अर्थसंकल्पात प्रत्येक विभागासाठी भरीव तरतूद
- मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 9 : देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राच्या स्थूल उत्पन्नाचा 14 टक्के वाटा असून लोकसंख्या विचारात घेता इतर राज्यांच्या तुलनेत राज्याचे उत्पन्न अधिक असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले. राज्याच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात मागील वर्षाच्या तुलनेत प्रत्येक विभागासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
विधान परिषदेत अतिरिक्त अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मंत्री श्री.केसरकर बोलत होते.
‘मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण’ योजनेविषयी माहिती देताना मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट 2024 या महिन्यांचा लाभ एकत्रित देण्यात येणार असून त्यानंतर प्रत्येक महिन्यात हा लाभ बँक खात्यात जमा करण्यात येईल. यासाठी पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे.
उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, राज्यात 2,25,481 कोटींची गुंतवणूक झाली असून एक लाख 77 हजार रोजगार निर्मिती होणार आहे. दावोस येथे 2023 मध्ये 1.37 लाख कोटींचे 19 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या माध्यमातून एक लाख इतकी रोजगार निर्मिती होणार आहे. 2024 मध्ये तीन लाख 233 कोटी रुपयांचे 24 करार करण्यात आले आहेत. विदेशी थेट गुंतवणुकीत देशातील 30 टक्के गुंतवणुकीसह महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर असल्याची माहिती त्यांनी दिली. नवी मुंबईत इंडिया जेम्स अँड ज्वेलरी पार्क प्रकल्प उभारण्यात येणार असून अशा प्रकारचा देशातील एकमेव प्रकल्प असणार आहे. या माध्यमातून एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
विद्यार्थ्यांना यावर्षी दोन मोफत गणवेश देण्यात येणार असून यापैकी एक गणवेश स्काऊट आणि गाईडचा गणवेश असेल. याबरोबरच एक जोडी बूट आणि दोन जोडी सॉक्स देखील देण्यात येणार आहेत. गणवेश शिलाईचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या स्थानिक बचतगटांमार्फत करण्यात येत असून यामुळे बचत गटातील सुमारे एक लाख महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे. हे गणवेश 30 जुलै पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मिळतील, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत भरीव वाढ करण्यात आली आहे.
शाळा दत्तक घेण्याची योजना राबविण्यात येत असून यामध्ये दत्तक घेणाऱ्याचे नाव शाळेला देण्यात येणार आहे. याचबरोबर दहा वर्षांसाठी शाळांची देखभाल दुरुस्ती दत्तक घेणाऱ्यांमार्फत करण्यात येईल. महाराष्ट्र - कर्नाटक सीमा भागातील ऐतिहासिक मराठी शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी 50 कोटींची तरतूद करण्यात येत आहे. शिवभोजन योजनेअंतर्गत मिळणारा प्रतिसाद पाहता ही योजना बंद करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांबाबतच्या योजनांविषयी माहिती देताना मंत्री श्री.केसरकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी समुपदेशन करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यात येत आहे. एक रुपयात पीक विमा योजना राबविली जात आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात राज्यात चांगले काम होत असून कृषी पंपांसाठी सौरऊर्जेच्या वापरावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. सिंचनावरही भर देण्यात येत असून 3.65 लक्ष हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यामुळे कृषी दर वाढण्यास मदत होणार आहे. विजेची उपलब्धता वाढण्यासाठी सहा कंपन्यांसोबत दीर्घकालीन करार करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
याव्यतिरिक्त अन्य योजनांची माहिती देताना मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे. आरोग्य सेवेअंतर्गत मूत्रपिंडावरील उपचारांसाठी रुग्णालयांच्या संख्येमध्ये वाढ, राज्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाची संख्या वाढविण्यात येणार, सहकारी पतसंस्थांना विमा कवच देणार, इंद्रायणी नदी स्वच्छ ठेवण्यात येणार, विविध विकास महामंडळांना निधीची तरतूद, तृतीय पंथीयांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment