📚 वाचनीय 📚
' दुपारी तीनची वेळ. रमेश माझ्याजवळ आला.जवळ घेऊन म्हणाला," मृदुला, मी सगळं संपवायचं ठरवलंय.आयुष्याला आज पूर्णविराम देतोय." मी त्याच्याकडे पाहून म्हटलं, " मलापण तसंच वाटतंय.नाही जगायचं मला पण."
भूतपूर्व न्यायमूर्ती मृदुला रमेश भाटकर यांच्या ' हे सांगायला हवं ' या पुस्तकातील 📖 हा उतारा. आपल्या पतीवर झालेला बलात्काराचा खोटा आरोप व त्याविरोधात दिलेला लढा याची माहिती या पुस्तकात दिली आहे.
रमेश भाटकर हे एक मराठी रंगभूमी,चित्रपट, टीव्हीवरील नामवंत अभिनेते. अचानक एक दिवस त्यांच्यावर बलात्काराचा आरोप झाला .नेहमीप्रमाणे प्रसिद्धी माध्यमांनी बातमीची शहानिशा न करता रमेश भाटकरांना दोषी ठरवलं. त्यांचं जगणं हराम करून सोडलं. हे सारं रमेश व त्यांच्या न्यायाधीश पत्नीला सहन झालं नाही आणि अखेर जोडीने त्यारात्री रेल्वेखाली जीव देण्याचं त्यांनी ठरवलं. रात्री अमेरिकेत असलेल्या मुलाला फोन करून त्याच्याशी शेवटचं बोलायचं आणि या जगाचा निरोप घ्यायचा असा बेत ठरवला.
रमेश त्यांच्या स्थावरजंगमाची यादी करायला बसले आणि अचानक फोनची घंटा वाजली.अचानक यासाठी की दोन दिवस फोन बंद होता. मृदुलांनी फोन उचलला, तर पलीकडे जस्टीस धनंजय चंद्रचूड (सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती) होते. ते म्हणाले , " मी आताच तुमची जजमेंट वाचून संपवली.मी व जस्टीस राधाकृष्ण जजमेंट तपासण्याच्या समितीत Very Good शेरा दिला आहे.तुम्ही हायकोर्टात बेंचवर येण्याची वाट पाहतो." तेव्हा मृदुला बोलून गेल्या, ' सध्या आम्ही अत्यंत निराश आहोत.' चंद्रचूड म्हणाले, " सगळं बोगस दिसतंय. चिंता करू नका. माझ्या तुम्हा दोघांना सदिच्छा."
हे ऐकून मृदुला थरारल्या. या कठीण परिस्थितीत कोणीतरी आपल्यावर विश्वास ठेवतोय हे सारं उमेद वाढवणारं होतं. त्यांनी सारं संभाषण रमेशना सांगितलं. ठरवलं. आपण लढायचं. सारं काही अजून संपलं नाही. ' काळाचे चक्र फिरेल, संपेल रात्र संपेल ' या आशावादाने ते दोघे या संकटाला सामोरे जाण्यास सज्ज झाले.
हे सारं घडलं,तेव्हा मृदुला भाटकर मोक्का कोर्टाच्या न्यायाधीश होत्या.मुंबई लोकल साखळी बाॅंब स्फोटाचा खटला त्यांच्यासमोर चालू होता.या संदर्भातील जजमेंट संबंधी चंद्रचूड यांचा ' तो ' फोन होता. पण हा खटला चालवत असतानाच अचानक त्यांची तेथून कोल्हापुरला बदली झाली. तेथे जाण्याच्या तयारीत असताना ही बलात्काराची बातमी सर्वत्र पसरली आणि पुढे दोघांच्या आयुष्याची दहा बारा वर्षे विस्कळीत होऊन गेली. प्रसिद्धी माध्यमांनी तर ताळतंत्र सोडून भाटकरांवर नाना तऱ्हेचे गलिच्छ आरोप करायला सुरुवात केली होती. एफआयआरमध्ये कुठेही त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप नसताना बिनदिक्कतपणे ' बलात्कारी रमेश ' म्हणून प्रतिमा रंगवली. यामुळे समाजात बाहेर तोंड काढणं कठीण होऊन बसलं आणि त्याचमुळे कंटाळून दोघांनी आयुष्य संपवायचा निर्णय घेतला होता. चंद्रचूडना त्यावेळी ठाऊक नव्हतं की आपल्या एका फोनने आपण दोघा निरपराध व्यक्तींचे जीव वाचवले आहेत !
सर्वसाधारण स्त्री जे करेल, तेच मृदुलांनी केलं. त्यांनी रमेशना हे प्रकरण काय आहे ते विचारलं. त्यांनी आपणं असं काही केलेलं नाही हे सांगितलं.गेली २९ वर्ष रमेशबरोबर त्यांनी संसार केला होता. त्यांचाही रमेशवर विश्वास होता, पण एकवार खात्री करून घेतली होती. ही बातमी प्रसिद्ध झाली, तेव्हापासून
मृदुलांना वारंवार वाटतं होतं, की या प्रकरणात रमेश फक्त प्यादं आहे.खरे लक्ष्य आपण आहोत. हा जो कोणाचा अदृश्य हात आहे, तो त्यांनी शोधायचा ठरवला. त्यावेळी त्यांना जळगाव वासनाकांडाचा खटला आठवला. हा खटला त्यांच्यासमोर असताना सरकारी दबावाला भीक न घालता त्यांनी तो खटला चालवला होता. त्याचीच किंमत तर आज चुकती करावी लागतं नाही ना, असा त्यांना संशय येत होता.
१९८८पासून जळगावमधील तरुण व अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्यावर बलात्कार केले गेले होते. त्यासंबंधी १९९४ मध्ये या प्रकरणाला वाचा फुटली. अनेकांना पकडण्यात आलं. त्यातील काही सत्ताधारी पक्षाशी संबंधित होते. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी आदेश दिल्याप्रमाणे त्या वेगाने खटल्याचं कामकाज चालवत होत्या. त्यावेळी त्यांच्यावर अनपेक्षितपणे अनेक ठिकाणांहून दबाव येऊ लागला. एके दिवशी त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बातमी ' लोकसत्ता ' या दैनिकात प्रसिद्ध झाली.मृदुलांनी ती बातमी मुख्य न्यायमूर्तीच्या निदर्शनास आणली व त्यातील सर्व माहिती खोटी असल्याचं सांगितलं.न्यायालयाचा अवमान झाल्याप्रकरणी 'लोकसत्ता'वर खटला भरण्यात आला. त्या दैनिकावर नामुष्कीची पाळी येऊन न्यायालयाची त्यांना माफी मागावी लागली व तसा खुलासा दैनिकातून प्रसिद्ध करावा लागला. जेव्हा एक खटला अंतिम निर्णय देण्याच्या टप्प्यावर आला, तेव्हा सरकारी वकील निकालपत्र पुढे ढकलण्याची विनंती करू लागले.नेमकं त्याच वेळी एक ओळखीची आय.एस.एस.अधिकारी ' हा संवेदनशील खटला आहे, तेव्हा सावकाशीने काम कर ' असा सल्ला देऊ लागली. हे कमी म्हणून की काय मुख्य न्यायमूर्तींनी पण भेटायला बोलावलं. तेव्हा पुण्याहून मुंबईला जात असताना गाडीत दोघा इसमांच्या बोलण्यावरून त्यांच्या लक्षात आलं की विधानसभेची निवडणूक १२ फेब्रुवारीला आहे. आणि त्या निकाल त्या तारखेअगोदर देणार होत्या. त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की कोणीतरी राजकारणी या निकालामुळे फटका बसू नये म्हणून खटल्याचा निकाल पुढे कसा जाईल हे पाहत आहे. त्या सावध झाल्या. मुख्य न्यायमूर्तीनी पण आडवळणाने तो खटला लांबणीवर टाकण्याचा सल्ला दिला. पण लेखी आदेश देत नव्हते.त्यामुळे या दडपणांना भीक न घालता, मृदुलांनी तो खटला चालवण्याचं ठरवलं, तर अचानक उच्च न्यायालयाने खटल्याला स्थगिती दिली.
मृदुलांना वाटतं होतं की हे दुखावलेले राजकारणी आज सूड घेत आहेत. आपण त्यांच्या पायाशी लोळण घ्यावी, या अपेक्षेत आहेत. म्हणजे आज उपकार करून पुढे कधी तरी या उपकाराची पुरेपूर परतफेड करून घेता येईल. पण यास दाद न देण्याचं त्यांनी ठरवलं.
या निर्णयामुळे नाना प्रकारच्या संकटांना त्यांना तोंड द्यावं लागलं. ' बलात्काऱ्याची बायको ' म्हणून मृदुलांना त्यांच्या बारकडून साधा निरोप समारंभही देण्यात आला नाही. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना टाळलं. कोल्हापुरात असताना न्या. चंद्रचूड व न्या. अभय ओक दोघे तेथे एका कामासाठी आले होते. रिवाजाप्रमाणे या दोघांना व तेथील सहकारी न्यायाधीशांना मृदुलांनी बंगल्यावर जेवायला बोलावलं. यावेळी रमेश बंगल्यात असतानाही त्या मेजवानीत ते सामील होऊ शकले नाहीत.ते एकटेच बेडरूममध्ये जेवले. मृदुलांची उच्च न्यायालयात नेमणूक झाल्यावर झालेल्या शपथविधीसाठी पण रमेश हजर राहू शकले नाहीत. कारण जेथे न्यायाधीश उपस्थित आहेत, त्या सभारंभाला रमेशसारख्या ' गुन्हेगारा' ची उपस्थिती अशी बातमी प्रसिद्ध होणं साऱ्यांना अडचणीत टाकणारं होतं. पुढे रमेशची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. तेव्हा मुलाचं लग्न करायचं ठरलं. तेव्हाही स्वागत समारंभाला न्यायाधीशांना आमंत्रित करायचं की नाही या द्विधा मनस्थितीत त्या होत्या.पण शेवटी त्यांनी सहकाऱ्यांना आमंत्रण दिलं. पुष्कळसे न्यायाधीश हजर राहीले. पण तेथेही रमेशचा त्यांच्याशी संबंध येणार नाही याची दोघांनी काळजी घेतली. सारी कोंडीच या दोघांची झाली होती.
यावेळी त्यांचे कुटुंबीय व विजय गोखले आणि विनय येडेकर हे मराठी रंगभूमीवरील कलाकार त्यांच्या पाठीशी उभे राहिले . मृदुलांचे वडील न्यायाधीश प्रताप बेहरे, ( हे पुस्तक वाचल्यावर लगेचच प्रताप बेहरे यांचं ' मी एक न्यायाधीश ' हे पुस्तक वाचण्यात आलं.) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.डी. तुळजापूरकर हे मामे आजोबा यांची शिकवण, मामेभाऊ प्रख्यात वकील वीरेंद्र तुळजापूरकर यांचं सततचं मार्गदर्शन यामुळे ते या संकटाशी मुकाबला करू शकले.
या पुस्तकातून रमेश भाटकरांचं एक संवेदनशील,प्रेमळ व्यक्तिमत्त्व पाहायला मिळतं.आपण वकील झालो, त्याचं सारं श्रेय त्या रमेशना देतात.एल.एल.बीची तिसऱ्या वर्षीची परीक्षा असताना रमेश छोट्या हर्षवर्धनला सांभाळून त्यांना अभ्यासाला वेळ देत. ' जेव्हा लग्न झालं, त्या दिवशी रमेशच्या खात्यात फक्त सोळा रुपये होते.पण संसार मात्र सोळा आणे झाला ' असं त्या अभिमानाने लिहितात. या ' लढाईच्या काळात ' मृदुला सांगतील त्याप्रमाणे ते वागत होते.
त्यांची ही कहाणी वाचत असताना पुष्कळशी न्यायालयीन प्रक्रिया कळते. न्यायाधीश आणि न्यायमूर्ती यांतील फरक कळतो. कोर्टाचा अवमान, एकेका न्यायाधीशाची खटला चालवण्याची पद्धत, लेखी आदेशाची किंमत,उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नेमणुकीची प्रक्रिया, नंतर राष्ट्रपतींकडून येणारं नेमणुकीचं वाॅरंट याची माहिती मिळते. आपल्यावर टीका होत असतानाही कायद्याच्या बंधनामुळे त्यांना आलेली हतबलता याचं ज्ञान होतं.
एवढं सारं भोगूनही मृदुला जेव्हा लिहितात, की ' या सगळ्या काळात आम्ही दोघांनी आनंदानं काळ घालवला कारण आमची आमच्या कामावरची श्रद्धा व प्रेम ', तेव्हा त्यांच्या खंबीर मनाचं कौतुक करावसं वाटतं.
अशा वेळी आठवतात सुरेश भटांच्या गाण्याच्या ओळी,
' भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले ! '
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणारी पत्रकारिता जेव्हा बेजबाबदारपणे वागते, तेव्हा त्या संबंधित व्यक्तीची आणि त्याच्या कुटुंबाची काय घुसमट होते, हे कळण्यासाठी तरी ' हे सांगायला हवं '
हे वाचनीय पुस्तक वाचायलाच हवं.' हे सांगायला हवं म्हणून हा खटाटोप.
नक्की वाचा.
प्रदीप राऊत
🖋️🖋️🖋️
No comments:
Post a Comment