Wednesday, 12 July 2023

*दही.*

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
     *🌿🌹🙏आरोग्य प्रभात🙏🌹🌿*
                             *दही.*

*दही हा आयुर्वेदाचा फार मोठा शत्रू आहे असं अनेकांना वाटतं. प्रत्यक्षात मात्र तसं मुळीच नाही. नीट विराजलेले सायीचे दही हे शरीराला स्निग्धता देते, जिभेची चव वाढवते, वात कमी करते आणि शुक्रधातू वाढवते असे आयुर्वेद सांगतो.*

*तरीही दही हा ‘नियमितपणे’ आणि रात्री खाण्याचा पदार्थ नाही हा झाला मूलभूत नियम. अदमुरे दही कित्येकजण आवडीने खातात. ते गोड असल्याने चांगलं असा त्यांचा समज असतो. मात्र प्रत्यक्षात जी गोष्ट धड दूधही नाही आणि दहीदेखील नाही अशी त्रिशंकू गोष्ट आरोग्याला चांगली कशी असेल बरं? गोड दही अनुभवायचं असेल तर सिंहगडवर मातीच्या कुल्हडमध्ये मिळणारं दही खाऊन बघा. ते व्यवस्थित लागलेलं घट्ट दही असतं. असं अर्धवट नाही. थोड्क्यात; अदमुरं दही नको. ते शरीरातले तिन्ही दोष वाढवतं.*

*दही घेताना छान फेटून घ्या. याला दह्याचं Structure demolition असं म्हटलं जातं. तसं केल्याने ते पचायला सोपं जातं. त्यात साखर, मीठ, मिरपूड किंवा आवळा पूड घालून घेतलं तर हे दही बाधत नाही. दही गरम गोष्टींत मिसळायचं मात्र नाही. दुधासारखंच तेदेखील फाटतं. त्यामुळे ‘दही + गरम’ हे समीकरण नकोच.*

*सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे; पचायला जड असलेलं दही हे थंड नसून उष्ण आहे. मग ते सर्दीसारखे त्रास कसं करतं बरं? सोपं आहे. दही आंबट असेल तरच कफाचे त्रास घडवून आणते; अन्यथा नाही. लस्सीदेखील दह्यापासूनच बनत असल्याने उष्णच. मग सर्दीचे त्रास गोड असलेल्या या लस्सीनेदेखील कसे होतात? कारण मुळात लस्सी हा पदार्थ गोड होतो तो साखरेमुळे ती लस्सीची अंगभूत चव नव्हे. त्यातच पाणी मिसळले गेल्याने पुन्हा त्यातला जलांश वाढल्याने या पदार्थाने सर्दी होऊ शकते. असे असले तरी लस्सीसुद्धा उष्णच बरं का. मिरची फ्रीजमध्ये ठेवली म्हणून. ‘थंड’ असं म्हणतो का आपण? अगदी तसंच इथेही आहे.*

*दही हा कॅल्शियमपासून ते शरीराला उपयुक्त बॅक्टेरियापर्यंत विविध गोष्टींचा उत्तम स्रोत आहे असे आधुनिक आहारशास्त्राने कितीही ओरडून सांगितले तरी त्याचे ‘नियमित’ सेवन टाळाच. बाकी वरील नाममात्र काळजी घेऊन दही खुशाल खा. त्याने शरीरावर सुपरिणाम दिसून येतील. आणि कोणतेही दुष्परिणाम मात्र होणे टळेल.*

*© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.) आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते.*
*।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली*

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺

*(

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi