रेडीओची एक सुरम्य आठवण...आवडलेली पोस्ट
हे सगळं आपण अनुभवलंय....
ते परत एकदा जागवा...
*आकाशवाणीचे हे मुंबई केंद्र आहे...*
*नमस्कार श्रोतेहो…!*
मध्यम लहरी *"तीनशेअठ्ठ्यात्तर अंश सात आठ मीटर्स अर्थात सातशेब्याण्णव किलोहर्ट्झ"*
वर आकाशवाणीचे हे केंद्र आहे…किंवा “२३९.८१ मीटर म्हणजेच १२९१ किलोहर्ट्ज“ वर आकशवाणीच्या केंद्रा वरून आम्ही बोलत आहोत…
*सकाळचे पाच वाजून पन्नास मिनिटे व दहा सेकंद झाली आहेत आहेत…* असा निवेदिकेचा मंजूळ स्वर कानी पडायचा आणि सनईचे सूर वाजायचे.
कधी सांगली, कधी पुणे, तर कधी मुंबई केंद्र एवढाच काय तो फरक.
बाकी कार्यक्रम सगळीकडे तितकेच सुरेल आणि सुंदर …
हे सगळं काय?..... *तर एकेकाळचा “रेडिओ” आणि “आमचं जीवन”....*
*आज पुन्हा आठवलं नव्यानं.*
किती रम्य दिवस होते ते आणि अविस्मरणीय आठवणी..!! आठवण एवढ्याच साठी म्हटलं कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं एक वेगळ स्थान होतं
कारण त्या *“रेडिओच्या” जमान्यात* आपण लहानाचे मोठे झालो आणि हा रेडिओ म्हणजे आपल्या घराचा कुटुंबाचा एक सदस्य होता..
माझं बालपण हे दोन वेगवेगळ्या घरामधून गेलेलं. मातीच्या भिंती आणि काळ्या कौलाचं छप्पर असलेलं घर. बाहेरच्या खोलीतील एका भिंतीवरच्या कपाटात असायचा आमचा भला मोठा रेडिओ.
त्यानंतर दुसऱ्या घरात तो लाकडी फळीवर आला. त्याला जोडलेला एक स्पिकर बॉक्स स्वैपाकघरातपण असायचा. कालांतराने आमच्याकडे मर्फी चा ट्रान्सिस्टर पण आला, त्याला चामड्याच एक भक्कम कव्हर पण होतं आणि गळ्यात अडकावायला त्याला चामड्याचा एक पातळ पट्टा होता. *त्या काळी रेडिओला वर्षाला सहा रुपये लायसन्स असायचे* ….
आमचा हा रेडिओ इलेक्ट्रिक वर चालणारा असायचा आणि ट्रान्सिस्टर इलेक्ट्रिक आणि बॅटरी शेल दोन्हीवर चालायचा…. एकाचवेळी तीन शेल टाकावे लागायचे… तेव्हा फक्त एव्हरेडी कंपनीचे शेल मिळायचे…..असो..
असा हा आमचा रेडिओ सकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांनी एका विशिष्ट धुन ने चालू व्हायचा…..
एक मिनिटाची ती धून बंद होताच…
आपोआप ‘’वंदे मातरम्” सुरु व्हायचा अन मग दिल्ली केंद्रावरुन प्रक्षेपित होणार्या व पुणे केंद्राहुन सहक्षेपित हिंदी बातम्या प्रसारित व्हायच्या… — “ये (थोडा श्वास घ्यायचा,मग ) आकाशवाणी है *”अब देवकी नंदन पांडे से समाचार सुनिये”*…हा आवाज म्हणजे तेव्हा देशाचा आवाज झाला होता…!!
एकदा बातम्या संपल्या कि मग प्रभात वंदन व लगेच भक्तीगीतांचा कार्यक्रम सुरु व्हायचा....
दिवसाची खऱ्या अर्थानं मंगलमय सुरुवात असायची ती...
घनश्याम सुंदरा,
श्रीधरा अरुणोदय झाला….उठी लौकरी वनमाळी उदयाचळीं मित्र आला….
आनंदकंदा प्रभात झाली..उठी सरली राती…काढी धार क्षीरपात्र घेऊनी..धेनू हंबरती… लक्षीताती वांसुरेंहरी धेनुस्तनपानाला…..
या भूपाळी बरोबर लता मंगेशकर यांची “’रंगा येई वो रे…विठाई विठाई माझी कृष्णाई—कान्हाई $$”’ किंवा “पैल तोहे कावू कोकताहे, शकून गे माहे सांगताहे…”, ‘’भेटी लागी जीवा लागलेसी आस,…पाहे रात्रंदिवस वाट तुझी..” असं भक्तिमय संगीत चालू असायचं.
