Sunday, 9 June 2024

*वेदांच्या विकृती

 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼


*वेदांच्या विकृती*


लेखकः  दिवाकर बुरसे, पुणे


पुण्यातील तुळशीबाग येथील रामजी संस्थानच्यावातीने २ जून ते ३१ जुलै २०२४ या काळात ऋग्वेदाच्या घनपारायणाचे आयोजन केले जात आहे. चि.श्रीनिधी स्वानंद धायगुडे हे घनपारायणकर्ते असून वेदमूर्ती समोहन कोल्हटकर श्रोता म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्रीनिधी यांचे अध्ययन वडील वेदरत्न स्वानंद धायगुडे यांच्याकडे झाले आहे. ऋग्वेदाचा घनपाठ श्रवण करण्याची ही अमूल्य संधी वेदांविषयी पूज्यभाव बाळगणा-या लोकांनी गमावू नये. या कार्यक्रमाला उपस्थित राहून या अलौकिक ज्ञानसत्राचा लाभ घ्यावा.


या घनपाठपारायणाच्या निमित्ताने वेदांच्या विकृती आणि घनपाठ म्हणजे काय हे थोडक्यात समजून घेऊ.


मूळच्या वेदमंत्रांमध्ये कोणत्याही प्रकारे भ्रष्ट होऊ नयेत म्हणून प्राचीन बुद्धिमान, कल्पक ऋषींनी अनेक क्लुप्त्या योजल्या आहेत. हे वेदमंत्र सस्वर टिकावेत यासाठी एक युक्ती प्राचीन ऋषींनी योजिली तिला 'वेदांच्या विकृती' म्हणतात. तेजस्वी ब्राह्मणांनी सर्व वेद आणि त्यांच्या विविध विकृती अथक परिश्रम घेऊन कंठस्थ करून एका पिढीकडून दुस-या पिढीकडे सहस्रावधी वर्षे हस्तांतरित करून आजपर्यंत जतन केल्या आहेत. 


जेव्हा एखादी व्यक्ती प्रतिदिन बारा तास या प्रमाणे सतत बारा वर्षे अध्ययनाला देते तेव्हाच त्याला घनपाठी होता येते!


वेदाचा घनपाठी म्हणजे 'घन' या  नांवाची वेदाची विकृति पठण करणारा. जटा, माला, शिखा, रेखा, ध्वज, दंड, रथ व घन अशा वेदपाठणाच्या एकूण आठ पद्धती म्हणजे  'विकृती' आहेत.


घनपाठी होण्याला असामान्य कतृत्व, प्रखर बुद्धिमत्ता, तीव्र, तीक्ष्ण स्मरणशक्ती, अथक परिश्ररम, दुर्दम्य इच्छाशक्ती, उत्तम आरोग्य आणि उत्तम ज्ञानी गुरु या सर्व गोष्टींची नितांत आवश्यकता आहे! घनपाठ पूर्ण करण्याचा क्रम असा आहे .


*१) पदपाठ*– संहितेत जे मंत्र आलेले आहेत ते वेगवेगळे करून म्हणणे म्हणजे 'पदपाठ' होय. 

संहितेत 'कुक्कुटोsसि मधुजिह्वा' असे आले आहे तर याचा पद पाठ 'कुक्कुटः असि मधुजिह्वsइति मधु जिह्वः'  असा होईल. 

पदपाठ असणे फार महत्त्वाचे आहे. ह्या पायावरच पुढील इमारत उभी आहे.

ऋग्वेदामध्ये  साधारणपणे १०५५२ मंत्र आहेत. या सगळ्या मंत्राना वेगवेगळे करून म्हणणे हा झाला पदपाठ. उदा- सा रे ग म प ध नि सा


*२) क्रमपाठ* — वेगवेगळी पदे विशिष्ट क्रमाने म्हणणे म्हणजे 'क्रमपाठ' होय.

 या मध्ये प्रत्येक पद १-२-२-३-३-३-४-४-५  या क्रमाने म्हटले जाते. हा अभ्यासक्रम पूर्ण करायला साधरणपणे २ वर्षे लागतात.

उदा- सारे ,रेग, गम, मप,पध ,धनि, निसा


*३) जटापाठ*- जर संहिता म्हणायला १५ मिनटे वेळ लागला तर जटापाठ म्हणायला २ तास वेळ लागतो. यामध्ये १-२-२-१ -१-२ असा क्रम झाल्यावर पहिले पद सोडून दिले जाते मग २-३-३-२-२-३-३-३  मग २रे पद सोडून दिले जाते या क्रमाने म्हटले जाते. उदा – सा-रे-रे-सा-सा-रे


*४) घनपाठ*- संहितेतील प्रत्येक पद १-२-२-१-१-२-३-३-२ -१-२-३  मग पहिले पद सोडून द्यावे मग २-३-३-२-२-३-४-४-३-२-२-३-४ या क्रमाने म्हणावे.उदा- सा-रे-रे-सा-सा-रे-ग-ग-रे-सा-सा-ग-रे.

हा वेळ आणि हे कष्ट केवळ मंत्र शिकण्यासाठी आहेत.


हे मंत्र कुठे उपयोजायचे कसे उपयोजायचे, कुठल्या यज्ञात उपयोजायचे ह्याचे ज्ञान ग्रहण करण्याला लागणारा वेळ वेगळा द्यावा लागतो.


अष्टविकृतीमुळे कोणालाही वेद मंत्रांचे कोणतेही अक्षर, काना, मात्रा, विसर्ग यात बदल करणे शक्य नाही. ते कोणालाही व्याकरणदृष्ट्यासुद्धा शक्य नाही. कारण ऋग्वेद, यजुर्वेद या वेदांसाठी 'प्रातिशाख्य' नावाचे स्वतंत्र व्याकरण  आहे.


सहस्रावधी वर्षापासून ही  'गुरुशिष्य वेदाक्षर ब्रह्म कंठस्थ परंपरा'  अव्याहत चालू आहे. ही परंपरा ब्रह्मवृंदानी प्राणापलीकडे जपली आहे. अपरंपार परिश्रम घेऊन स्वतः जतन करून पुढील पिढीला दिली आहे. ब्राह्मणांची अरण्यात राहून, अर्धवस्त्रे लेऊन, निष्कांचन अवस्थेत सहस्रावधी वर्षे अव्याहत जी ज्ञानोपासना केली, ज्ञानासाठी सर्वस्वाचा होम केला त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही! 



धन्य भारतभूमी, धन्य ती गुरुशिष्य परंपरा, धन्य त्यांची ज्ञानोपासना..



🙏🏽🙏🏽🙏🏽


लेखकः  दिवाकर बुरसे, पुणे

संपर्कः ९२८४३००१२५

          ९५५२६२९२४५

          (३१ मे २०२४)


🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi