Wednesday, 7 June 2023

फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे

 फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात संगीत कारंजे


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


संघर्षनगर, चांदिवली येथे सुपर स्पेशालिटी इस्पितळाचे भूमीपूजन


 


        मुंबई, दि. 6 : नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे साकारण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले.


         संघर्षनगर, चांदिवली, साकीनाका येथे मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून 400 कोटी रुपयांच्या खर्चातून बांधण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी इस्पितळ आणि क्रीडा संकुलाचा पायाभरणी व भूमीपूजन सोहळा आज सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी आमदार दिलीप लांडे, आमदार भरत गोगावले उपस्थित होते.


           मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानीही आहे. मुंबईत परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यानुसार मुंबई शहराचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. त्याबरोबर मुंबई महनगरपालिकेच्या तिजोरीत ११ हजार कोटींची भर पडली आहे. महाराष्ट्रात पायाभूत सोयी सुविधांचे सर्वाधिक प्रकल्प सुरू आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे विविध प्रकल्प मार्गी लागले आहेत.


          महाराष्ट्रात सर्वाधिक परदेशी गुंतवणूक होत आहे. त्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे. संघर्ष नगर परिसरात मूलभूत सोयीसुविधा पुरवून ते सुंदर नगर करण्यात येईल. राज्य सरकार सर्व सामान्य जनतेचे हे सरकार असून त्यांच्यासाठी आतापर्यंत विविध निर्णय घेतले आहेत. असाल्फा व्हीलेज येथील ४८ कुटुंबांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            आमदार श्री. लांडे म्हणाले की, चांदिवली परिसराचा विकास घडवून आणणार आहे. शिधा वितरण कार्यालय लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परिसरातील रस्त्यांचा विकास केला आहे. नागरी सेवा- सुविधा पुरविण्यात येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. गरिबांच्या घरांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. हिंदी भाषिकांसाठी शाळा सुरू केली. मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी इस्पितळासाठी केंद्र सरकारची परवानगी आणून दिली, असेही त्यांनी सांगितले.


             यावेळी नंदेश उमप व सहकाऱ्यांनी नंदेश रजनी हा कार्यक्रम सादर केला. यावेळी लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


०००००

रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; तर डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे

 रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ; तर डॉ. सुरेश गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती


डॉ. संजय भावे कोकण कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरु


 


            मुंबई, दि. ६ : डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे; तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


            राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी डॉ. रवींद्र कुलकर्णी व डॉ. सुरेश गोसावी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.


            राज्यपालांनी डॉ. संजय घनश्याम भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.   


            डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.


००००


 


Dr Ravindra Kulkarni to be new Vice Chancellor of University of Mumbai ; Dr Suresh Gosavi to be VC of SPPU


Dr Sanjay Bhave appointed as Vice Chancellor of Konkan Krishi Vidyapith


 


            Dr Ravindra Dattatray Kulkarni has been appointed as the Vice-Chancellor of the University of Mumbai; while Dr. Suresh Wamangir Gosavi has been appointed as the Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University.


            Maharashtra Governor and Chancellor of public universities in the State Ramesh Bais announced the appointment of Dr Ravindra Kulkarni and Dr Suresh Gosavi.


The Governor has also declared the appointment of Dr. Sanjay Ghanshyam Bhave as the new Vice-Chancellor of Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Dapoli.


            Dr Ravindra Kulkarni is a Senior Professor at Institute of Chemical Technology while Dr Suresh Gosavi is a Senior Professor at the Department of Physics, Savitribai Phule Pune University.


            Dr. Sanjay Bhave is the Head of Department of Agricultural Botany at Dr. Balasaheb Sawant 

Konkan Krishi Vidyapeeth.


0000


कायम रात्रीच का येतो दम्याचा अटॅक? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय.....*

 *कायम रात्रीच का येतो दम्याचा अटॅक? जाणून घ्या लक्षणं आणि उपाय.....*


दमा (Asthama) हा श्वसनाचा आजार आहे. यामध्ये श्वसननलिकेला सूज येते. त्यामुळे श्वास घेण्यात अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे त्याला दमा असंही म्हटलं जातं. जगभरातील मोठ्या संख्येने लोक दम्याच्या आजारानं त्रस्त आहेत. असे बरेच लोक आहेत ज्यांना मध्यरात्री दम्याचा अटॅक येतो. रात्री दम्याचा अटॅक येण्यास कारणीभूत घटकांपैकी एक म्हणजे सर्कॅडियन रिदम. हे रात्रीच्या वेळी हार्मोन्सच्या पातळीत कमी झाल्यामुळे होते.


दम्याचा त्रास अचानक कधीही होऊ शकतो. काही लक्षणांसह दीर्घकाळापर्यंत अनेकदा या आजाराचे संकेतही मिळतात. परंतु त्याच्या मुख्य लक्षणांमध्ये दीर्घकाळ खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होतो. बोलण्यात अडचण येणे आणि नीट झोप न येणे हा देखील दम्याच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये समाविष्ट आहे. अशी लक्षणे दिसू लागल्यावर, आपण आपल्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगणे सुरू केलं पाहिजे.


*यापासून कसा बचाव केला पाहिजे...?*

तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार ज्यांना याचा त्रास होतो त्यांनी आपली औषधं वेळेवर घेतली पाहिजेत. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी असे काही उपाय करावेत, ज्यामुळे दम्याचा अटॅक टाळता येतो. रात्रीच्या वेळी दम्याचा अटॅक येऊ नये म्हणून सर्वप्रथम तुम्ही तुमची खोली स्वच्छ ठेवावी. पंख्यांची पाती आणि कपाटांचा वरचा भाग देखील स्वच्छ ठेवा. बेडरुममधील धुळीचे कण कमी करण्यासाठी गादी आणि उशांवर कव्हर घालणे हा एक उत्तम आणि प्रभावी मार्ग आहे. डॉक्टर म्हणतात की जर तुम्हाला सायनसचा त्रास होत असेल तर कधीही सरळ स्थितीत झोपू नका. यामुळे पोस्टनेसल ड्रिप वाढू शकते. ज्यामुळे दम्याचा झटका येऊ शकतो. झोपताना मऊ उशी डोक्याखाली घेऊन डोके थोडे वर ठेवा.


*उपाय काय कराल...*


दम्याचा त्रास टाळण्यासाठी घरगुती उपायही करता येतात. यासाठी लेमनग्रास खूप फायदेशीर मानले गेले आहे. त्यात अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. त्यात व्हिटॅमिन सी असते. हे पोषक तत्त्व वायुमार्गाची जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. लेमनग्रासचे सेवन दम्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे.


*ओवा...*

ओव्याचा वापर भजी सारख्या डिशेस बनवण्यासाठी मोठ्या प्रामाणात केला जातो. ओवा हा दम्यासाठी फायदेशीर मानला जातो. ओवा भाजून खाल्ल्यानं श्वसननलिकेची सूज कमी होते.


*आलं...*

आल्यातही अनेक औषधी गुणधर्म सापडतात. यामध्ये असलेले अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म दम्याच्या त्रासासाठी उपयुक्त आहेत. आल्याचा काढा किंवा चहासारख्या गोष्टींनी दम्याचा त्रास कमी होऊ शकतो.


*लसूण...*

लसणात असलेले गुणधर्म फुफ्फुस मजबूत करण्यासाठी वापरले जातात. लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्तीही वाढते. लसणाच्या कच्च्या पाकळ्या खाल्ल्याने दम्यामध्ये आराम मिळतो.


*कुमार चोप्रा,*

*डॉ. सुनील इनामदार.*


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


Tuesday, 6 June 2023

महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन कंपन्यांचा वर्धापन दिन

 महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन कंपन्यांचा वर्धापन दिन


महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे त्रिभाजन होऊन दि. ६ जून २००५ मध्ये तीन कंपन्या स्थापन झाल्या. यामध्ये महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या कंपन्यांची सुरुवात झाली. आज या तिन्ही कंपन्यांचा वर्धापन दिवस आहे.


महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या कंपन्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात चांगलं काम करत आहेत. देशातील सर्व शहरात, गावात व खेड्यातल्या वस्तीत वीज पोहोचली पाहिजे; प्रत्येकाच्या घरात विकासाचा प्रकाश पोहोचला पाहिजे, या ध्येयाने या तिन्ही कंपन्या कार्यरत आहेत.


देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मुंबईजवळील घारापुरी बेटावर वीज नेण्याचा उपक्रम केला गेला. घारापुरी बेटावर हजारहून अधिक कुटुंबे गेली ७० वर्षे दिवाबत्तीवरच आपलं जीवन जगत होती. त्यांच्या आयुष्यात यामुळे नवा प्रकाश पडला.


समुद्र तळातून केबल टाकून वीज पोहोचवण्याचा प्रयत्न केला. न्हावाशेवा बंदरातून विजेची केबल समुद्राखालून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावर पोहोचवण्यात आली. त्यामुळे दरवर्षी १४ लाखांहून अधिक पर्यटक येणाऱ्या या बेटावर पर्यटनालाही यानिमित्ताने चालना मिळाली.


देशातील कानाकोपऱ्यात, दुर्गम भागात, डोंगराळ भागातही वीज पोहोचविण्याचे काम या कंपन्यांनी केले आहे. सर्वांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा झाला पाहिजे, यासाठी उर्जा विभाग नेहमी प्रयत्नरत असतो. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, कुसूम योजना कार्यान्वित केली आहे. सौरऊर्जेसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.


महापारेषणच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची कामे अतिशय वेगाने सुरू असून ती प्रगतिपथावर आहेत. जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई देण्यासाठी सुधारित वहिवाटीचा रस्ता (RoW) धोरण दि. २ नोव्हेंबर २०२२ पासून व त्यासाठीचा सविस्तर निर्णय १ डिसेंबर २०२२ रोजी मंजूर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळणार आहे. महापारेषणकडून वाहिनी उभारताना संबंधित जमीन मालकास जमिनीची नुकसान भरपाई (RoW), पिकांची व झाडांची नुकसान भरपाईचा मोबदला देण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी महापारेषणच्या खात्यातून रक्कम थेट जमीन मालकाच्या खात्यात जमा होणार आहे.


पॉवरग्रीड तसेच देशातील इतर राज्य पारेषण उपक्रमांचा दर तसेच पध्दतीचा अभ्यास करून सुधारित दरपत्रक दि. १६ सप्टेंबर २०२२ मध्ये महापारेषणने जारी केले आहे. महापारेषणच्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने उपविभाग स्तरापासून सांघिक कार्यालय स्तरापर्यंत पुरस्कार योजना सुरू केली आहे.


विजेच्या माध्यमातून सर्वांच्या घरी आनंदाचा, विकासाचा प्रकाश पडावा, अशी वर्धापनदिनानिमित्त महापारेषण, महानिर्मिती व महावितरण या तिन्हीही कंपन्यांना 

शुभेच्छा.


***


महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्याकोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर

                    

महाराष्ट्राची पर्यटन पंढरी असलेल्याकोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर


       सर्वात जास्त पायाभूत प्रकल्प सुरु असलेले देशातील एकमेव महाराष्ट्र - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


        सिंधुदुर्गनगरी दि.6 (जि.मा.का):- “कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. ‘येवा कोकण आपलोच आसा’ असा पाहुणचार करणाऱ्या कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर आहे. त्याचबरोबर राज्यातील जनतेला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक प्रकल्प राज्यात सुरु आहेत. देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधा प्रकल्प सुरु असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


            सावंतवाडी शहर व सावंतवाडी मतदार संघातील 110 कोटींच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सुक्ष्‍म, लघु व मध्‍यम उद्योगमंत्री नारायण राणे, ग्रामविकास क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार रविंद्र फाटक, आमदार भरत गोगावले, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, युवराज लखमराजे सावंत-भोसले, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रातांधिकारी प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, “महाराष्ट्राला पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच युवा पिढीला रोजगार उपलब्ध करुन देण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. नोकरी मागणाऱ्या हातापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. महिला बचतगटांना सक्षम करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे. मुलभूत सुविधांबरोबरच आरोग्य सुविधाही जिल्हा, तालुका पातळीपर्यंत व ग्रामीण भागापर्यंत सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र वेगाने प्रगत होत आहे. यासाठी केंद्राकडूनही मदत मिळत आहे. केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी देऊन निधी देण्यात येत आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार. भारत देश गतीने विकास करत असून देशाची अर्थव्यवस्था ११ क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आली आहे. तसेच जी-२० चे अध्यक्षपद आपल्या देशाला मिळाले ही अत्यंत गौरवाची बाब आहे”. असेही मुख्यमंत्री म्हणाले.


            महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असून अलिकडच्या काळात १ लाख १४ हजार कोटी परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आलेली आहे. या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल”, असा विश्‍वास मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्‍यक्‍त करुन कोकणाच्‍या विकासासाठी कोकण प्राधिकरणाची निर्मिती करण्‍याचे काम सुरु केल्याचे सांगितले. कोकणातील कोस्‍टल रोड एमएसआरडीसीच्‍या माध्‍यमातून पूर्ण करण्‍यात येईल. कोकणात सबमरीन सुरु करण्‍यासाठी आवश्‍यक निधी देण्‍यात येईल. त्‍याचबरोबर कोकणातील स्‍थानिक मालाचे ब्रॅंडिंग करुन मार्केटिंग उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी प्रयत्‍न केले जातील. सावंतवाडी शहरातील मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्‍प‍िटलही उभारण्‍यासाठी निधी देऊ. असे सांगून समृध्‍द कोकण घडविण्‍यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्‍न करुया, असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.


            केंद्रीय मंत्री नारायण राणे म्‍हणाले, कोकणाचा गतिमान विकास होण्‍यासाठी दरडोई उत्‍पन वाढीसाठी प्रयत्‍न होणे आवश्‍यक आहे. जिल्ह्यात दोडामार्ग येथे सुरु झालेल्‍या एमआयडीसी मध्‍ये जास्‍तीत जास्‍त उद्योग येतील, यासाठी केंद्र व राज्‍य शासन प्रयत्‍न करेल. आत्‍मनिर्भर भारत बनविण्‍यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्‍यक असल्‍याचे ते म्हणाले.


            शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्‍हणाले, “जास्‍तीत जास्‍त उद्योग हे सिंधुदुर्गामध्‍ये आणून येथील युवकांना रोजगाराची संधी मोठ्या प्रमाणात मिळेल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्‍न करावेत, जेणेकरुन स्‍वयंरोजगाराचे केंद्र हे सिंधुदुर्ग ठरेल. गोवा राज्‍याप्रमाणे सिंधुदुर्गमध्येही उत्कृष्ट पर्यटन सोयीसुविधा निर्माण होणे आवश्यक आहे.


            कमीत कमी खर्चामध्ये सावंतवाडी येथे नदी शुध्दीकरण हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मोती तलावाच्या मध्यभागी बांधण्यासाठी 1 कोटी रुपये निधी दिला जाईल, असे सांगून श्री. केसरकर पुढे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नौदलाचा वर्धापन दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा होणार आहे. या कार्यक्रमांचे भव्यदिव्य आयोजन करण्यात येईल.


            यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सावंतवाडी शहरातील संत गाडगेबाबा महाराज मंडई आणि शॉपिंग सेंटर विकसित करणे, सावंतवाडी नगरपरिषदेच्या जिमखाना मैदान येथे द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गुरुवर्य रमाकांत आचरेकर ड्रेसिंग रूम बांधणे, महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान (राज्यस्तर) योजनेअंतर्गत अग्निशमन वाहन खरेदी, अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण (जिल्हास्तर) या योजनेअंतर्गत अग्निशमन केंद्र व अग्निशमन सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांचे सेवा निवासस्थान बांधकाम, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्य स्तर) योजनेअंतर्गत सावंतवाडी शहरातील पाणी पुरवठा योजना सुधारणा, सावंतवाडी शहरातील जीर्ण झालेली वितरण व्यवस्था बदलणे आदींसह सुमारे 110 कोटींच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.


हळवल तालुका कणकवली येथील वारकरी संप्रदायाला वाहन लोकार्पण


            उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हळवल ता. कणकवली येथील वारकरी संप्रदायाला प्रवास करण्यासाठी चारचाकी वाहन उपलब्ध करुन दिले. या वाहनाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेंगुर्ला येथे करुन हळवल वारकरी संप्रदायाला शुभेच्छा देत अभिनंदन केले.


०००००



 

 परिवहन विभागाच्या नांदेड कार्यालयातर्फेट अटकावून ठेवलेल्या मालमत्तेचा लिलाव

            मुंबई, दि. ६ : प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड या कार्यालयाने वाहन चालकांना मोटार वाहन कर, जमीन महसुलाची थकबाकी १९ जून २०२३ पूर्वी भरावी. अन्यथा वसुली योग्य असलेल्या योग्य रकमेच्या मागणीसाठी अटकावून ठेवण्यात आलेल्या वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येईल, असे मोटार वाहन कर वसुली अधिकारी तथा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.


            प्रादेशिक परिवहन कार्यालय, नांदेड यांच्या वायूवेग पथकामार्फत नांदेड जिल्ह्यात अटकावून असलेल्या व वाहनधारकांमार्फत सोडविण्यात न आलेल्या वाहनांची लिलाव प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने https://eauction.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येईल. ई- लिलावासाठी ऑनलाइन/ऑफलाइन नोंदणी ९ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येईल. ई- लिलाव ऑनलाइन/ऑफलाइन प्राप्त कागदपत्रांची पडताळणी व मंजुरी (शासकीय सुटी वगळून) १४ जून २०२३ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत करता येईल. बोलीदारांना वाहने १९ जून २०२३ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत पाहता येतील. त्यानंतर २१ जून २०२३ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या कालावधीत ई- लिलाव ऑनलाइन होतील, असेही कळविण्यात आले आहे.


०००००

इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी१६ जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी१६ जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई, दि. ६ : जुलै- ऑगस्ट २०२३ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (इयत्ता दहावी) पुरवणी परीक्षेसाठीचा अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्यास १६ जून २०२३ पर्यंत मुदत आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.


            दहावीच्या परीक्षेचा निकाल या महिन्यात जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुरवणी पुरवणी परीक्षा जुलै- ऑगस्ट २०२३ मध्ये होईल. या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय विषय घेवून प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे, Transfer of Credit घेणारे विद्यार्थी) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रवीष्ट होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने दहावीसाठी www.mahasscboard.in या संकेतस्थळावर भरावयाची आहेत. नियमित शुल्कासह १६ जून २०२३ पर्यंत, तर विलंब शुल्कासह २१ जून २०२३ पर्यंत अर्ज सादर करता येईल. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असेही मंडळातर्फे कळविण्यात आले आहे.



०००००


Featured post

Lakshvedhi