांचा बोजा टाकायचा नाही, हे ही ठाऊक आहे. माझी मुलं  आणि आम्ही स्वावलंबी आहोत. आम्ही आमच्या शेतात राबतो, पिकवतो,  रोज कमावतो, रोज खातो, साठवून ठेवायला मात्र आमच्याकडे पैसे नाहीत. ' त्यापुढे कुंतीने  जे  सांगितलं, ते या पृथ्वीतलावरच वाटलंच  नाही मला. 

         कुंती आणि दोरजा, तिचा नवरा, दोघं  पेलिंगच्या कष्टकरी लेपचा जमातीतले. हिमालयाच्या  निसर्गरम्य पहाडात हातावर पोट  असलेलं त्यांचं कुटुंब.  दोरजा सैन्यासाठी लाकूडफाटा   सीमेवर पोचवण्याचं  काम करायचा. कुंती गावातल्या बायकांबरोबर लाकडं गोळा करायला जायची. देशाला आपली तेवढीच मदत. कुंती कधी दोरजासोबत मिरची - भाकरी सैनिकांसाठी पाठवायची.  त्यांचा मोठा मुलगा राम,  विसाव्या वर्षीच सैन्यात भरती झाला. कुंतीला त्याचं  कोण अप्रूप. सगळ्या गावाला तिने त्याचा गणवेष कौतुकाने फिरून दाखवला. दाजूमुळे ( मोठा भाऊ )  आणि घरातल्या देशप्रेमी वातावरणामुळे   धाकट्या दोघांना ही सैन्यात जायचे वेध लागलेले. राम काश्मीर सीमेवर तैनात असताना, अवघ्या बावीसाव्या वर्षी  त्याला वीरमरण आलं.  हिमालयातला बर्फ वितळेल, असा कुंतीचा शोक चालला होता.  तिला  मुलगा गेल्याचं दु:ख होतच. पण  मुलाची  देशसेवा अर्ध्यावर राहिली याची तिला  जास्त खंत होती. 

            कुंतीच्या धाकट्या दोघांनी दाजूचं  स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं आणि कुंतीने आपला निर्णय दोरजाला सांगितला. मला देशासाठी लढणारे सैनिक निर्माण करायचे आहेत. नाहीतरी माझ्यासारखी स्त्री देशाची सेवा कशी करणार ? दोरजाने आधी तिला समजावलं. नातेवाईकांना वाटलं ती वेडी झालीये. पण नंतर दोरजाला कुंतीच्या ठाम निर्णयाचा अंदाज आला.  मुलांच्या लष्कर भरतीत कुंतीच्या संगोपनाचाच वाटा होता. दोरजाला फक्त कुंतीच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. कुंती म्हणाली , दोरजा, तू फक्त साथ दे. आपण कष्ट करू, मुलांना स्वावलंबी बनवू. त्यांना देशासाठी घडवू आणि देशालाच अर्पण करू. मला शक्य आहे तोपर्यंत मला हे करू दे. दोरजा म्हणाला, पण एखाद्या मुलाला हे पटलं  नाही तर. ' ज्याला नाही पटणार, तो दोन वर्ष  देशसेवा करून नंतर आपलं  आयुष्य जगू शकतो.  माझ्या दुधाचं  हे मुलांवर असलेले कर्ज  त्यांनी फेडावं, असं  सांगेन मी त्यांना . ' आणि कुंतीच्या घरात वर्ष दोन वर्षात पाळणा हलू लागला. ' चांगल्या  कामाला निसर्ग ही साथ देतो दीदी. माझं  वय काय ठाऊक नाही. पण अजून तरी कूस फळतेय. मुलांना  अंगाई म्हणून ही  देशाचीच गाणी गाते. माझी मुलं ही फार  गुणी आहेत. माझं   ऐकतात. आमच्यासारखचं देशाचं  प्रेम त्यांनाही आहे. मध्यंतरी भीमाची बहीण वारली.  तिच्या नवर्‍याने दुसरं लग्न केलं. पोटच्या पोरांना परकं  केलं. मी म्हटलं, आण त्यांना इकडे. आता माझ्या पिल्लांसोबत  तिचीही मुलं  वाढताहेत. पण  अट त्यांनाही तीच. सैन्यात भरती व्हायचं. मुलांना  तायक्वंडोचं शिक्षण, रोज पहाडात दौड लावायचा सराव सक्तीचा केलाय मी. ' ती परत हसली. ' सैन्यात नंबर लागायला हवा ना, म्हणून जरा सक्ख्त आई झालेय. '  कुंती एकीकडे दोन मुलींना आणि एका मुलाला, सैनिकांसाठी  भाकर्‍या कागदात बांधायला सांगत  होती. दोरजाची गाडी सीमेकडे जायला निघेल म्हणून ती त्यांना घाई करत होती. शेतातल्या भाज्या आणि मिरच्यांचा वानवळा ही सोबत जायचा होता. 

          हिमालयाच्या कुशीतल्या, बर्फाळ पहाडावर,  एक निरक्षर आई, आपलं  मातृत्व  देशाला अर्पण करत होती. त्यासाठी तिनं  स्वत:चं शरीर पणाला लावलं होतं. मला माझीच  लाज वाटली. पण   माझं  नवरात्र हुकलं  नव्हतं.  आज  मनात चांगल्या विचारांची  घटस्थापना झाली होती.  कुंती हसली. तिच्या सुरकुत्या मला विलक्षण सुंदर दिसल्या.  माझी दुर्गा  माझ्यासमोर होती.  🙏🏻


*डॉ. स्मिता दातार*

 आगळी वेगळी देशभक्ती

*नीतिमत्ता..!!

 *नीतिमत्ता..!!


साधारण आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विनावाहक विनाथांबा अशी सांगली कोल्हापूर बससेवा सुरू होती. बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बर्‍यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्यातरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. 


साधारणतः हातकणंगले ओलांडल्यानंतर त्या आजी मला म्हणाल्या, "व्हय दादा,  मास्तर बरं न्हाय आलं अजून?" मास्तर मंजे कंडक्टर.


मी म्हटलं "आजी, ह्या गाडीला मास्तर नसतंय. गाडीवर लिव्हलया की तसं."


"आरं देवा... मंग तिकीट??"


"त्ये खालीच,एस.टी त बसायच्या आधीच काढायचं असतंय."


"मग आता???" आजी काळजीने म्हणाली.


"तिकीट तपासायला वाटेत कुणी चढलं, आणि पकडलं तर दंड भरावा लागेल.तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत, त्यामुळं चढल्या तुम्ही."


"दुसरी इयत्ता पास हाय म्या.म्होरंबी शिकले असते,पण बानं चुली पुढं बशीवलं.त्ये मरुदे तिकडं. वाचाय येतंया मला.सांगली कोल्हापूर पाटी बघूनच तर चढले.गडबडीत बाकी न्हाय वाचलं."


"अहो आज्जी. आपण फक्त सांगू तसं.  असंबी त्ये कुणाचं काय ऐकत नाहीत.  तरिबी उगा वाईच खडा टाकून बघू.  त्येबी, तपासणीसाठी आले तर मग बघू..."


दोन मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही.


डोक्यावरचा पदर सावरत, हळूच म्हणाली, 


"नशिबी गरिबी पूजल्या, त्ये परवडलं, पण अडाणीपणाचा शिक्का लई बेक्कार."


ह्या सगळ्या झांगड  गुत्त्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टँड मध्ये शिरली कळलंच नाही. मी खिडकीतून डोकावून पाहिलं, बाहेर कुणी तपासनीस नव्हता.  


आजीला म्हटलं, "आज्जी, आता सुमडीत उतरा. अन हिकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या भैर पडा."


आजी कैच बोलली नै. 


बाहेर आल्यावर मी गाड्यावर मस्त चहा मारला. तेवढ्यात पुन्हा आज्जी दिसली. म्हंटलं... 


"आज्जी अजून इथंच?"


आज्जीनं आपली बटव्याची पिशवी काढली, त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिलं.  आज्जीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विना वाहक विना थांबाच्या काऊंटर वरनं काढलं होतं. मला म्हणाली


"टाक फाडून. म्या भैर आल्यावर फाडणारंच व्हते.माघारी जाताना मात्र, न इसरता आधी तिकीट काढन."


म्हटलं, आज्जी.... "पैकं जास्त झालं असतील तर नाष्टा द्या हॉटेलात..."


आज्जी हसली.... म्हणाली 

"जिच्या दर्शनाला आले, त्या अंबा बाईनं तिची जबाबदारी पार पाडली. कुठलं गालबोट नं लावता आणलं इथवर. वाटेत  उतरवलं असते मला, पकडलं गेले अस्ते तर.पण त्या अंबाबाईनं चार चौघात लाज राखली माझी.


दंड भराय इतकं पैकं न्हाईत पण मग 

आता म्या किमान हाय तेव्हढं तिकीट काढून, फाडून टाकलं म्हंजे झालं की रं हिशेब बराबर....आता जाताना मात्र इसरायची न्हाई तिकीट काढायला.


महालक्ष्मीच्या दारात जायचं अन त्येबी कुणाची तरी लक्ष्मी लुबाडून... हे बरं न्हाई बाबा..."


मी काहीच नं बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं. आज्जी गेली अंबाबाई च्या दर्शनाला. मी मात्र तिथनंच हात जोडले. 


ढीग इयत्ता गिरवल्या तरी ही अशी नीतिमत्ता येतेच असं नाही, हेच खरं.


लेखक अज्ञात

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 मध्ये शेतकऱ्यांना

 प्रधानमंत्री पीक विमा योजना

रब्बी हंगाम 2023-24 मध्ये शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

            मुंबईदि. 2 : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी 2025-26 हंगामासाठी 3 वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (Area Approach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यात शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी केले आहे.

            रब्बी हंगाम 2023-24 मध्ये या योजनेतील सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) करिता 30 नोव्हेंबर2023गहू (बागायत)हरभरारब्बी कांदा करिता 15 डिसेंबर2023 व उन्हाळी भातउन्हाळी भुईमूग पिकाकरिता 31 मार्च2024 अशी आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय (PMFBY) ऑनलाईन  पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे .

रब्बी हंगामामध्ये गहू (बागायत)रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत)हरभराउन्हाळी भातउन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा ( 6 पिके ) या अधिसूचित पिकांसाठीअधिसूचित महसूल मंडळ/ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.

            सन 2023-24 पासून सर्वसमावेशक  पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने शेतकरी हिश्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार  आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून PMFBY पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वत: शेतकरी यांना तसेच बँकविमा कंपनी प्रतिनिधी व सामूहिक सेवा केंद्र (CSC) यांच्यामार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल.

            प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणीसाठी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रुपये 40 देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून केवळ 1 रुपया भरुन पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करावी.

            कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरुन देणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणार नसेल तर तसे त्याने विहित मुदतीत कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे.

            योजनेतील सहभागासंदर्भात शेतकऱ्यांना अडचण तसेच सामूहिक सेवा केंद्राने अतिरिक्त रकमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालयनजिकची बँकतहसीलदार/तालुका कृषी अधिकारीजिल्हाधिकारी/जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

योजना कार्यान्वयीन यंत्रणा पुढीलप्रमाणे :

            अहमदनगरनाशिकचंद्रपूरसोलापूरजळगावसातारा या जिल्ह्यांसाठी ओरिएन्टल इन्शुरन्स कं. लि.परभणीवर्धानागपूर या जिल्ह्यांसाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इंशुरन्स कं.लि.जालनागोंदियाकोल्हापूर या जिल्ह्यांसाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इं. कं. लि.नांदेड,  ठाणेरत्नागिरीसिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कं. लि.छत्रपती संभाजीनगरभंडारापालघररायगड या जिल्ह्यांसाठी चोलामंडलम एम. एस. जनरल इं. कं. लि.वाशिमबुलडाणासांगलीनंदूरबारबीड या जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीहिंगोलीअकोलाधुळेपुणेधाराशीव या जिल्ह्यांसाठी एचडीएफसी जनरल इं. कं. लि.यवतमाळअमरावतीगडचिरोली या जिल्ह्यांसाठी रिलायंन्स जनरल इंन्शुरन्सलातूर जिल्ह्यासाठी एस. बी. आय. जनरल इं. कं. लि. निवड करण्यात आली आहे.

            जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन पिकाचा विमा काढण्याचे आवाहन कृषी संचालक श्री. झेंडे यांनी केले आहे.

Thursday, 2 November 2023

आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड, मानधन वाढीसह,मिळणार दिवाळी भेटही

 आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोडमानधन वाढीसह,मिळणार दिवाळी भेटही

- सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत

            मुंबईदि. 1 : राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये मानधन वाढ3 हजार 664  गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6 हजार 200 रुपये मानधन वाढआशा व गट प्रवर्तकांना प्रत्येकी 2 हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज आरोग्य भवन येथे आशा स्वयंसेविकासंघटनांचे  प्रतिनिधी समवेत आयोजित बैठकीत सांगितले.

                बैठकीस आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरआरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमारसहसंचालक सुभाष बोरकरयांच्यासह आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी  उपस्थित होते.  राज्यात सन 2007 पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा योजनेची अंमलबजावणी सुरु आहे. सद्य:स्थितीत राज्यात 80 हजारावर आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. यापूर्वी  आशा सेविकांना 5 हजार रुपये मानधन देण्यात येत होते. आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी मानधनात 7 हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनस्तरावरूनही  3 हजार रुपये मानधन दिले जाते.  त्यामुळे आरोग्य मंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता 15 हजार रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.

                राज्यात 3 हजार 664 गट प्रवर्तक कार्यरत आहेत. यापूर्वी गट प्रवर्तकांना 6 हजार 200 रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आरोग्य मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी आज 6 हजार 200 रुपये मानधन वाढ जाहीर केली आहे.  गट प्रवर्तकांना केंद्रशासनस्तरावरूनही 8 हजार 775 रुपये मानधन मिळत असून,  त्यांना आता 21 हजार 175 रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे. या बैठकीत  आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना 2 हजार रुपये दिवाळी भेटही देणार असल्याची  घोषणा आरोग्य मंत्र्यांनी केली आहे. आशा स्वयंसेविकांना मानधनवाढ व दिवाळी भेट देऊन आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आशा स्वयंसेविकांची दिवाळी गोड केली आहे. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

0000

*मोती साबणाचा जन्म

 *मोती साबणाचा जन्म !*


तेलात स्थिरावल्यावर टाटांनी साबणाकडे लक्ष द्यायचे ठरवलं. तोपर्यंत भारतात आपापल्या घरी बनवलेल्या साबणापासुन, म्हणजे बेसनपीठ व दुधाच्या मिश्रणातून अंघोळी व्हायच्या. अंगणात, विहीरीकाठी अंघोळ करणारे कधीकधी पाठ घासायला नारळाची शेंडी वापरत होते. साबण म्हणून असे काही असते हे माहीती नव्हते. वास्तविक १८७९च्या काळात उत्तरेत मिरतच्या आसपास पहिला साबण बनल्याची नोंद सापडते. पण त्याचा तो प्रसिध्द झाला नाही.! 


अंघोळीची अशी तऱ्हा होती, तर कपड्यांच्या साबणाचाही काही विषय नव्हता. १८९५ ला कलकत्ता येथील बंदरात इंग्लंडहून पहिला साबणसाठा आपल्याकडे आला, सनलाईट सोप नावाचा.! त्यावर लिहलं होतं, मेड इन इंग्लंड बाय लिव्हर ब्रदर्स.!  हा सनलाईट फार लोकप्रिय झाला आणि ती कंपनीही.! लिव्हर ब्रदर्स म्हणजे आत्ताची हिन्दुस्थान लिव्हर, ही कंपनी भारतात आली सनलाईट या साबणावर स्वार होऊन.! 


या लिव्हर कंपनीने नंतर डालडा आणला, वनस्पती तुप. आणि भारतात ऐसपैस हातपाय पसरले. टाटांनी जेव्हा भारतीय बनावटीचा साबण बाजारात आणायचे ठरवले तेव्हा लिव्हर कंपनीने त्यांना कडवा विरोध केला. एक तर तो काळ स्वदेशीचा होता. टाटा आपल्या जातिवंत उद्यमशिलतेनं नवनवी आव्हान पेलतं होते. वीज आली होती, पोलाद निर्मितीसाठी शोध चालु होते. पहिले पंचतारांकित हाँटेल ताज च्या रुपाने उभे होते. नागपुरात एम्प्रेस होती तर मुंबईत स्वदेशी जोरात सुरु होती.! 


आता साबणातही टाटा उतरले तर आपले नुकसान होणार हा अंदाज त्यांना आला होता,.टाटा दर्जाच्या बाबतीत तडजोड करणार नाही हे ही ठाऊक होते. टाटांना आव्हान द्यायचे असेलतर ते फक्त किंमतीच्या पातळीवरच देता येईल हे ते जाणून होते. टाटांनाही हि कल्पना होती. त्यामुळं टाटांनी आपला साबण बाजारात आणला तो लिव्हर च्या किंमतीत, १० रुपयांना १०० वड्या.! 


नावही ठरलं..५०१..बार.! या नावामागेही एक कथा आहे. टाटांना स्पर्धा होती लिव्हरची. लिव्हर ही कंपनी मुळची नेदरलँडची. ती झाली ब्रिटिश.! टाटांना आपल्या साबणात ब्रिटिश काहीच नको होतं.! लिव्हर ची स्पर्धा होती, फ्रान्समध्ये तयार होणाऱ्या साबणाची.! आणि त्या साबणाच नाव होतं ५००.! ते कळाल्यावर कंपनीचे प्रमुख जाल नवरोजी म्हणाले... मग आपल्या साबणाचे नाव ५०१.! कारण त्यांच्या रक्तातच स्वदेशी होत, त्यांचे आजोबा होते दादाभाई नवरोजी.! 


बाजारात आल्यापासून या साबणाचा चांगला बोलबाला झाला.! त्यामुळे लिव्हरने सनलाईटची किंमत ६ रुपयांना १०० अशी कमी केली.! त्यात त्यांचा तेलाचा खर्च ही निघत नव्हता.! टाटांच्या साबणाला अपशकुन करण्यासाठी त्यांची ही चाल होती.! टाटा बधले नाही, किंमत कमी केली नाही, तीन महीन्यांनी लिव्हर ने परत सनलाईटची किंमत पहील्यासारखी केली.! टाटा या स्पर्धेत तरले.! या कंपनीने पुढे अंघोळीसाठी हमाम... तर दिवाळीसाठी जो आजही मोठ्या उत्साहानं वापरला जातो... त्या मोती साबणाची निर्मिती केली.! ✍🏻


इतिहास विषय नावडीचा असला तरी देशाभिमान महत्वाचा , म्हणून दिवाळी निमित्त करून ही पोस्ट महत्त्वाची.!

Featured post

Lakshvedhi