Thursday, 13 January 2022

 *प्रारब्धवशात जे आहे तेच होते...*

१) लग्न (२) पैसा (३) मरण (४) अन्न (५) जन्म...हे ज्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात...

१)रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रम्हदेवांना विचारले, "या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे ?" ब्रम्हदेवांनी कुंडली पाहून सांगितले, "समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्याबरोबर होणार आहे." रावणास राग आला. माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची ? शक्यच नाही. नोकरांना सांगितले, "याला समुद्रात फेकून द्या." नोकरांनी त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला. तो मुलगा वाहत-वाहत एका बेटावर पोहोचला. तिथला राजा वारला होता. लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते. हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली. लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले. मुलगा वयात आला. रावणाची कन्या उपवर झाली, बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला. रावणाने पाहुणचाराकरिता एकदा जावयास बोलाविले रावण म्हणाला, "ब्रम्हदेवपण हल्ली खोटे बोलतो." त्याने सांगितले होते, "माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून पण आपण तर राजकुमार आहात." जावई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे." पायाचा अंगठा दाखविला. मग रावणास खात्री पटली. या ब्रम्हदेवाच्या गाठी असतात.

*२)पैसा -* ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्या ठिकाणीच मिळतो.

*३)मरण*-ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते...*

*कथा -* एकदा गरुडाची आई आजारी पडली. सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी, आज कोण कोण आले होते ? आई सर्वांची नावे सांगत होती. एकदा यमराज आले व भेटून गेले. पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईस विचारले, आज कोण आले होते ? आई म्हणाली, *आज यमराज आले होते व जाताना हसले."* गरुडास शंका आली, का हसले असावे ? त्याने आईस उचलले व जंगलातील झाडाच्या खोडात ठेवले. *यमराज दुसऱ्या दिवस तिथेही आले. यमराजांना गरुडाने विचारले, "आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. पण जाताना आपण हसला का? "यमराज म्हणाले,"आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून हसलो." त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती... 

*तात्पर्य-काहींचा मृत्यू एसटीत, काहींचा रेल्वेत, काहींचा विमानात, काहींचा पाण्यात, काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे... पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे..*🌹🔱🙏

 पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करा; आर्थिक शिस्त पाळा

                                              - उपमुख्यमंत्री अजित पवार

· सर्वच महामंडळाच्या मंजूर निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश.

· अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा आढावा.

            मुंबई, दि. 10 : अण्णासाहेब पाटील आर्थिक‍ मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना, काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळा. महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविताना समाजातल्या पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. त्याचबरोबर सर्व महामंडळांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती कक्षात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नामदेव भोसले, नियोजन विभागाचे उपसचिव श्री. देसाई, नियोजन विभागाचे अवर सचिव श्री. बोरकर, वित्त विभागाचे सहसचिव श्री. दहीफळे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यातील सर्व समाजघटकांच्या शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसह समतोल सामाजिक प्रगती साधण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने वेगवेगळ्या प्रवर्गासाठी विविध विकास महामंडळाच्या माध्यमातून योजना राबविण्यात येतात. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांना शेतीपूरक व्यवसाय, विपणन, प्रक्रियाउद्योग, पुरवठा आणि साठवणूकीबरोबरच लघू उद्योग, वाहतुक, अन्य व्यवसायिक उद्योगासाठी आर्थिक मदत करताना राज्यातील सर्व भागातील जास्ती-जास्त तरुणांना या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा, असेही श्री.पवार यांनी सांगितले.

            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाबरोबरच महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळासह इतर सर्व महामंडळासाठी तरतुद केलेल्या निधीचे तातडीने वितरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

*****

वृत्त क्र. 74

मालेगाव एमआयडीसीमध्ये उद्योग प्रकल्प

जलदगतीने सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार

                                                - उद्योग मंत्री सुभाष देसाई

         · मालेगाव जलदगतीने पूर्ण करण्यात आलेली विशेष एमआयडीसी

         · कृषीमंत्री यांनी सोडविल्या मालेगाव एमआयडीसीअंतर्गत उद्योजकांच्या समस्या

            मुंबई, दि. 10 : मालेगाव येथील एमआयडीसी जलदगतीने उभारण्यात आलेली विशेष एमआयडीसी असून, याअंतर्गत असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. येथील उद्योग प्रकल्प तातडीने सुरू करण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. उद्योग नियमावलीप्रमाणे वस्त्रोद्योग पार्क व अजंग प्रकल्पांसाठी भूखंड वाटपाच्या दरास मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले.

            मंत्रालयात नाशिक, मालेगाव येथील अजंग-रावळगाव औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक 3 येथील प्रलंबित कामाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पी. अन्बलगन, सहसचिव संजय देगांवकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर, अवर सचिव किरण जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

            एमआयडीसीअंतर्गत असलेल्या समस्या कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी मांडल्या. त्यांनी मालेगाव येथील उद्योजकांसाठी केलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

            उद्योग मंत्री श्री.देसाई म्हणाले, मालेगाव एमआयडीसी अंतर्गत अजंग गाव ते औद्योगिक वसाहत पोहोच रस्त्यांच्या कामासंदर्भातील कार्यवाही एका महिन्यात पूर्ण करावी. तसेच अभिन्यांसातील अंतर्गत रस्ते तयार करण्यात यावेत. वस्त्रोद्योग पार्क व अजंग टप्पा क्रमांक ३ भुखंड वाटपाच्या रू ६०० प्रति चौमी या दरास मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. यानंतर ७९० प्रमाणे दर करण्यात यावेत. जे प्रकल्प काम सुरू करत आहेत त्यांना तात्पुरत्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाणीपुरवठा योजना क्रमांक दोनसाठी तांत्रिक मंजुरी तसेच निविदा प्रक्रियेची प्रक्रिया करण्यात यावी. वीजेसंदर्भातही सध्या तात्पुरत्या स्वरूपात वीज व्यवस्था करून ऊर्जा विभागासोबत पाठपुरावा करून वीजेसाठी सबस्टेशन कार्यान्वीत करावेत. प्लास्टिक, वस्त्रोद्योग, फुड व इतर उद्योगांसाठी सुधारित अभिन्यास मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश उद्योग मंत्री देसाई यांनी दिले.

०००


 संस्कृत भारतीच्या सुभाषित पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण.

§ सुभाषित अभियान अंतर्गत उपक्रम

            पनवेल दि ११ः संस्कृत भारती कोकण प्रांताच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुभाषित अभियान अंतर्गत सुभाषित पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच झाले. कृष्णभारती हॉल येथे या स्पर्धा व पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला.

            संस्कृत भारती कोंकण प्रांताच्या वतीने सुभाषित अभियान घेण्यात आले. 5 सप्टेंबर 2021 पासून 13 डिसेंबर 2021 पर्यंत रोज एक याप्रमाणे 100 सुभाषिते व्हाॅटसॅप ग्रुपव्दारे पाठवण्यात आली. इयत्ता 5 वी ते 10 वीचे विद्यार्थी या अभियान अंतर्गत पाठांतर स्पर्धेत सहभागी झाले होते.

           हे अभियान संपूर्ण कोकण प्रांतात सुरु आहे. अभियान स्पर्धेचा एक महत्त्वाचा टप्पा जिल्हास्तरीय स्पर्धा होत्या. स्पर्धा 5 वी ते 10 वी असे सहा गट व 100 सुभाषिते पाठ असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष गट अशा एकूण सात गटात झाली. या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, कर्जत, खोपोली, गोरेगाव येथून विद्यार्थी आले होते.

            स्पर्धेसाठी पनवेल येथील श्री.चारुदत्त जोशी आणि श्रीमती सुनंदा लखपती, यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. श्रीमती सुनंदा लखपती मार्गदर्शन करताना म्हणाल्या, स्पर्धा संपली म्हणून सुभाषितांचा अभ्यास थांबवू नका. सुभाषितांमधील मार्गदर्शन आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी ठरते त्यामुळे अधिकाधिक सुभाषिते पाठ करा आणि सतत सुभाषितांच्या सहवासात रहा.

            स्पर्धेत एकूण 34 विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रत्येक गटातून तीन क्रमांक काढण्यात आले. आणि 100 सुभाषिते पाठ असणा-या विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिक देण्यात आले.

गट क्र. १

१. प्रथमः क्रमांक :- ईशा महावीर जाधव

२. द्वितीयः क्रमांक:- आशिष जयन नायर 

३. तृतीयः क्रमांक: - साईज्ञा सतीश खिलारी                  

गट क्र. २

१. प्रथमः क्रमांक: - अक्षरा साहू

२. द्वितीयः क्रमांक: - किमया शशिकांत गायकवाड

३. तृतीयः क्रमांक:- हिमांशु पराग घरत

गट क्र. ३

तृतीयः क्रमांक: - निवेदिता गणेश मुसळे

गट क्र. ४

१.प्रथमः क्रमांक: - पूर्वा अमित पाटील 

२. द्वितीयः क्रमांक: - वेदश्रुति विद्येश मराठे

३. तृतीयः क्रमांकः नेहल सचिन गांधी

गट क्र. ५

१. प्रथमः क्रमांक: - श्रुती चंद्रकांत पाटील 

२. द्वितीयः क्रमांक- भक्ती संजय कांबळे

३. तृतीयः क्रमांक - तन्वी ब्रह्मदेव मिसाळ

गट क्र. ६

१. प्रथमः क्रमांक: - सोनल रवींद्र पतंगे

२.द्वितीयः क्रमांक :- ज्ञानेश्वरी बापू कामठे

३. तृतीयः क्रमांक :- आयुष जयंत ठाकुर

विशेष गट १०० सुभाषित

१. अ+श्रेणी - भक्ती संजय कांबळे

२. अ श्रेणी - आशिष जयन नायर

३. ब श्रेणी - क्रितिका तिवारी

४. ब श्रेणी - तन्वी बह्मदेव मिसाळ

            या सुभाषित अभियानाचे आणि स्पर्धेचे संपूर्ण नियोजन आणि पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाचे सत्र संचालन संस्कृत भारती जिल्हा संयोजक श्री. विक्रांत जोशी यांनी केले.

            कार्यक्रमाची सुरुवात सौ. प्रतिमा जोगळेकर यांच्या ध्येयमंत्राने झाली. परीक्षकांचा परिचय सौ. तृप्ती गोरे यांनी करुन दिला तर प्रास्ताविक सौ. अनया करंदीकर यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. स्नेहला पाडळकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शान्तिमंत्राने झाली.

0000


 



Wednesday, 12 January 2022

 वृत्त क्र. 109


सुधारित :

चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा मंत्रालयात

प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरु कराव                             - सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे


            मुंबई, दि. 12 : कोविड आणि ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती प्रणालीचा वापर करण्यावर वारंवार स्थगिती येत आहे. या पार्श्वभूमीवर नवीन तंत्रज्ञान असलेल्या आधार प्रमाणित चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यासंदर्भात सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

            मंत्रालयात फिंगरप्रिंट आधारित बायोमेट्रिक उपस्थिती प्रणालीऐवजी आधार प्रमाणीत चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा वापर करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री श्री.भरणे बोलत होते. बैठकीस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे विवेक भिमनवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव ज.जी.वळवी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे अवर सचिव लक्ष्मण सावंत आदिसह अधिकारी उपस्थित होते.

            सामान्य प्रशासन राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना बायोमॅट्रिक पद्धतीने उपस्थितीवर स्थगिती आणण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या चेहरा पडताळणी हजेरी प्रणालीचा वापर केल्यास कर्मचाऱ्यांचा वेळही वाचणार असून, प्रायोगिक तत्वावर अशा काही मशिनचा वापर करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, असे निर्देश राज्यमंत्री श्री.भरणे यांनी दिले.

००००




Tuesday, 11 January 2022

 सार्वजनिक समारंभ व शाळा 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्यावी: ललित गांधी.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे मुख्यमंत्र्यांकडे मागणी


महाराष्ट्रात राज्य सरकारने लागू केलेल्या कोरणा प्रतिबंधक नियमांमध्ये काही सुधारणा करून लग्न व अन्य सार्वजनिक समारंभामध्ये 50 टक्के क्षमतेने उपस्थिती साठी तसेच शाळा व शैक्षणिक संस्था 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज च्या वतीने अध्यक्ष ललित गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे महाराष्ट्र चेंबर तर्फे आज माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह संबंधित विभागांच्या सचिवांना चेंबर तर्फे निवेदन देऊन यासंदर्भात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात भूमिका मांडताना ललित गांधी यांनी म्हटले आहे की

• लग्नसमारंभ, सभा, सामाजिक कार्यक्रम, सेमीनार्स इ. साठी 50 जणांची मर्यादा निश्‍चित केली आहे. अशा प्रकारच्या आयोजनांवर इव्हेन्ट ऑर्गनायझर्स, कॅटरर्स, टेन्ट कॉन्ट्रॅक्टर्स, डेकोरेटर्स, बँडवाले इत्यादी अनेक छोट्या छोट्या व्यावसायिकांचा रोजगार व उदरनिर्वाह अवलंबुन आहे. 50 जणांच्या मर्यादेमुळे हे सर्व व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

याचवेळी चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स इ. 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी आहे.

याच धर्तीवर अशा समारंभानाही 50 टक्के क्षमतेने अथवा जास्तीत जास्त 200 उपस्थितीच्या मर्यादेत यापैकी जे कमी असेल त्या संख्येने समारंभ/कार्यक‘म आयोेजित करण्यासाठी परवानगी असणे आवश्यक आहे.


ललित गांधी यांनी शाळांच्या संदर्भात आपली भूमिका मांडताना म्हटले आहे की, शाळा-महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन शैक्षणिक वर्षात ऑनलाईन पध्दतीने शाळांचे वर्ग चालविण्यात आले त्याचा फार मोठा दुष्परिणाम मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर, मानसिक अवस्था व व्यक्तिगत जीवनावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतील निर्बंध उठवुन शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ऑनलाईन पध्दतीने शिकलेला अभ्यासक्रम विसरला असल्याचे 70 टक्के विद्यार्थ्यांनी नमुद केले.

अनेक विद्यार्थी मोबाईल वापराच्या आहारी गेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना काऊन्सीलिंग वैद्यकीय उपचारांची गरज पडत आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांमध्ये दृष्टीविकार निर्माण झाले आहेत.

अनेक प्राथमिक, उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी पॉर्न फिल्म्सच्या आहारी गेल्याच्या तक्रारी पालकांकडून प्राप्त होत आहेत.

शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प आहे.

तसेच 8 वी च्या पुढील विद्यार्थ्यांचे लसीकरण पुर्णत्वाकडे आहे. तरी 50 टक्के क्षमतेने शाळा सुरू ठेवण्याची परवानगी देण्याची आग्रही मागणी आहे.

देशाच्या भावी नागरीकांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी व सामाजिक दुष्परिणाम रोखण्यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय तात्काळ घेणे आवश्यक आहे.

मद्यालये सुरू व विद्यालये बंद असे विदारक चित्र निर्माण होत आहे ते बदलणे आवश्यक आहे.

कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनांच्या पालनासाठी आम्ही कटीबध्द आहोत. मात्र अर्थव्यवस्था व समाजव्यवस्था सुरळीत चालु राहण्यात मदत होणेसाठी वरील दोन सुधारणांचे आदेश तात्काळ निर्गमित व्हावेत अशी अपेक्षाही ललित गांधी यांनी व्यक्त केली आहे


Thanks and Regards,

 


Featured post

Lakshvedhi