Saturday, 10 September 2022

जात पडताळणी

 जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 8 : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आरक्षित जागांवर प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या तथापिअद्याप ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज केला नाही अशांनी तत्काळ ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीपुणे यांनी एका केले आहे.

             शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या असून, चालू शैक्षणिक वर्षात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नयेतयासाठी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर न केलेल्या विद्यार्थ्यांनी  https://bartievalidity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे त्याच जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विलंबाबाबतच्या हमीपत्रासह त्वरित सादर करावी.

            जात वैधता प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यास आरक्षणातून प्रवेश न मिळाल्यास होणाऱ्या नुकसानीस जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जबाबदार राहणार नाहीअसे हमीपत्र अर्जदाराने अर्जाच्या प्रतीसोबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. हमीपत्राचा नमुना बार्टीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे हमीपत्राचा नमुना उपलब्ध आहे.

*****


 


 

मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून

पडताळणीसाठी अर्जाचे आवाहन

 

            मुंबई, दि. 8 : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षेच्या जागांवर प्रवेश घेवू इच्छिनाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे विहित वेळेत सादर करण्याचे आवाहनमुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त सलिमा तडवी यांनी केले आहे.

            जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत यासाठी विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज सादर करावेत.  मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे. विद्यार्थ्यांनी  https://bartievalidity.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. अर्जाची एक प्रत मुंबई जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर करावी, असे आवाहन समितीच्या अध्यक्ष अनिता मेश्राम (वानखेडे) व उपायुक्त तथा सदस्य सलिमा तडवीसंशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सुनिता मते यांनी केले आहे.

000


क्रीडा पुरस्कार

 क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन सादर करण्याचे आवाहन

            मुंबई दि.8 : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, नवी दिल्ली यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी (विद्यापीठांकरीता) द्रोणाचार्य पुरस्कार राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार 2022 च्या पुरस्कारासाठी नाम निर्देशनाचा प्रस्ताव २० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केंद्र सरकारकडे सादर करण्याचे आवाहन, मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

            तसेच या वर्षापासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरिताच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार (Award Guidelines) अर्जदारांनी स्वतः फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची / अथवा व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्र सरकारच्या dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर संकेतस्थळावर सादर करावे.

            तसेच ऑनलाईन अर्जाबाबत समस्या आल्यास 011-23387432 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.00 ते सायं 5.30 पर्यंत संपर्क करावा. केंद्रशासनाच्या विविध पुरस्कारांची सविस्तर माहिती व नियमावली व विहित नमुना https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.

०००


साहित्य खंड

 स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड मोबाईल ॲपचे

येत्या सोमवारी लोकार्पण

 

            मुंबईदि. 8 : स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड- 1 ते 13 या मोबाईल ॲपचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते रवींद्र नाटय मंदिर येथे येत्या सोमवारदि. 12 सप्टेंबर 2022 रोजी लोकार्पण होणार आहे.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असणाऱ्या दर्शनिका विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या मोबाईल ॲपमध्ये आधुनिक भारताच्या इतिहासापासून मवाळवादीजहालवादी कालखंडांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सक्रिय सहभागातून उभी राहिलेली लोकचळवळ जसे असहकार आंदोलनसविनय कायदेभंगचलेजाव आंदोलन या सर्व महत्त्वाच्या घडामोडींची सखोल माहिती या 13 खंडांमधून अभ्यासकांना आणि वाचकांना मिळणार आहे.

            लोकार्पण सोहळयादरम्यान स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर यांच्या अज्ञात पैलू’ तसेच मराठीहिंदीउर्दु भाषेतील निवडक रचनांवर आधारित यशोयुताम् वंदे’ हा कार्यक्रम होणार असून पुणे येथील कलासक्त संस्थेच्या 25 नृत्यांगना त्यावर आधारित शास्त्रीय नृत्य सादर करणार आहेत.

            या कार्यक्रमाद्वारे पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीद्वारे प्रायोगिक नाट्यगृहाचे उट्घाटन होणार आहे.

 


Botnical गार्डन

 विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी.

                                             --वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव बॉटनिकल गार्डनला देणार.

            चंद्रपूर, दि,९: चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण माजी पंतप्रधान भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी २५ डिसेंबरला करण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक नियोजन करावे असे निर्देश वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

            चंद्रपूर जिल्‍हयातील अपूर्ण असलेले महत्‍वाकांक्षी वनप्रकल्‍प तातडीने पूर्ण करावे यासंदर्भात असलेल्‍या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यासाठी चंद्रपूरात घेतलेल्‍या आढावा बैठकीत वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हे निर्देश दिले. वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक वायएलपी राव यांच्‍यासह झालेल्‍या चर्चेत वनमंत्र्यांनी चंद्रपूर जिल्‍हयातील महत्‍वपूर्ण वनप्रकल्‍पांचा आढावा घेतला.

विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण २५ डिसेंबर रोजी

            चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनचे लोकार्पण दि. २५ डिसेंबर रोजी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्‍या जयंतीदिनी करण्‍याचे नियोजित आहे. ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पामुळे चंद्रपूर जिल्‍हयाला पर्यटनाच्‍या दृष्‍टीने विशेष महत्‍व आहे. ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पाला भेट देण्‍यासाठी देश-विदेशातील पर्यटक वर्षभर येत असतात. देशातील अत्‍याधुनिक बॉटनिकल गार्डन जवळच विसापूरमध्‍ये तयार होत असल्‍याने या गार्डनची देश-विदेशातील पर्यटकांनाही भुरळ पडणार आहे. वनसंपदा व वनेतर क्षेत्रातील जैविक संवर्धन साठा बघण्‍यासाठी जगभरातील पर्यटक, अभ्‍यासक, विद्यार्थी या गार्डनला भेट देतील. या बॉटनिकल गार्डनमुळे विसापूर आणि सभोवतालची गावे विकासाचे हब म्‍हणून पुढे येतील. त्‍यामुळे जिल्‍हयातील आदिवासी व ग्रामस्थांची जीवनमान उंचावण्‍यासाठी मदत होणार आहे. या बॉटनिकल गार्डनचे काम अंतिम टप्‍प्‍यात आहे. बॉटनिकल गार्डन, कन्‍झर्वेशन झोन आणि रिक्रीएशन झोन अश्‍या तीन विभागामध्‍ये उद्यान तयार होत आहे. या बॉटनिकल गार्डनला भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी यांचे नांव देण्‍यात येणार असल्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ताडोबात टायगर व बिबट सफारी सुरू करणार

            ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प हे उत्‍तम पर्यटन स्‍थळ म्‍हणून जगाच्‍या नकाश्‍यावर यावे यादृष्‍टीने आपण प्रयत्‍नशील आहोत. ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात टायगर व बिबट सफारी सुरू करण्‍याचा प्रकल्‍प अपूर्णावस्‍थेत आहे. टायगर व बिबट सफारीच्‍या माध्‍यमातून येथे येणा-या पर्यटकांना वन्‍यजीव दर्शनाची विशेष सोय उपलब्‍ध होणार आहे. यादृष्‍टीने देखील जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले.

बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करा

            चंद्रपूर जिल्‍हयातील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र हा रोजगार निर्मितीच्‍या दृष्‍टीने महत्‍वपूर्ण प्रकल्‍प आहे. या प्रकल्‍पाच्‍या ठिकाणी बांबु कामावर फायर रिटारडंट पॉलीश करणे, आग प्रतिबंधक योजनेनुसार कार्यशाळा इमारत व स्‍वयंपाकगृह इमारतीचे बांधकाम करणे तसेच विद्युत विषयक कामे प्रलंबित आहेत. यासाठी नुकताच १४ कोटी रू. निधी मंजूर झालेला आहे. ही कामे जलदगतीने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

वनअकादमी पूर्ण क्षमतेने पुढे नेण्‍याबाबत कार्यवाहीचे निर्देश

            चंद्रपूर येथील वनप्रशासन विकास व व्‍यवस्‍थापन प्रबोधिनी अर्थात वनअकादमीशी संबंधित कामांना गती देत पुढे नेण्‍याची आवश्‍यकता आहे. वनअकादमीत आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्रशिक्षण केंद्राच्‍या निर्मितीची आवश्‍यकता आहे. अकादमीतील रिक्‍त पदांची भरती करणे सुध्‍दा गरजेचे आहे. वनअकादमीचे वनविद्यापीठात रूपांतर करण्‍याच्‍या दृष्‍टीने समिती नेमून त्‍यादृष्‍टीने जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश वनमंत्र्यांनी दिले. देशातील अत्‍याधुनिक अशा स्‍वरूपाची ही वनअकादमी सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण व्‍हावी असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले.

