मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे मल्टी मीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी पुढे यावे- मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार.
पुणे, दि. 9 : जगात लोकशाहीचा विकास होत आहे; देशांची प्रगती होत आहे. अनेक समस्या असल्या तरी त्या सोडवण्यासाठी सर्व घटक सहभागी होतात. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे ‘मल्टी मीडिया प्रदर्शन’ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, कुलगुरू डॉ. कारभारी काळे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख निवडणुक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण, केंद्रीय संचार ब्युरोच्या अतिरिक्त महासंचालक रंजना देव शर्मा, स्वीप संचालक संतोष अजमेरा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात मतदारजागृतीच्या अनुषंगाने सादर केलेल्या लावणी, जोगवा, जागरण-गोंधळ, कोळीगीत, वासुदेव नृत्य आदी लोककला तसेच गीतांना दाद देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, लोकगीत, लोकसंगीत, लोकनृत्य, लोककला या आपल्या सर्वांना, समाजाला जोडून ठेवण्याचे काम करतात. आपला देश अनेक समस्यांना तोंड देत असतानाही प्रगतीपथावर वाटचाल करत असल्यामागे या आपल्या सर्वांना बांधून ठेवणाऱ्या शक्ती आहेत. मतदार जागृतीसाठी या कला अतिशय प्रभावी असून त्यांचा जास्तीत जास्त सहभाग घेतला जाईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एक नामांकित विद्यापीठ आहे. त्यामुळे हा कार्यक्रम येथे घेतल्याचे सांगून श्री. राजीव कुमार पुढे म्हणाले, आपला प्रचंड देशात आपण सहभागीतेच्या तत्वावर विश्वास ठेवतो, चर्चा, सहभागाच्या माध्यमातून आपल्या समस्या सोडवण्यावर आपला विश्वास असतो. अनेक गुंतागुंतीच्या, सामाजिक, समस्या, आर्थिक, भौगोलिक समस्या, मानवनिर्मित समस्या अशा सर्व समस्या हळुवारपणे, शांततेत सोडवल्या जातात. त्याच पद्धतीने मतपत्रिकेच्या प्रचंड अशा ताकदीच्या माध्यमातून सत्तेचे हस्तांतरणही अतिशय सुलभतेने होत असते.
देशात २ लाख ४९ हजार मतदार शंभर पेक्षा अधिक वयाचे, ८० वर्षेपेक्षा अधिक वयोगटातील १ कोटी ८० लाखांपेक्षा मतदार आहेत. पुरुषांइतक्याच महिला मतदारांची संख्या आहे. लोकशाहीमध्ये दिव्यांग, ज्येष्ठ, महिला, पुरुष, तृतीयपंथी अशा सर्वांचा चांगला सहभाग आहे. त्यामुळे युवकांनीही निवडणूक प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवावा, असेही ते म्हणाले.
गावात एक मतदार असला तरी तेथे मतदार नोंदणी केली जाते. एक मत नोंदवून घेण्यासाठी १५-२० किलोमीटर प्रवास केला जातो. त्यामुळे मताचे मूल्य लक्षात घेतले पाहिजे. आपण समाजमाध्यमावर वेळ घालवू शकतो तर एक मत नोंदवण्यासाठी नक्कीच वेळ देऊ शकतो, असेही श्री. कुमार म्हणाले.
१८-१९ वयोगटाची लोकसंख्या आणि प्रत्यक्ष झालेली मतदार नोंदणी यामध्ये तफावत आहे. या कार्यक्रमामुळे युवकांच्या लोकशाहीतील सहभागावर चांगला परिणाम होईल असा विश्वास व्यक्त करतानाच तरुणांनी नोंदणी करावी, मित्रांना नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे तसेच मूल्यांवर आणि मुद्द्यांवर आधारित मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी युवकांना केले.
युवा मतदार नोंदणी मोहीम लोकचळवळ व्हावी- अनुपचंद्र पांडे
निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे म्हणाले, कला, साहित्य, गीत, संगीत यामुळे पुणे हे राष्ट्राचे बौद्धिक केंद्राप्रमाणे सांस्कृतिक केंद्रही आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठातून मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवीन मतदार नोंदणीचा देशपातळीवरील शुभांरभ केला जात आहे. कोणीही मतदार नोंदणीपासून राहू नये, मत आपल्या इच्छेने द्यावे मात्र मतदान जरुर करावे आणि निर्भयतेने आणि कोणत्याही प्रलोभनाशिवाय मतदान द्यावे या तीन मुद्द्यावर आयोगाचा भर आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा केवळ १६ टक्के साक्षरता असल्यामुळे येथे लोकशाही रुजेल का ही शंका व्यक्त करण्यात येत होती. परंतु, लोक अशिक्षित असले तरी शहाणे असल्यामुळे ते आपला प्रतिनिधी निवडण्यात चुकणार नाही हा विश्वास होता. आज ५६ टक्के लोक युवा वर्गातील असून मतदार प्रक्रियेत सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू झालेली युवा मतदार नोंदणीची मोहीम एक लोकचळवळ (जनआंदोलन) झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.
कुलगुरू डॉ. काळे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाची संधी विद्यापीठाला मिळाली याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने विद्यापीठाने मतदार जागृतीसाठी चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित केल्या. तृतीयपंथींयांसाठी कार्यशाळा घेतली. आषाढी वारीमध्ये लोकशाही दिंडीचे आयोजन केले. विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, विद्यापीठातील तसेच संलग्न महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंचाचे सदस्य हे मतदार जागृतीसाठी सक्रीय सहभाग देत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीमती रंजना देव शर्मा यांनी प्रास्ताविकात निवडणूक आयोगाच्या उपक्रमांची प्रसिद्धी, प्रचार करण्यासाठी केंद्रीय संचार ब्युरोतर्फे राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. स्थानिक परंपरा, रिती, कला, लोककला आदींच्या माध्यमातून दुर्गम भागापर्यंत मतदार जागृती करण्यात येत आहे. केवळ माहिती पोहोचवणे आणि मनोरंजन एव्हढाच मर्यादित उद्देश न ठेवता लोकशिक्षण करण्यासाठी ब्युरो प्रयत्नशील असतो असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे मतदार जागृतीसाठी राज्यस्तरीय मीम स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मतदारजागृतीच्या अनुषंगाने लावणी, जोगवा, जागरण-गोंधळ, कोळीगीत, वासुदेव नृत्य आदी लोककला तसेच गीतांचे सादरीकरण करण्यात आले. तत्पूर्वी मल्टी मीडिया प्रदर्शनाचे उद्घाटन करुन प्रदर्शनाची पाहणी केली.
यावेळी निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा प्रशासनाकडून मतदार नोंदणीसाठी व्यवस्था केलेल्या दालनाला भेट देऊन मतदार नोंदणी प्रक्रियेविषयी अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधत माहिती घेतली. यावेळी नुकतीच मतदार नोंदणी केलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थीनी प्रार्थना मोढा हिच्याशी संवाद साधला तसेच सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेतली. लोकशाही भिंतीवर (डेमोक्रसी वॉल) स्वाक्षरी केली.
000
मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुणे येथेमतदार जनजागृतीच्या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे-मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी - निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे
पुणे दि. 9 : छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे मतदार जनजागृती सायकल फेरीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, निवडणूक उपायुक्त निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, दिग्दर्शक नागराज मंजुळे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, निवडणूक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण, स्वीप संचालक संतोष अजमेरा आदी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, देशाच्या प्रत्येक भागातील प्रत्येक पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदानही आवश्यक आहे. शहरी भागात मतदार नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने त्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुण्यातून होत आहे.
देशातील दुर्गम भाग, वाळवंट, समुद्रकिनारा, दऱ्याखोऱ्यातील नागरिक मतदानात सहभाग घेतात हे आपले वैशिष्ठ्य आहे. देशात वयाची शंभरी ओलांडलेले २ लाख ४८९ हजार मतदार आहेत. हिमाचल प्रदेशच्या शामशरण नेगी यांनी मृत्यूपूर्वी ३ दिवस आधी टपाली मतदान केले. मतदानाविषयी ही जागरूकता आणण्यासाठी सर्वांनी मतदार जागृतीच्या कार्यात सहभागी व्हावे, निवडणुकीत मतदानाचा हक्कही बजावावा आणि निवडणूक आयोगाचे दूत म्हणून कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. आजची जनजागृती फेरी सर्वसमावेशक असल्याचे नमूद करून या फेरीत खेळाडू, कलाकार, युवक, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी मतदारही सहभागी होत आहेत असेही ते म्हणाले.
लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी -निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे
निवडणुक आयुक्त श्री.पांडे म्हणाले, या वेळेचा मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम युवा मतदार केंद्रीत ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत १७ वर्षाचा युवकही नोंदणी करू शकणार आहे. १८ वर्ष पूर्ण होताच त्याचा समावेश मतदार यादीत केला जाईल. लोकशाही सशक्त करण्यासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी आणि सायकलच्या चाकाच्या गतीप्रमाणे मतदार जनजागृतीचा संदेश प्रत्येक भागात पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
श्री.मंजुळे यांनी सायकल फेरीला शुभेच्छा देताना युवा मतदारांना मतदार नोंदणीचे आवाहन केले. प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी दिलेल्या संदेशात मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, शहरी भागातील १७ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करुन मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेणे तसेच मतदार यादीचे शुद्धीकरण करणे या दुहेरी उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक गावात १० नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचन, नवीन मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे. प्रत्येक महाविद्यालयात मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील महाविद्यालय व विद्यालयामध्ये जनजागृती मोहीम आयोजित करुन १७ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांची नोंदणी करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
युवा मतदार सार्थक पडाळे, तृतीयपंथी समुदायातील मतदार सानवी जेठवानी, अमित मोहिते, ज्येष्ठ नागरिक आनंद पडाळे, दिव्यांग मतदार शिवाजी भेगडे यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल फेरीचा शुभारंभ केला.
सायकल फेरीच्या शुभारंभ प्रसंगी बॅडमिंटन खेळाडू निखिल कानिटकर, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू अभिजित कुंटे, बॉक्सिंग ऑलिंपियन मनोज पिंगळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते सुमेश झेपे, एव्हरेस्ट शिखर वीर आशिष माने, आनंद माळी, हॉकी खेळाडू अजित लाखा, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, सायकलिंग ऑलिंपियन मिलिंद झोडगे उपस्थित होते.
सायकल फेरीत विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, आंतरराष्ट्रीय खेळाडू, युवा मतदार, ज्येष्ठ नागरीक, तृतीयपंथी समुदायाचे प्रतिनिधी, अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सुमारे ४०० नागरिकांनी सहभाग घेतला.
राधा चौक- पुणे विद्यापीठ चौक- राजभवन-केंद्रीय विद्यालय समोरून- कस्तुरबा वसाहत- ब्रेमेन चौक- परिहार चौक- डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक- मेरी पॉईंट हॉस्पिटल- ताम्हाणे चौक- ज्युपिटर हॉस्पिटल- बाणेर बालेवाडी फाटामार्गे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे सायकल फेरीचा समारोप झाला.
मतदार जागृतीसाठी नागरिकांशी संवाद
सायकल फेरीदरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी कस्तुरबा गांधी वसाहत येथे नागरिकांशी संवाद साधला. युवक आणि वयोवृद्धांनीही मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पुण्याची ओळख असलेल्या ढोल पथकाचे आणि पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.
000
निवडणूक आयोगाने साधला तृतीयपंथी समुदायातील मतदारांशी संवाद
पुणे, दि. 9 : निवडणूक प्रक्रियेबाबतच्या तृतीयपंथी घटकांच्या समस्यांबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच त्यांना आपले म्हणणे, समस्या मांडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून एक डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे त्यांनी तृतीयपंथी घटकांशी संवाद साधला. यावेळी निवडणूक उपायुक्त हृदयेश कुमार, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सदस्या दिलशाद मुजावर आदी उपस्थित होते.
श्री. कुमार म्हणाले, तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी प्रकिया अतिशय सोपी केली असून तंत्रज्ञान, जन्म दाखला आदी समस्यांवर मार्ग काढला जाईल. प्रत्येक राज्यात तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधत आहोत. निवडणूक प्रकियेच्या अनुषंगाने तृतीयपंथींयासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबाबत आयोग आवश्यक ती कार्यवाही करेल.
निवडणूक आयुक्त श्री. पांडे म्हणाले, तृतीयपंथीयांची संख्या सुमारे ५ लाख आहे. तथापि, केवळ १० टक्के मतदार नोंदणी झाली आहे. त्यांनी मतदार नोंदणीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या राज्यघटनेने जात, धर्म, लिंग आदी कशाही आधारे भेदभाव होणार नाही याची हमी दिली आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियमातदेखील ही तरतूद असल्यामुळे तृतीयपंथीयांनाही मतदार नोंदणी, निवडणुकीत भाग घेण्यास कोणतीही समस्या येणार नाही, त्याबाबत आयोग अधिक प्रयत्न करेल. राष्ट्रीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावर तृतीयपंथींयांमधून निवडणूक आयकॉन नेमण्याबाबत निवडणूक आयोग निश्चित विचार करेल, असेही ते म्हणाले.
यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून तृतीयपंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
बैठकीत मानीनी मोहिते, डॉ. सान्वी जेठवाणी, दिशा पिंकी शेख, माया अवस्थी, माया शेख, मयुरी आवळेकर आदींनी समस्या, अडीअडचणी मांडल्या तसेच विविध सूचना केल्या.
निवडणूक साक्षरता मंच आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांशी संवाद
तत्पूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील निवडणूक साक्षरता मंचाचे सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच ‘वुई फौंडेशन’च्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. साक्षरता मंचांकडून मतदार जागृतीसाठी राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांदरम्यान येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी तांत्रिक आणि अन्य सहकार्याविषयी त्यांनी सदस्य आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
00
उद्योग क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे आवाहन
पुणे, दि. 9 : उद्योग क्षेत्रात कामगारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीत नाव नोंदवून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी उद्योग संस्थांनी प्रोत्साहित करावे, असे आवाहन भारताचे मुख्य निवडणूक राजीव कुमार यांनी केले.
मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील टेक महिंद्रा - फेज ३ येथे आयोजित कार्यक्रमात उद्योगांमधील मतदार जागृती मंचाच्या नोडल अधिकाऱ्यांशी संवाद कार्यक्रमाच्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे, निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, निवडणूक उपायुक्त हिरदेश कुमार, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवडणुक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण, टेक महिंद्राचे उपाध्यक्ष सतीश पै, उद्योग समूहाचे प्रतिनिधी, औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, पुण्यामध्ये मतदानाची टक्केवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी होतांना मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी मतदानाविषयी जनजागृती करुन पात्र कर्मचारी, कामगारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदार जागृती मंचाच्या प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत भारत निवडणूक आयोग सकारात्मक विचार करेल, असेही ते म्हणाले.
निवडणूक आयुक्त श्री. पांडे म्हणाले, मतदान प्रक्रिया सुरळीतपणे, शांततेत पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग नेहमीच तत्पर असून निवडणूक प्रक्रियेत बाधा निर्माण करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई करण्यात येते. लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलिस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अत्याधुनिक अशी इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (इटीपीबीएस) सेवा भारत निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध कंपन्यांमधून आलेल्या प्रतिनिधींच्या प्रश्नांना श्री. कुमार आणि श्री. पांडे यांनी उत्तरे दिली. नवीन मतदार नोंदणी व मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रपत्र क्र. ६, ७ आणि ८ नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. तसेच मतदार प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुलभ, जलद गतीने होण्यासाठी 'व्होटर हेल्पलाईन मोबाईल अॅप', ‘नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल’ ( एनव्हीएसपी), मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसाठी 'गरुडा' मोबाईल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जवळच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे ऑफलाईनपद्धतीने मतदार नोंदणी करता येते, असे यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित उद्योग समूहाचे प्रतिनिधी, औद्योगिक संघटनेचे पदाधिकारी यांनी निवडणूक आयोगाशी संवाद साधला.
00
मुंबई शहर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
- जिल्हाधिकारी राजीव निवतकर
१२ आणि १३ नोव्हेंबर रोजी दिव्यांग आणि महिलांसाठी विशेष मोहीम.
मुंबई, दि. ९ : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला होता. त्यानुसार आज ९ नोव्हेंबर रोजी एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून येत्या १२ व १३ नोव्हेंबर रोजी दिव्यांग व महिलांसाठी विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.
आज प्रसिद्ध झालेली मतदार यादी विधानसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात अवलोकनार्थ उपलब्ध असेल. यासंदर्भात दावे व हरकती दि. ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत स्वीकारण्यात येतील. तर दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्याण पांढरे उपस्थित होते.
मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमेअंतर्गत दि.१२ व १३ नोव्हेंबर २०२२ रोजी दिव्यांग आणि महिलांसाठी तसेच दि.२६ व २७ नोव्हेंबर, २०२२ रोजी तृतीयपंथी, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, भटक्या व विमुक्त जमातीच्या व्यक्तींची नाव नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येणार असून भटक्या व विमुक्त जमातींच्या नागरिकांकडे वय व रहिवासाचा पुरावा नसल्यास स्वयंघोषणा पत्र घेतले जाईल.
जिल्ह्यातील पदनिर्देशित ठिकाणी सर्व मतदारांसाठी १९ आणि २० नोव्हेंबर २०२२ तसेच ३ आणि ४ डिसेंबर २०२२ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नवीन मतदार नोंदणीअंतर्गत १ जानेवारी २०२३ रोजी १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या नागरिकांची नोंदणी करण्यात येणार असून ज्या नागरिकांचे वय दि. १ एप्रिल, दि. १ जुलै तसेच दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी १८ वर्षे पूर्ण होणार आहे, त्यांना आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.
नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना क्र. ६, मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७, नाव दुरूस्तीसाठी नमुना क्र. ८, परदेशस्थ भारतीयांसाठी नमुना क्र. ६ अ तसेच आधार नोंदणीसाठी नमुना क्र. ६ ब चा उपयोग करता येईल. तर, ऑनलाईन नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी, यासाठी जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.
0000
No comments:
Post a Comment