Thursday, 8 December 2022

पोक्रा-2 मध्ये नवतंत्रज्ञान, कृषि संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा

 पोक्रा-2 मध्ये नवतंत्रज्ञान, कृषि संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा

- कृषिमंत्री अब्दुल सत्तार


            मुंबई, दि. 7- नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा) माध्यमातून कृषि व ग्राम विकासाचे काम होत आहे. पहिल्या टप्प्यात कृषि विषयक योजनांच्या अंमलबजावणीतून पायाभूत सुविधांना बळकटी करण्याचे काम झाले. पोक्राचा दुसरा टप्पा हा अधिक विस्तारित, अधिक गावांचा सहभाग असणारा आणि कृषि क्षेत्रात झालेल्या संशोधन आणि नवीन तंत्रज्ञानाचा थेट लाभ शेतकऱ्यांना मिळेल, अशा स्वरुपाचा असावा आणि त्यासाठी जागतिक बॅंकेने सर्वतोपरी मदत करावी, असे आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.


            मंत्रालयात आज पोक्राच्या दुसऱ्या टप्प्याच्या अनुषंगाने जागतिक बॅंकेच्या टास्क टीमचे प्रमुख रंजन सामंतराय यांच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले. पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव सरिता बांदेकर - देशमुख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी बोलताना मंत्री श्री. सत्तार म्हणाले की, पहिल्या टप्पा राबविताना आपण सर्वप्रथमच अनेक गोष्टी करीत होतो. साडेचार वर्षाच्या काळात आता कृषि विषयक योजनांच्या माध्यमातून गावांचा विकास करण्यासाठी अधिकच्या कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, ते जाणवले आहे. त्यामुळेच अशा बाबींना नव्या टप्प्यात समाविष्ट करण्याची गरज आहे. पीक उत्पन्न वाढीसाठी आपण प्रयत्न केले. त्याचबरोबर आता पीक उत्पादनाच्या विक्रीसाठीची व्यवस्था तयार करणे, नवतंत्रज्ञान आणि संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देणे याबाबींना आता अधिक महत्व देण्याची गरज आहे. यासाठी विद्यापीठातील कृषि शास्त्रज्ञ, हवामान बदल, पीक पद्धतीतील बदल याचा अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचेही सहाय्य घ्यावे, असे त्यांनी नमूद केले.


            यावेळी जागतिक बॅंकेच्या टास्क टीमचे प्रमुख श्री. सामंतराय म्हणाले की, पहिला टप्पा संपताच लगेचच दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरु व्हावी, असा प्रयत्न आहे. केंद्र सरकार आणि जागतिक बॅंकेने प्रामुख्याने दुष्काळप्रवण जिल्ह्यांच्या विकासासाठी ही योजना राबविण्याचे ठरविले आहे. सध्या बिजोत्पादन ते पीक उत्पादन, पीक उत्पादन ते काढणीपश्चात मशागत, कृषि यांत्रिकीकरण अशा विविध बाबींचा विचार पहिल्या टप्प्यात केला गेला आहे. दुसऱ्या टप्प्यात अधिक व्यापक स्वरुपात पोक्रा-2 राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


            आयुक्त श्री. चव्हाण यांनी, पीक उत्पादनानंतर त्याचे मार्केटींग आणि विक्रीसंदर्भात व्यापक स्वरुपात काही करता येईल का, याबाबत जागतिक बॅंकेने मदत करावी, असे सांगितले.


000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi