Wednesday, 7 December 2022

राहाल जामीन कोणाला?

 


कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणार

 कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून देणार





- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 6 : “कोकणातील तरूणांना कोकणातच रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी पर्यटन विकासासह विविध स्थानिक उद्योगांना चालना देऊन कोकणचा पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडविण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील’’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. समृद्धी महामार्गाप्रमाणे कोकणात ग्रीनफिल्ड रस्ता करता येईल का यावर काम सुरू असून स्थानिकांनी त्यांच्या हिताचे असलेले प्रकल्प स्वीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले.


            कोकण भूमी प्रतिष्ठानच्या 'मी मुंबई अभियान' अंतर्गत 'स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा'चे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, कालिदास कोळंबकर, संजय शिरसाठ, माजी मंत्री कृपाशंकर सिंह, आयोजक संजय यादवराव आदी उपस्थित होते. नेस्को सेंटर, गोरेगाव येथे आयोजित हा महोत्सव चार दिवस चालणार आहे.


            निसर्गसमृद्ध कोकणाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचा हा महोत्सव असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या विकासाला दिशा आणि गती देण्याचे काम केले जात आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कोकणात पर्यटनाच्या माध्यमातून विकासाची मोठी संधी उपलब्ध आहे. काजू, आंबा, मत्स्यव्यवसाय यांच्यासह स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील अशा उद्योगांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. कोकणचे वैभव जपणे सर्वांचे कर्तव्य आहे. हे लक्षात घेऊनच कोकणासाठी विविध पर्यावरणपूरक योजना, प्रकल्प, उपक्रमांना चालना देण्यात येणार आहे.”


            लहरी हवामानामुळे कोकण किनारपट्टीला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यातून सावरण्याचे बळ देण्याबरोबरच स्थानिक उद्योजकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी सांगितले. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचेही ते म्हणाले. तरूणांना रोजगार उपलब्ध करून कोकणचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.


कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार - उपमुख्यमंत्री फडणवीस


            कोकण ही नररत्नांची खाण आहे. स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाच्या माध्यमातून कोकणच्या कला, संस्कृती, वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचे दर्शन होत असून येत्या काळात अधिक चांगल्या आणि पर्यावरणपूरक योजना राबवून कोकणाला विकासाच्या पुढच्या टप्प्यात नेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


           “कोकणातला आंबा अधिक गोड की माणूस” असा प्रश्न पडतो अशा शब्दात कोकणी माणसाच्या सरळ स्वभावाचे कौतुक करून श्री.फडणवीस म्हणाले, “बंदरे, मासेमारी, विविध उद्योग, पर्यटन विकासासह स्थानिकांचे जीवनमान उंचावण्याचा शासनाचा निर्धार आहे” हा महोत्सव म्हणजे कोकणच्या समृद्धी आणि विकासासाठी आवश्यक व्यक्तींचे एकत्रित संमेलन असून राज्य शासन कोकणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.


            काजूसारख्या उत्पादनात कोकणची अर्थव्यवस्था बदलण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे नारळ, मत्स्यपालन, आंबा प्रक्रिया, पर्यटन, वन उत्पादने असे विविध उद्योग हे कोकणचे वैभव असून प्रत्येक जिल्ह्याची गरज ओळखून त्या उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नमूद केले.


            प्रारंभी महोत्सवाचे संयोजक आमदार प्रवीण दरेकर तसेच स्वागताध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे, झाशीच्या राणीचे वंशज राजू नेवाळकर यांच्यासह कोकणच्या विकासात योगदान देणाऱ्या विविध उद्योजकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


00000





महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार,

 महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार,

पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


            मुंबई, दि. 6 : महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीतर्फे गुजराती भाषेतील साहित्य प्रचार आणि प्रसारासाठी विविध योजना राबविण्यात येतात. गुजराती भाषेच्या समग्र विकासासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी काम करत आहे.


            महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीमार्फत सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या तीन वर्षांसाठी विविध पुरस्कारासह पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रवेशिका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमी, दुसरा मजला, जुने जकातघर, विकास विभाग इमारत, शहीद भगतसिंह मार्ग, मुंबई- 400001 या पत्त्यावर 30 डिसेंबर 2022 पूर्वी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत पाठवाव्यात. अधिक माहिती www.maharashtra.gov.in आणि www.mahasahitya.org या संकेतस्थळावर नवीन संदेश या शीर्षकाखाली पाहावयास मिळेल.

महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार,

 महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार,


पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


            मुंबई, दि. 6 : महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीतर्फे सिंधी भाषेतील साहित्य प्रचार आणि प्रसारासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सिंधी भाषेच्या समग्र विकासासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी काम करत आहे.


            महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमीमार्फत सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या तीन वर्षांसाठी अखिल भारतीय सन्मान जीवन गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, विधा पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रवेशिका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, दुसरा मजला, जुने जकातघर, विकास विभाग इमारत, शहीद भगतसिंह मार्ग, मुंबई- 400001 या पत्त्यावर 30 डिसेंबर 2022 पूर्वी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत पाठवाव्यात. अधिक माहिती www.maharashtra.gov.in आणि www.mahasahitya.org या संकेतस्थळावरील नवीन संदेश या शीर्षकाखाली पाहावयास मिळेल.


०००००




महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार योजना,

 महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे पुरस्कार योजना,


आणि पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन


            मुंबई, दि. 6 : महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीतर्फे हिंदी भाषेतील साहित्य प्रचार आणि प्रसारासाठी विविध योजना राबविण्यात येतात. हिंदी भाषेच्या समग्र विकासासाठी राज्य शासनामार्फत महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी काम करत आहे.


            महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीमार्फत सन 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या तीन वर्षांसाठी अखिल भारतीय सन्मान जीवन गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय सन्मान जीवनगौरव पुरस्कार, विधा पुरस्कार आणि पुस्तक प्रकाशन अनुदानासाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रवेशिका अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, दुसरा मजला, जुने जकातघर, विकास विभाग इमारत, शहीद भगतसिंह मार्ग, मुंबई- 400001 या पत्त्यावर 30 डिसेंबर 2022 पूर्वी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत पाठवाव्यात. अधिक माहिती www.maharashtra.gov.in आणि www.mahasahitya.org या संकेतस्थळावरील नवीन संदेश या शीर्षकाखाली पाहावयास मिळेल.

Tuesday, 6 December 2022

शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत

 शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी शालेय विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबणार नाहीत


- शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर


पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुलभ होण्यासाठी शासन निर्णय जारी.

            मुंबई, दि. 6 : राज्यातील कोणत्याही अभ्यासक्रमाच्या प्राथमिक अथवा माध्यमिक शाळेत इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गात प्रवेशासाठी अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्याला आता सुलभरितीने प्रवेश घेता येणार आहे. शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) अशा विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येऊ नये, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. 


            शिक्षणाचा हक्क अधिनियमात शालेय प्रवेशित न झालेल्या विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल असे नमूद असून अशा प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा अशी तरतूद आहे. त्यानुसार जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येऊन विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा यासाठी शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.


            या शासन निर्णयानुसार राज्यातील कोणत्याही शासकीय/ महानगरपालिका/ नगरपालिका/ खाजगी अनुदानित/ कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या तसेच कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळास संलग्न असलेल्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात तसेच माध्यमिक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गात अन्य शाळेतून आलेला विद्यार्थी प्रवेशासाठी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्यास शाळा स्थलांतर प्रमाणपत्राअभावी (टीसी) (Transfer Certificate) प्रवेश नाकारण्यात येऊ नये असे स्पष्ट करण्यात आले आहे.


            विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, तसेच शिक्षण खंडीत होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये याची दक्षता संबंधित शाळा प्रमुखांनी/ मुख्याध्यापकांनी घ्यावयाची आहे. असे विद्यार्थी वंचित ठेवल्यास संबंधित शाळेविरूद्ध/ मुख्याध्यापकाविरूद्ध नियमानुसार/ कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे. या शासन निर्णयाप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने नवीन शाळेत प्रवेश घेतल्यास अशी नवीन शाळा विद्यार्थ्याची सरल पोर्टलवरील माहिती मिळविण्याची विनंती जुन्या शाळेकडे करेल आणि जुनी शाळा सात दिवसाच्या आत विनंती मान्य करेल. शाळेने अशी विनंती मान्य न केल्यास संबंधित केंद्र प्रमुख अशी विनंती त्यांच्या स्तरावरून मान्य करतील, असेही या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.


            कोविडच्या प्रादूर्भावानंतर काही कारणांमुळे एखाद्या विद्यार्थ्यास त्याच्या खाजगी शाळेतून शाळा स्थलांतर प्रमाणपत्र (टीसी) (Transfer Certificate) किंवा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) देण्यात आला नसेल तर अशा विद्यार्थ्यांना शासकीय किंवा अनुदानित शाळेत या दाखल्याअभावी प्रवेश देण्यात येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये या उद्देशाने अशा विद्यार्थ्यांना सुलभरितीने प्रवेश मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री श्री. केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.


00000



भवताल

 


Featured post

Lakshvedhi