सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Tuesday, 9 November 2021
महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान
· उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण
नवी दिल्ली 08 : सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये उद्योजक आनंद महिंद्रा यांना पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पद्म पुरस्कार वितरण सोहळयास उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडु, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
दरवर्षी प्रजासत्त्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये आज सकाळी वर्ष 2020 च्या काही पद्म पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते. सकाळी पार पडलेल्या समारोहात 4 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. वर्ष 2020 च्या उर्वरित पद्म पुरस्काराचे वितरण सोमवारी सायंकाळी करण्यात आले. यामध्ये एकूण 6 मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध उद्योजक श्री. आनंद महिंद्रा यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पद्म भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. श्री महिंद्रा हे महिंद्रा समुहाचे चेयरमन आहेत. जगभरातील 100 देशांमध्ये त्यांचे उद्योगसमूह आहेत.
महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-यांना 5 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये कला क्षेत्रातील योगदानासाठी 3 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने आज दुस-या टप्प्यात सन्मानित करण्यात आले. यामध्ये सुरेश वाडकर यांना त्यांच्या अविट आवाजाने मराठी, हिंदीसह अन्य भाषेतील गायनासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी एकता कपूर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दूरचित्रवाणी तसेच चित्रपट सृष्टीतील वैविध्यपूर्ण मालिका तसेच चित्रपट निर्माता म्हणून श्रीमती कपूर यांची स्वतंत्र ओळख आहे. दूरचित्रवाणीवरील त्यांच्या मालिकांनी घराघरात लोकप्रियतेचा कळस गाठलेला आहे.
करण जोहर यांनाही कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हिंदी सिने जगतात त्यांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित तसेच निर्देशित केलेल आहेत. मागील 2 दशकांमध्ये त्यांनी एका पेक्षा एक असे मनोरंजनपूर्ण हिंदी चित्रपट बनविले आहेत.
पोपटराव पवार यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी पद्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बीजमाता म्हणून ओळखल्या जाणा-या अहमदनगर जिल्ह्याच्या राहीबाई पोपेरे यांना त्यांच्या कृषी क्षेत्रातील अभिनव कार्यासाठी गौरिवण्यात आले.
वर्ष 2020 मध्ये विविध क्षेत्रातील 7 मान्यवरांना पद्म विभूषण, 16 मान्यवरांना पद्म भूषण आणि 118 मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले होते. यामध्ये महाराष्ट्रातील 13 मान्यवरांचा समावेश आहे. आज झालेल्या पुरस्कार वितरणामध्ये महाराष्ट्रातील एकूण 10 मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
००००
राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पब्लिक रिलेशन कौन्सिलचे पुरस्कार प्रदान
· कोरोना काळातील देवदुतांचा राजभवन येथे सन्मान
· वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, प्रिया दत्त,
मध्य व पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सन्मानित
मुंबई, दि. 8 : कोरोनाच्या कठीण काळात डॉक्टर्सपासून वार्डबॉयपर्यंत, पोलीस शिपायापासून महासंचालकांपर्यंत, उद्योजकापासून ते सामान्य माणसापर्यंत सर्वांनीच निःस्वार्थपणे व सेवाभावाने काम केल्यामुळे तसेच कमी अवधीत देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यामुळे भारताने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
कोरोना काळात विशेषत्वाने कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. ८) राजभवन येथे ‘एन्जेल कम्युनिकेटर’ पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियातर्फे आयोजित कार्यक्रमात राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, माजी खासदार प्रिया दत्त, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर व टाटा हॉस्पिटलचे कर्करोग तज्ञ डॉ.सुदीप गुप्ता व डॉ.शैलेश श्रीखंडे यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अभिनेते रोहिताश्व गौर, संपादक सुंदरचंद ठाकूर, डॉ.निर्मल सुर्य, डॉ.हरीश शेट्टी, रुबिना अख्तर हसन रिझवी, भारत मर्चंट चेंबरचे राजीव सिंघल, अजंता फार्माचे आयुष अगरवाल, कमल गुप्ता यांना देखील कोरोना काळातील कार्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
Monday, 8 November 2021
मच्छिमारांना नुकसान भरपाईबाबतच्या राज्यस्तरीय धोरणासाठी
मच्छिमार, तज्ज्ञ, संघटना व मच्छिमार संस्थांना सूचना
लेखी स्वरुपात पाठविण्याचे आवाहन
मुंबई, दि. 8 : राज्यातील सागरी क्षेत्रात होत असणाऱ्या बांधकाम प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छिमारांना नुकसान भरपाईबाबत राज्यस्तरीय धोरण तयार करण्यासाठी सर्व मच्छिमार, मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ, संघटना व मच्छिमार संस्थानी त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात पाठविण्याचे आवाहन प्रधान सचिव (पदुम), मंत्रालय, मुंबई यांनी केले आहे.
उच्च न्यायालयाने रिट याचिका 2016/2021 संदर्भात दि. 12.08.2021 रोजीच्या आदेशान्वये, राज्यातील सागरी क्षेत्रात होत असणाऱ्या बांधकाम प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छिमारांना नुकसान भरपाईबाबत राज्यस्तरीय धोरण करण्यासाठी प्रधान सचिव (पदुम) यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये आयुक्त मत्स्यव्यवसाय, राज्यातील महाराष्ट्र मच्छिमार संघ, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती व पारंपारिक मच्छिमार बचाव कृती समिती यांचेशी चर्चा करण्यात आली. सर्व सदस्यांनी उच्च न्यायालय व मत्स्यव्यवसाय विभागाचे आभार मानले. या समितीद्वारे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या पारंपरिक मच्छिमारांना व इतर मत्स्यव्यवसायिकांना न्याय मिळेल असे सांगण्यात आले. जे मच्छिमार शासनाच्या अभिलेखामध्ये नसतील त्यांची शासनामार्फत नोंदी घेण्यात येतील. सर्व मच्छिमारांचे अधिकार अबाधित रहावे व मासेमारी क्षेत्र कमी होऊ देऊ नये, अशा सूचना देऊन लेखी स्वरुपात त्यांचे म्हणणे विभागास देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
प्रधान सचिव (पदुम) यांनी याबाबत राज्यातील सर्व मच्छिमारांना, मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील तज्ञ, या क्षेत्रात काम करणा-या संघटना व मच्छिमार संस्थाना या समितीस त्यांचे म्हणणे लेखी स्वरुपात commfishmaha@gmail.com या ई-मेल वर पाठविण्यात यावे, असे आवाहन केले आहे. तसेच ही माहिती fisheries.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिलेली आहे, याची दखल राज्यस्तरीय धोरणामध्ये घेण्यात येईल, असे आवाहन आयुक्त, मत्स्यव्यवसाय यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
००००
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत
उच्च न्यायालयात कायदेविषयक प्रदर्शन
मुंबई, दि. 8 : मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत, कायद्याचा इतिहास, कायदेविषयक माहिती, आणि प्राप्ती यासंबंधीचे प्रदर्शन दिनांक 8 नोव्हेंबर 2021 ते 14 नोव्हेंबर 2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मुंबई उच्च न्यायालय म्युझियम रुम नंबर १७, तळ मजला मुख्य इमारत येथे आयोजित करण्यात आले. तरी त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्य न्यायमूर्ती श्री. दिपंकर दत्ता यांच्या हस्ते दिनांक 8 नोव्हेंबर, 2021 रोजी करण्यात आले. कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे इतर न्यायमूर्ती व न्यायालयीन अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.
००००लोकसहभागातून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात यावा
-- मुख्य सचिव सीताराम कुंटे
मुंबई, दि. 8 : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र शासनाने आखून दिलेल्या संकल्पनेनुसार आणि लोकसहभागातून राज्यात सर्वत्र कार्यक्रमांचे उत्साहाने आयोजन करून त्यांची माहिती यासाठी निर्मित स्वतंत्र संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिल्या.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत ७५ आठवडे राज्यभर विविध कार्यक्रम राबवून अमृतमहोत्सवी वर्षाचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन करीर, माहिती - तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात व संबंधित अधिकारी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, दर्शनिका विभागाचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांमध्ये जास्तीज जास्त स्थानिक, युवा, विद्यार्थी यांचा सहभाग घ्यावा. खासगी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने आणि सहभागाने उत्साहाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन होणे गरजेचे असल्याचेही, मुख्य सचिव श्री.कुंटे यांनी सांगितले.
गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी, पोलीस बँड पथकाद्वारेही देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. अज्ञात स्वातंत्र्यसेनानी, स्वातंत्र्यकालीन महत्त्व असलेली स्थळे प्रकाशात आणण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना दिल्या.
महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांनी सूचना केली की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे फक्त उत्सवी स्वरूप न राहता कायमस्वरूपी स्मरण राहिल, असे भरीव स्मारक उभे करण्याबाबतही सर्व संबंधितांनी प्रस्तावित करावे.
सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी प्रास्ताविक केले तर सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी सादरीकरण केले.
विविध जिल्ह्यांत आजवर झालेल्या कार्यक्रमांची माहिती संबंधित विभागीय आयुक्तांनी दिली. दर्शनिका विभागाचे संचालक डॉ.दिलीप बलसेकर यांनी प्रत्येक जिल्ह्याचे विशेष पुरवणी गॅझेट तयार करण्यासंदर्भात व गॅझेटच्या आकृतीबंधाबाबत माहिती दिली. भारतीय स्वातंत्र्य आंदोलन इतिहास आधार साहित्य खंड १ ( सन १८१८) ते खंड १३ भारत छोडो डिसेंबर १९४२ या ग्रंथाचे चार ई बुक संच यावेळी मुख्य सचिव यांना सांस्कृतिक कार्य सचिव यांच्या हस्ते भेट देण्यात आला.
०००
पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची
संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल;
आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राला मानाचा पुरस्कार
मुंबई, दि. 8 : पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेकडून दखल घेतली गेली आहे. स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लिडरशीप’ (प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व) साठी पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राला अंडर २ कोलिशन फॉर क्लायमेट अॅक्शनकडून हा पुरस्कार मिळाला आहे. स्कॉटलंडमध्ये अंडर २ कोलिशन फॉर क्लायमेट अॅक्शनतर्फे तीनपैकी एक पुरस्कार जिंकणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. राज्याच्या हवामान भागीदारी आणि क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्सची ही येथे विशेष दखल घेतली गेली. शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान असल्याचेही पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे यांनी नमूद केले आहे.
श्री.आदित्य ठाकरे म्हणाले, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी दृष्टीकोन असणारे नेते आहेत. त्यांनी आम्हाला चांगल्या आणि हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे. पर्यावरण जपण्यासाठी आम्ही माझी वसुंधरा म्हणजेच ‘माय प्लॅनेट’ ही चळवळ सुरू केली आहे. त्याचबरोबर आम्ही पंचमहाभूतांवरही लक्ष केंद्रित करत आहोत. राज्य सरकार पारंपरिक ऊर्जेऐवजी स्वच्छ ऊर्जेचा विचार करीत आहे. नुकतेच एका महामार्गाचे सोलराइजेशन केले असून २५० मेगावॅट ऊर्जा निर्माण करणार असल्याचेही मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
श्री.आदित्य ठाकरे म्हणाले, भूगोल, वंशाच्या सीमा, राष्ट्रीयत्व किंवा लिंगभेद नसलेल्या या जागतिक समस्येवर काम करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आणि विधायक व अर्थपूर्ण कृती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हवामान कृतीसाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न व योगदानाबद्दल अंडर२ कोईलेशनद्वारे मान्यता मिळाली याचा आम्हाला खरोखरच आनंद होत आहे.
हवामान कृतीसाठी वचनबद्ध असलेल्या सर्वात मोठ्या जागतिक नेटवर्क अंडर२ कोईलेशनतर्फे उपराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना मान्यता मिळाली आहे. तर, क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्ससाठी ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा) यांनी आणि हवामान भागीदारीसाठी क्वेबेक (कॅनडा) यांनी इतर दोन पुरस्कार जिंकले. महाराष्ट्राने अंडर२ च्या तीनही श्रेणींसाठी प्रवेशिका दिल्या होत्या.
संयुक्त राष्ट्रांच्या ‘रेस टू झिरो’ उपक्रमामध्ये तसेच जागतिक स्तरावर हवामान बदलाबाबत संबोधित करण्यासाठी सी-४० शहरांच्या उपक्रमात देखील महाराष्ट्र सामील झाले आहे.
औषधांची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्यांना दंड
अन्न व औषध प्रशासनाची कायदेशीर कारवाई
मुंबई, दि. 8 : औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती ) कायदा १९५४ व नियमांतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून औषधांची आक्षेपार्ह जाहिरात करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून औषधांच्याबाबत आक्षेपार्ह जाहिराती आढळल्यास संबंधिताविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने कळविले आहे.
"गायनोप्लस कॅप्सुल" या औषधांच्या लेबलवर "महिलांची बंद झालेली मासिक पाळी नियमित करते" अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर छापलेला होता. अशा प्रकारची जाहिरात करणे हे औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ व नियम यांचे उल्लंघन करणारे असल्याने अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने औषध निरीक्षक ए. ए. रासकर व श्रीमती पी. एन. चव्हाण यांनी शिवडी न्यायालयात दोन खटले दाखल केले होते. यामध्ये सुनावणी होऊन दि.22 ऑक्टोबर 2021 रोजी निकाल देण्यात आला. त्यानुसार मे. नॅल्को बायोटेक इंदोर या संस्थेचे मालक दिलीप बुन्हानी यांना दोन्ही खटल्यात एकूण रु.४०,०००/- व मे. क्रिस्टल हेल्थकेअर, मुंबई या संस्थेचे मालक गौरव शहा व मे लॉईड फार्मास्युटीकल्स, इंदोर याचे संचालक देवेंद्र खत्री यांना प्रत्येकी रु.२०,०००/- इतका दंड ठोठावण्यात आला.
आणखी एका प्रकरणात "व्हिरुलिना पाऊडर" या आयुर्वेदिक औषधाबाबत औषधाच्या लेवलवर व उत्पादक नॅचरल सोल्यूशन्स, नाशिक या उत्पादकाच्या संकेतस्थळावर औषधे व जादुटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४ व नियम यांचे उल्लंघन करणारे श्वसन संस्थेशी संबंधित असलेला आक्षेपार्ह मजकूर आढळल्याने अन्न व औषध प्रशासन, मुंबईचे तत्कालिन औषध निरीक्षक श्री.ध. अ. जाधव यांनी नॅचरल सोल्यूशन्स, नाशिकचे मालक अनिलकुमार शर्मा व युगंधर फार्मा, नाशिक चे मालक योगिता केळकर यांचेविरुध्द शिवडी न्यायालयात खटला दाखल केला होता. त्याची सुनावणी होऊन दि. 24 सप्टेंबर 2021 रोजी निकाल लागला. त्यानुसार प्रत्येकी रु. १०,०००/- दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे, असे अन्न व औषध प्रशासन यांनी कळविले आहे
***छठपूजा उत्सवानिमित्त गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई, दि. 8 : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता नागरिकांनी या वर्षीचा छठपूजा उत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून त्याबाबतचे परिपत्रक गृह विभागाने जारी केले आहे.
दि. 9 नोव्हेंबरच्या सुर्यास्तापासून ते दि. 10 नोव्हेंबर, 2021 रोजीच्या सुर्योदयापर्यंत छठपूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोविड रोगाचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेल्या दीड वर्षापासून सर्व धर्मीय सण/उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.
1. कोविड–19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
2. कोविड संसर्गामुळे बंद करण्यात आलेली राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्यात आलेली असली तरीही छठपूजा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.
3. नागरिकांनी नदी, तलाव अथवा समुद्राच्या काठी एकत्र न येता गर्दी टाळावी व घरीच थांबून साध्या पद्धतीने छठपूजा साजरी करावी. विशेष करुन ज्येष्ठ नागरिक तसेच लहान बालके यांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे.
4. महानगरपालिका/स्थानिक प्राधिकरण, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करावी व त्या ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण इ. उपाययोजना कराव्यात तसेच सुरक्षा व स्वच्छतेच्या उपाययोजना याबाबत जनजागृती करावी. छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग/संक्रमण वाढणार नाही.
5. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशान्वये “ब्रेक द चेन” च्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनाचे नियम काही प्रमाणात शिथील करण्यात आले असले तरी देखील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्रित येण्यावरील निर्बंध कायम ठेवले आहेत. त्यामुळे सार्वजनिक/धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावयाचे झाल्यास या मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतोवर अशा कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर देण्यात यावा.
6. छठपूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरुपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत.
7. या सूचनांव्यतिरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधित
महापालिका/पोलीस/स्थानिक प्रशासनाला असतील.
8. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहीत, केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसाच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
हे शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२१११०३१६५७५८०४२९ असा आहे.
००००
Featured post
-
सहा वेगवेगळ्या पर्यायातून आर्थिकदृष्ट्या किफायतशीर पर्यायावर सहमती सविस्तर तांत्रिक व अभियांत्रिकी मूल्यांकन केल्यानंतर , एमएमआरडीएने सवि...
-
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंह म्हणाले की , कर्करोगाविरुद्ध जो लढा आहे , त्यामध्ये प्रत्येकाच्या वाटा फार महत्त्वाचा आहे. ...
-
मॉकड्रीलमध्ये सामान्य नागरिकांना काय शिकवलं जाणार मोक drill म्हणजे संकटकाळी बचाव प्रशिक्षण प्रशासनाने नागरिकांना सल्ला दिला आहे की , अश...