आरोग्य क्षेत्रातील आव्हानांचा सामना करण्यासाठी
आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संशोधनावर भर द्यावा
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा दीक्षांत समारंभ
मुंबई, दि.23 : देशात कर्करोग, रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार, मधुमेह अशाप्रकारच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका महत्वपूर्ण आहे. आरोग्य क्षेत्रातील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी विज्ञान विद्यापीठाने संशोधनावर अधिक भर देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या 23 व्या दीक्षांत समारंभ प्रसंगी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. दिनेश वाघमारे, बेळगांवचे के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ॲण्ड रिसर्चचे कुलगुरु डॉ. नितीन गंगने, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाल, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, डी लिट पदवी प्राप्त डॉ. ख्रिस्तोफर डिसुझा यांच्यासह विशेष अतिथी, विद्यापीठाच्या विविध शाखांचे अधिष्ठाता, प्रशासकीय परिषद सदस्य, प्राध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य, सुवर्णपदक विजेते, पदव्युत्तर आणि पदवीधर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले, जुन्या आजारांपासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आहे. भारताने जगाला योगविद्या बहाल केली असून रोगांपासून बचाव करण्यासाठी योगशक्ती वापरण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या काळात रोगनिदान व आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टीफिशल इंटेलिजन्स) आरोग्य सेवेमध्ये परिवर्तनाची भूमिका बजावणार असल्याने यामुळे रोगांचे निदान करणे सोपे होणार आहे. त्यामुळे आर्टीफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून होणारी उपचार पद्धती लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. यासाठी सार्वजनिक रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे आधुनिक आरोग्य सुविधांनी मजबूत करणे गरजेचे आहे. तसेच लाखो गरीब आणि गरजूंची सेवा करण्यासाठी तत्पर डॉक्टरांची देखील आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व गोष्टींचे महत्व लक्षात घेवून वैद्यकीय शिक्षणाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. याअनुषंगाने गेल्या 10 वर्षांत देशातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 145 वरून 260 झाली आहे. भारतात डॉक्टर-रुग्णांच्या सरासरी प्रमाणातील तफावत कमी करून डॉक्टरांची संख्या वाढावी या उद्देशाने प्रधानमंत्री यांनी हिंदी, मराठी आणि इतर प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचेही आवाहन केले आहे. याचधर्तीवर महाराष्ट्रातही लवकरच एमबीबीएसचा अभ्यासक्रम मराठीत होईल. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण घेता येणार असून त्यांच्यासाठी संधींची अनेक दारे खुली होणार आहेत, असा विश्वासही राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केला.
आयुर्वेद आणि युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यासारख्या आयुषच्या इतर शाखांमध्ये आमचे वेगळे फायदे आहेत. भारतातील आयुर्वेद आणि इतर आयुष विषयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर कार्यक्रम घेण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात यावा. त्याचप्रमाणे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने देशात डॉक्टर आणि परिचारिकांची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच देशातील ज्येष्ठ नागरिकांची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून विशेष वृद्धापकाळ काळजी सुविधा विकसित करणे आवश्यक आहे. औषध, शस्त्रक्रिया, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि सिद्ध या क्षेत्रातील शिक्षक आणि संशोधक या नात्याने, या विद्यापीठाकडे दर्जेदार डॉक्टर तयार करण्याची गुरुकिल्ली आहे. पदवी प्राप्त करणारे तरुण हे सत्य, शुद्धता, निःस्वार्थी आणि अतिशय जबाबदार आणि सामाजिक बांधिलकी जपत डॉक्टर म्हणून आरोग्य सेवा देतील, अशी अपेक्षा व्यक्त करत राज्यपाल रमेश बैस यांनी सर्व पदवीधरांना रुग्णांशी विनम्रपणे संवाद साधण्याचे आवाहन देखील यावेळी केले.
विद्यार्थी हे भविष्यातील प्रगतीचा केंद्रबिंदू : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
विविध क्षेत्रात प्रगती करतांना विद्यार्थी हे केंद्रबिंदू असल्याने वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत स्किल लॅब व डिजिटल लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. तसेच आंतरवासिता व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरघोस वाढ करण्यात आली असून विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील आहे, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आरोग्य विद्यापीठाचे प्रति-कुलपति हसन मुश्रीफ यांनी केले.
प्रधानमंत्री यांना अभिप्रेत असलेल्या विकसित भारताच्या प्रत्येक नागरिकास उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असलेले उच्चशिक्षित व कुशल मनुष्यबळ व वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रसामग्री व साधनसामग्री उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग कटिबद्ध आहे. याकरिता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय विभागामार्फत आवश्यक प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी सामान्य व गरजू नागरिकांना दर्जेदार रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी या वर्षामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अतिविशेषोपचार रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, शासकीय दंत महाविद्यालयांच्या बळकटीकरणाच्या अनुषंगाने पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अध्यापक व टीसीएस द्वारे पात्र तांत्रिक व अतांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्तीची प्रक्रिया राबवून बहुतांश पदावर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यातील कार्यरत शासकीय महाविद्यालयाचे श्रेणीवर्धन करून नव्याने प्रस्तावित शासकीय महाविद्यालय उभारण्यासाठी आशियाई विकास बँक संस्थेकडून साधारण चार हजार कोटी रुपयांचे कर्ज शासनास मंजूर झाले आहे. या निधीच्या माध्यमातून वैद्यकीय संस्थांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून त्यांचे श्रेणीवर्धन करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. या संस्थांबरोबर आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका देखील महत्त्वाची असल्याने विद्यापीठाला शासनाकडून निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. विद्यापीठाचा विद्यार्थी हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांची जोडला जावा, त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्गदर्शन मिळावे, विद्यापीठाचा संशोधनाचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तराचा व्हावा यासाठी उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय संस्थाशी सामंजस्य करार करण्यात येत आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन बाबींची तसेच प्रगत वातावरणामधील तंत्रज्ञान व आरोग्य शास्त्र विषयक अद्ययावत प्रशिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दीक्षांत कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठाच्या परंपरेप्रमाणे मानदंड मिरवणूक करून त्याद्वारे सर्व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित झाले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. बैस यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचे ‘ई-प्रबोधिनी’चा शुभारंभ आणि बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पुस्तिकेची ब्ल्यु प्रिंट पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ ख्रिस्तोफर डिसुझा यांना डी लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आरोग्य विज्ञान विद्यापीठाने 25 वर्षात केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासोबतच आगामी वर्षभरात विद्यापीठामार्फत करण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी यावेळी सांगितले.
सेंटर ऑफ एक्सेलन्सच्या कोनशीलेचे अनावरण
दीक्षांत समारंभ कार्यक्रमापूर्वी महाराष्ट्र राज्य आरोग्य प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे सेंटर ऑफ एक्सेलन्स उपक्रमाचे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या प्रास्ताविकात विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कानिटकर यांनी सेंटर ऑफ एक्सेलन्स बाबत माहिती दिली.
दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना पीएच.डी, पदवी प्रदान....
दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 12 हजार 486 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्या 111 विद्यार्थ्यांना 139 सुवर्णपदक, एका विद्यार्थ्यास रोख रक्कम पारितोषिक व संशोधन पूर्ण केलेल्या 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली.
दीक्षांत समारंभात आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 551, दंत विद्याशाखा पदवीचे 2195, आयुर्वेद विद्याशाखेचे 871, युनानी विद्याशाखेचे 99, होमिओपॅथी विद्याशाखेचे 1217, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग 2464, पीबी बी.एस्सी. नर्सिंग 366, बी.पी.टी.एच. 254, पॅरामेडिकल विद्याशाखेचे 637, पदवी ऑप्टोमेट्री 52, ऑक्युपेशनल थेरपी पदवी अभ्यासक्रमाचे 17, बी.पी.ओ.विद्याशाखेचे 04 तसेच पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये पी.जी. मेडिकल 2 हजार 864, पी. जी. दंत 497, पी.जी. आयुर्वेद 63, पी.जी. होमिओपॅथी 18, पी.जी. एम.ए.एस.एल.पी. 02, डिप्लोमा मेडिकल विद्याशाखेचे 02 , पी.जी. एम.पी.ओ. 02, पी.जी नर्सिंग 92, पी.जी. ऑक्युपेशनल थेरपीचे 29, पी.जी. फिजिओथेरपी 15, पी.जी. डि.एम.एल.टी. 87, डिप्लोमा पॅरामेडिकल विद्याशाखेचे 88 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
00000000
राजू धोत्रे/विसंअ
No comments:
Post a Comment