Thursday, 1 December 2022

ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीसाठी ‘उमेद’ अभियान प्रभावी

 ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीसाठी ‘उमेद’ अभियान प्रभावी

- ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

राज्यातील 38 हजार गावांमध्ये अभियानाची प्रभावी अंमलबजावणी.

            मुंबई दि. 30 : 'उमेद' अभियानाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.


            माटुंगा येथे षण्मुखानंद सभागृहात आयोजित 'उमेद' महिला सक्षमीकरण विशेष कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.


            मंत्री श्री. महाजन म्हणाले, ग्रामविकासामध्ये महिलांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असून समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी गरिब, विधवा, निराधार महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. राज्यातील महिला बचतगटाच्या सक्षमीकरणासाठी उत्पादीत केलेल्या मालाची विक्री, व्यवस्थापन, पॅकिंग तसेच मार्केटिंग करण्यावर भर देण्यात यावा. या मालाच्या विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात शहरालगत मोठे संकुल (मॉल) उभारून विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही श्री.महाजन यांनी यावेळी सांगितले.


            राज्यातील जवळपास ३८ हजार गावांमधील ५५ लाख कुटुंबे या अभियानात सहभागी झाले आहेत. या माध्यमातून ५ लक्ष ८४ हजार स्वयं सहाय्यता गटांची निर्मिती झाली आहे. १० हजार उत्पादन गट तयार करण्यात आले असून ४५ शेतकरी उत्पादक गट तयार करण्यात आले आहेत. जवळपास १७ हजार कोटी रुपयांचे कर्ज बँकांच्या माध्यमातून तसेच अभियानाअंतर्गत ११ कोटी रुपयांचा निधीचे वाटप स्वयं सहाय्यता गटांना करण्यात आले आहे. आगामी काळात भरीव आर्थिक तरतूद करण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री श्री. महाजन यांनी आश्वस्त केले.


            ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी राज्याच्या ग्रामीण आर्थिक विकासात ‘उमेद’ अभियान महत्त्वाची भूमिका निभावत असून अभियानातील सहभागी कुटुंबाचे किमान १ लाख वार्षिक उत्पन्न करण्यासाठी विभाग प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘उमेद’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी केले. अभियानाचे अवर सचिव धनवंत माळी यांनी आभार मानले.


            या कार्यक्रमाला आमदार कॅ. आर. तमिल सेल्वन, अपर मुख्य सचिव राजेश कुमार तसेच संबंधित विभागाचे अधिकारी, राज्यातील महिला बचतगटांच्या प्रतिनिधी, समुदाय संसाधन व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आ

 महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान

वर्ष 2022 चे क्रीडा पुरस्कार आणि वर्ष 2021 चे तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार प्रदान.

            नवी दिल्ली , 30 : क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या खेळाडूंना विविध श्रेणीतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये वर्ष 2022 चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि वर्ष 2021 साठीचा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंचा यात समावेश आहे. क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य आजीवन पुरस्कार आणि शुभम वनमाळी यांना जल साहसासाठी वर्ष 2021 साठीचा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.


            केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करून खेळाडूंना गौरविण्यात आले.


            दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यावर्षी एका खेळाडूला ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’, 25 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाले होते. यासह ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारामध्ये आ‍जीवन श्रेणीत 3 आणि नियमित द्रोणाचार्य पुरस्कारा’साठी 4 खेळाडूंना तसेच क्रीडा प्रशिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले होते. याशिवाय ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील 4 खेळाडूंना जाहीर झाले होते. 3 संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’, आणि गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसरला ‘मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी’ ची घोषणा करण्यात आली होती.


क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘द्रोणाचार्य आजीवन ’ पुरस्कार प्रदान


            क्रिकेट क्षेत्रात प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिनेश लाड यांना द्रोणाचार्य आजीवन पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. मागील 30 वर्षांपासून श्री. लाड हे क्रिकेट प्रशिक्षक आहेत. मुंबईतील बोरीवलीतील श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल याठिकाणी श्री लाड यांची क्रिकेट अकादमी आहे. त्यांच्या या अकादमीतून अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू आतापर्यंत तयार झालेले आहेत.


            श्री. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळपास 90 च्या वर रणजीपटू तयार झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड यांच्या सह अनेक क्रिकेट खेळाडूंचे ते प्रशिक्षक आहेत. 


            मुंबईच्याच सुमा शिरूर यांना पॅरा नेमबाजी क्रीडा प्रकारात प्रशिक्षक म्हणून द्रोणाचार्य पुरस्काराने (नियमित) आज गौरविण्यात आले. अग्नी रेखा, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, शाहु माने, आशिष चौकसे, सुनिधी चौव्हान, किरण जाधव, प्रसिद्धी महंत, अबनव शहा, आत्मिका गुप्ता, आकृती दहीया सारख्या प्रसिद्ध खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षित केलेले आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना आज सन्मानित करण्यात आले.


महाराष्ट्रातील 3 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार


            महाराष्ट्रामधून मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी सागर ओव्हळकर, अविनाश साबळे यांना ॲथलेटिक्ससाठी, तर स्वप्निल पाटील यांना पॅरा जलतरण क्षेत्रातील आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता.


            मुंबईतील मल्लखांब चे उत्कृष्ट खेळाडू श्री ओव्हळकर यांनी लहान वयापासूनच मल्लखांब हा साहसी खेळ खेळायला सुरुवात केली. वर्ष 2019 मध्ये आयोजित जागतिक अजिंक्य पद (चॅम्पियनशिप) स्पर्धेत पोल मल्लखांब लॉन्ग सेट स्पर्धा, स्मॉल सेट स्पर्धा आणि रोप मल्लखांब लॉन्ग सेट या तीन्ही प्रकारात श्री ओव्हळकर यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे. तसेच 2019 मध्येच जागतिक अजिंक्य पद (चॅम्पियनशिप) स्पर्धेतील एकल प्रकारात रौप्य पदक पटकाविले आहे. विविध कसरती करण्यात श्री ओव्हळकर अतिशय कुशल आहेत. विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी अर्जुन पुरस्काराने आज गौरविण्यात आले.


            बीडचे ॲथलेटिक्स खेळाडू अविनाश साबळे यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये धावण्याच्या स्पर्धेत पुरूषांच्या 1 हजार मीटरची स्टीपल चेस स्पर्धा प्रकारात आणि वर्ष 2019 मध्ये एशिया अजिंक्य पद (चॅम्पियनशिप) स्पर्धेत 3 हजार मीटरची स्टीपल चेस प्रकारात श्री साबळे यांनी रौप्य पदक पटकावले आहे. त्यांच्या क्रिडा क्षेत्रातील या उत्तुंग कामगिरीसाठी आज त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


            कोल्हापूरचे पॅरा जलतरणपटू स्वप्निल पाटील यांनी आशियाई पॅरा क्रिडा स्पर्धा वर्ष 2018 मध्ये 100 मीटर ब्रेसस्ट्रोक एस 10 या प्रकारात रौप्य पदक, 100 मीटर फ्री स्टॉईल एस 10 स्पर्धेत कांस्य पदक आणि 400 मीटर फ्री स्टॉईल एस 10 मध्येही कांस्य पटकाविले होते त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना आज अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


साहसिक जलतरणपटू शुभम वनमाळी यांना वर्ष 2021 चा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार


            पालघर जिल्ह्यातील साहसिक जलतरणपटू शुभम वनमाळी यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते वर्ष 2021 साठी चा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्काराने आज गौरविण्यात आले. मांडवा जेटी ते एलिफंटापर्यंतचे 21 किलोमीटर समुद्रीमार्गाचे अंतर 5 तास, 4 मिनिटे, 5 सेकंदात त्यांनी पूर्ण केले. यासह गेटवे ऑफ इंडिया ते डहाणू बीचचे 147 किलोमीटरचे अंतर 28 तास 40 मिनिटे, तसेच राजभवन ते गेटवे ऑफ इंडिया मधील 14 किलोमीटरचे अंतर 3 तास 13 मिनिटे 10 सेकंदात पोहून पूर्ण केलेले आहे. श्री. वनमाळी यांना महाराष्ट्र शासनाचा वर्ष 2018-19 शिव छत्रपती राज्य साहस पुरस्कार प्राप्त झालेला आहे.


००००

छत्रपती शिवरायांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही

 छत्रपती शिवरायांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही


विधानाचा विपर्यास न करण्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आवाहन.

            मुंबई, दि. 30 : छत्रपती शिवरायांचे कार्य सगळ्या विश्वात अतुलनीय आहे. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. आज प्रतापगड येथे झालेल्या कार्यक्रमात मी छत्रपती शिवरायांसंदर्भात उदाहरण दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे सूर्य असून राज्यात त्यांच्या विचाराने प्रेरणा घेऊन अत्यंत चांगले काम करण्याचा आपला मानस आहे, असे राज्याचे कौशल्य विकास, पर्यटन आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.


            मंत्री श्री. लोढा म्हणाले की, माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या विधानाचा विपर्यास करू नये. छत्रपती शिवरायांचे कार्य हे फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण विश्वात त्यांच्या कार्याचा आदर्श घेतला जातो. त्यामुळेच इस्त्राईलचे पंतप्रधान जेव्हा देशाच्या दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी रायगडाला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवरायांच्या युद्ध कौशल्यापासून प्रेरणा घेऊन इस्त्राईल आजपर्यंत उभे आहे. ही काही तुलना नव्हती. शिवरायांच्या कार्याशी कोणाचीही तुलना करता येऊ शकत नाही. त्यांचे कार्य सूर्यासारखे आहे. शासन सकारात्मक काम करत आहे. मी सुद्धा माझ्याकडील तीन विभागांमध्ये काय काय चांगले करता येईल, यासाठी पूर्ण प्रामाणिकपणे काम करत आहे.


००००


 

मच्छिमार परवाना नूतनीकरणासाठी आता ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची गरज नाही

 मच्छिमार परवाना नूतनीकरणासाठी आता ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची गरज नाही

मच्छिमार सहकारी संस्थांना शासनाचा दिलासा 

            मुंबई, दि. 30 : राज्यातील तलाव आणि धरणांमध्ये मासेमारी करणाऱ्या आणि दि. 3 जुलै 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना यापुढे परवाना नूतनीकरण करण्याकरिता विभागाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची गरज राहणार नाही, असा शासन आदेश आज राज्य शासनाने जारी केला आहे. या नवीन निर्णयामुळे राज्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याविषयी निर्देश दिले होते.


            मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना तलावात मासेमारी करण्याकरता अथवा मत्स्यपालन करण्याकरता पंचवार्षिक परवाना दिला जातो. त्यांचे नूतनीकरण करतांना पूर्वी शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे आवश्यक होते. या किचकट प्रक्रियेमुळे मच्छिमार सहकारी संस्थांना परवाना नूतनीकरणासाठी अडथळे येत होते. ते अडथळे दूर करून मच्छिमार सहकारी संस्थांसाठी परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील हजारो मच्छिमार सहकारी संस्थांना फायदा होणार आहे.


००००

Wednesday, 30 November 2022

प्रधानमंत्री आवास योजनेतील निवासी सदनिकांसाठी मुद्रांक शुल्क घटविले

 प्रधानमंत्री आवास योजनेतील निवासी सदनिकांसाठी मुद्रांक शुल्क घटविले.


            प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्टयाच्या दस्तांना १ हजार रुपये इतके कमी मुद्रांक शुल्क आकारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट लाभार्थींना होणार फायदा होणार आहे.


            महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ मधील कलम ९ च्या खंड अ मधील अधिकारांचा वापर करुन लोकहितास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. निवासी सदनिकांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तांना अटी व शर्थींच्या अधीन राहून हे मुद्रांक शुल्क निश्चित केलेले आहे.


--00--

अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार

 अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार

अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ भरणार

            अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्ती विषयक लाभ देण्याचा त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टीकोनातून तांत्रिक खंड देऊन पुन्हा ११ महिन्यांच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.


            अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील तत्काळ सुरू करण्यात यावी असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले.


            अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे ३ हजार ८९८ कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे.


            आज घेण्यात आलेल्या निर्णयामुळे अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शासनाच्या प्रचलित धोरण व नियमानुसार लाभ मिळतील. या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, वेतनवाढ मिळणार नाही तसेच अनुकंपा धोरण लागू राहणार नाही.

स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार

 स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार

            दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा विभाग ३ डिसेंबरपासून कार्या‍न्वित होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निर्देश दिले होते.


            सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिव्यांग कल्याणाची दोन कार्यासने वेगळी करुन हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंड‍ळ व त्यांची कार्यालयं यांचा देखील समावेश असेल. या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी-कर्मचारी मिळून २०६३ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील. यामध्ये सचिवस्तरापासून ते शिपायांपर्यंतच्या पदांचा समावेश आहे. यासाठी सुमारे ११८ कोटी खर्चासही मंजूरी देण्यात आली.


            सध्या महाराष्ट्रात ३० लाखांपेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून दिव्यांगांचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवतात. जिल्हास्तरावर देखील जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे काम पाहतात. या स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवण्यात येणारे अधिनियम आणि योजना राबवण्यात येतील. यामध्ये विशेषत: दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वयंरोजगारासाठी बीजभांडवल, विविध पारितोषिके, क्रीडा स्पर्धा, व्यवसायासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग दिन साजरा करणे, मतिमंदाकरीताची बालगृहे, दिव्यांग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन यासारखे बाबींचा समावेश आहे.


--00--

Featured post

Lakshvedhi