🪗🪗🪗🪗🪗🪗🪗🪗🪗
*🍀 रानभाजी - सुरण 🍀*
🪗🪗🪗🪗🪗🪗🪗🪗🪗
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*
*शास्त्रीय नाव* : Amorphophallus paeoniifolius
*कुळ* : Araceae
*इंग्रजी* : Elephant foot yam
*स्थानिक नावे* - रानसुरण, जंगली सुरण, अरण्य सुरण.
सुरण ही आशिया खंडातील उष्ण कटिबंधीय प्रदेशा मध्ये उगवणारी कंदमूळ प्रकारातील अळूच्या कुलातील वनस्पती आहे. या वनस्पतीच्या कंदाचा प्रामुख्याने भाजी म्हणून वापर होतो. अर्श म्हणजे मूळव्याध. सुरण मूळव्याधीचा नायनाट करते म्हणून त्यास अर्शोघन म्हणतात. कण्दू म्हणजे खाज. सुरण प्रक्रिया न करता खाल्ले असता घशास खाज सुटते, म्हणून त्यास कण्डूल म्हणतात. तसेच त्याच्या पानाच्या हिरव्या देठावर पांढरे चट्टे असल्यामुळे त्यास चित्रदण्डकही म्हणतात. सुरण हे औषधी गुणांनी युक्त आहे म्हणून त्याची ‘कन्दनायक’ अशी ओळख आहे. ही वनस्पती विदर्भ, कोकण आणि पश्चिम घाटातील जंगलांत आढळते. काही ठिकाणी तिची लागवड सुद्धा करतात.
सुरणाचा कंद ओबडधोबड, अर्धगोलाकृती, चपटा आणि गर्द तपकिरी रंगाचा असतो. हा कंद म्हणजे सुरणाचे रूपांतरीत खोड असते. ही वनस्पती वर्षातील सुमारे आठ महिने सुप्तावस्थेत असते. पावसाळा आला की तिच्या कंदाला कोंब येतो आणि तिची झपाट्याने वाढ सुरू होते. या वनस्पतीचे वैशिष्ट्य असे की तिला एका वर्षी केवळ एक पान आणि त्याच्या पुढील वर्षी फुले येतात. जमिनीबाहेर सरळ उंच खोडासारखा वाढणारा, पांढरे चट्टे असणारा अवयव म्हणजे सुरणाच्या पानाचा देठ. या देठाच्या वरच्या टोकाला छत्राकार संयुक्त पान असते. पानांद्वारे प्रकाशसंश्लेषण करून सुरण त्याच्या कंदामध्ये स्टार्चच्या रूपात अन्न साठविते आणि पुढील वर्षी याच ऊर्जेचा वापर करून फुलोरा किंवा पुष्पविन्यास तयार करते. मोठ्या कंदावर छोटे छोटे कंद तयार होतात, ज्याचा उपयोग शाकीय अभिवृद्धीसाठी होतो.
सुरणामध्ये पुष्पविन्यास हा स्थूलकणिश प्रकार पाहावयास मिळतो. त्याच्या तळाशी १०.१ - १२.७ इंचाची दोन ते तीन तपकिरी रंगाची शल्कपर्णे असतात. या प्रकारात सहपत्रीचे रूपांतर स्थूलकणिशाला संरक्षण देण्यासाठी चॉकलेटी गुलाबी रंगाच्या मोठ्या पानासारख्या जाड अवयवात अर्थात महाछदामध्ये झालेले असते. यात मध्यभागी सुमारे १ मीटर उंचीचा जाड दंडगोलीय भरीव दांडा असतो. या दांड्याच्या टोकाला कीटकांना आकर्षित करण्यासाठी गडद चॉकलेटी किंवा गुलाबी रंगाचे उपांग असते. त्याखाली पिवळ्या रंगाचा ४-५ इंच लांबीचा नर पुष्पविन्यास आणि थोड्या अंतरावर मादी पुष्पविन्यास असतो. या स्थूलकणिशाला एक मंद प्रकारचा घाण वास असल्याने माश्या आकर्षित होऊन त्या परागीभवनाचे काम करतात.
फुलांमध्ये दल किंवा निदल नसून ती सूक्ष्म आणि जवळ जवळ एकवटलेली असतात. नर फुलांमध्ये २-४ अवृंत पुंकेसर असतात. तर मादी फुलामध्ये १-४ कप्पी स्त्रीकेसर असते. कुक्षीपुंज आखूड असून कुक्षी साधी किंवा खंडित असते. परागीभवनानंतर मादी पुष्पविन्यासामध्ये फलधारणा अर्थात कणीस तयार होते. फळ लाल रंगाचे अनष्ठिल प्रकारचे असून त्यात दोन ते तीन बिया असतात. बिया अभ्रूणपोषी असून बृहत अधोबीजपत्री असतात. सुरणाच्या कंदाची आणि पानांची भाजी तसेच काप कटलेटस सुद्धा करतात. सुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वांचा आहारात वापर करतात. त्याच्या कंदात कॅल्शियम ऑक्झॅलेट असल्याने खाज येते. हा खाजरेपणा घालविण्यासाठी त्याचे तुकडे चिंच किंवा आमसुलाच्या पाण्यात भिजत ठेवतात किंवा उकडतात.
*औषधी उपयोग व गुणधर्म*
* सुरण रूक्ष, तुरट, तिखट गुणधर्मांचे आहे. भूक व चव वाढविते. दमा, श्वासनलिकेचा दाह, वांती, पोटदुखी, मूळव्याध, रक्तविकार, हत्तीरोग यांवर उपयुक्त आहे.
* सुरणाचा ताजा कंद क्रियाशील व उद्दीपक, कफोत्सारक असून पुनः बलस्थापित करण्याची क्षमता त्यात आहे.
* सुरणात अ, ब तसेच क ही जीवनसत्त्वे आहेत.
* सुरणाचा कंद लोणच्याच्या स्वरूपात वायुनाशी समजला जातो.
* सुरण अरुची, अग्निमांद्य, दमा, खोकला, जंत, यकृताचे व प्लीहेचे विकार यांवर गुणकारी आहे.
* संधिवातात कंद व बियांचा लेप लावल्यास सूज कमी होते.
* सुरणाच्या कंदाची भाजी मूळव्याधीवर गुणकारी आहे. अर्शातील रक्तवाहिन्याचे संकोचन होते, म्हणून रक्त वाहणाऱ्या अर्श रोगांत सुरण हितावह आहे.
* सुरणाच्या कंदाची भाजी खाल्ल्याने यकृताची क्रिया सुधारते आणि शौचास साफ होते तसेच बद्धकोष्ठता कमी होते.
* आतड्यांच्या तक्रारींवर सुरणाची भाजी खाणे हितकारक असते. तो कृमींचा नायनाट करतो, म्हणून तो कृमिघ्नही आहे.
* आयुर्वेद औषधांमध्ये सुरणाच्या कंदाची पावडर मोठ्या प्रमाणात वापरतात. सुरणापासून बृहतसुरणकबाय आणि सुरानादिवटक हे कल्प तयार केले जातात.
*समीक्षक – बाळ फोंडके*
*पाककृती - सुरण फ्राय*
* साहित्य - अर्धा किलो सुरण, अर्धी वाटी तांदूळ पीठ, पाव वाटी रवा, ५-६ कोकम, पाव कप तेल, १ टिस्पून तिखट, अर्धा टीस्पून हळद, चवी पुरते मीठ.
* कृती - सुरणाचे त्रिकोणी तुकडे करून घेणे. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडी हळद व कोकम टाकून दहा मिनिटे शिजवून घेणे. रवा तांदूळ पीठ मसाले एकत्र मिक्स करून घ्या. सुरणाचा प्रत्येक काप वरील मिश्रणामध्ये घोळवून घ्या. तव्यावर तेल टाकून ते चांगले गरम होऊ द्या. त्यात घोळवलेले सुरणाचे काप फ्राय करून घ्या. गरमा गरम काप चपाती सोबत किंवा असेच खाऊ शकता.
*पाककृती - सुरण मसाला*
* साहित्य - अर्धा किलो सुरण, २ कांदे, २ टोमॅटो, ८ लसणाच्या पाकळ्या, १ इंच आलं, पाव वाटी कोथिंबीर, २ टीस्पून संडे स्पेशल मसाला, पाव चमचा हळद, १ चमचा तिखट, २ टीस्पून धणे जीरे पावडर, १० कढीपत्त्याची पाने, टेबलस्पून तेल, चवी नुसार मीठ, सुपारी एवढा गुळाचा खडा, अर्धा चमचा मोहरी, चिमुटभर हिंग.
* कृती - प्रथम सुरणाची सालं काढून त्याच्या बारीक फोडी कराव्या. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. आलं लसूण बारीक ठेचून घ्यावं. कोथिंबीर बारीक कापून घ्यावी. भाजीचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावं. तेल गरम झालं की त्यामध्ये हिंग व मोहरी, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आलं व लसूण ठेचलेलं घालून छान परतावं. त्यामध्ये हळद, तिखट, मसाला, गूळ मीठ, धने, जीरे पावडर सगळं घालून छान परतावं. झाकण ठेवून त्याला तेल सुटू द्यावं. मग त्यामध्ये थोडे पाणी घालून झाकण ठेवावं व मसाला छान परतून घ्यावा. मग सुरणाच्या फोडी धूउन त्यामध्ये घालाव्या व एकजीव करावे. थोडे पाणी घालावे व झाकण लावून कुकरला दोन ते तीन शिट्ट्या कराव्या. कुकर थंड झाला कि कोथंबीर घालून भाजी चपाती भाकरी भाताबरोबर खाऊ शकतो.
*संदर्भ : मराठी विश्वकोश*
No comments:
Post a Comment