याला जोड म्हणून पंडित भीमसेन जोशी यांची "इंद्रायणी काठी देवाची आळंदी...लागली समाधी ज्ञानेशाची.." किंवा मोठी ताण आवळत “जे का रंजले गांजले’ त्यासी म्हणे जो आपुले…” अशी भक्ती गीते धीरगंभीर आवाजात ऐकू यायची.
बाबूजींचं 'समाधी साधन संजीवन नाम' हे ६ वाजून २० मिनिटांनी हटकून असायचच.
शाळेच्या दिवसात क्लास ला जाण्यासाठी हे गाणं झालं कि सायकलचं पायंडल मारायचं. घड्याळ कधीच बघावं लागत नव्हतं. बऱ्याच वेळा घड्याळ असायचं पण नाही. *सगळं काही चालायचं ते रेडिओ वरच.*
सकाळी चहाचा घोट घेत असताना ६:५५ ला संस्कृत बातम्या चालू व्हायच्या ते आम्हाला काही कळत नव्हतं पण दररोज ते सुरुवातीच पठण ऐकून *“इयं आकाशवाणी | संप्रति वार्ता: श्रूयन्ताम् | प्रवाचकः बलदेवानन्द सागरः |…”* हे आमचं पाठ झाल होतं…..पुढे आम्ही कॉलेजला जाईपर्यंत किती तरी वर्षे तोच आवाज होता..!!. संस्कृत कुणाला काही समजत नव्हते
पण,
आतून आई चा आवाज मात्र यायचा...संस्कृत बातम्या झाल्या रे...आंघोळीला जा...
सकाळी सात वाजता पाच मिनिटाच्या हिंदी बातम्यांच्या सुरुवातीला बातमीदार एक आवंढा गिळून— *“”ये (थोडा श्वास घ्यायचा, मग) आकाशवाणी है” अब सुब्रम्हण्यम स्वामी से समाचार सुनिये”"*
बरोब्बर सात वाजून पाच मिनिटांनी घोषणा ऐकू यायची…
*“आकाशवाणी पुणे! सुधा नरवणे (किंवा भालचंद्र कुलकर्णी) आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत!!”*— *ठळक बातम्या… सुधा नरवणे आणि त्यांचा आवाज* आजही आठवतो. अत्यंत स्पष्ट आवाजात आणि १० मिनिटात त्यावेळचे जग समजायचे.
सकाळी ८ वाजता हिंदीतून मग ८ वाजून १० मिनिटांनी इंग्रजी मधून दिल्ली केंद्रावरच्या बातम्या प्रसारित व्हायच्या. नंतर साडे आठ वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे *मराठी बातमीपत्र हे दत्ता कुलकर्णी, नंदकुमार कारखानिस, माधुरी लिमये, मृदुला घोडके* त्यावेळी द्यायचे. आजही त्यांचे आवाज कानांत बसलेले आहेत.
८ वाजून ४० मिनिटांनी कधी नाट्यसंगीत तर कधी चित्रपट संगीत तर कधी भावगीते प्रसारित होत असत.
अकरा वाजता आकाशवाणी मुंबई ब केंद्रावरुन *कामगार सभा* हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम लागायचा…. त्याकाळी *शाहीर दादा कोंडके* याचं लोकप्रिय झालेलं *“मळ्याच्या मळ्यामधे कोण ग उभी"* अन् *"अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान"* हि गाणी हटकून असायची….
ऐकून ऐकून आम्हा पोरांची ती गाणी तोंडपाठ झाली…!!
दुपारी बारा वाजता बाई माणसाची घरातील सर्व आवरा सावर झाली की, *”माजघरातल्या गप्पा”* हा कार्यक्रम चालू झाला की त्या प्रत्येकाला त्या गप्पा आपल्या घरातल्या गप्पा वाटायच्या…
*सरु बाईंचा सल्ला* हा घरातील वडिलधाऱ्या मंडळीने दिलेला सल्ला वाटायचा….
संध्याकाळी पुन्हा रेडिओचा ताबा मिळायचा….
साडेसहा वाजता *“कामगारांसाठी”* असा पुन्हा एक विरुगंळ्याचा कार्यक्रम लागायचा…
त्यात लोकसंगीत, लोकगीतं, कोळीगीत,भारुडे, अशा गाण्यांचा भरणा असायचा...
शाहीर विठ्ठल उमप, अनंत फंदी यांची कितीतरी गाणी त्यावेळी ऐकलीय — *“बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको—संसारामधी असा आपला, उगाच भटकत फिरु नको”* हे गाणं आजही कानात गुणगुणतय..!!
संध्याकाळी साडेसहाला शेतकऱ्यांच्या साठी दररोज एक *आपली शेती* नावाचा अर्ध्या तासाचा प्रायोजित कार्यक्रम लागायचा…..
लहान असल्यानं शेतीतील कार्यक्रमाचा काहीच कळायचं नाही पण… *“झुळझुळ वाणी.. खेळवा पाणी.. आणायचं कुणी.. सांगतो राणी... फिनोलेक्सनं आणलं पाणी, शेतं पिकली सोन्यावाणी…. फिनोलेक्स”*…हि मध्येच वाजणारी जाहिरात बरोबर म्हणायचो…
संध्याकाळी सात वाजता मुंबई केंद्रावरुन मराठी बातम्या लागायच्या… *वृत्तनिवेदका श्रीमती इंदुमती काळे* आठवतात. बातम्यांची वेळ झाली कि शेजारी पाजारी गल्लीतले ज्यांच्याकडे रेडिओ आहे, त्यांच्या अंगणात गोळा व्हायचे अन कधी कधी वडीलधारी मंडळी कट्ट्यावर त्या बातम्या ऐकत बसायचे…..
मग गल्ली पासून ते अमेरिकेच्या अध्यक्षापर्यंत चर्चा व्हायची. अमेरिका आणि रशियाने काय करायला हवे याचा हि सल्ला दिला जायचा वडीलधाऱ्या मंडळींकडून.
रात्री ८ वाजता दिल्ली केंद्रावरच्या इंग्रजी मधून क्रीडा बातम्या असायच्या आणि बरोबर ८ वाजून ५ मिनिटांनी दिल्ली केंद्रावरच्या मराठी बातम्या...आणि *आकाशवाणी दत्ता कुलकर्णी (किंवा नंदकुमार कारखानिस)* आपल्याला बातम्या देत आहेत ....." असा दमदार आवाज घरात घुमायचा..
घरातील लोकांची जेवणं व्हायची तोपर्यंत नऊ वाजलेले असायचे मग *नभोवाणी आणि मित्रमंडळ सादर करत आहे एक नाटिका...* असा एक श्रवणीय अर्ध्या एक तासाचा नाट्यप्रयोग लागायचा….
ते ऐकत असताना आपण प्रत्यक्ष ते नाटक अनुभवतोय असं भास व्हायचा…..
तोर्यंत घरात अंगणात/घरात गाद्या, गिरद्या, गोधड्या, वाकळ असं काही बाही टाकून झोपण्याची तयारी केलेली असायची अन नेमकं त्याच वेळी जुन्या हिंदी गीतांचा कार्यक्रम चालू व्हायचा…. मग मोकळ्या हवेत अंथरुणावर लोळत पडत ही सुमधुर श्रवणीय गाणी ऐकत कधी झोपी जायचो ते कळत पण नसायचं….!!
असाच रात्री ९ वाजता प्रसारीत होणारा आणखी एक साप्ताहिक लोकप्रिय कार्यक्रम मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम *“आपली आवड”* की ज्यात पत्राने लोक मराठी गाणी आकाशवाणी केंद्राला कळवायचे आणि मग ज्या गाण्यासाठी जास्त पत्रं आलीत ती गाणी मग आपल नावं घेवून त्या कार्यक्रमात लावली जायची….!!
सूर्य मावळतीला गेल्यावर संध्याकाळी *सांजधारा* म्हणून एक भावगीतांचा कार्यक्रम चालू व्हायचा *“अशी पाखरे येती, आणिक स्मृती ठेवुनी जाती”* किंवा *‘’संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख दुःखाची जाणीव तिजला नाही….. संथ वाहते कृष्णामाई’’* ही आणि अशी अनेक अरुण दाते आणि सुधीर फडके यांनी गायलेली भावगीते आजही मनात घर करून उभी आहेत..!
असाच एक साडेनऊ वाजता रेडिओवर *‘गम्मत-जम्मत’* हा लहान मुलांचा कार्यक्रम लागायचा…. *’गम्मत जम्मत. या या या गम्मत जम्मत. ऐका हो गम्मत जम्मत. या या या ढिण्चॅक ढिण्ण, ढिण्चॅक ढिण्चॅक ढिण्ण’* अशी त्या शिर्षक गीतानं कार्यक्रमाची सुरुवात व्हायची…. त्यातलं शेवटचे *‘गम्मSSSSत जम्मSSSSत’* हे शब्द कानावर आले कि आम्ही मुलं हात वर करून ते शब्द त्या रेडिओ सोबत म्हणायचो…!!
शनिवारी रात्री साडेनऊला नाटकांचे, कादंबरीचे नभोवाणी रुपांतर चांगले असायचे.
तेंव्हा रेडिओवर जास्त करून मराठी कार्यक्रमच ऐकले जायचे.
मराठी सिने संगीत, शास्त्रीय संगीत, श्रुतिका, चर्चा, किर्तनं, बाजारभाव इत्यादी इत्यादी. पैकी रात्रीची *'टेकाडे भाऊजींची'* श्रुतिका, रात्रीची *आपली आवड* हे अगदी न चुकवायचे कार्यक्रम. हिन्दी कार्यक्रम ऐकायचेच नाही असेही नाही.
दुपारी अडीच वाजता विविध भारती, त्यातील *'फौजी भाईयों कि खिदमत में'* सादर होणार्या कार्यक्रमात येणार्या मोठेमोठ्या निर्माते, दिग्दर्शक, हिरो - हिरॉइन्स वगैरे ग्लॅमरस व्यक्तींना प्रत्यक्ष 'ऐकायला' मिळायचं. गाणी तर सुंदर असायचीच.
दर बुधवारी रात्री ८ वाजता रेडिओ सिलोनवर लागणारी *"बिनाका गीत माला"* हा कोणतं गाणं या आठवड्यात किती नंबरला आहे... याबाबतचा एक तासाचा कार्यक्रम लागायचा…. त्यात ते अमिन सायानीचे निवेदन... *“भाईयो और बहेंनो, तो चलो देखते है, इस हप्ते में पायदान नंबर चार पे कौनसा गाना है..”*
हे असं त्यांनी म्हंटल कि, आमच्या घरामध्ये त्या गाण्यावरुन पैजा लागायच्या…..कोण जिंकतंय कोण हरतयं यापेक्षा आपला अंदाज बरोब्बर आल्याचा आनंद अधिक असायचा…..तो अमीन सयानी म्हणजे प्रत्येकाला आपल्या घरातील माणूस वाटायचा... इतकं जिवंत ते सादरीकरण कानाला अन मनाला भावायचं..!!
*बिनाका गीतमालाचा वार्षिक कार्यक्रम* म्हणजे गाण्यांची मेजवानीच. आमच्या काळातल्या गाण्यांशी आमचं भावविभोर विश्व निगडीत होतंच की! आम्ही कागद-पेन घेऊन ती यादी लिहून काढायचो. वषभरातल्या आपल्या आवडत्या गाण्यांशी ती ताडून पाहायचो. अमीनभाईंचा आश्वासक, आपलासा वाटणारा आवाज, ती गाणी! ते गायक! व्वा! असे दिग्गज कलाकार ज्या शतकात जन्मले, त्याच शतकात आपलाही जन्म झाला आहे, या सुखद जाणिवेनं आजही किती कृतकृत्य वाटतं.
रात्री सव्वानऊला *'ईगल फ्लास्क'* प्रस्तुत इन्स्पेक्टर ईगल ह्यांची विनोदी मालिका लागायची
तर *'हवामहल'* कार्यक्रमात वेगवेगळ्या पुरातन ऐतिहासिक वास्तू स्वतः इतिहास कथन करायच्या.
फौजी भाईयों की पसंद के फिल्मी गाने!’ जिवाचा कान करून ऐकायचो. या कार्यक्रमासोबत मदमस्त गाण्यांचा जो सिलसिला सुरू व्हायचा तो थेट रात्रीपर्यंत
(काय हो? *ते झुमरीतल्लैया नेमकं कुठल्या राज्यात आहे बरं!*).
सर्वचजण *‘बेला के फूल’* हा कार्यक्रम संपताच निद्रादेवीची आराधन करायचे आणि सरतेशेवटी रेडिओ बंद व्हायचा.
तुमच्याहि रेडिओच्या काही आठवणी नक्की असतील….. या आणि अशा कितीतरी रेडिओच्या आठवणी मनात आजही घर करून उभ्या आहेत……
निर्जीव असला तरी, घराघरातील तो एक हक्काचा आपलेपणाचा सदस्य होता…..
एकवेळ आपण चुकू पण तो कधीच चुकत नव्हता……टीव्ही च्या काळात जरी डोळे सुखावले असले तरी पण कान आणि मन मात्र त्या जुन्या आठवणीत गुरफटुन राहिले….
हा रेडिओच आमचा सुख-दु:खाचा साथी होता.
ह्या सर्व गोष्टींची चमचमती झालर लाभलेलं आमचं बालपण आठवलं की अजूनही मन हळवं होतं.
🙏🌹🙏
No comments:
Post a Comment