राज्यातील आयकॉनिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यावरती पर्यटन विभागाने भर द्यावा
पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १७ : पर्यटन विभागाने पर्यटन धोरण २०२४ ची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी त्याचप्रमाणे पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा चे बळकटीकरण करण्यावर भर द्यावा. केरळच्या धर्तीवर राज्यातही वैद्यकीय पर्यटनासाठी पर्यटन विकास करून राज्यातील आयकॉनिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर विभागाने भर द्यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, अपर मुख्य सचिव नगरविकास असिमकुमार गुप्ता, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव एन.नवीन सोना, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी यांसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, पर्यटन विभागाने मंजूर प्राप्त निधीचा १०० टक्के विनियोग करावा. अमृत सांस्कृतिक वारसा हा पालघर परिसरात आदिवासी पर्यटनाला चालना देणारा प्रकल्प प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क उभारणे, सभा मंडप आणि स्कायवॉक पंढरपूर ही कामे प्राधान्याने करावीत. महिलांसाठी राबवण्यात येणारे आई महिला केंद्रित पर्यटन धोरणाची अंमलबजावणी राज्यभर चांगल्या पद्धतीने करा. महिलांचा या धोरणामध्ये सहभाग वाढावा यासाठी जनजागृती करा. केंद्र शासनाच्या सर्व योजना देखील प्रभावीपणे राबवा असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये अनेक अशी पर्यटन स्थळे आहेत जिथे खाजगी गुंतवणूक होऊ शकते. अशी पर्यटन स्थळ विकसित करण्यावर पर्यटन विभागाने भर द्यावा. पर्यटन विभागाने आपली स्वतःची लँड बँक तयार करावी आणि त्यावरती पर्यटन विकासाचा आराखडा बनवा. खासगी क्षेत्राच्या सहभागातून जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांनी दर्जेदार सेवा देऊन पर्यटकांचा ओघ राज्यात वाढवण्यासाठी पर्यटन विभागाचे नियोजन असले पाहिजे असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, क्रुझ पर्यटन, जल पर्यटन, कॅरा व्हॅन पर्यटन, आदिवासी पर्यटन, विंटेज संग्रहालय, ग्लोबल व्हिलेज, कुंभमेळा, बेट पर्यटन, थीम पार्क, बटरफ्लाय पार्क, साहसी पर्यटन, लोक संग्रहालय, मोबाईल टेंट सिटी अशी नाविन्यपूर्ण पर्यटन उपक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी पर्यटन विभागाने सूक्ष्म नियोजन करून राज्याच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न करावेत. नवीन महाबळेश्वर विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची मदत घेऊन ही ठिकाणे विकसित करण्यावरती पर्यटन विभागाने समन्वयातून नियोजन करावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या.
***
No comments:
Post a Comment