Wednesday, 1 November 2023

(The 99 Club ) चे मेंबर व्हाच

 (The  99  Club )

                                                                                                    डॉ. स्वाती गानू     

      

  एक अत्यंत धनाढ्य राजा साऱ्या सुखसुविधा , संपत्ती असूनही आनंदी नव्हता, समाधानी नव्हता. एके दिवशी त्याने आपल्या सेवकाला आनंदाने गाणं गात काम करताना पाहिलं . राजाला आश्चर्य वाटलं की मी ह्या देशाचा राजा असूनही मी दुःखी, उदास आणि तो गरीब सेवक मात्र इतक्या आनंदात कसा? शेवटी त्याने सेवकाला विचारलंही तू इतका आनंदी कसा काय? तेव्हा तो म्हणाला," महाराज, मी एक अगदी सामान्य माणूस आहे पण आम्हाला फार काही लागत नाही . डोक्यावर छत आणि पोट भरेल इतकं अन्न मिळालं की आम्ही समाधानी असतो. पण राजाला आपल्या त्या सेवकाचे उत्तर पटले नाही म्हणून त्याने आपल्या विश्वासू  मंत्र्याला विचारले. राजाची शंका आणि त्या सेवकाची गोष्ट ऐकल्यावर तो मंत्री म्हणाला," मला वाटतं तो सेवक ‘99 Club’ चा भाग झाला नसावा अजून.


ते ऐकल्यावर आश्चर्याने राजाने मंत्र्याला विचारलं ‘99 Club’? म्हणजे नेमकं काय?


 महाराज आपण ९९ मोहरा भरलेली थैली त्याच्या घराबाहेर ठेवा . राजाने तसे करवून घेतले. जेव्हा त्या सेवकाला ती थैली आपल्या घराबाहेर दिसली तेव्हा त्याने ती आत नेली. त्यातील सुवर्णमुद्रा पाहून तो हर्षभरित झाला.मोहरा मोजल्यावर त्या ९९ भरल्या. शंभरावी सुवर्णमुद्रा गेली तरी कुठे म्हणून तो शोधायला लागला. खूप शोधल्यावरही ती सापडेना म्हणून थकून तो विचार करायला लागला की कोणी ९९ सुवर्णमुद्रा कशा काय ठेवेल? पण शंभरावी नाहीये हे ही खरं . त्याने ठरवलं की कठोर परिश्रम करायचे म्हणजे शंभरावी सुवर्णमुद्रा घेता येईल.


त्या दिवसापासून त्या सेवकाचं आयुष्यच बदललं . तो अक्षरशः यंत्राप्रमाणे , रात्रंदिवस झपाटल्यासारखा काम करायला लागला. कुटुंबातल्या सगळ्यांनी त्याला मदत करायलाच पाहिजे म्हणून ओरडाआरड करायला लागला. काम करताना त्यांचं गाणं म्हणणं ऐकू येईनासं झालं . राजानेही ते पहिले . त्याच्यातला हा बदल पाहून  राजाने मंत्र्याला कारण विचारलं तेव्हा मंत्र्याने उत्तर दिले की आता तो सेवक '‘99 Club’ 'चा मेंबर झालाय.


ही कथा वाचनात आली आणि वाटलं सध्याच्या काळात आपल्यापैकी खूपच जण '99 Club’ 'चे मेंबर झालो आहोत. प्रत्येकाला त्याच्याजवळ जे आहे त्यापेक्षा अधिकच भूक आहे. पैसे सगळ्यांजवळ आहेत . आपल्या गरजाही भागताहेत. सुखासमाधानाने जगतोय पण यापेक्षा जास्त श्रीमंत व्हायचंय . पुरेसं होईल असं घर आहे पण प्रशस्त तीन-चार बेडरूमचं घर हवंय. घरात बऱ्यापैकी मोठा टी.व्ही आहे पण सोनीचा सगळ्यात मोठा टी. व्ही हवाय. ब्रँडेड म्युझिक सिस्टीम , फ्रीज , झुळझुळीत पडदे, ए.सी , महागडी कार , परफ्यूमस, कपडे, हॉटेलिंग , मोबाईल मिळवण्यासाठी ह्या  ‘99 Club’ च्या मेंबर्सची रात्रंदिवस धावपळ चाललीये. पैशाबरोबरच ऑफिसमध्ये , राजकारणात अधिक उच्च पदं, अधिक सत्ता ह्या हव्यासाचा कडेलोट होतोय.

मुलांना शंभरपैकी ९९ मार्क मिळाले तर एक मार्क नेमका कुठे गेला हे शोधायला ९९ मार्क मिळाल्याचा आनंद पालक हरवून बसताहेत. जे आहे त्यापेक्षा जे कमी वाटतंय ते मिळवण्याच्या मागे आपण काय गमावतोय याचं भानच उरलेलं नाही. आपल्याजवळ असणारं घर, घरातली माणसं, वस्तू, पैसा, समाजातली प्रतिष्ठा , नावलौकिक , यश ह्याच्यात दडलेलं असतं समाधान. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून आणखी जास्त मिळवायचंय असा विचार करणारे लोक आनंदाच्या शोधात असतात मात्र समाधान हाताच्या ओंजळीतून निसटून जातं हे त्यांच्या लक्षातच येत नाही. आपण ९९ सुवर्णमुद्रा असल्या तरी शंभराव्या नाण्याचा शोध घेण्यासाठी तळमळत राहतो. स्वतःला सांगत राहतो की ते शंभरावं नाणं एकदा का मला मिळालं की मग मी कायमचा आनंदी, सुखी होईन आणि असं तो आयुष्यभर म्हणतच राहतो . आपली रात्रीची झोप , आपला आनंद सारं घालवून बसतो. जे हवं ते मिळवण्याची अभिलाषा अशी की जवळच्यांची मनंही दुखावताहेत. आपल्या गरजा, इच्छा वाढताना आपण ह्या  ‘99 Club’ चे मेंबर कधी होतो ते आपल्याला कळतही नाही.

आपण आयुष्यात उच्च ध्येय ठेवणं चुकीचं नाही मात्र शिखरावर पोचताना ध्येयापेक्षा त्या प्रवासाला अधिक महत्व असतं हे लक्षात ठेवायला हवं. आपण लोभ,मोह याच्यामागे झपाटल्यासारखं लागलो तर कायमच असमाधानी राहू यात शंकाच नाही. अशा ‘99 Club’ ‘चा मेंबर होण्यासाठी फी शून्य लागते पण त्यातून बाहेर पडण्याची मात्र फार मोठी किंमत चुकवावी लागते. म्हणूनच म्हणतात नं की Life is a journey not a destination. आपण समाधान मिळवण्याचा प्रवास करायचा आहे आणि आनंद प्राप्तीच्या मोहाने ‘99 Club’ चे मेंबर तर आपण होत नाही आहोत ना याचं भान राखायचं आहे.

Tuesday, 31 October 2023

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

 अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

-  महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

            मुंबईदि. 31 : अंगणवाडी सेविकांना मोबाईल संच खरेदीसाठी ११ हजार ८०० रुपयेअंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा हप्ता शासन भरणार असून अंगणवाडी सेविकांच्या अन्य मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

            मंत्रालयात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत कृती समितीची बैठक आज झाली. त्यावेळी महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव यांच्यासह महिला व बालविकास विभागाचे अधिकारीमहाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीचे एम.ए.पाटीलशुभा शमीमभगवान देशमुखसुवर्णा तळेकरसरिता मांडवकर उपस्थित होते.

            मंत्री कु. तटकरे म्हणाल्या कीकेंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने झालेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या कार्यक्रमात केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी अंगणवाडी सेविकांसाठी विविध घोषणा केल्या आहेत केंद्राच्या सूचना प्राप्त होताच त्याची राज्यस्तरावर अंमलबजावणी करण्यात येईल. यामध्ये अंगणवाडी सेविकांना मोबाईल संच घेण्यासाठी ११ हजार ८०० रुपयेअंगणवाडी सेविकांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा हप्ता शासन भरणार असून३००० अंगणवाडी सेविकांना लवकरच पदोन्नतीही मिळणार आहे. मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्तीविषयक लाभ ही बाब धोरणात्मक असून त्याबाबतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर हा विषय सादर करण्यात येईल. अंगणवाडी सेविकांना दरमहा पाच तारखेच्या आत मानधन मिळावे आणि इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही मंत्री कु. तटकरे यांनी कृती समितीला दिली.

******

मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया सुलभरित्या राबवावी

 मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची

प्रक्रिया सुलभरित्या राबवावी

- महसूल विभाग अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा

 

            मुंबईदि. 31 : मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी / प्राधिकृत उपजिल्हाधिकारी यांनी सुलभरित्या राबविण्याच्या सूचना महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी दिल्या.

            मराठा समाजातील नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भातील प्रक्रिया राबविण्याबाबत छत्रपती संभाजीनगर विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी / प्राधिकृत उपजिल्हाधिकारी यांची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगेमहसूल विभागाचे उपसचिव संतोष गावडेछत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी / प्राधिकृत उपजिल्हाधिकारी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            यावेळी श्री.देवरा म्हणाले कीमराठवाड्यातील निजामकालिन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला आहे. या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या असून 13 हजार 498 जुन्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या कुणबी नोंदी तपासून जिल्हाधिकारी कार्यालयात जमा कराव्यात. या कागदपत्रांचे भाषांतर करुन जतन करण्यासाठी डिजिटलायझेशन करुन पब्लिक डोमेनवर उपलब्ध करुन द्यावी. जात प्रमाणपत्र सुलभरित्या उपलब्ध करुन देण्यासाठीच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी. तसेच उपलब्ध कागदपत्रे हे मोडी व ऊर्दू लिपी मध्ये असल्याने त्याचे भाषांतर करताना काळजीपूर्वक करण्याच्या सूचनाही श्री. देवरा यांनी यावेळी दिल्या.

            सचिव श्री. भांगे म्हणाले कीमराठा -कुणबीकुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला असून  जात प्रमाणपत्र वितरणाबाबतची कार्यवाही नियमावली तातडीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र वितरण कार्यवाही नियमाच्या आधारे मिशन मोडवर राबवावी, असेही त्यांनी सांगितले.

००००

Monday, 30 October 2023

शिक्षण हीच विकासाची गुरुकिल्ली’ - राज्यपाल रमेश बैस

 शिक्षण हीच विकासाची गुरुकिल्ली’

- राज्यपाल रमेश बैस

            बिहारझारखंडआंध्रप्रदेश व तेलंगणा नक्षलग्रस्त भागातील आदिवासी युवकांनी घेतली राज्यपालांची भेट

           

            मुंबईदि. 30 : शिक्षण हीच विकासाची गुरुकिल्ली आहे. शिक्षण व कौशल्याच्या माध्यमातूनच आदिवासी - जनजाती समाज उन्नती साधू शकेल व राष्ट्र विकासात योगदान देऊ शकेल. यास्तव आदिवासी युवक - युवतींनी शिक्षणाची कास धरावी. तसेच नक्षलवाद्यांच्या विरोधात पुकारलेल्या लढ्यात देशाला साथ द्यावीअसे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

            बिहारझारखंडतेलंगणा व आंध्रप्रदेश या चार राज्यांमधील नक्षलग्रस्त जिल्ह्यातील  २०० युवक- युवतींनी सोमवारी (दि. ३०) राज्यपाल श्री. बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतलीत्यावेळी ते बोलत होते.

            केंद्रीय युवा मंत्रालयाच्या नेहरु युवा केंद्र संघटनेने गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार नक्षलग्रस्त जिल्ह्यांमधील आदिवासी युवकांसाठी १५ व्या आदिवासी युवक आदान - प्रदान कार्यक्रमांचे आयोजन केले असूनया कार्यक्रमांतर्गत चार राज्यातील युवक महाराष्ट्र भेटीवर आले आहेत. 

            यावेळी विधानमंडळाच्या वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक नीलेश मदानेनेहरु युवा केंद्र संघटनेचे महाराष्ट्र व गोवा संचालक प्रकाशकुमार मनुरेकेंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कमांडंट इंद्राणी यादव व नेहरु युवा केंद्राचे उपनगर जिल्हा युवक अधिकारी निशांत रौतेला उपस्थित होते.

            बिहार व झारखंड येथील आदिवासी युवक युवती प्रथमच मुंबई येथे आले असून रेल्वेत देखील प्रथमच चढले या गोष्टीची नोंद घेऊन आदिवासी युवकांची महाराष्ट्र भेट ही त्यांचे अनुभव विश्व समृद्ध करेल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

            केंद्र शासनाने बिरसा मुंडा यांच्या जयंतीला 'आदिवासी गौरव दिवससाजरा करण्याचा निर्णय घेतला आहेअसे सांगून आदिवासी समाजाचे स्वातंत्र्य लढ्यात योगदान फार मोठे असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            आदिवासी बांधवांनी कौशल्ये आत्मसात करावी, असे सांगताना आदिवासी युवक शेती करीत असतील, तर त्यांनी त्यातील नवनवी कौशल्ये शिकावीत व प्रगतिशील शेतकरी बनावेअसे राज्यपालांनी सांगितले.

            आदिवासी युवकांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती करुन घ्यावी व उद्योजक होण्याचा प्रयत्न करावाअसे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी नेहरू युवा केंद्राचे संचालक श्री. मनुरे यांनी आदिवासी युवा आदान - प्रदान कार्यक्रमाची माहिती दिली. आदिवासी युवक आदान प्रदान कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या व्यक्ती व अशासकीय संस्थांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

**


 

Maharashtra Governor tells tribal youths to educate and stay away from Left Wing Extremists

      Mentioning that education is the master key to success, Maharashtra Governor Ramesh Bais today called upon tribal youths from Naxal affected districts to educate themselves, acquire new skills, become entrepreneurs and help the government in its fight against the Left Wing Extremism.

      The Governor was speaking to a group of 200 tribal youths from the States of Bihar, Jharkhand, Andhra Pradesh and Telangana during an interaction at Raj Bhavan Mumbai on Mon (30 Oct).

      The tribal youths from the Naxal affected districts of the 4 States met the Governor as part of the 15th Tribal Youth Exchange Programme organised by the Nehru Yuva Kendra Sanghatan under the aegis of Ministry of Home Affairs, Government of India.

      The Governor said tribals were in the forefront of the Indian freedom movement. He said the nation is proud to have the first woman from the tribal community as the President. He said the Government of India has started the practice of celebrating 'Janajati Gaurav Diwas' on the birth anniversary  of Birsa Munda.

      Director of Nehru Yuva Kendra Sanghatan Maharashtra and Goa Branch Prakash Kumar Manure, Director of V S Page Parliamentary Training Centre of Maharashtra Vidhan Bhavan Nilesh Madane, Commandant of CRPF Indrani Yadav and District Youth Officer of Nehru Yuva Kendra Nishant Rautela were present. The Governor felicitated individuals and organisations supporting the Tribal Youth Exchange programme on the occasion.

0000


 

उद्योगाला चालना देण्यासाठी अधिकाधिक उपक्रम हाती घ्यावेत

 उद्योगाला चालना देण्यासाठी अधिकाधिक उपक्रम हाती घ्यावेत

– विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळण्यासाठी नागपूर येथे उद्योग प्रदर्शनाचे आयोजन

            मुंबईदि. 30 - महाराष्ट्रात जागतिक गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने विविध देशांशी परस्पर समन्वय वाढण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेतस्टार्ट अप आणि नवोपक्रम सुरु करणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन मिळावेगुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ उपक्रम अधिक व्यापकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवावाअसे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्योग विभागाला दिले. आगामी हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला नागपूर येथे महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे आणि त्यात महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात करत असलेल्या प्रगतीचा आढावा प्रदर्शनाच्या माध्यमातून घ्यावाअशा सूचनाही त्यांनी आज केल्या.

            उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी विधानभवनात भारत आणि विविध देशांतील व्यापार-उद्योगास चालना देण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्माग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशीमहाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजपुणे चे सदस्य डॉ. विजय मालापुरेश्री. सागर नागरे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्योग विकास आयुक्त श्री. दीपेंद्रसिंह कुशवाह दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

            या बैठकीत उद्योगाशी निगडित असणाऱ्या उद्योजकांच्या विविध संस्था व उद्योग विभागांमध्ये समन्वय साधून व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न व्हावाया अनुषंगाने चर्चा झाली. यापूर्वी महाराष्ट्र आणि विविध देश यांच्यात झालेले सामंजस्य करारसद्यस्थिती याबाबतही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आढावा घेतला. आफ्रिकेत व्यवसायसंबंधी काय काम करता येईल. महिला उद्योजकांना उद्योग सुरु करण्याच्या अनुषंगाने अधिक सुलभता देणेत्याअनुषंगाने धोरण राबविणेपरदेशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुविधाविविध विद्यापीठे आणि शासकीय विभाग यांच्यामध्ये आदानप्रदान वाढवून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशीप प्रोग्राम राबविणे आवश्यक असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

            राज्यातील पर्यटनवाढीच्या संधी लक्षात घेऊनही काम व्हायला हवे. उद्योजकांच्या संघटना आणि राज्य शासन यांनी यासंदर्भातील कार्यक्रम हाती घेऊन त्यासंदर्भातील  कामाला गती द्यावी. महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये शासनाच्या विभागामार्फत कार्यशाळा आयोजित केली जावी. महिला उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने नागपूर येथे अधिवेशन काळात परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

            प्रधान सचिव डॉ. कांबळे म्हणाले कीराज्याचे स्वत:चे उद्योग धोरण आहे. अधिकाधिक गुंतवणूक राज्यात यावी यासाठी विविध माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत. या प्रक्रियेत येथील उद्योजक संघटनांचे तसेच जगभरातील महाराष्ट्र मंडळ आणि तेथील स्थानिक महाराष्ट्रीयन मंडळींचे सहकार्य निश्चितपणे महत्वाचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

            तैवानजपान यांसह दक्षिण आशियाई देशांसोबत दर 15 दिवसांनी आढावा बैठक होत असतात. व्यवसाय संबंधित विविध परिषदांमध्ये उद्योग विभाग नेहमीच सहभाग घेत आलेला आहे. राज्याच्या विभागनिहाय उद्योगाची रणनीती ठरविण्यात आली आहे. लवकरच मॅग्नेटिक महाराष्ट्र हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

            यावेळी डॉ. जोशी यांनी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम मार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तर डॉ. विजय मालापुरे यांनी राज्यातील उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी आणि उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सहकार्य असेलअसे सांगितले. 

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

"कुप्लर रोस मॉडेल"* या तत्वज्ञान सिद्धांतानुसार

 . *"कुप्लर रोस मॉडेल"* या तत्वज्ञान सिद्धांतानुसार, जेव्हा माणूस कुठल्याही दुःखात, नैसर्गिक आपत्ती, अपघात या गोष्टींना सामोरे जातात तेव्हा ते ५ टप्प्यामधून जातात आणि हे ५ टप्पे म्हणजे


(१) नकार

(२) राग

(३) वाटाघाटी

(४)नैराश्य

(५) स्विकार


(१) *नकार* - ही गोष्ट होऊ शकते यावर विश्वास ठेवण्यास संपूर्ण नकार. 

उदाहरणं म्हणजे आपल्याला वाटले होते की कोरोना आपल्याकडे येणारचं नाही.


(२) *राग* - संताप आणि चिडचिड, गोष्टी मनाविरुद्ध झाल्याने 


रोजनिशी, पगार, नोकरी कपात गेल्यावर राग अनावर


(३) *वाटाघाटी* - स्वतःच्या मनाला सतत सांगत राहणे की जर असे झाले नसते तर सगळं ठीक झालं असतं. 


(४) *नैराश्य* - संताप, चिडचिड याचे परिणामतः नैराश्यात रूपांतर होते. 


(५) *स्विकार* - सगळ्यात शेवटचा टप्पा, आता काहीच समोर दिसत नसल्याने जे आहे ते जसेच्या तसे स्वीकार करणे 

आयुष्यातील सर्व प्रसंग याप्रकारे येतात पण जो कोणी शेवटचा आणि महत्वाचा 'स्वीकार' टप्पा घेत नाही तो मानसिक संतुलन बिघडवून घेतो हे अढळ सत्य!

Sunday, 29 October 2023

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या

 साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संमेलनाचे निमंत्रक म्हणून मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची तर प्रमुख संरक्षक व सल्लागार म्हणून पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नावाची घोषणा मराठी वाङ्मय मंडळ अमळनेरचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी केली आहे.


मराठी वाङ्‌मय मंडळ, अमळनेर द्वारा आयोजित ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि.२, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळेनर येथील पू. साने गुरूजी साहित्य नगरी, प्रताप महाविद्यालयात होत आहे. संमेलन अध्यक्षपदी प्रा. डॉ. रविंद्र शोभणे यांची निवड करण्यात आली आहे. आता संमेलनाच्या तयारीसाठी वेग आला आहे. दरम्यान संमेलन स्वागताध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन, संरक्षक व सल्लागार म्हणून गुलाबराव पाटील व निमंत्रक म्हणून अनिल पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या बाबत म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ, मुंबईच्या अध्यक्षा उषाताई तांबे यांना पत्र पाठविले आहे. जिल्ह्यातील तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांसोबत एकत्रित बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. यानुसार स्वागताध्यक्ष, संरक्षक व निमंत्रक यांची निवड करण्यात आली असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. अशी माहिती म. वा. मंडळाचे उपाध्यक्ष रमेश पवार यांनी दिली.


संमेलनाचे इतर पदाधिकारी आणि विविध समित्यांची निवड आठवडाभरात करण्यात येणार आहे. त्यांच्यावर जबाबदारी देखील सोपवण्यात येणार असल्याची माहिती म. वा. मंडळाने दिली. यासंदर्भात २ नोव्हेंबर रोजी साने गुरुजी हायस्कूल अमळनेर येथे साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची हितगुज सभा दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे.


संमेलन अध्यक्ष प्रा. डॉ. रविंद्र शोभणे यांनी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे नुकतीच भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन समित्या, सुख सुविधा, सुशोभीकरण, लागणाऱ्या गरजा आदींबाबत चर्चा केली होती. आता साहित्य संमेलनाच्या प्रमुख पदांवर जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांची निवड झाल्याने संमेलन यशस्वी करण्यासाठी गती मिळेल, असा विश्वास म.वा महामंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रह्मे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, सदस्य प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश महेश्वरी, प्रा.श्याम पवार, प्रा. शीला पाटील, अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, हेमंत बाळापूरे यांनी व्यक्त केला आहे.


Featured post

Lakshvedhi