*🙏🏻🙏🏻*आई**🙏🏻🙏🏻
लहानपणी वाचलेली एक गोष्ट आठवली. वयात आलेला तरुण मुलगा मुलीच्या प्रेमात पडतो. त्याची प्रेयसी त्याचे तिच्यावरचे प्रेम सिद्ध करण्यासाठी त्याला अट घालते की तुझ्या आईचे हृदय मला घेऊन ये. आई कुठलीही तक्रार न करता मुलासाठी मरावयास तयार होते. तिचे ते काढलेले हृदय घेऊन मुलगा प्रेयसीच्या घराकडे धावत जात असतो रस्त्यात ठेचकाळतो, पडतो तेव्हा हातातल्या हृदयातून शब्द येतात " बाळा तुला कुठे लागलं तर नाही ना? " ही कथा जरी काल्पनिक असली तरी आईच्या ओतप्रोत प्रेमाची महती सांगणारी आहे. जवळच्या नात्यांमधले सर्वात निरपेक्ष नाते म्हणजे आई आणि मुलाचे आणि म्हणूनच विविध भाषांमधल्या अक्षर साहित्यात आणि काव्यात अशी एखादीच भाषा असेल ज्या भाषेत आईबाबतचे लिखाण नाही. परमेश्वर प्रत्येक माणसापर्यंत पोचू शकत नाही आणि म्हणूनच त्याने आईची निर्मिती केली. "आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही " हे मराठी चित्रपटातील गीताचे शब्द आपल्या मनाला भिडतात. महाविद्यालयीन जीवनात असताना मैक्सिम गोर्की या रशियन भाषेच्या कवीची आई नावाची जगप्रसिद्ध कादंबरी वाचनात आली होती जीचे १०० च्या वर भाषांमध्ये भाषांतर झाले. आई मुलासाठी आयुष्यभर करत असलेल्या त्यागामुळे राष्ट्राला पितृभूमी न म्हणता मातृभूमी म्हणत असावेत. कळायला, समजायला लागल्यानंतर कानावर रेडिओवरचे आईविषयीच्या काव्याचे लता दीदींचे मन व्याकूळ करणारे स्वर कानावर पडायचे. आई जिवंत असताना ती नजरेसमोर असल्याने तिची महती कधीच लक्षात येत नाही.पण आई सोडून गेली की आईच्या पश्चात तिच्या बद्दलच्या आठवणी आठवतात, व्याकूळ करतात आणि आपल्या अख्ख्या आयुष्याला सर्वत्र व्यापून सुद्धा त्या उरतातच. तीच ही आईच्या आठवणीची कविता.
प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिन्धु आई !
बोलावुं तूज आता मी कोणत्या उपायी(?) ।
तू माय, लेकरूं मी; तू गाय, वासरूं मी;
ताटातुटी जहाली आता कसे करूं मी ?।
गेली दुरी यशोदा टाकूनि येथ कान्हा,
अन् राहिला कधीचा तान्हा तिचा भुका ना ?॥१॥
आई तू मला या जगात मला एकटा टाकून सोडून गेलीस. गायीची आणि वासराची ताटातूट होते तसं माझं झालं आहे. कृष्णाला गोकुळात एकटं टाकून जेव्हा यशोदा दूर निघून जाते तेव्हा कितीतरी वेळ कृष्ण भुकेला राहतो असे माझे झालेले आहे. असा कुठला उपाय मी करू की त्यामुळे तू परत येशील.
तान्ह्यास दूर ठेवी- पान्हा तरीहि वाहे -
जाया सती शिरे जी आगीत, शान्त राहे ।
नैष्ठुर्य त्या सतीचें तू दाविलेस माते,
अक्षय्य हृत्प्रभूचें सामीप्य साधण्याते ॥२॥
गाईपासून वासरू दूर असले तरी केवळ त्याच्या आठवणीने तिचा पान्हा वाहत असतो पण इथे तर आई नाही. सती जाण्यासाठी स्वतः होऊन अग्नीत प्रवेश करून जी शांत चित्ताने अविचल राहते त्या पतिव्रता सतीचे नैष्ठुर्य म्हणजे निष्ठुर वाटणारे मनाचे निश्र्चयात्मक रूप तू दाखवलेस. आई केवळ हृदयस्थ परमेश्वराच्या सन्निध म्हणजे जवळ जाण्यासाठी.
नाही जगांत झाली आबाळ या जिवाची,
तूझी उणीव चित्तीं आई, तरीहि जाची ।
चित्तीं तुझी स्मरेना काहीच रूपरेखा,
आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका ॥३॥
आई तुझ्या पश्चात माझी काही आबाळ झाली असे देखील नाही पण तरीदेखील तुझी उणीव मला क्षणोक्षणी आणि पावलोपावली जाचत होती. मनामध्ये तुझी आठवण येत असताना, तू काही केल्या नजरेसमोर येत नव्हतीस पण तरीही तू मला पुन्हा हवी आहेस हा माझा हट्ट माझं मन काही केल्या सोडायला तयार नाही.
विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,
आईविणे परी मी हा पोरकाच राहीं ।
सारें मिळे परन्तु आई पुन्हा न भेटे,
तेणे चिताच चित्तीं माझ्या अखण्ड पेटे ॥४॥
आई तुझ्या पश्चात ज्याला लौकिकार्थाने मोठा झाला असे म्हणतात असा मी खरोखर मोठा झालो, उच्च विद्या विभूषित झालो, गर्भश्रीमंत झालो, समाजात मला प्रतिष्ठा लाभली हे सगळे मिळूनसुद्धा मी पोरकाच राहिलो ग!!सारे काही मिळून सुद्धा आईची पुनर्भेट होत नाही त्यामुळे माझ्या मनात विचार कल्लोळांच्या चिंतेची चिताच अखंड पेटलेली आहे.
आई,तुझ्या वियोगें ब्रह्माण्ड आठवे गे !
कैलास सोडुनी ये ऊल्केसमान वेगें ।
किंव्वा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,
अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती ॥५॥
तुझ्या वियोगामुळे ब्रह्मांड आठवते . मला माहिती आहे तू नक्कीच परमेश्वराच्या पायाशी कैलास पर्वतावर आहेस. परंतु तारांगणातील उल्का जशी वेगाने पृथ्वीवर येते तशी तू मला भेटण्यासाठी ये किंवा तुझा विदेह म्हणजे देह नसलेला आत्मा माझ्या सभोवती फिरतही असेल आणि माझ्यावर अव्यक्त न दिसणाऱ्या अशा तीर्थ स्वरूपाच्या अश्रूधारांची तू बरसात करत असशील.
ही भूक पोरक्याची होई न शान्त आई,
पाहूनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांहीं ।
वाटे ईथूनि जावें, तूझ्यापुढे निजावें,
नेत्रीं तुझ्या हसावें, चित्तीं तुझ्या ठसावें ॥६॥
आई तुझ्या पश्चात मी पोरका झालो आणि इतरांचे आईवरचे वात्सल्य बघून माझी तुझ्या प्रेमाची भूक शांतच होत नाही. असं वाटतं इथलं सारे सोडून निघून जावे. तुझ्या डोळ्यात डोळे घालून हसावे, बोलावे, तुझ्या मनात शिरावे.
वक्षीं तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोकें,
देईल शान्तवाया हृत्स्पन्द मन्द झोके ?।
घे जन्म तू फिरूनी, येईन मीहि पोटीं,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी ॥७॥
आई तुझ्या वक्षावर स्थिरपणे डोके ठेवून तुझ्या हृदयाचे शांत शांत मंद ठोके ऐकत माझे मन केव्हा झोके घेईल? तू पुन्हा एकदा जन्म घे आणि मलाही तुझ्या पोटीच जन्माला येऊ दे. परमेश्वरा, ही माझी एक मोठी आस खोटी ठरू नये ही प्रार्थना!!
मनाला व्याकूळ करणारे या गाण्याचे स्वर जेव्हा कानी पडतात, तेव्हा गर्भात नऊ महिने आणि त्या नंतर जिवंत असेस्तोवर आपली सगळी काळजी घेणारी आई साक्षात आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. गाय जेव्हा तिला लुचणाऱ्या वासराला प्रेमाने चाटते तेव्हा तिच्यातील आई वासरावर जीव टाकत असते. वासरू दूर गेले की गाय हंबरते. कदाचित म्हणूनच तिला गोमाता म्हणत असावेत. आई ही अशीच असते. आपल्या प्रत्येकाच्या मनात आईबद्दलच्या आठवणी सदैव व्यापून असतात.आपल्या आईच्या आठवणी शब्दांत उतरवणारे हे काव्य आहे.
कवी माधव ज्युलियन यांनी सुमारे १०० वर्षांपूर्वी हे सुंदर काव्य लिहिले आहे. कवी कै.माधवराव पटवर्धन यांचा जन्म बडोद्यामध्ये २१ जानेवारी १८९४ साली झाला. त्यांनी फारसी आणि इंग्रजी साहित्यामध्ये BA आणि MA या पदव्या मिळवल्या. फारसी भाषेचे ते प्रकांड पंडित आणि त्यामुळेच MA ची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर सुमारे ११ वर्ष कोल्हापुरातील राजाराम कॉलेज येथे फारसी भाषा शिकवायचे काम केले. त्यांनी १९२६ साली फारसी - मराठी शब्दकोश लिहिला. छंदोरचना हा त्यांचा पीएचडी चा प्रबंध जर्मनी मधील विद्यापीठात त्यांनी सादर केला. त्यांच्या 'छंदोरचना' या पुस्तकामुळे मुंबई विद्यापीठाची त्यांना डॉक्टरेट मिळाली. मराठी साहित्यासाठी डॉक्टरेट मिळवणारे भारतातील ते पहिलेच साहित्यिक. १९३६ साली ते जळगाव येथील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी मराठी काव्य हे पंतकवी आणि संतकवी पुरतेच मर्यादित होते. परंतु केशवसुत, भा. रा. तांबे आणि माधवराव पटवर्धन अशा कवींनी प्रेम काव्ये मराठी साहित्यात लिहायला सुरुवात केली. आईची आठवण हे त्यांचे वरील काव्य 'गजलांजली' या पुस्तकातील आहे. त्यांनी 'खंडकाव्य' नावाचे २३४ श्लोकांचे पुस्तक देखील लिहीले. सामाजिक सुधारणांचा उद्देशाने त्यांनी 'सुधारक' नावाचे पुस्तक देखील लिहिले. इंग्रजी भाषेतले कवी शेले यांच्या ज्युलियन आणि मडालो या कवितेवरून त्यांनी ज्युलियन असे टोपण नाव धारण केले. परंतु पुण्यात त्यांचा ज्युलियन नावाच्या मुली बरोबर प्रेमभंग झाला म्हणून तिची आठवण म्हणून माधव ज्युलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती प्रसिद्ध होती. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धन यांना देण्यात येते. १९२० च्या दशकात पुण्यातील काही समविचारी कवींनी एकत्र येऊन रविकिरण मंडळ स्थापन केले होते. रविकिरण मंडळातर्फे कविता वाचनाचे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असत या कवींमध्ये कवी कै.माधव ज्युलियन अग्रेसर होते.
माधव ज्युलियन यांचे हे करुण काव्य संगीतकार कै. वसंत प्रभू यांनी सारंग रागात संगीतबद्ध केले आणि कै. लता दीदींनी आपल्या सुस्वरात या कवितेचे अजरामर गीत केले. आजही या गाण्याचे स्वर कानी पडले की मनात आईच्या आठवणी जाग्या होतात.
विद्वत्ता, तर्ककुशलता, वाक्पटुता व ठाशीव वाणी यांचा सुंदर संगम कवी कै. माधव ज्युलियन यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्या काळात अनेक मराठी कवींचे अकाली निधन झाले. बालकवी २८व्या वर्षी गेले, राम गणेश गडकरी ३४ व्या वर्षी गेले, केशव सुतांचे ३८ व्या वर्षी निधन झाले. कै.माधवराव पटवर्धन यांचे देखील वयाच्या ४५ व्या वर्षी अकाली निधन झाले. मृत्यूच्या शेवटच्या क्षणी देखील माधवराव प्रसन्न चित्त होते असे म्हणतात. अगदी शांत मनाने व उत्सुक अंत:करणाने त्यांनी
"मृत्यो, सुंदरता तुझी तरी बघू दे,
हो सखा शेवटी"
असे म्हणत मृत्यूच्या हातात हात घालून माधवराव दिनांक २९ नोव्हेंबर १९३९ च्या रात्री हे जग सोडून गेले.. नव्हे मराठीतील उच्च विद्याविभूषित, विद्वान, व्यासंगी अशा एका भाषा प्रभूचे त्या रात्री निधन झाले. माधवरावांच्या अंत्ययात्रेला ओंकारेश्वरावर प्रचंड गर्दी झाली होती. कै.माधव ज्युलियन उर्फ माधवराव पटवर्धन यांच्या स्मृतींना शतश: वंदन!!
श्री. प्रदीप टिल्लू.
वकील, ठाणे.
९८६९२६४१७९
ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदा
शके १९४६
No comments:
Post a Comment