मोठ्या फसव्या असतात ह्या जाहिराती. दिवाळी तोंडावर आली की उंचपुऱ्या-गोऱ्या तुळतुळीत बायकांना नऊवारी चढवून महागड्या दागिन्यांचे खोकेच्या खोके मढवतात. पण कधी स्टुलावर चढून - भिंतीच्या कोपऱ्यातली जळमटं पाडणाऱ्या, केस पिंजारलेल्या घामाघूम बायका दाखवत नाहीत.
दिवाळीत कमी आवाजाचे फटाके वाजवा म्हणत जाहिरात करतील. पण पाच दिवसाच्या दिवाळीसाठी पाच दिवस आधी घासणी हाती घेऊन दुपार दुपार डबे बडवणाऱ्या बायकांवर कुणीच बोलत नाही.
दिवाळीत आप्तेष्टांना पत्रं लिहावीत, ग्रिटींग्ज द्यावेत - असं शाळेपासूनच शिकवलं जातं. पण घर आवरणाऱ्या घामाघूम आईसाठी पेलाभर पाणी घेऊन जावं, हे कुठंच का शिकवलं जात नाही?
कॅलेंडर सांगतं दिवाळी पाच दिवसांची. खोटं सांगतं कॅलेंडर. दिवाळी पाच नाही पंधरा दिवसांची. दिवाळीचे पाच. तयारीचे दहा! फक्त हे दहा दिवस बायकांचे असतात म्हणून कुठे उल्लेख नसतो.
दसरा सरला रे सरला की बायका लगेच या खोलीतलं सामान त्या खोलीत सरकवतात. आज ही खोली तर उद्या ती.. ह्या डब्यातली डाळ त्या डब्यात - त्या डब्यातले तांदूळ ह्या डब्यात, हे दहा दिवस म्हणजे कामाची नुसती खिचडी! कपाटं उपसा, दारं-खिडक्या पुसा, वापरातले वेगळी - ठेवणीतली वेगळी अशी सगळीच भांडी एकत्र घासा, जीवाची घासणी करून झिजतात बायका..
परत फराळाची तयारी ती वेगळीच! ह्याला उन द्या, त्याला भिजवा, अमकं आंबवा-टमकं तापवा. पुरुषांना दिवाळीत किराणामालाची लांबलचक यादी दिसते फक्त. दुकानातून घरापर्यंत सामानाचं ओझं आणताना आपल्या नाकी नऊ येत असतील, पण बारा पुड्या कढईत सुटतात तेंव्हा जेमतेम एक पदार्थ बनतो, हे गणित बायकांनाच माहित. आपल्याला ह्या डब्यात चिवडा, त्या डब्यात चकल्या, पलिकडच्या डब्यात करंज्या, त्याच्या पलिकडच्यात शंकरपाळी एवढंच काय ते पाहायची सवय.
साधा चहा बनवायला पाच मिनिट गॅसजवळ उभं राहिलं की चहाच्या आधी आपण उकळतो, एवढं आपल्याला उकडायला होतं. घर जेऊन झोपलं की बायका रात्रभर फराळ तळत बसतात, सांगा त्यांचं काय होत असेल.. रॅक घासता घासता बोट कापतं बऱ्याचदा, त्याच बोटाने मिर्ची-मिठाचा चिवडा चिवडताना आतून त्यांना किती मजबूत फोडणी बसत असेल..
मात्र आपण याचा विचार करत नाही. सणासुदीत नटणाऱ्या, माहेरी जाऊन विसाव्याचे दोन क्षण शोधणाऱ्या बायकांवर आपण फॉरवर्डेड जोक फॉरवर्ड करतो.. सगळे सण बायकांचेच! बायकांची काय बाबा मजा असते! रक्षाबंधन असो, भाऊबीज असो, ओवाळणी बायकांना मिळते. पुरुषांना काय मिळतं!
पुरुषांना सण मिळतो, कॅलेंडरवर लाल तारीख मिळते - सुट्टी मिळते. बैठकीत चार मित्रात रंगलेली मैफिल मिळते. टीपॉयवर फराळाची बशी मिळते. बायकांना हे मिळतं..?
आपला धर्म, आपली संस्कृती, सण-समारंभ बायकांनीच इथवर ओढत आणलेत. बायका नसत्या तर आपली दिवाळी कशी असती? जरा कल्पना करा..
नको त्यांना तुमची मदत. फक्त त्या जे करतात त्याची जाणीव ठेवा. आणि एखादं पत्र, एखादं ग्रिटींग, एखादं चॉकलेट किंवा एखादी मैफिल त्यांच्यासाठीही राखून ठेवा. बास्स एवढंच.
No comments:
Post a Comment