नुकताच पाहिलेल्या ताशकेंत फाईल्स चित्रपटाने डोक्यात न संपणाऱ्या प्रश्नांची सहस्त्रावर्तन सुरु झाली आहेत. मुळातच चित्रपटाच्या नावापासूनच शंकासुर थैमान घालायला सुरुवात करतो. स्वतंत्र भारताचे, दुसरे पंतप्रधान स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांच्या ११ जानेवारी १९६६ साली ताशकेंत इथे झालेल्या संशयास्पद मृत्यूबद्दल अनेक अनुत्तरित प्रश्नांना तोंड फोडणारा हा चित्रपट १२ एप्रिल रोजी रिलीज झाला. कुठलीही 'खानावळ' नसताना,अंगप्रदर्शनाचं एकही दृश्य किंवा कुठलंही आयटम सॉंग नसताना , दोन दिवसात सव्वा कोटीहून जास्त कमाई करणारा हा चित्रपट रेटिंग कसोटीवरही अव्वल ठरावा असाच आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता असा रूढ समज ह्या देशात गेली काही वर्ष पद्धतशीरपणे रुजवला गेला आहे. मात्र ह्या चौथ्या स्तंभाला स्वत:च्या अस्तित्वाला टिकवण्यासाठी काय काय करावं लागतं हेही अलीकडे ठळकपणे दिसून येतं . या स्तंभाला आपला डोलारा सांभाळण्यासाठी ब्रेकिंग न्यूज,चटपटीत हॅपनिंग स्कुप्स, मुलाखती मिळवाव्या लागतात. अश्याच एका मिडिया हाऊसमध्ये काम करणाऱ्या तरुण राजकीय पत्रकार रागिणी फुले ला चटपटीत स्कुप मिळवण्यासाठी हातात फक्त आठ दिवस हातात असतात. या स्कुप सिननंतर सुरु झालेला चित्रपट पुढचे सव्वा दोन तास अनेक प्रश्नांचे अनुत्तरित गुंते आपल्या समोर ठेवतो.
"ये देश गांधी और नेहरू का है "। " शास्त्री का क्यूँ नहीं "। या रागिणीच्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही हे चित्रपट पाहात असताना पदोपदी जाणवतं . १९६५ पाक युद्धात, शास्त्रीजींच्या नेतृत्वालाखाली देश लढला आणि पाकिस्तान नेस्तनाबूत केलं गेलं. "जय जवान, जय किसान" हा प्रसिद्ध नारा अजरामर करणाऱ्या शास्त्रीजींना मात्र हा देश शब्दशः विसरलाय . ह्या चित्रपटामुळे, शास्त्रीजींना देश विसरलाय की देशाला शास्त्रीजींना विसरायला लावलंय? हा प्रश्न विचार करू शकणाऱ्या प्रत्येक भारतियाला छळू शकतो. गेल्या काही दिवसांमध्ये बायोपिक बनवण्याचं प्रमाण वाढलेलं असून ताशकेंत फाईल्स मात्र बायोपिक नाहीये ही जमेची बाजू आहे. १९६६ साली भारत युद्धाच्या संपुष्टीसाठी तत्कालीन सोव्हिएत संघाने केलेल्या मध्यस्तीमुळे, उजबेकिस्तानच्या ताशकेंत इथे भारत पाक यांच्यात झालेल्या ताशकेंत करारावर सही करण्यासाठी शास्त्रीजी आठवडाभर तिथे मुक्कामास होते. ताशकेंतहुन आल्यावर ,"कुछ बातें बतानी है"। असं शास्त्रीजींनी आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं . करारावर सह्या झाल्यानंतर, त्याच रात्री शास्त्रीजींचा संशयास्पद मृत्यू होतो.
देशाच्या अतिशय महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीचा परदेशात अचानक, तोही संशयास्पद,मृत्यू होतो. त्याबद्दल ना मीडियात काही बोललं जातं ना सरकार दरबारी. ताशकेंत सारख्या थंड ठिकाणी , तेही भर जानेवारीत शास्त्रीजींचा मृत्यू झाल्यावर, पंधरा तासांनी त्यांचं शव भारतात दिल्लीत आणलं जातं . दिल्लीतही त्या काळात बोचरी थंडी असल्याने, बर्फातल्या प्रेताची अवस्था खराब होण्याचं काही कारणंच नाही असा विचार आपल्या मनात सहज येऊ शकतो. पण भारतात परत आणलेल्या शास्त्रीजींच्या शरीरावर कापल्याच्या खुणा , जखमा आणि कपड्यांवर रक्त असण्याबद्दल सगळेच मौन बाळगून असतात. देशात, बेवारस मेलेल्या व्यक्तीचंही पोस्ट मॉर्टेम केलं जातं . पण याच देशाच्या पंतप्रधानाचं ना पोस्ट मॉर्टेम होतं ना त्यांच्याबद्दल कुठे चकार शब्द लिहिला जातो. रागिणी फुले ही शोधपत्रकार जेव्हा ह्या सत्याला समोर मांडते तेव्हा आपण बधिर झालेले असतो. शास्त्रीजींच्या कुटुंबियांचे इंटरव्ह्यू सांगतात की त्यांची दररोजची नोंदी असणारी लाल डायरी आजवर मिळाली नसून त्यांच्या वापरातला थर्मासही गायब करण्यात आला, ज्यातून त्यांना शेवटचं दूध देण्यात आलं . शास्त्रीजी मृत्यू होतानांही त्या थर्मासकडे निर्देश करत होते. मृत्यूबद्दल बनवलेले दोन रिपोर्ट्स, आजाराच्या नावांशी केलेले चतुर शब्दच्छल, आठापैकी दोन मुख्य रशियन डॉक्टर्सच्या नसलेल्या सह्या , शास्त्रीजींच्या शरीराचा बदललेला रंग, कपाळावरचे दोन पांढरे ठिपके [ जे फोटोतही स्पष्ट दिसत असतात ] आणि सर्वात शेवट ... मृतदेह ताब्यात घेतल्यावर, बाजूलाच इंदिरा गांधींच्या चेहेऱ्यावरचे 'ते' भाव .... सगळं अंगावर येतं बाप्पा .
चित्रपट बनवताना विवेक अग्निहोत्रीने सिस्टीमच्या फुलप्रूफ थोबाडीत मारलीय. कुठेही ढिसाळंच काय, हुशार चूकही केलेली नाहीये. दिल्ली ल्युटेन्स वर्तुळाचं आणि सत्तेचं आपापसातलं साटंलोटं मांडताना विवेकने मीडियातले प्रेस्टिट्यूट्स , तथाकथित उच्चभ्रू इतिहासकार , सुप्रीम कोर्टाचे निवृत्त जज् , गुप्तहेर संघटनेचे निवृत्त प्रमुख, सो कॉल्ड बुद्धिजीवी साहित्यकार सारख्यांना धोबीघाटावर धुतल्यासारखं धुवून काढलंय. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संविधान मानत नाही, त्यांच्यापासून संविधानाला , देशाला धोका आहे, संविधानाची तोडमोड करणारे सत्तेवर बसलेत अशी रडारड करणारे देशात आणीबाणी लागू करतात आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या मूळ संविधानात हवा तसा बदल जबरदस्तीने घडवून आणतात आणि त्याबद्दल चकार शब्दही उच्चारला जात नाही हे पुराव्यानिशी पडद्यावर झळकतं आणि आपण सुन्न होतो.
चित्रपटाच्या शेवटी डॉक्युमेंट्स मध्ये काही नावं शाई लावून झाकलेली दिसतात. पण नीट वाचताना सगळे संदर्भ लगेच लागत जातात. स्वातंत्र्योत्तर काळात निव्वळ एकाच घराण्याची लोकशाही नामक गोंडस शब्दाखाली सुरु असलेली घराणेशाही ,दंडेलशाही ही अशी उघडंनागडं सत्य म्हणून समोर ठेवली जाते.या देशात, नागरीकाला सत्य जाणण्याचा हक्क नाही ? तुम्ही त्या घराण्याचे गुलाम, भक्त किंवा हुजरे असाल तर तुमच्यासाठी हा चित्रपट थोतांड वाटलं तरी डोक्यात विचारचक्रं सुरु करू शकतो. जे भक्त नाहीत ते या विचार सरणीचा निषेध करायच्या मार्गाला लागतील. आणि जे राष्ट्र प्रथम, राष्ट्रनिष्ठा प्रथम या विचारांवर विश्वास ठेवत असतील , ते या घराण्याच्या द्वेषाचं जोमानं समर्थन करतील हे नक्की. चित्रपटात, नेताजींच ताशकेंत करारावर शास्त्रीजी सही करत असताना, तिथे उपस्थित असणं एका खऱ्या फोटोतून दाखवलं गेलय . हा अजून एक धक्का! शास्त्रीजींच्या मृत्यूमुळे काय माहीत इतिहासात काय गाडून टाकलंय? इतकी वर्षं सत्याची मुस्कटदाबी केली, पण असे गड़े हुए मुर्दे बाहेर येणारच.
शास्त्रीजींसारख्या तळागाळातून पुढे आलेल्या काँग्रेसच्याच, गांधीवादी नेत्याला , त्यांच्या लोकप्रियतेला शह देण्यासाठी काय केलं गेलं असेल ? ही घराणेशाही किती बेरड आहे हे निर्भयपणे मांडण्यासाठी विवेक अग्निहोत्रीचं अभिनंदन. मिथुन चक्रवर्ती आणि श्वेता बासू प्रसाद चा अभिनय बाप ! पल्लवी जोशी,मंदिरा बेदी, पंकज त्रिपाठी, यांनी यथार्थ भूमिका निभावल्या आहेत. मला नाही वाटत, या चित्रपटासाठी नासिरुद्दीन मियाँना स्वतंत्र डायलॉग्ज लिहून दिले असतील. अगदी मनापासून आपलं स्वत्वं कॅमेऱ्यासमोर प्रकट केलंय त्याने. अगदी शोभलाय हा माणूस ! याच मनोवृत्तीच्या लोकांमुळे २ ऑक्टोबर गांधीजींसाठी लक्षात ठेवायचं हे आपल्या मेंदूवर शालेय जीवनापासून कोरल गेलंय . हेच लोकं २ ऑक्टोबर शास्त्रीजींचा जन्मदिवस असतो हे कुठेही सांगत नाही. हे आहे देशाच्या मेंदूचं झालेलं 'ब्रेनवाॅशिंग'. देश गांधी नेहेरुंचा नाही, पटेल शास्त्री सुभाष ,लाल बाल पाल यांचाही आहे हे आज स्पष्टपणे सांगायचं सबळ उदाहरण हा चित्रपट देतो. शास्त्रीजी एकदाच नाही, दोनदा निधन पावले. एकदा परदेशात, नि दुसऱ्यांदा स्वदेशात. अगदी बोल्ड अक्षरात लिहितेय, आवर्जून मिळेल तिथे हा चित्रपट पहाच. डोन्ट मिस द चान्स .
©️रुपाली पारखे देशिंगकर
* पोस्ट नावासकट शेअर करायला परवानगीची गरज नाहीच. कटूसत्य लोकांपर्यत पोहोचलंच पाहिजे.
No comments:
Post a Comment