Monday, 30 June 2025

सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासन व ‘सीईजीआयएस’ यांच्यात सामंजस्य करार

 सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी


राज्य शासन व ‘सीईजीआयएस’ यांच्यात सामंजस्य करार


मुंबई, दि. 23 : सामाजिक क्षेत्रातील योजनांच्या अंमलबजावणीसाठी वॉररुम तयार करण्यात आली आहे. या वॉररुमच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन सामाजिक क्षेत्रातील योजना, उपक्रम व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी तांत्रिक, विश्लेषणात्मक आणि धोरणात्मक सहाय्य पुरविण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री कार्यालय आणि सेंटर फॉर इफेक्टिव्ह गव्हर्नन्स ऑफ इंडियन स्टेट्स (सीईजीआयएस) यांच्यात सामंजस्य करार झाला.


मुंबईतील वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी व सीईजीआयएसचे सह-संस्थापक कार्तिक मुरलीधरन यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सेंटर फॉर इफेक्टिव्ह गव्हर्नन्स ऑफ इंडियन स्टेट्स (सीईजीआयएस) चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय पिंगळे, सल्लागार विनी महाजन, स्ट्रॅटेजी सल्लागार मुरुगन वासुदेवन, वरिष्ठ कार्यक्रम सल्लागार ओंकार देशमुख, वरिष्ठ कार्यक्रम सल्लागार तन्वी ब्रम्हे आदी उपस्थित होते.


यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामाजिक क्षेत्रातील योजना, उपक्रमाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मागोवा प्रणाली (ट्रॅकिंग सिस्टीम) उपयुक्त ठरणार आहे. ही प्रणाली सीएम डॅशबोर्डशी जोडण्यात यावी. या करारामुळे धोरणात्मक क्षमता वाढेल. तसेच क्षेत्रीय समन्वय सुधारून नागरिकांना अधिक प्रभावी व उत्तरदायित्व असलेली सेवा पुरविण्यासाठी मदत होणार आहे.


या कराराअंतर्गत सीईजीआयएस ही संस्था पुढील पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक क्षेत्राशी संबंधित विविध विभागांसोबत काम करणार असून धोरणे आणि अंमलबजावणी या दोन्ही पातळ्यांवर तांत्रिक, विश्लेषणात्मक आणि धोरणात्मक सहाय्य पुरविणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयासाठी निर्णय सहाय्य प्रणाली (डिसीजन सपोर्ट सिस्टीम) विकसित केली जाणार आहे. ही यंत्रणा मुख्यमंत्री कार्यालयाच्या वॉररुमसाठी डेटावर आधारित निर्णय प्रक्रिया सक्षम करण्यासाठी मदत करणार आहे. या प्रणालीद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निकषांच्या आधारे परिणामकारक लक्ष्य ठरवणे, माहितीतील विसंगती कमी करणे आणि नागरिकांच्या अभिप्रायाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्यक्षम देखरेखीसाठी या प्रणालींचा उपयोग केला जाणार आहे.


‘सीईजीआयएस’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय पिंगळे यांनी सादरीकरणाद्वारे कामाची माहिती दिली. ही भागीदारी परिणामाभिमुख आणि उत्तरदायित्व असलेली शासनव्यवस्था घडवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे. आम्ही महाराष्ट्र शासनासोबत संस्थात्मक क्षमतेत वाढ, डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया आणि सेवा वितरणात सुधारणा घडवून आणण्यासाठी उत्सुक आहोत, असे त्यांनी यावेळी सांगितले.


यावेळी श्री.मुरलीधरन यांनी लिहिलेले Accelerating India’s Development हे पुस्तक भेट दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi