Saturday, 3 December 2022

*हा बदल नक्की केव्हा झाला?*

 *हा बदल नक्की केव्हा झाला?*


वीस पंचवीस वर्षांपूर्वी नोकरी करणारा मुलगा पगार निमूटपणे वडिलांच्या हातात देत होता.... ! मग वडील त्यातून घरातला काही खर्च करायचे, थोडी बचत केली जायची आणि मुलाला येण्याजाण्याच्या तिकीटापुरते आणि दिवसाला फार तर एक चहा पिता येईल इतके पैसे दिले जात होते. आता मुलाला पगार किती मिळतो हे विचारायला आई-वडील कचरतात. मुलगा त्या पैशाचे काय करतो हे विचारायची हिम्मत/इच्छा आई-वडिलांकडे नसते...!         

 *हा बदल केव्हा झाला....?* 


कॉलेजमध्ये जाताना साडी ऐवजी पंजाबी ड्रेस घालायला मिळतो याचा आनंद मानणारी मुलगी आता तिच्या मुलीला हाफ पॅन्टमध्ये फिरताना बघते. मनातल्या मनात चरफडते पण स्पष्टपणे मुलीला "अंगभर कपडे घाल" असे म्हणायची हिंमत करत नाही....! 

 *हा बदल केव्हा झाला....?*

 

वयात आलेली मुलगी संध्याकाळच्या आत घरात असायची, घरकामात मदत करायची. आता एकदा स्वयंपाक घरात येऊन खायला काय आहे ते बघते आणि स्वतःच्या खोलीत जाऊन परस्पर ऑर्डर करून खाणं मागवते.         

*हा बदल केव्हा झाला......?*


लग्नाअगोदर मुला-मुलीने एक-दोन वेळा भेटणे म्हणजे पुढारलेपण मानणारे आता नातवंडांचे लिव इन रिलेशनशिप स्वीकारतात.

 *हा बदल केव्हा झाला.....?*


वर्षातून एकदा होळीच्या वेळी मोठ्या लोकांपासून लपून भांग पिण्याचा कार्यक्रम ठरवणारी आता प्रौढ झालेली माणसं घरातल्या तरुण मुलंपुढे सहज ग्लास भरु लागली. *हा बदल कधी झाला....?*

 

नातवंडांना जवळ घेणारी, नातीच्या केसांना तेल लावून देणारी, गोष्टी सांगणारी आजी, आता सकाळी योगा क्लास नाहीतर लाफ्टर क्लासला जाते आणि नातवंडांशी टीव्हीच्या रिमोटसाठी भांडते. 

*हा बदल केव्हा झाला.....?*


घरातल्या कोणाशी बोलत नाहीत अशांना कौन्सिलर जवळचा वाटतो. त्याला पैसे देऊन त्याचा सल्ला मानतात. पण स्वतःच्या भावंडांवर विश्वास ठेवायला तयार नसतात. तोच प्रकार पैशाच्या व्यवहाराबद्दल. नवरा-बायको दोघेही कमावतात. पण कुठे खर्च झाले, किती गुंतवले, कुठे गुंतवले, ते फक्त सीएला माहित असते. मुलीच्या संसारातले सगळे लहानसहान तपशील जाणून घेणारे आई-वडील, मुलगा आणि सुनेच्या बाबतीत मात्र अलिप्त राहतात. *असं का होतंय.....?* 


वडीलधा-यांचा मान ठेवणा-यांच्या मुली नवऱ्याचा येता-जाता अपमान करतात, सगळ्यांसमोर उणं-दुणं काढतात. अशा वेळी मुलीचे आई-वडील कसनुसं हसतात आणि मुलाचे आई-वडील हतबुद्ध होतात. 

*हा बदल कधी झाला.......?*


तरुण मुले एक नोकरी सोडतात, दुसरी धरतात. राहत्या गावातून दुसऱ्या गावी जातात. सगळे ठरल्यावर आई-वडिलांना फक्त सांगितलं जातं. त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तर आई-वडिलांना सांगण्याचीही गरज नसते. मित्रांबरोबर ट्रीपला जाणे, ब्रेकअप होणे, सिनेमाला जाणे, पार्टी करणे, स्वतःसाठी नवीन वस्तू, फोन, कपडे वगैरे खरेदी करणे, अशा गोष्टीत आई-वडिलांनी दखल दिलेली मुलांना आवडतं नाही. असं का होतं..? 

*हा बदल कधी झाला.......?*


नातेवाईकां कडे जाणं, शेजार्‍यांकडे वेळप्रसंगी जाणं, लग्न समारंभात सहभागी होणं, कुळाचार पाळणे, देवळात जाणे, पूजा करणे, इत्यादी गोष्टींवर आता काही घरात नाराजी नाही तर भांडणे होतात. असं का होतं...? 

*हा बदल कधी झाला.......?*


मान्य आहे, दोन पिढ्यांमध्ये अंतर असतेच. पाचवारी नेसणाऱ्या सुनेबद्दल नऊवारी नेसणाऱ्या सासूने तेव्हाही नाराजी व्यक्त केली होती. पण आता पन्नाशी पार केलेल्या पिढीत आणि त्यांच्या मुलांच्या पिढीत अंतर नाही दरी निर्माण झाली असं वाटतं.


*हा बदल नक्की केव्हा झाला......? खरंच विचार करायला हवा*

-----🙏🙏सुप्रभात🙏🙏------

पत्रकार विकास शहा , तालुका प्रतिनिधी दैनिक लोकमत , शिराळा ( सांगली )

माणसाला शेपूट येईल का ?*

 *गाठभेट होऊन सुद्धा , बाजूला बसून सुद्धा , किंवा Whatsapp चा मेसेज वाचून सुद्धा ......हल्ली माणसं एकमेकाशी बोलतच नाहीत या गंभीर विषया वरची , कवी प्रा.विजय पोहनेरकर यांची एक हलकीफुलकी कविता !*


*माणसाला शेपूट येईल का ?*

     🥱🤪😛😜🥱 

*कवी : प्रा.विजय पोहनेरकर*

----------------------------------------

*माणसाने माणसाशी* 

*संवाद तोडला आहे*

*म्हणून तो घरा घरात* 

*एकटा पडला आहे* 


*येत्या काळात ही समस्या*

*अक्राळविक्राळ होईल* 

*तेंव्हा आपल्या हातातून*

*वेळ निघून जाईल* 😃


*कदाचित माणूस विसरेल*

*संवाद साधण्याची कला*

*याच्यामुळे येऊ शकते*

*मूकं होण्याची बला* 😃


*पूर्वी माणसं एकमेकाला*

*भरभरून बोलायचे*

*पत्र सुद्धा लांबलचक*

*दोन चार पानं लिहायचे* 😃


*त्यामुळे माणसाचं मन*

*मोकळं मोकळं व्हायचं*

*हसणं काय रडणं काय*

*खळखळून यायचं*


*म्हणून तेंव्हा हार्ट मध्ये*

*ब्लॉकेज फारसं नव्हतं*

*राग असो लोभ असो* 

*मोकळं चाकळं होतं*😃


*पाहुणे रावळे गाठीभेटी*

*सतत चालू असायचं*

*त्याच्यामुळे प्रत्येक माणूस*

*टवटवीत दिसायचं* 💃


*आता मात्र माणसाच्या*

*भेटीच झाल्या कमी*

*चुकून भेट झालीच तर*

*आधी बोलायचं कुणी ?* 😃


*ओळख असती नात असतं*

*पण बोलत नाहीत*

*काय झालंय कुणास ठाऊक*

*त्यांचं त्यांनाच माहीत* 😃


*घुम्यावणी बसून राहतो*

*करून पुंगट तोंड*

*दिसतो असा जसा काही*

*निवडुंगाचं बोण्ड* 😜


*Whatsapp वर प्रत्येकाचेच* 

*भरपूर ग्रुप असतात*

*बहुतांश सदस्य तर*

*नुसते येड्यावणी बघतात* 😜


*त्यांनी मेसेज वाचल्याच्या*

*दिसतात निळ्या खुणा*

*पण रिप्लाय साठी सुटत नाही*

*शब्दांचा पान्हा* 


*नवीन नवीन Whatsapp वर*

*चांगलं बोलत होते*

*दोनचार शब्द तरी* 

*Type करत होते* 🤣


*आता मात्र बऱ्याच गोष्टी*

*इमोजीवरच भागवतात* 

*कधी कधी तर्कटी करून*

*इमोजीनेच रागवतात 😡 😜*


*म्हणून इतर प्राण्यां सारखी*

*माणसं मुकी होतील का ?*

*भावना दाबून धरल्या म्हणून*

*माणसाला शिंग येतील का ?* 🤪


*काय सांगा नियती म्हणेल*

*लावा याला शेपटी*

*वाचा देऊन बोलत नाही*

*फारच दिसतो कपटी* 😛


*हसण्यावर नेऊ नका* 

*खरंच शेपूट येईल*

*पाठीत बुक्का मारून मग*

*कुणीही पिळून जाईल* 😜


*म्हणून म्हणतो बोलत चला*

*काय सोबत येणार*

*नसता तुमची वाचा जाऊन*

*नक्की शेपूट येणार* 😛

💐💐

Friday, 2 December 2022

महाराष्ट्रातील जी २० परिषद कार्यक्रमांचा आढावा

 महाराष्ट्रातील जी २० परिषद कार्यक्रमांचा आढावा

मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर येथे होणार परिषदेच्या बैठका

जगभरात महाराष्ट्राचे नावलौकीक आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. २: भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचे ब्रँडींग करण्याची संधी आहे. जगभरात महाराष्ट्राचा नावलौकीक वाढावा यासाठी शहर सौंदर्यीकरण, स्वच्छता यांवर भर देऊन जास्तीत जास्त लोकांचा सहभाग यात वाढवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. 


            जी २० परिषदेनिमित्त महाराष्ट्रात होणाऱ्या बैठकांच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. 


            दि. १ डिसेंबरपासून भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले असून ते ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत भारताकडे राहणार आहे. या कालावधीत देशभरात परिषदेच्या १६१ बैठका होणार असून त्यापैकी १४ बैठका महाराष्ट्रात होतील. मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या महानगरांमध्ये या बैठका होणार आहेत. 


            दि. १३ ते १६ डिसेंबर या कालावधीत मुंबईमध्ये परिषदेच्या विकास कार्य गटाची बैठक होणार आहे. त्यानंतर पुणे येथे येत्या १६ आणि १७ जानेवारीला पायाभूत सुविधा कार्यगटाची तर औरंगाबाद येथे १३ व १४ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. २१ आणि २२ मार्चला नागपूर येथे रिग साईड इव्हेंट होणार आहे. त्यानंतर मुंबईत २८ आणि ३० मार्च, १५ ते २३ मे आणि ५ व ६ जुलै, १५ व १६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत विविध बैठका होतील. पुणे येथे १२ ते १४ जून, २६ ते २८ जून या कालावधीत बैठका होणार आहेत. या परिषदेच्या आखणी व नियोजनाकरिता चार अधिकाऱ्यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे. 


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गर्शनाखाली आपल्या देशाला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. देशाचे आणि आपल्या राज्याचे जगात नावलौकीक करण्यासाठी ही संधी असून त्यासाठी शहर सौंदर्यीकरणावर अधिक भर द्यावा. रस्त्यांची दुरूस्ती, चौकांचे सुशोभीकरण, रोषणाई याबाबींवर भर देऊन परिषदेच्या बैठक काळात शहरांचा चेहरामोहरा बदलावा, आपल्या राज्याचे आणि शहराचे जगात ब्रँडींग करण्यासाठी याचा उपयोग करून घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळणे मोलाचे आहे. एकदा अध्यक्षपद मिळाले की त्यानंतर २० वर्ष ते मिळत नाही. त्यामुळे आपल्याला देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळाली आहे. या परिषदेच्या बैठकांच्या आयोजनात कुठलीही उणीव राहू देऊ नका. या कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा, विविध खासगी संस्था, संघटनांना देखील सहभागी करून घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.


            परिषदांच्या बैठक काळात राज्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमाबाबत आणि त्यांच्या तयारीबाबत मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी सादरीकरण केले. मुंबई महापालिका आयुक्त आय. ए. चहल यांनी मुंबईत सुरू असलेल्या तयारीची माहिती दिली. पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विभागीय आयुक्तांनी बैठकांसाठी सुरू असलेल्या नियोजनाची माहिती दिली.


००००

 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 1032 अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान

नवनियुक्त अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत.

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

            मुंबई, दि. 2 : राज्य शासनाच्या विविध विभागातील नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करावीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जाहीर केल्यानुसार येत्या वर्षभरात राज्यात 75 हजार रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्राचा ‘महासंकल्प’ कार्यक्रमानिमित्त जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आणि मृद व जलसंधारण विभागातील 1032 अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार राम शिंदे उपस्थित होते.


            स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम राज्यात पहिल्यांदाच होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्यात गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने लोकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत. पायाभूत सुविधा आणि विकासकामांसाठी केंद्र सरकारच्यावतीने मोठा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 10 लाख उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याची घोषणा करुन एकाच वेळी 71 हजार नियुक्तीपत्रांचे वाटप केले. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 75 हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचा महासंकल्प केला आहे.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत लोकाभिमुख निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील 15 मोठ्या प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील हजारो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारे विविध प्रलंबित विषय मार्गी लावण्यात आले. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत. राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सकारात्मक इच्छाशक्तीमुळे युवकांना रोजगार देणे शक्य झाले. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत 1143 पैकी आज 1032 अभियंत्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. उर्वरित 111 उमेदवारांना नियुक्त्या देता आल्या नाहीत. यापुढे त्यांच्यासाठी न्यायालयात भक्कम व आग्रही बाजू मांडून त्यांच्याही नियुक्तीचा मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


            मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सामान्य प्रशासन विभागाचे (साविस) सचिव सुमंत भांगे आदी यावेळी उपस्थित होते.

दही खाण्याचे फायदे* आरोग्य मित्र

 *आरोग्यविषयक अधिक माहितीसाठी सेवार्थ 💉पॅथॉलॉजि लॅब डॉ.कानडे बाळ रुग्णालयाजवल वाशिम एक वेळेस अवश्य भेट द्या मोफत मार्गदर्शन🧑‍🔬 9158635596*


*दही खाण्याचे फायदे* 


 *१. पोट ‘भरल्याचे’ समाधान* टिकून राहते दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घ काळ पर्यंत टिकून राहते. म्हणून दोन जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

 *२. भरपूर प्रथिनांनी युक्त आहार* 

दह्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने आणि कॅल्शियम आहे जे शरीरात सहज शोषले जाते आणि शरीराची गरज भागते.

 *३. ऊर्जेने युक्त आहार* 

दही खाल्ल्याने भरपूर ऊर्जा त्वरित मिळते आणि धकाधकीनंतरचा थकवा त्वरित निघून जातो. दही आणि साखर खाल्ल्याने काम शक्ती वाढते. नपुंसकत्व कमी होण्यास मदत होते.पुरुष बीजांची संख्या आणि गुणवत्ता सुधारते.

 *४. प्रतिकारशक्ती वाढते* 

दही खाल्ल्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्यरत होऊन शरीरातील संरक्षक यंत्रणा बळकट बनते. त्यामुळे विषाणूंचा नायनाट होऊन संसर्गजन्य आजार होत नाहीत. दातातील कीड नाहीशी होते.

 *५. मधुमेह नियंत्रित राहतो* 

दह्यामुळे रक्तशर्करेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित राखण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारी गुप्तागांची खाज कमी होते.

 *६. पचन क्रिया सुधारते​* 

दही पचायला हलके आहेच. तसेच दह्यामुळे जठरातील आणि आंतड्यातील पाचक रस स्त्रवण्यास मदत होते, जेणेकरून जड अन्न देखील सहज पचते. खूप तिखट, तेलकट, मसालेदार, चमचमीत जेवणासोबत दही खाल्ल्यास असा आहार बाधत नाही.

 *७. हृदय विकाराची शक्यता कमी होते​* 

दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे विविध हृदय विकारांची शक्यता कमी होते. रक्त दाब नियंत्रित राहतो.

 *८. जीवनसत्वानी परिपूर्ण* 

विटॅमिन बी ५, बी १२ सारख्या जीवन सत्वानी परिपूर्ण असलेने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि मज्जा संस्था निरोगी राहते. कॅल्शियम आणि जीवनसत्व ‘ड‘ मुळे दात आणि हाडे बळकट होतात. मणक्याचे आरोग्य सुधारते.

 *९. आतड्यांचे आरोग्य सुधारते* 

लॅक्टो बॅक्टेरीया सारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यात असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते, आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. पोट नियमित साफ होते.

 *१०. चेहरा,त्वचा उजळते* 

चेहऱ्यावर,त्वचेवर मध आणि बदाम तेलासोबत पंधरा मिनिटे दही वापरल्याने मृत आणि रापलेली त्वचा निघून जाते. कांती उजळ बनते. संत्र्याच्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाब पाणी आणि हळदी सोबत दही लावल्याने त्वचा उजळ आणि मुलायम बनते. लिंबू रस आणि दह्याच्या वापराने त्वचेवरील,चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.


 *तुमचा आरोग्य मित्र* 

 *सागर केशवराव जाधव* 

MSc(Biotech.,P.G.D.M.L.T( *महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक)* 

संस्थापक अध्यक्ष सेवार्थ चॅरिटेबल ट्रस्ट (महाराष्ट्र राज्य )तथा संचालक सेवार्थ पॅथॉलॉजि लॅब वाशिम 

9158635596

https://chat.whatsapp.com/GNoiybayyGC3uBkKPdTcXR

नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय.

 नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय.

*महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सच्या मागणी व पाठपुराव्याला मोठे यश : ललित गांधी*

---------------------------०००००---------------------------

कोल्हापूर : नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला. महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सने सातत्याने केलेली मागणी आणि पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे, ही माहिती महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये पिशव्या, ताटे, स्ट्राँ, वाटय़ा, ग्लास, काटे, चमचे आदींच्या वापरावरील निर्बंध राज्यात शिथिल केले आहेत. महाराष्ट्र चेबर आँफ काँमर्स सोबत झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, असे साकडे या वस्तूंची उत्पादन करणाऱ्या लघु व सूक्ष्म उद्योजकांनी व व्यापार्यांनी घातले होते. या मागणीची तातडीने दखल घेऊन महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सने ३१ जुलै, २०२२ रोजी औरंगाबाद येथे राज्यस्तरीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर चेंबरने हा प्रश्न गांभीर्याने मांडून लघुउद्योजक विशेषता बँकांच्या कडून कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू करणारे युवक व महिला यांच्यासाठी जीवनभरणाचा बनलेला हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. बंदी आदेश असल्याने राज्यातील सुमारे सहा लाखांवर युवक, महिलांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याचा धोका निर्माण झाला होता. हा उद्योग उभारणीसाठी उद्योजकांनी विविध बँकांकडून सुमारे ३ हजार कोटी रुपयाचे अर्थसहाय्य घेतले होते. सरकारने बंदी घातल्याने या उद्योजकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली होती. या सर्व गंभीर परिस्थितीची दखल घेऊन महाराष्ट्र चेंबरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने मागणी आणि पाठपुरावा केला होता. वेळोवेळी निवेदन, चर्चा आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी आग्रह धरला होता. अखेर नाँन वोव्हन बँग्स व पेपर उत्पादनांना बंदी आदेशातून वगळण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.  

दरम्यान चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या निर्णयासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानेच हे यश मिळाले आहे. या निर्णयाने राज्यातील व्यापारी, उद्योजकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान हा निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र चेंबर आँफ काँमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले. या वेळी चेंबरचे प्रभारी सहकार्यवाह जनरल सागर नागरे, विपुल मेहता, संचालक सूर्यकांत रोकडे, पी. सी. जैन, मधुसुदन बियाणी यांच्यासह चेंबरचे पदाधिकारी उपस्थित होते. या निर्णयासाठी मुख्यमंत्र्याचे सचिव विकास खारगे, पर्यावरण सचिव प्रवीण दराडे, आमदार प्रकाश आवाडे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.

००००

या वस्तूवरील बंदी उठविली*

नॉन वोवन बॅग, पेपर म्हणजेच कागदापासून व विघटन होणाऱ्या तत्सम पदार्थापासून बनविण्यात येणाऱ्या आणि एकदाच वापर होणाऱ्या वस्तूंवरील बंदी उठविली आहे. स्ट्रॉ, ताटे, कप, प्लेट्स, ग्लास, काटे, चमचे, भांडे, वाडगे, कंटेनर आदीच्या वापरास आता मुभा असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.  


 

मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावारोजगाराच्या 7 हजार संधी उपलब्ध

 मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावारोजगाराच्या 7 हजार संधी उपलब्ध

नोकरी इच्छुकांनी सहभागी होण्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन.

            मुंबई, दि. 2 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्या’चे आयोजन शनिवारी 3 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजेपासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, 3 महापालिका मार्ग, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई येथे हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील 7 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, नोकरी इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.


            मेळाव्यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन मंत्री श्री. लोढा, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.


            मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह इत्यादी उद्योग सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिंग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एचआर अॅप्रेंटीसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ऍण्ड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रात एकूण 7 हजार पदे उपलब्ध आहेत.


अप्रेंटीसशिपची संधीही उपलब्ध


            औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उर्तीर्ण झालेल्या उमेदवारांकरिता नामांकित कंपन्यांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेंटीसशिपची पदेही या मेळाव्यामध्ये उपलब्ध आहेत.


            मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून, यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या योजनांची माहिती पुरविणारे स्टॉल लावण्यात येणार आहेत. याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश असणार आहे.


            महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राबविण्यात येणा-या विविध प्रशिक्षण योजनांची माहितीही उमेदवारांना या मेळाव्यात घेता येणार आहे.


००००



Featured post

Lakshvedhi