            वनविभागाचे प्रधान सचिव श्री. वेणुगोपाल रेड्डी आणि प्रधान मुख्‍य वनसंरक्षक श्री. वायएलपी राव यांच्‍यासह झालेल्‍या चर्चेत वरील विषयांवर विस्तृत चर्चा झाली. हे प्रकल्‍प जलदगतीने पूर्ण करण्‍याच्‍या दृष्‍टीने कालबध्‍द कार्यक्रम तयार करण्‍याचे निर्देश वनमंत्र्यांनी यावेळी दिले. दर पंधरा दिवसांनी चंद्रपूरला येवून सचिवांनी या प्रकल्‍पांबाबत आढावा घेण्‍याचे निर्देशही त्‍यांनी दिले.



मदत शेतकऱ्यांसाठी

 अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी वाढीव दराने 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत

            मुंबई,दि.9 : राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण 23 लाख 81 हजार 920 हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी 3 हजार 501 कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार  आहे.

             आपदग्रस्त शेतक-यांना मंजूर मदत तातडीने वितरीत  करण्याचा आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आला आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता.त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर  प्रति हेक्टरी 6800 वरून वाढवून प्रति हेक्टरी 13 हजार 600 रुपये,बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी 13 हजार 500 रूपयांवरन 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर 18 हजार रूपयांवरून 36 हजार रुपये करण्यात आला आहे.जिरायत,बागायत व बहुवार्षिक पिकांच्या बाबतीत यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करून प्रती तीन हेक्टर अशी वाढ करण्यात आली आहे.

             शेतक-यांसाठीचा मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्तजिल्हाधिका-यांकडे  वर्ग करण्यात आला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.याबाबतचा शासननिर्णय मदत व पुनर्वसन विभागाने सप्टेंबर  2022  रोजी निर्गमित केला.

शुभ दिवस

 







जनता त्रस्त डी जे मस्त, वाजवा

: विसर्जन आणि हतबल महिला पोलीस 

********************

पुण्यातील टिळक रोड वर माझे ऑफिस. तिथे कालपासून विसर्जन मिरवणूक सुरु आहे ! 

काल पासून मी ऑफिसात अडकून आहे. टिळक रोड क्रॉस करता येत नसतो २ दिवस ! आणि डीजे डॉल्बी इतके जोरात कि कानात हेडफोन लावून काम करत बसलोय! तरी आवाज सहन होत नाहीये !! अगदी खिडकीच्या काचा सुद्धा थरथर करत आहेत⁠⁠⁠⁠!

सकाळी थोडावेळ खाली फुटपाथवर जाऊन मिरवणूक तरी पाहावी म्हणून गेलेलो.  तर एका पोलिसाने कळवळून विचारले कि "इथे जवळ कुठे बाथरूम आहे का हो ? आमच्या लेडी हवालदार ला गरज आहे !"

***

मला शरम वाटली आपल्या शासन व्यवस्थेची !! 

मी  त्यां पोलिसांना आमच्या गेटचे कुलूप उघडून ऑफिसात आणले ! सहा सात लेडी होत्या ! त्यांना ऑफिसची वॉशरूम उघडून दिली !! नंतर त्यांना विनंती करून "बसा पाच मिनिट" असे सांगून त्यांना बसवले, आणि ऑफिसात असलेले पार्लेची  बिस्कीट दिली. पाणी दिले. 

****

त्यावेळी एक लेडी हवालदार म्हणाली, "खाणे पिणे जाऊ द्या, पण रस्त्याच्या कडेला टेम्पररी वॉशरूम सुद्धा उभ्या केल्या नाहीत कुणी ! आणि म्हणे आम्ही यांचे रक्षण करायचे ! कसे करायचे सांगा ना ?"

डोळ्यात माझ्याच पाणी आले, त्यांचे हाल पाहून ! आणि निरुत्तर झालो ! काय उत्तर देणार त्या महिलांना ?

***

डीडी नोट : मला कुणावर टीका करायची नाहीये ! पण लाखो करोडो रुपयाची उधळण डीजे डॉल्बी वर करू शकणारी मंडळी साधी मोबाईल टॉयलेट व्हॅन नाही समाजासाठी उपलब्ध करून देऊ शकत ? (काही ठिकाणी कुणी अशी सोय केली असेल तर त्याला दंडवत. पण माझ्या पाहण्यात तरी नाही आले कधी)

***

यंदाचा तर गणेशोत्सव आता संपेल. किमान पुढच्या वर्षी तरी कोणी "जागे" होऊन यावर विचार करील का ?

( विचार पटला असल्यास शेयर करा ! म्हणजे किमान जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे जाईल ) डीजेच्या आवाजाने आजारी व्यक्ती, लहान मुलं,गरोदर स्ञीया किंवा परीक्षार्थींचे काय होत असेल? 😨😨

Featured post

Lakshvedhi