Monday, 10 April 2023

*फणस

 *फणस*


धंदेवाईक दृष्टीने म्हणा, भौगोलिक दृष्टीने म्हणा, धार्मिक दृष्टीने म्हणा किंवा साहित्यिक दृष्टीने म्हणा किंवा आणखी कुठल्या ह्याने म्हणा; बिचाऱ्या फणसाला मिळणारी वागणूक आंब्याच्या तुलनेत दुय्यमच! 

एखाद्या अक्षयतृतीयेला पिकलेल्या फणसाचा नैवेद्य दाखवून फणसाचं नवं केलय कुणी, त्याचे फोटो बिटो टाकलेत असं मात्र दिसत नाही! 

आमची रत्नांग्री फेमस कशासाठी, तर आंब्यासाठी! 

पण आंब्यांच्या बरोबरीने, काही काही वेळा आंब्यांच्यापेक्षाही वयाने ज्येष्ठ असणाऱ्या फणसांना मात्र हा फेमस व्हायचा मान नाही! 

इतकंच काय, पण सत्यनारायणाच्या पूजेत एखादा फणस ठेवलाय आणि गुरुजी त्यावर पाणी सोडायला सांगतायत असं दृश्य कुठेही बघायला मिळणं म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवण्यातला प्रकार आहे. 


साहित्यात सुद्धा आंब्याच्या झाडाला आम्रतरू बिरु असले अलंकारिक शब्द काय वापरतात, त्याच्यावर बसून कोकिळा काय गातात आणि अजून किती काय! 

पण फणसाची साहित्यिक जागा मात्र "परांजप्या, टाकतोस काय दोन डाव" असं विचारणाऱ्या अंतूबर्व्याच्या खांद्यावरच! कोकिळा बिकिळा लांबचीच गोष्ट! कुणाच्या कथाकाव्यात आमच्या फणसावर बसून कुणी कावळाचिमणी सुद्धा नाही हो ओरडत! इतकंच कशाला, जोडशब्दात उल्लेख सुद्धा आंबेफणस असाच; म्हणजे आंब्याच्या नंतरच! 


नाही म्हणायला 'आम्ही खातो गरे, तुम्ही खा आठळा आणि बाकीच्यांना चारखंड' या म्हणीत मात्र फणसाला मान दिलेला दिसतो! 


असतं एकेकाचं नशीब! काय करणार!


पण खरं सांगतो! खरा कोकण्या मात्र आंब्याइतकच प्रेम फणसावर सुद्धा करतो! 

पिके गरे ही फार पुढची पायरी झाली! पण फणसाच्या *कुयरीच्या* भाजीची अवीट चव ज्याने चाखलेली नाही त्याच्या *जिभेने* आयुष्यभर नुसतं तोंडात राहून केलन काय असा प्रश्न पडावा! 


एखाद्याने आयुष्यात बाकी अगदी सगळं चांगलंचुंगलं खाल्लंन पण *उकडगऱ्याची* चळचळीत फोडणी दिलेली भाजी खाल्लीन नाही तो आमच्या दृष्टीने सगळे दागिने घालूनही कुंकू न लावणाऱ्या सवाष्णीसारखा! 


खरं म्हणाल तर दिवाळी होऊन गेल्यावर थोड्या दिवसांनी फणसाच्या बारीक बारीक कुयऱ्या झाडावर दिसायला लागल्या की तेव्हाच आमच्या जिभा *पाऱ्याच्या* आणि *उकडगऱ्यांच्या* भाजीच्या नुसत्या विचाराने लपलपायला लागतात! 


बाकी हल्ली तळलेले गरे, फणसाची साटं हे प्रकार बाजारात बऱ्यापैकी दिसतात.


आंब्यांसारखेच या फणसाचे पण प्रकार आहेत.

( इथे सुद्धा आंब्यांसारखेच हे सांगायला लागतं.) पार्वतीकाकू, सावित्रीकाकू आणि सिताकाकू या तिघी जावा जावा. 

तिघीही माझ्या पणज्या. 

या तिघींनी आठळा रुजवलेल्या आणि त्याची मग फणसाची झाडं झालेली. 

या तिघींच्या नावावरून या फणसांना पार्वतीकाकूचा, सावित्रीकाकूचा आणि शीताकाकूचा अशी नावं दिलेली. या तिघींनाही जाऊन आता तीसचाळीस वर्षांहून जास्त काळ झाला. 

पण त्यांच्या नावाचे फणस मात्र अजूनही आहेत. 

यातला पार्वतीकाकूचा फणस कापा. चवीला अगदी साखर नुसता! शीताकाकूच्या फणसाची ही मोठ्ठी ढेरी केवढीतरी आणि सावित्रीकाकूचा फणस मागाहून तयार होणारा. 

अगदी पहिला पाऊस पडून गेला की तयार होणारा. शीताकाकूचा आणि सावित्रीकाकूचा बरका फणस. 


ही नावं आता एवढ्या अंगवळणी पडलेली आहेत की “जा बरी सावित्रीकाकूच्यातला आण एक काढून” असं सहजपणे गड्याला सांगितलं जातं. 

एक फणस तर मुळी गुरांचा फणस म्हणूनच ओळखतात. 

याचे फणस कधीही पिकत नाहीत त्यामुळे फणस काढायचे आणि साकटून गुरांच्या अम्बोणात घालायचे. 


कित्येक ठिकाणी घरांची दारंखिडक्या फणशी लाकडाच्या आहेत. 

पावसात पाणी लागून लागून हे फणसाचं लाकूड आणखी आणखी टणक होत जातं असं सांगतात. 

इतकं टणक की हतोडीने खिळा ठोकताना खिळा वाकतो हे बघितलेलं आहे.


आजकाल बाजारात फणसाचे काढलेले गरे विकत मिळतात. पण फणस खायचा यथासांग विधी सांगतो! 


सगळ्यात आधी अनुभवी गड्याकडून झाडावरून फणस उतरवून घ्यावा! काढायला तयार झालेला फणस ओळखायची खूण अशी की फणस तयार व्हायला लागला की त्याच्यावरच्या *काट्यांमधलं* अंतर वाढायला लागतं. 

अनुभवी नजरेला ते बरोबर समजतं. 


तर असा फणस झाडावरून उतरावल्यावर एखाद्या कागदावर किंवा चांदाड्याच्या पानावर देठ खालच्या बाजूला करून भिंतीच्या आधाराने उभे करून ठेवायचे! 

म्हणजे देठाशी असलेला चीक निघून जातो! 

आणि 

मग हा फणस पिकायची वाट बघायची! 

फणस पिकून पक्का तयार झाल्यावर त्याचा मादक घमघमाट सुटतो! 

हा घमघमाट प्रसंगी आंब्याच्या वासालाही *थोत्रीत* मारतो! 


फणस खायची उत्तम वेळ म्हणजे सकाळी न्याहरीची! न्याहारीच्या आधी आगरात शिंपणं, पातेरा झाडणं वगैरे मेहनतीची कामं करून पोटात कावळे ओरडायला लागलेले असावेत! 

अशावेळी पडवीत फतकल मारून बसावं, समोर फणस घ्यावा! त्यावर टिचकी मारून बघावं आणि डबडब आवाज येतोय याची खात्री करून घ्यावी! बोटांना थोडंसं खोबरेल तेल लावून घ्यावं आणि मग कभी कभी लागता है आपुनही भगवान है असे विचार मनात आणून भगवंताने *हिरण्यकशपूचं* पोट फडलं तसं फणसाचं पोट फाडावं! 

पक्का तयार झालेला फणस फोडायला *हाताची बोटं* सोडल्यास बाकी कुठलीही हत्यारं शक्यतो लागत नाहीत. 

हे सगळं केल्यावर क्षणाचाही विलंब न लावता पटकन एक गरा तोंडात टाकावा! 


फणसाची पाव बाजूला काढून टाकावी आणि मग राहिलेल्या गऱ्यांच्या यथावकाश घाई न करता समाचार घ्यावा! 

फणस जर बरका असेल तर गाऱ्यातली आठीळ बाहेर काढायचा आणि गरा गिळायचा मुहूर्त बरोबर साधायला लागतो. 


कापा फणस असेल तर सांभाळून खायला हवा आणि कापे गरे खाल्ल्यावर चुकूनही *पाणी* पिऊ नये. 

शक्य असेल तर सगळा फणस *एकट्यानेच* संपवावा आणि गऱ्यांना *भांड्याचा* किंवा *जीभ* सोडून दुसऱ्या कसलाही स्पर्श होऊ द्यायचं पाप करू नये! 

पूर्ण फणस संपवणं शक्य नसेल तर आपलं पोट भरल्यावर उरलेले गरे केळीच्या *फाळक्यावर* काढून घरात द्यावे आणि घरच्या अन्नपूर्णेला *सांदणाची चाळण* शिजवायची विनंती करावी!


बाकी आम्ही कोकणची साधी भोळी माणसं वरून फणसारखे वरून काटेरी आणि आतून रसाळ आहोत हे जगजाहीर आहेच!


 😊😊

------------------

वैभव देवधर, रत्नागिरी

#स्फुटवैभव

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi