Sunday, 19 September 2021

  

 

दै. प्रहार (दि. १९ सप्टेंबर)


सेल्फी


लेखक: चंद्रकांत बर्वे


गणपती the elephant god. 


बघता बघता आता श्रीगणेशाच्या विसर्जनाची वेळ आलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मान्यता असलेला देव म्हणजे गणपती म्हणजेच elephant god. गणपतीच्या जन्माची कथा तर आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. आता पार्वतीने आपल्या अंगाचा मळ काढून त्याचे मुल बनवले आणि स्वतः अंघोळ करताना त्याला द्वारपालाची भूमिका दिली आणि तिथे भगवान शंकर आले, त्यांना त्या बाळाने थांबवताच शंकराने रागाने त्या मुलाचे मुंडके उडवले आणि नंतर आपली चूक लक्षात आल्यावर एका हत्तीचे मुंडके त्या मुलाच्या धडाला बसवले वगैरे. आता काही मंडळी त्या काळात आमचे वैद्यक ज्ञान किती प्रगत होते वगैरेच्या पुष्ट्यर्थ ही कथा सांगतात. त्यांच्याबद्दल जास्त न बोललेलं बरं. हां पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये झाडे फुले,पाने, वृक्षांना तसच प्राणिमात्राला खूप महत्व आहे. आपण जर आपल्या पुराणातल्या कथा कल्पना वाचल्या तर याची आवर्जून प्रचीती येते. गणपतीपुढे उंदीर असतो, शंकरापुढे नंदी बैल असतो. दत्ताची गाय शिवाय कुत्रे देखील असतात. शंकराच्या गळ्यात नाग असतो, तर लक्ष्मीचे वाहन घुबड असते. गरुड, घोडा, वाघ हे प्राणी तर निरनिराळ्या देव देवतांचे वाहन आहेतच आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण सर्वोच्च स्थानावर असणाऱ्याला देतो ते असते सिंहासन. अहो आपले देव सुद्धा बघाना हनुमान म्हणजे monkey god. अन गणपती म्हणजे elephant god. नरसिंह अवतार तर भगवान विष्णूचा अवतार. भगवान विष्णूचे तर आपण दशावतार मानतो. त्यात मत्स्यावतार हा पहिला अवतार, जीवाची उत्क्रांतीला सुरुवात देखील पाण्यातच झाली. पुढे कूर्म म्हणजे पाणी व जमिनीवर जगणारे कासव आले. त्यानंतर जमिनीवरचे डुक्कर देखील आपल्याला निषिद्ध नाही.  पण आपण सर्वात महत्व देतो ते बुद्धीला  अन या बुद्धीची देवता म्हणजे श्री गणेश. देवता सर्वात जास्त अत्याधुनिक पद्धतीने भक्तीभावाने पुजली जाते.


 महाराष्ट्रातील अष्टविनायक, मुंबईचा सिद्धिविनायक तर संपूर्ण भारतभर सर्वांना माहित आहेच. महाराष्ट्रातील गणेशोत्सव देशातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे.  गणेशोत्सवाच्या काळात सर्वच माध्यमातून त्यावर खूप बोलले जाते. तर त्यानिमित्ताने आपण आज हत्तीविषयी काही गोष्टी समजून घेऊया कारण माणसाच्या शरीराला हत्तीचे मुंडके असलेला हा देव बुद्धीची देवता म्हणून सर्वोच्च स्थानावर आरूढ आहे. निसर्गातील सर्वच प्राण्यांना आपल्या संस्कृतीत स्थान असताना हत्ती या प्राण्याला मात्र सर्वात मोठा सन्मान का? याचे उत्तर जर आपण या प्राण्याचे निरीक्षण आणि अभ्यास केला तर मिळेल. 


हत्ती हा समूहात राहणारा प्राणी आहे. त्यांचा समाज हा मातृसत्ताक असतो. आपल्या माणसांची समाज व्यवस्था देखील एकेकाळी मातृसत्ताक होती. उदाहरणार्थ पांडव हे कुंतीचे पुत्र म्हणून ओळखले जायचे. हत्तींच्या प्रत्येक कळपाची प्रमुख ही सगळ्यात ज्येष्ठ मादीच असते तिच्या नेतृत्वाखाली तो कळप आपली वाटचाल करत असतो. हत्तीची स्मरणशक्ती ही चांगली असते. पाण्याची वाणवा असताना पाण्याचे आणखी स्त्रोत कुठे आहेत हे या हत्ती आजीला ठाऊक असते. ती त्यानुसार समूहाला दिशादर्शन करू शकते. कुठल्या एकांड्या हत्तीवर जर सिंहासारख्या प्राण्याकडून हल्ला झाला तर हत्ती अतिशय कमी फ्रिक्वेन्सीच्या आवाजातून आपण संकटात असल्याची ओरड करतो. तो आवाज ८ कि मी पर्यंतच्या इतर हत्तींना ऐकू जाऊ शकतो व ते मदतीला येतात. आपल्या बाळाचे प्रेम हे इतर प्राण्यांपेक्षा हत्तींमध्ये जास्त दिसून येते. हत्तींचा कळप एकत्र समुहाने संचार करत असतो. त्यातील एखाद्या पिल्लाला जर इजा झाली तर बाकी या पिल्लाला सोडून पुढे जात नाहीत हाच हत्ती आणि इतर प्राणी यांच्यातला मुख्य फरक. इतर चार पायांच्या जनावरात पिल्लाला दुध पाजण्याचे सड किंवा स्तन हे मागील दोन पायांमध्ये असतात पण हत्तींचे मात्र पुढील पायात असतात. इथे तो मानव प्राण्याच्या जवळ येतो. 

आपण सर्व माणसे आपल्या पूर्वजांना नेहमीच आदर देत आलेलो आहोत. सर्व धर्मात तीच शिकवण आहे. हत्तींच्या बाबतीत देखील ही गोष्ट खरी आहे. हत्तींचा कळप जरी एकीकडे जंगल तुडवीत जात असला तरी जेंव्हा एखाद्या मृत हत्तीची कवटी रस्त्यात आढळते तेंव्हा ते पायाने न तुडवता ते त्याच्या प्रती आदर दाखवताना दिसतात. त्यांना हत्तीच्याच डोक्याचे ते हाड आहे हे बरोबर समजते. असा पूर्वजांबद्दल आदरभाव मानव प्राण्याशिवाय फक्त हत्तीन्मध्येच दिसून येतो, अन्य कुठल्याही प्राण्याला ही  समज नाही. मुळात हा प्राणी जरी जंगली असला तरी तो अतिशय चांगल्या पद्धतीने माणसाळू शकतो. अशा या प्राण्याच्या दाताला म्हणजेच हस्तिदंताला चांगला बाजारभाव असल्यामुळे दुर्दैवाने त्यांची अनधिकृत रित्या शिकार केली जाते, याच्यासारखे दुर्दैव ते काय! आपल्या देशात त्याविरुद्ध कडक कायदे आहेत पण वीरप्पन सारख्या चंदन चोरांनी ते धाब्यावर बसवले होते. आता मात्र सध्या आपल्या देशात हत्तींची स्थिती सुधारते आहे. उत्तर पूर्वेला काझीरंगा आणि दक्षिणेला कर्नाटकच्या जंगलात हत्तींची संख्या स्थिर आहे. असो बंगाल, कर्नाटक,आसाम, आदि राज्यातून हत्तींच्या कळपांचा मानवी वस्तीला त्रास होतो ही गोष्ट जरी खरी असली तरी तो दोष त्या हत्तींचा नाही तर वाढते शहरीकरण आणि मानवाची अतीलालसा त्याला कारणीभूत आहेत. csbarve51@gmail.com  

 

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi