Tuesday, 28 February 2023

_पश्चिम आकाशातील खेळ_

 *_पश्चिम आकाशातील खेळ_*

*20 फेब्रुवारी 2023*


सध्या पश्चिम आकाशात एक सुंदर खगोलीय खेळ रंगला आहे. 


सूर्यास्तानंतर अतीशय तेजस्वी *_शुक्र_* सहज लक्ष वेधून घेतो आहे. त्याच्या वरच काही अंतरावर *_गुरू_* पण लगेच दिसतोय. खर म्हणजे शुक्र एवढा तेजस्वी आहे की तो सूर्य आकाशात असतानाही दिसतो. थोडा प्रयत्न करून शोधला तर एक वेगळा आनंद मिळेल. शुक्र आपल्या आकाशातील सूर्य, चंद्र यांच्या खालोखाल तेजस्वी असणारा ग्रह आहे. 


उद्या म्हणजे 21 फेब्रुवारी 2023 ला सूर्यास्तानंतर लगेच पश्चिम क्षितिजावर फाल्गुन महिन्याची प्रतिपदेची सुंदर कोर दर्शन देईल. ती सुद्धा सूर्यास्तानंतर लगेचच शोधायचा प्रयत्न करा. ती सापडली तर तो आनंद अवर्णनीय असतो.


22 फेब्रुवारीला चंद्र - शुक्र युती आहे. म्हणजे ते अगदी जवळ जवळ असतील.


23 फेब्रुवारीला चंद्र गुरुच्या दिशेने सरकेल आणि त्याच्याबरोबर युती करेल. खरतर ही विधान युती आहे पण आपल्या इथून ती युती दिसेल.


24,25,26,27 फेब्रुवारी या काळात मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण निश्चित सूर्यास्तानंतर गुरु, शुक्र पहाणार. कारण त्यांच्यातलं अंतर रोज कमी कमी होत जाईल. ते दृश्य पहाण्याचे टाळणे केवळ अशक्य ठरेल.


या काळात चंद्र शुक्र, गुरू या दोघांना मागे टाकून मंगळाच्या दिशेने सरकलेला असेल.


28 फेब्रुवारीला विज्ञान दिन आहे. याच दिवशी चंद्र मंगळ पिधान युती आहे. म्हणजे मंगळ चंद्राच्या मागे काही काळाकरता झाकला जाईल. पण भारतातून ही पिधान युती दिसणार नाही. चंद्र मंगळ फक्त युती दिसेल.


1,2 मार्च 2023 या संध्याकाळी संपूर्ण जगातले अनेक लोक गुरु शुक्र युती अनुभवत असतील. हे अतिशय दुर्मिळ दृश्य असेल. कारण यानंतर असे दृश्य 2047 मध्ये म्हणजे 24 वर्षांनी अनुभवता येईल. 


त्यामुळे या दुर्मिळ घटनांचा आनंद घ्या.


* - * -* - * -* - * -* - * 


या सगळ्या घटना एकत्रितपणे पुढे देतो आहे. त्यांचा आनंद जरूर घ्या.


21 फेब्रुवारी 2023 - फाल्गुन शुद्ध प्रतिपदा चंद्र दर्शन


22 फेब्रुवारी 2023 - चंद्र - शुक्र युती


23 फेब्रुवारी 2023 - चंद्र - गुरू पिधान युती (आपल्या इथून युती दिसेल)


28 फेब्रुवारी 2023 - चंद्र - मंगळ पिधान युती (आपल्या इथून युती दिसेल)


1,2 मार्च 2023 - शुक्र - गुरू युती


*राम जोशी, खगोलवेध, अलिबाग*

अर्थसंकल्पीय अधिवेशनमा.राज्यपाल अभिभाषण :

 अर्थसंकल्पीय अधिवेशनमा.राज्यपाल अभिभाषण :

अर्थव्यवस्थेला गती, युवकांना नोकऱ्या ही शासनाची प्राथमिकता


शेतकरी कर्जमुक्ती, आपला दवाखाना योजना, रोजगार मेळावे,

पायाभूत सुविधांची निर्मिती यासह अनेक योजनांना राज्यात गती


- राज्यपाल रमेश बैस


            मुंबई, दि. 27 :- महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य राज्य आहे. राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत अनेक योजना, उपक्रम राबविण्यात येत असून 1 लाख 25 हजार रोजगार निर्मितीसाठी 45 कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत. अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ‘ याअंतर्गत 50 हजार रूपये प्रोत्साहनपर लाभ दिला आहे. मुंबईत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजनेअंतर्गत 72 दवाखाने सुरू केले आहेत. नागपूर - शिर्डी दरम्यान हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरुन 31 जानेवारीपर्यंत 7 लाख 84 हजार 739 वाहनांनी प्रवास केला आहे. कोविडनंतर राज्याची अर्थव्यवस्था पुनरूज्जीवित करणे आणि युवकांना नोकऱ्या देणे ही शासनाची प्राथमिकता असून त्याची सुरुवात म्हणून 75 हजार शासकीय नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच 600 रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत अग्रभागी असलेले आपले स्थान कायम रहावे म्हणून राज्य सतत प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.


            विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात राज्यपाल श्री.बैस यांचे अभिभाषण झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, कार्यक्रम यांचा सविस्तर ऊहापोह राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात घेतला. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, विधिमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह मंत्रिमंडळ सदस्य, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य उपस्थित होते.


            राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इतर महान द्रष्टे व समाजसुधारक यांसारख्या महान व्यक्तींनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचे महाराष्ट्र शासन सतत अनुसरण करीत आहे. शासनाने 19 फेब्रुवारी 2023 पासून राज्यगीत म्हणून “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत स्वीकारले आहे. त्यामुळे राज्यगीताची आपली अपेक्षा पूर्ण झाली आहे. माझे शासन महाराष्ट्र-कर्नाटक सीमा विवादासंबंधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या मूळ दाव्यात महाराष्ट्राची बाजू ठामपणे मांडत आले आहे आणि यापुढेही मांडत राहील. सीमावर्ती भागामध्ये राहणाऱ्या मराठी भाषिक जनतेसाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे व त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.


            राज्यपाल म्हणाले की, सन 2022-23 या वर्षामध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी राज्याला विशेष सहाय्य म्हणून 8 हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेचे नियतवाटप केल्याबद्दल प्रधानमंत्री व केंद्र सरकार यांच्याप्रती राज्य कृतज्ञता व्यक्त करते. आजपर्यंत 5 हजार 884 कोटी रूपये इतकी रक्कम यापूर्वीच मंजूर करण्यात आली आहे आणि प्रकल्प सुरू झालेले आहेत.


            राज्यात चोवीस प्रकल्पांच्या 87 हजार 774 कोटी रूपये इतक्या रकमेच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे, त्यातून 61 हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. शासनाने जानेवारी 2023 मध्ये दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेमध्ये 19 कंपन्यांशी 1 लाख 37 हजार कोटी रूपये इतक्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केलेले आहेत.


            शासनाने प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत 4 लाख 85 हजार 434 युवकांच्या आणि 2 लाख 81 हजार 541 शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाचे यशस्वीरीत्या आयोजन केले आहे. शासनाने, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये युवकांमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी 2 औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केल्या आहेत. 1 हजारपेक्षा अधिक आयटीआय निदेशकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रगत निदेशक प्रशिक्षण विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.


            शासनाने स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या पती-पत्नींच्या निवृत्तिवेतनात दरमहा 10 हजार रूपयांवरून 20 हजार रूपये इतकी दुप्पट वाढ केली आहे. याचा लाभ राज्यातील 5 हजार 406 स्वातंत्र्यसैनिकांना होणार आहे. शासनाने महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादात हुतात्मा झालेल्यांच्या कायदेशीर वारसांचे निवृत्तिवेतन देखील दरमहा 10 हजार रूपयांवरून 20 हजार रूपये इतके दुप्पट केले आहे. माझ्या शासनाने “आणीबाणीच्या काळात लढा दिलेल्या व्यक्तींचा सन्मान” करणारी योजना पुन्हा सुरू केली आहे. या योजनेत एकूण 4 हजार 438 लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.


            राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील एक अग्रगण्य औद्योगिक राज्य आहे. भारताच्या एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 14.2 टक्के इतका आहे आणि भारताच्या एकूण निर्यातीच्या 17.3 टक्के इतक्या वाट्यासह निर्यातीत देखील महाराष्ट्र आघाडीवर आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत अग्रभागी असलेले आपले स्थान कायम रहावे म्हणून राज्य सतत प्रयत्नशील आहे. माझे शासन सन 2026-27 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर इतकी साध्य करण्याच्या प्रधानमंत्री यांच्या ध्येयाशी सुसंगत अशी राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर इतकी साध्य करण्यासाठी कटिबध्द असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.


        मा.राज्यपालांच्या भाषणातील उर्वरित भाग सोबतप्रमाणे :-   


            शासनाने मुंबईमध्ये 13 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत जी - 20 परिषदेच्या पहिल्या बैठकीचे आणि पुणे येथे 16 व 17 जानेवारी 2023 रोजी जी - 20 परिषदेच्या पायाभूत सुविधांच्या कार्यगटाच्या बैठकीचे यशस्वीरीत्या आयोजन केले. सहभागी प्रतिनिधींनी परिषदेचे भरभरून कौतुक केले. शासनाने, उद्योगांमध्ये व्यवसाय सुलभता आणण्याच्या दृष्टीने उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या 119 सेवा या “मैत्री” नावाच्या एक खिडकी प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. वस्त्रोद्योगाला बळकटी आणण्याच्या उद्देशाने माझे शासन “एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-2028” तयार करीत आहे. नवीन कापूस प्रक्रिया केंद्र उभारणे आणि वस्त्रोद्योग उद्योगात सौर उर्जेच्या वापरातून रेशीम उत्पादकांना मूल्यवर्धित लाभ प्रदान करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट असेल. त्यामुळे राज्यात रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होतील, असे राज्यपाल म्हणाले.


            शासनाने मुंबई मेट्रो मार्ग-11 वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या 13 किलोमीटर लांबीच्या दोन उन्नत व आठ भुयारी स्थानकांचा समावेश असलेल्या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. गती शक्ती वर भर देण्याच्या दृष्टीने शासनाने तीन शहरांमध्ये मुंबई येथे 30 किलोमीटर, नागपूर येथे 40 किलोमीटर व पुण्यात 32 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू केले आहेत. शासनाने “स्वच्छ भारत अभियान (नागरी) 2.0” च्या धर्तीवर “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0” सुरू केले आहे. मुंबईत सर्वसमावेशक आरोग्य सुविधा देण्याकरिता “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे-आपला दवाखाना” योजनेअंतर्गत 72 दवाखाने सुरू केले आहेत आणि मार्च 2023 पर्यंत मुंबईत 123 दवाखाने तसेच 18 नवीन बहुविध चिकित्सालये व रोगनिदान केंद्रे सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.


            शासनाने खाजगी क्षेत्र आणि अशासकीय संस्थांच्या सहभागातून राज्याचा जलद व सर्वसमावेशक विकास साध्य करण्याकरिता नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉरमेशन - मित्र ही संस्था स्थापन केली आहे. मित्र ही संस्था राज्याच्या विकासाला धोरणात्मक, तांत्रिक तसेच कार्यात्मक दिशा देण्याकरिता एक विचार गट असेल. शासनाने आर्थिक व अन्य आनुषंगिक बाबींवर राज्य शासनाला सल्ला देण्यासाठी “आर्थिक सल्लागार परिषदेची” देखील स्थापना केली आहे, असे त्यांनी सांगितले.


            प्रधानमंत्री यांच्या हस्ते 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर व शिर्डी यांना जोडणाऱ्या 521 किलोमीटर लांबीच्या मुंबई-नागपूर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग एक्सप्रेस वेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनापासून 31 जानेवारी 2023 पर्यंत या महामार्गावरून एकूण 7 लाख 84 हजार 739 इतक्या वाहनांनी प्रवास केला आहे. वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याकरिता माझे शासन कटिबध्द आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना भांडवली खर्चाकरिता विशेष सहाय्य योजना, आशियाई विकास बँकेकडून उपलब्ध झालेले कर्ज आणि हायब्रीड ॲन्यूटी योजना यांमधून राज्यातील रस्ते बांधणी कार्यक्रम जलदगतीने सुरू आहेत. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आतापर्यंत 26 हजार 731 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.


            माझ्या शासनाने विविध योजनांच्या एकत्रीकरणातून सुमारे 5 हजार गावांमध्ये “जलयुक्त शिवार अभियान 2.0” राबविण्याचे ठरविले आहे. जलसाठा क्षमता वाढविण्याकरिता तसेच शेतजमिनीच्या मातीचा दर्जा सुधारण्यासाठी “गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार” योजना सुरू ठेवणार आहे. शासनाने केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत 27 प्रकल्पांना आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 91 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. पूर्ण झालेल्या प्रकल्पांमधून प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत 3 लाख 27 हजार हेक्टर सिंचन क्षमता आणि बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत 1 लाख 73 हजार हेक्टर सिंचनक्षमता निर्माण करण्यात आली आहे. आजपर्यंत 2 लाख 95 हजार 127 हेक्टर लाभक्षेत्रावर बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण प्रणालीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. शासनाने 33 हजार 400 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चाच्या 29 पाटबंधारे प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या 29 प्रकल्पांची कामे पूर्ण झाल्यानंतर 5 लाख 86 हजार 439 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी माझ्या शासनाने, “मिशन-2025” कार्यक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत पुढील तीन वर्षात 30 टक्के कृषी वीज वाहिन्यांचे सौर उर्जीकरण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


            पाच लाखांपेक्षा अधिक घरकुले बांधून पूर्ण करण्याच्या उद्देशाने “प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण” आणि राज्य पुरस्कृत “राज्य ग्रामीण गृहनिर्माण योजना” यांची अंमलबजावणी करण्यासाठी “अमृत महाआवास अभियान” सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या ‘प्रत्येकाच्या डोक्यावर छत’ या ध्येयाच्या पूर्ततेसाठी प्रधानमंत्री आवास योजनेची ग्रामीण आणि नागरी या दोन्ही भागात जलदगतीने अंमलबजावणी करण्यासाठी माझे शासन कटिबध्द आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना पुरेशी निवासस्थाने उपलब्ध करून देण्यासाठी शासन दीर्घकालीन, मध्यमकालीन व तात्काळ उपाययोजना करत आहे. तसेच शासनाने म्हाडाच्या मदतीने मुंबईमधील पोलीस निवासस्थानांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जानेवारी 2011 पर्यंत बीडीडी चाळीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या वारसांना 15 लाख रूपये इतक्या बांधकाम खर्चात पुनर्विकसित 500 चौरस फूट क्षेत्रफळाचा गाळा मालकी तत्त्वावर वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.


            शासनाने राज्यामध्ये जलजीवन मिशनअंतर्गत ग्रामीण भागात 1 कोटी 5 लाख 73 हजार घरगुती नळजोडण्या पुरविल्या आहेत. शाश्वत भूजल व्यवस्थापनासाठी 1 हजार 442 गावांमध्ये “अटल भूजल योजना” राबविण्यात येत आहे.


            शासनाने वन विभागात कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचा वनांचे किंवा वन्यजीवांचे संरक्षण करतेवेळी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू ओढवल्यास त्यांच्या वारसांना 25 लाख रूपये आणि कायमचे अपंगत्व आल्यास 3 लाख रूपये इतके आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेतला आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास त्याबाबतीत प्रदान करावयाच्या आर्थिक सहाय्याच्या रकमेत 15 लाख रूपयांवरून 20 लाख रूपये इतकी वाढ करण्यात आली आहे.


            रामसर परिषदेने ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून “रामसर क्षेत्र” घोषित केले आहे. यामागे या क्षेत्रातील पाणथळ क्षेत्राचे व वन्यजीवांचे संवर्धन करणे हा हेतू आहे. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972 अन्वये शासनाच्या मालकीच्या क्षेत्रात वन्यप्राण्यांचे आणि वनस्पतींचे व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याच्या प्रयोजनार्थ राज्यात 11 नवीन संवर्धन राखीव क्षेत्रे अधिसूचित केली आहेत. शासनाने राज्यातील हळद पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्रासाठी 100 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


            संयुक्त राष्ट्राने सन 2023 हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केले आहे. माझ्या शासनाने शेतकऱ्यांमध्ये पौष्टिक तृणधान्ये लोकप्रिय करण्यासाठी आणि पौष्टिक तृणधान्यांचे क्षेत्र व उत्पादकता वाढविण्यासाठी 200 कोटी रूपयांची तरतूद करून “महाराष्ट्र पौष्टिक तृणधान्य अभियान” सुरू केले आहे. हैद्राबाद येथील भारतीय पौष्टिक तृणधान्य संशोधन संस्थेच्या सहकार्याने सोलापूर येथे “पौष्टिक तृणधान्यांकरिता उच्चतम गुणवत्ता केंद्र” उभारण्यात येणार आहे. शासनाने संपूर्ण कोकण विभाग तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा तालुक्यांमध्ये काजू फळ पीक विकास योजना राबविण्याकरिता मान्यता दिली आहे. या प्रयोजनासाठी 5 वर्षांकरीता 1 हजार 325 कोटी रूपये इतकी रक्कम प्रस्तावित करण्यात आली आहे. 


            शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर लाभ दिला आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 4 हजार 683 कोटी रूपये इतकी रक्कम एकूण 12 लाख 84 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केली आहे. शासनाने, 34 हजार 788 शेतकऱ्यांनी 29 भूविकास बॅंकांकडून घेतलेल्या 964 कोटी रूपये इतक्या थकीत कर्जाची रक्कम देखील माफ केली आहे.


            शासनाने शेतकऱ्यांच्या घरी जाऊन गोवंशीय पशुधनाचे संपूर्णत: मोफत प्रतिबंधात्मक लसीकरण केले आहे. लम्पी चर्मरोगामुळे पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना व पशुधन मालकांना आर्थिक सहाय्य दिले आहे. या साथरोगाचा सामना करण्यासाठी औषधे, लस, उपकरणे यांसाठी ...


मराठी भाषा सर्वांना सामावून घेणारी भाषा

 मराठी भाषा सर्वांना सामावून घेणारी भाषा

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानमंडळात 'साहित्याची ज्ञानयात्रा' उत्साहात संपन्न.

            मुंबई, दि. 27 :- “जी भाषा जात-पात विसरून सर्वांना सामावून घेते तीच विश्वाची भाषा होते. हे सर्व गुण मराठी भाषेत आहेत. या भाषेचा वापर अधिकाधिक करून मराठी भाषा समृद्ध केली पाहिजे. त्यासाठी आवर्जून मराठी बोलले, लिहिले पाहिजे,” असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.


            विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात 'मराठी भाषा दिनानिमित्त' महाराष्ट्र विधानमंडळ आयोजित 'साहित्याची ज्ञानयात्रा' या कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते.


             मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मराठी भाषा ही प्राचीन आणि समृद्ध आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. स. खांडेकर, कवी कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, डॉ.भालचंद्र नेमाडे असे ज्ञानपीठ विजेत्यांचे मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी योगदान आहे. याचबरोबर विजय तेंडुलकर, जयंत पवार ते अगदी आत्ताचे प्रणव सखदेव, प्रवीण बांदेकर असे वास्तवाला भिडणारे अनेक लेखक मराठीत आहेत. या मराठी भाषेला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शब्दांची देवाणघेवाण झाली पाहिजे. अशा देवाणघेवाणीमुळे भाषा प्रवाही व जिवंत राहते. महाराष्ट्राला गौरवशाली साहित्य आणि संस्कृतीची परंपरा लाभली आहे. आपले साहित्य एक अमूल्य ठेवा आहे. राज्य शासनाने अलिकडेच शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजा बढे यांनी लिहिलेल्या "जय जय महाराष्ट्र माझा" या गीताला राज्य गीताचा दर्जा दिला आहे. साहित्य, मराठी भाषा आणि राज्याचा अभिमान यांना एकत्र आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मराठी भाषा ही 2500 वर्षांपूर्वीची आहे. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देता येणार आहे. साहित्य संमेलनासाठी साहित्यिकांच्या समस्या शासन सोडवेल आणि मदत करेल. मराठी भाषा भवनाचे काम लवकरच गतीने पूर्ण करू, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले,


मराठी भाषेचा व्यवहारात वापर झाला पाहिजे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


      उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मराठी माणसाने नेहमी जगाचा विचार केला आणि त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांनी संपूर्ण विश्वाला पसायदान दिले. मराठी भाषेने आजवर अनेक आव्हाने पेलली आहेत. कुसुमाग्रज यांच्या शब्दांतून खऱ्या अर्थाने शिव म्हणजे सर्व विश्व आहे हा विचार मांडला आहे. मराठी ही प्राचीन भाषा आहे. अनेक काळापासून अनेकांनी ही भाषा समृद्ध केली आहे, असेही ते म्हणाले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जगातील अनेक भाषा संपल्या पण मराठी भाषा ही संपणार नाही. मराठी भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाईल मराठी भाषेचा व्यवहारात वापर झाला पाहिजे, ती ज्ञान भाषा झाली पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणात उच्च व वैद्यकीय शिक्षण मराठीत घेता येणार असून उच्च शिक्षणात गेल्यानंतर भाषेशी तुटणारे नाते जोडण्याचा प्रयत्न होत आहे. जगात सर्वात चांगले इंजिनिअर जर्मनीत आहेत, ते तेथील मातृभाषेत शिक्षण घेत असल्यामुळे हे घडत आहे. आम्हीच वर्षानुवर्षे इंग्रजीचा आग्रह धरून ठेवला. आता केंद्र सरकारनेही नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्याचा निर्णय स्वीकारला आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.


मराठी भाषेची गौरव पताका जगभरात फडकतेय


                              - विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर


         विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मराठी भाषा गौरव दिनानिमित्त साहित्यिकांसाठी अपूर्व अशी मेजवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या प्रेरणादायी साहित्यांमुळे मराठी भाषेची गौरव पताका जगात फडकत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राज्यातील विविध भागातील बोलीभाषा एकाच व्यासपीठावर उपलब्ध होतात. ही आपल्या राज्याची बलस्थाने आहेत. बहुभाषिक, बहुसंस्कृती असणारा महाराष्ट्र राज्यासारखे जगात राज्य नसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या राज्यातील राज्यातील भाषेचा विकास करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. तसेच मराठी भाषेचा इतिहास, देशातील भाषा, मराठी भाषेचे वैशिष्ट्ये अशी सविस्तर माहिती त्यांनी यावेळी सांगितली.


मराठी भाषेसाठी सर्वजण एकत्र येतात - उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे


            विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'साहित्याची ज्ञानयात्रा' हा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि उपस्थित मान्यवरांनी मनापासून दिलेली दाद आणि वेळ देखील खूप महत्वाचा आहे. मराठी भाषेचा प्रश्न असो अथवा मराठी भाषेच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येतात. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून २७ फेब्रुवारी २००२ मध्ये दोन्ही सभागृहात ठराव मांडला. इंग्रजी शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आज समाजमाध्यमे आणि मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे देखील मराठीचा चांगला वापर करतात. नव्याने होणाऱ्या मराठी भाषा भवनमध्ये येणारी सर्व कार्यालये एकत्र असावीत. जेणेकरून एकाच ठिकाणी मराठी विषय सर्वांना अभ्यास करणे सोपे होईल, असे ही त्या म्हणाल्या.


नवीन मराठी भाषा भवन अभ्यासाचे केंद्र बनेल : मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर


       मराठी भाषा मंत्री श्री. केसरकर म्हणाले, मराठी भाषेचा मराठी माणसाला अभिमान आहे.मराठीला आपण आई मानतो. त्या मराठीचा आज गौरवाचा दिवस आहे. शालेय शिक्षण विभाग व मराठी भाषा भवनचा भूखंड एकत्रित करून मरिन लाईन्स येथे आदर्शवत, सुसज्ज वास्तू उभारणार आहे. यामध्ये संमेलन, चर्चासत्र, संशोधन केले जाईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.मराठी विश्वकोश ही एक देणगी आहे.मराठी विश्वकोशाचे कार्यालय भाड्याच्या जागेत होते.यावर्षी नवीन प्रस्ताव तयार केला असून वाई येथे सुसज्ज इमारत उभारणार आहे. परदेशात शनिवारी व रविवार मराठी भाषा शाळा चालवतात.मराठी भाषा टिकावी यासाठी प्रयत्न करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.


    विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. 


            आमदार यामिनी जाधव यांनी यावेळी स्व-रचित जीवनविषयक कविता सादर केली. अभिनेते डॉ. गिरीश ओक व लीना भागवत यांनी अभिवाचन केले.गायक नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे, अभिषेक नलावडे यांनी मराठी भाषेचे महत्त्व असलेल्या गीतांचे गायन केले. या कार्यक्रमांची संहिता उत्तरा मोने यांची होती. वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या मराठी लेखकांच्या साहित्यावर आधारित या कार्यक्रमाला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली. विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान साचिव राजेंद्र भागवत यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अनुश्री फडणीस यांनी केले.


0000

महाराष्ट्र परिचय केंद्रात मराठी भाषा गौरव दिन साजरा

            नवी दिल्ली , 27 : महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘मराठी भाषा गौरव दिन’ आज साजरा करण्यात आला. परिचय केंद्राच्या ग्रंथालयात कवी ‘कुसुमाग्रज’ यांच्या प्रतिमेस जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


            शासनाच्यावतीने ‘कुसुमाग्रज’ यांची जयंती ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरी केली जाते. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर व उ‍पस्थित कर्मचाऱ्यांनीही अभिवादन केले.


मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘कुसुमाग्रज’


            कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्‍कृतिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय योगदान आहे. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. ‘कुसुमाग्रज’ या नावाने त्यांनी काव्य लेखन केले. प्रसिध्द साहित्यिक वि.स.खांडेकर यांच्या नंतर मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कुसुमाग्रज दुसरे मराठी साहित्यिक ठरले.


             कवी कुसुमाग्रज यांचे एकूण २४ कविता संग्रह , ३ कादंब-या, १६ कथा संग्रह, १९ नाटके आणि ४ लेखसंग्रह आदी साहित्य प्रसिद्ध आहे. १९६४ मध्ये गोव्यात आयोजित ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे ते अध्यक्ष होते. १९७४ मध्ये कुसुमाग्रज लिखित ‘नटसम्राट’ या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले.


0000



 

मराठीमध्ये विश्वाची भाषा बनण्याचे गुण

 मराठीमध्ये विश्वाची भाषा बनण्याचे गुण

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुरस्कार प्रदान.

            मुंबई, दि. 27 : जगाच्या कानाकोपऱ्यातील मराठी जनांना एका धाग्यात जोडण्याचे काम माय मराठी करते. जी भाषा सर्वांना जोडते, सामावून घेते, माणुसकी शिकवते तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची भाषा बनते. हे सर्व गुण मराठी भाषेत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वनीचित्रमुद्रीत संदेशाद्वारे शुभेच्छा देताना केले.


            ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठी भाषा विभागातर्फे या वर्षी हा कार्यक्रम “यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान” मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ध्वनीचित्रमुद्रीत संदेशाच्या माध्यमातून ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीधर दीक्षित, मराठी भाषा विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, भाषावार प्रांत रचनेनंतर महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन मराठी ही राजभाषा झाली. शासनाने मराठीच्या जतन व संवर्धनासाठी स्वतंत्र मराठी भाषा विभाग स्थापन केला. त्यामुळेच लोकभाषा, ज्ञानभाषा, राजभाषा म्हणून मराठी गौरवाने प्रस्थापित झाली आहे. बोली भाषा संवर्धनासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. साहित्य प्रसार, भाषा विकास आणि संशोधनासाठी, साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक दर्जाचे मराठी भाषा भवन मुंबईत साकारण्यात येत आहे. हे भवन महाराष्ट्राचा मानबिंदू ठरेल, असा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 


            मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम होत आहेत. यामुळे मराठी भाषा समृद्धीला हातभार लागत असून अशा महोत्सवाच्या माध्यमातून मराठी भाषा जागतिक स्तरावर नेण्यासाठी यंदा प्रथमच विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे तसेच जगभरातील मराठी जनांचा याला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.


            राज्य शासनाने राज्यगीत म्हणून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत स्वीकारले आहे, याचेही सर्वत्र कौतुक होत असल्याचे सांगून या गीताप्रमाणेच महाराष्ट्र हा भाषेच्या पातळीवरही सर्वत्र गर्जत राहील, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषा विभागाच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा व्यक्त करून विभागामार्फत पुरस्कार प्राप्त साहित्यिक आणि संस्थांचे त्यांनी अभिनंदन केले.


नवीन शैक्षणिक धोरणामुळे मातृभाषेतून शिक्षण - चंद्रकांत पाटील


            कविता, नाटक, पोवाडे, गीते आदी विविध माध्यमांतून मराठी भाषा जन सामान्यांपर्यंत पोहोचली आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त झालेल्या तसेच अन्य साहित्यिकांच्या योगदानामुळे मराठी भाषा समृद्ध होत असल्याचे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे अभिनंदन केले.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘मातृभाषेतून शिक्षण’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे नवीन शैक्षणिक धोरण यावर्षीपासून राज्यात लागू करण्यात येत असून इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आता मराठीत उपलब्ध असणार असल्याचे सांगितले. मराठीतून अभ्यासक्रम शिकण्यासाठी यावर्षी 67 टक्के विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामुळे केवळ इंग्रजीतूनच उच्च शिक्षण घेता येते हा प्रघात संपेल आणि मराठी भाषा वृद्धिंगत होण्यास हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


युवा साहित्यिकांना प्रोत्साहन देणार - दीपक केसरकर


            युवा साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका असून मराठी युवक मंडळ ही नवी संकल्पना राबविण्यात येणार असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री श्री.केसरकर यांनी दिली. तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी या मंडळांना दहा हजार रुपये अनुदान देण्यात येईल, असेही ते म्हणाले.


            महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी कार्य करणाऱ्या मान्यता प्राप्त मंडळांना दहा लाख रुपये अर्थसाहाय्य देण्यात येईल. त्यानुसार महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात मराठी भाषा संस्कृती व विकास यासाठी अर्थसाहाय्य देणार आहे. महाराष्ट्राबाहेर होत असलेल्या साहित्य संमेलनांना 25 लाख रुपये देणार असल्याचीही माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी दिली.


            मराठी भाषा विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती अपर मुख्य सचिव श्रीमती म्हैसकर यांनी दिली.


            या कार्यक्रमात मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्य विकासासाठी कार्यरत असलेल्या मान्यवरांना दिले जाणारे विविध साहित्यिक पुरस्कार प्रदान करण्यात आले.


            यावर्षी विविध महानगरपालिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी वाचन प्रेरणा दिन मराठी स्पर्धेतील तीन विजेत्या महानगरपालिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने काढलेल्या 35 पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.


यावेळी देण्यात आलेले पुरस्कार


• सन २०२२ चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. प्रा. नलगे यांनी कथा कादंबरी, एकांकिका, चित्रपट लेखन इत्यादी विविध प्रकारात लेखन केले. त्यांच्या प्रकाशित ग्रंथाची संख्या ९० आहे. त्यांना यापूर्वी विविध पुरस्कार, आदर्श शिक्षक तसेच राज्य शासनाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.


• श्री. पु. भागवत पुरस्कार २०२२ चा पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनला प्रदान करण्यात आला. ३ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रकाशित ग्रंथांची संख्या १ हजार २४०, सतत ४८ वर्ष कार्यरत असलेल्या ग्रंथालीने विविध विषयात प्रकाशने, पुस्तक प्रदर्शने, ग्रंथ चर्चा, वाचक चळवळ इत्यादी उपक्रम राबविले आहेत.


• डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ (व्यक्तींसाठी) दिला जाणारा पुरस्कार डॉ. विठ्ठल वाघ यांना जाहीर करण्यात आला. त्यांच्या वतीने मुलगा अभिजित वाघ याने पुरस्कार स्वीकारला. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. डॉ. विठ्ठल वाघ यांनी वऱ्हाडी म्हणी, वऱ्हाडी बोलीचे संशोधन, देश विदेशात काव्य वाचनातून समाज प्रबोधनाचे कार्यक्रम, कविता, कांदबऱ्या, संशोधन अशा विविध साहित्य प्रकारात लेखन केले आहे.


• कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२२ (व्यक्तींसाठी) श्री. द. ता. भोसले यांना देण्यात झाला. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. ग्रामीण बोलीचा शब्दकोश, लोपलेल्या सुवर्णमुद्रा ही बोली भाषेवरील महत्वाची पुस्तके, खेड्यातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी २५ हून अधिक वर्षे ते कार्यरत आहेत.


• डॉ. अशोक रा. केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार २०२२ (संस्थेसाठी) दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांना दिला आहे. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेची स्थापना १९०६, मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकास व प्रचारासाठी कार्यरत, विविध साहित्य प्रकारातील ४० हून अधिक पुरस्कार या संस्थेद्वारे प्रदान करण्यात येतात. लेखन कार्यशाळा सारखे उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतात.


• कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२२ (संस्थेसाठी) हा पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांना देण्यात आला आहे. २ लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेची स्थापना १९९९, मराठी भाषा साहित्य संस्कृतीसाठी कार्यरत साहित्य संमेलने | लेखक वाचक संवाद लेखन कार्यशाळा असे विविध उपक्रम संस्थेमार्फत राबविण्यात येतात.


• माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्रथम क्रमांक तर द्वितीय क्रमांक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि तृतीय क्रमांक भिंवडी-निजामपूर महानगरपालिका यांना प्रदान करण्यात आला.

Shubham

 






आदर्श शाळा, शिक्षक, विद्यार्थी

 

एक लाईक जरूर द्या.

Featured post

Lakshvedhi