वेळेचे योग्य नियोजन हाच यशस्वी जीवनाचा मंत्र
नाशिक, दि. ५ : वेळ हा विद्यार्थ्यांचा चांगला मित्र आहे. वेळेचा कार्यक्षमतेने वापर करून योग्य नियोजन केल्यास जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळवता येते. ज्ञानाचा विस्तार करण्यासोबतच उद्दिष्टे निश्चित करणे, कौशल्ये सुधारणे आणि खुल्या संधीचा पुरेपूर वापर करण्यासाठी आतापासूनच वेळेचे नियोजन करावे, असा संदेश राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांना दिला.
संदीप विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ राज्यपाल श्री. बैस यांच्या उपस्थितीत आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संदीप विद्यापीठाचे कुलगुरू पंडित नित्यानंद झा, चेअरमन डॉ. संदीप झा, उपकुलगरु डॉ. राजेंद्र सिंन्हा, माजी खासदार प्रभात झा, अलोक झा, आर्यन झा उपस्थित होते.
राज्यपाल श्री. बैस म्हणाले की, या व्यासपीठावर सर्व यशवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना आनंद होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकाविले आहे, त्यांचेदेखील यावेळी विशेष अभिनंदन करतो. अशा कार्यक्रमांमधूनच आजच्या युवा पिढीशी संवाद साधता येतो. देशाचे भविष्य तरुणांच्या हाती आहे. ही तरुण पिढी उद्याच्या भारताचे नेतृत्व करणार असून आज मिळालेल्या पदवीच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवणार आहे. संदीप विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि विद्यापीठावर देश घडविण्याची मोठी जबाबदारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. भारताच्या सुवर्ण युगाची सुरुवात करण्यात आजची ही युवा पिढी महत्वाची भूमिका बजावणार, यात शंका नाही. आज विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधण्यासाठी विविध क्षेत्रांची कवाडे खुली झाली आहेत. विद्यार्थ्यांची मेहनत आणि अभ्यासाप्रती असलेले समर्पण आज ज्या स्थानावर घेऊन गेले आहे. याचे श्रेय विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या प्राध्यापक आणि पालकांना जाते. आता, तुम्ही सर्व करिअरच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहात. प्रत्येक दिवस नवीन आव्हाने आणि नवीन धडे घेऊन येईल. ही आव्हाने संधी म्हणून स्वीकारण्यास सज्ज व्हा, असे आवाहनही राज्यपाल श्री. बैस यांनी विद्यार्थ्यांना केले.
ध्येय ठरवतांना अपयशी होण्यास घाबरू नका. अपयश हा जीवनाचा एक भाग आहे, जीवनाचा शेवट नाही. त्यामुळे अपयशापुढे खचू नका. जगातील यशस्वी लोकांच्या जीवनाचा प्रवास पाहिल्यास, समजते की अपयश हे त्यांच्या जीवनाचा देखील एक भाग आहे. पण त्यांनी त्या अपयशाला संधी म्हणून स्वीकारले आणि त्याच संधीच्या बळावर त्यांनी यश संपादन केले आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमधील क्षमता, कौशल्ये आणि ज्ञान जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचे जतन करणे आवश्यक आहे. निरोगी आयुष्य जगण्यासाठी करिअरसोबतच मानसिक आरोग्याची ही काळजी घ्या. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० देशाच्या परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांच्या आधारे बनवले गेले आहे. या शैक्षणिक धोरणाने आकांक्षी उद्दिष्टांसह विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शिक्षण पद्धतीत सुधारणा आणि पुनर्रचना करण्यात आली आहे. हे नवे शैक्षणिक धोरण प्राचीन आणि शाश्वत भारतीय ज्ञान आणि विचारांच्या समृद्ध परंपरेवर आधारित आहे. भारतीय विचार परंपरा आणि तत्वज्ञानात ज्ञान, शहाणपण आणि सत्याचा शोध हे नेहमीच सर्वोच्च मानवी ध्येय मानले गेले असल्याचे राज्यपाल श्री. बैस यांनी सांगितले.
चेअरमन श्री. झा यांनी मार्गदर्शन केले. पंडित नित्यानंद झा व प्रभात झा यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाचे उप कुलसचिव श्री. बाविस्कर यांनी विद्यार्थ्यांना पदवीदानाची शपथ दिली. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी व सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले.
0000
No comments:
Post a Comment