Thursday, 7 April 2022

काश्मीर फाईल,उघडा डोळे

 बघा कोणाचे डोळे

उघडतायत का…? 👀🙄

——————————

#kashmirfilesmovie वरुन कौल काका आठवले मला. जुना लेख आहे.

निर्वासित

माझं घर बांधून नुकतंच झालं होतं तेव्हाची गोष्ट. पलंगांच्या मापांच्या गाद्या करून घ्यायच्या होत्या. गावातल्या एका चांगल्या फर्निशिंगच्या दुकानात फोन केला, मालक म्हणाले 'दुपारी नमुने घेऊन आमच्या माणसाला पाठवतो. तुम्ही हवी त्या जाडीची, हवी त्या प्रकारची गादी निवडा. तेच गृहस्थ मापं घेतील. तीन वाजता येतील ते गृहस्थ नमुने घेऊन तुमच्या घरी'. आता हे पुण्याचे तीन, त्यामुळे ते गृहस्थ निवांत साडेतीन पर्यंत येतील ह्या हिशेबाने आम्ही सव्वातीनपर्यंत नव्या घरी पोचलो, बघितलं तर फाटकाबाहेर एक जुनी दुचाकी उभी होती आणि घराच्या पायरीवर एक साठीचे गृहस्थ आमची वाट बघत शांतपणे बसून होते. बाजूला दोन मोठ्या पिशव्या ठेवलेल्या. 


दिवस एप्रिलचे, उन्हाने अंगाची नुसती काहिली काहिली होत होती आणि त्या उन्हात तापलेल्या पायरीवर ते गृहस्थ बसले होते. आम्ही खूप खजील झालो. उशिरा आल्याबद्दल त्यांची माफी मागितली, 'असू दे बेटा, होतं असं.' ते म्हणाले. मराठीतच बोलत होते, पण भाषेत किंचित उत्तरेकडचा बाज डोकावत होता. आम्ही बरोबर आणलेल्या किल्लीने दरवाजा उघडला आणि आत गेलो. पहिलं काम केलं म्हणजे पंखा लावला आणि त्यांना पाणी दिलं. बाटली वाकडी करून ते घटाघटा पाणी प्याले आणि डोळे मिटून काही क्षण पंख्याखाली स्वस्थ बसले. 'खूप उन्हाळा तापलाय ना ह्या वर्षी '? मी म्हणाले. ते हसले, म्हणाले, 'पंधरा वर्षे झाली महाराष्ट्रात येवून, पण इथला उन्हाळा काही अजून सहन होत नाही'. खरंच, उन्हाने त्यांचा मुळचा गोरा चेहरा चांगलाच रांपला होता. 


थोड्या वेळाने एक दीर्घ सुस्कारा सोडून उठत ते म्हणाले, 'चला, बेटा, नमुने बघून घेता?'. पुढचा काही वेळ ते कामात गढून गेले. आम्हाला आणि मुलांना आणलेले नमुने    

दाखवले, प्रत्येकाची किंमत, फीचर्स व्यवस्थित समजावून सांगितले आणि आम्ही निवड केल्यानंतर त्यांनी सगळ्या पलंगांची मापे घेतली. ते मापे घेत असताना मी त्यांचे निरीक्षण करत होते. अजिबात घाई न करता, काळजीपूर्वक त्यांचं काम चालू होतं. प्रत्येक बाजू मोजली की बरोबरच्या वहीत ते आकडे नोंदवायचे, ते सुद्धा सावकाश, एका ओळीत, सुंदर अक्षरात. त्यांच्या कामात कुठेही घिसाडघाई नव्हती. माझी मुलगी त्यांचं हे माप घेणं बारकाईने बघत होती, मधून मधून त्यांना प्रश्न विचारत होती, आणि ते काका अजिबात न कंटाळता तिच्या प्रश्नांना उत्तरं देत होते. त्यांचं एकूण सौजन्य, वागण्यात ओसंडून वाहणारा सुसंस्कृतपणा, खरोखरच वाखाणण्याजोगा होता. 

मापं घेऊन झाली. नमुने परत पिशवीत ठेवत ते म्हणाले, 'आठ दिवसात गाद्या तयार होतील. पुढच्या गुरुवारपर्यंत डिलिव्हरी मिळून जाईल, आता जातो मी', 'थांबा काका, लिंबू शरबत करते' मी म्हटलं. 'नको, नको, उशीर होईल, परत गावात पोचायला हवं पाच वाजेपर्यंत,' ते संकोचानं म्हणाले. 'घ्या ना आजोबा शरबत', लेकीने आग्रह केला. हे आजोबा एकूण तिला फारच आवडले होते असं दिसत होतं. 'खूप गोड आहे तुमची मुलगी, लहानपणी माझी नात अगदी अशीच दिसायची', कौतुकाने अनन्याकडे बघत ते काका म्हणाले. 

मी शरबत करून आणलं, आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या. 'तुम्ही मराठी खूप चांगलं बोलता', मी म्हटलं, 'बेटा, गेली पंधरा वर्षे झाली मी महाराष्ट्रात आहे, मग इथली भाषा शिकायला नको'? ते हसत म्हणाले. 'तुम्ही मुळचे कुठले, पंजाबचे का?' मी विचारलं. त्यांचा लख्ख गोरा रंग आणि भाषेचा लेहजा बघून मला ते मनोमन पंजाबी वाटले होते. 'नाही बेटा, माझं नाव हरीकिरण कौल. मी मुळचा काश्मीरचा. सारस्वत ब्राह्मण. काश्मिरी पंडित.' ते काहीसं खिन्न हसत बोलले. त्या एकाच वाक्यात त्यांनी त्यांच्या गेल्या दोन दशकातल्या आयुष्याचा पूर्ण जमाखर्च मांडला होता. 'मग तुम्ही, काश्मीर नव्वदमध्ये सोडलंत'? मला पुढे बोलवेना. 

'सोडावंच लागलं बेटा. श्रीनगर मध्ये दुकान होतं माझं स्वतःचं. हेच फर्निशिंगचं. घर होतं, जमीन होती. पण अक्षरशः एका रात्रीत सगळं सोडून जावं लागलं. ज्यांच्याशेजारी पिढ्यानपिढ्या राहिलो होतो तेच जीवावर उठले. आम्हाला सांगण्यात आलं, आजादीच्या लडाईत सामील व्हा, तुमच्या पोरी-बाळी आमच्या स्वाधीन करा नाहीतर काश्मीर सोडून चालते व्हा'. कौल म्हणाले. भावनावेगाने त्यांचा आवाज कापत होता. 'कुठे जाणार होतो आम्ही आमचं वतन सोडून? पण जावंच लागलं आणि सगळ्या आयुष्याचीच फरफट झाली पहा'. 

'काही दिवस जम्मूला नातेवाईकांकडे काढले, काश्मीरला लवकरच परिस्थिती निवळेल आणि आम्ही परत जाऊ ह्या आशेने. पण काही काही झालं नाही. सरकारने काहीही मदत केली नाही आम्हाला. तिथून आम्ही आलो दिल्लीला. तिथे निर्वासित म्हणून काही महिने काढले. मग पोटाच्या पाठी लागून एक दिवस मुंबईला आलो. मुलं शाळेत शिकत होती, हातपाय हलवणं भागच होतं आम्हाला. मुंबईला एका फर्निशिंगच्याच दुकानात नोकरी धरली, हरकाम्या म्हणून, काश्मीरला दहा माणसं माझ्या दुकानात पगारावर होती, आणि इथे मुंबईत मी हातात टेप घेऊन कुणाच्या तरी दुकानात सामान्य कामगार म्हणून उभा होतो. पुढे चांगल्या कामामुळे मालकाचा विश्वास कमावला आणि त्याने पुण्याला पाठवलं, इथल्या दुकानाची व्यवस्था बघायला. तेव्हापासून पुण्यातच आहे'. कौलकाका म्हणाले. 

त्यांची कहाणी ऐकून मी सुन्न झाले होते. काश्मिरी पंडितांची वाताहत कशी झाली, कुणी केली हे वर्तमानपत्रातून वाचणं वेगळं आणि अश्या ठसठसत्या वेदनेचा आलेख डोळ्यांसमोर कुणी उलगडत असताना ऐकणं वेगळं. 'आता मुलं काय करतात', गढूळलेलं वातावरण निवळावं म्हणून मी कौलकाकांना विचारलं. ते परत एकदा काहीसं कडवट हसले, म्हणाले, 'मुलं मोठी झालीत आता, मुलीचं लग्न झालंय. ती दिल्लीला असते. मुलगा अमेरिकेत एमएस करून नोकरी करतोय, म्हणतोय मी परत भारतात येणार नाही. आता अमेरिकेतच राहीन. निर्वासितच म्हणून राहायचं तर इथे अमेरिकेत का नको? आपल्याच देशात निर्वासिताचं जिणं जगणं ह्याहून जास्त लाजीरवाणी गोष्ट जगात असूच शकत नाही'. 

कौलकाका निघून गेले तरी त्यांचे शब्द कितीतरी वेळ माझ्या कानात घुमत होते! 

- Shefali Vaidya…

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi