माझ्या भगिनी सौ स्नेहा भागवत, चिपळूण यांनी लिहिलेला उत्कृष्ट लेख, गंध आठवणीतले!
(चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या "स्नेहबंध" या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला माझा लेख)
माझे गंध - विश्व
सुवासाच आणि माणसाचं एक अतूट नातं आहे.. जशा आपल्या जाणीवा काळाच्या ओघात विकसित होत जातात तसा त्या त्या वेळच्या सुगंधातले भावार्थ आपल्या मनात दरवळून निघतात. आठवणी गणिक कधीही मनसोक्त हुंगावेत...
रंग,चव ,स्पर्श,नाद आणि गंध. रंग हे दीर्घकाळ फोटोत कैद राहतात.चवही काही काळ मनात रेंगाळते.स्पर्श काहीसे पुसट होत जातात ,नाद मनात काही काळ गुंजन करतात ...पण गंध मनाच्या खोल कप्प्यात दडून बसतात..आपले श्र्वसनेंद्रिय सुमारे ५०००० प्रकारचे गंध /वास लक्षात ठेवू शकत,हे विज्ञानाने शोधून काढलय. ह्या वाक्याचा मागोवा घेताना माझं मन अर्थातच भूतकाळात रमलं... तिथे ठाण मांडून बसले आहेत काही ठळक गंध ..अगदी लहानपणापासून नकळत्या वयात भावलेला वास म्हणजे ओल्या गवताचा वास. बालपणी अनुभवलेला ओलसर रानवट वास रानगंध अजूनही मनात भरून राहिला आहे.माझी प्राथमिक शाळा आमच्या घरापासून दूर होती..चालत जावं लागे.मैत्रिणीचा चिमुकला हात हातात घेऊन रमत गमत शाळेत जाताना नकळत पणे आमचं निसर्ग वाचन सुरू असायचं.जून महिन्याच्या सुरवातीला कुठेतरी दूर पडलेला पाऊस आम्हाला कळे तो खरपुस मृद्गंध दरवळल्यावरच...पहिल्या पावसाच्या त्या अनुपम गंधाची सर कुठल्याच
गंधाला नाही.तरीही या विश्र्वातील प्रत्येक गंध मला खुणावतो..आमच्या शाळेच्या गेट वर प्राजक्ताच झाड होत..सकाळची शाळा, तो हवेतला मिश्र नैसर्गिक पानाफुलांचा वास आणि त्यात मिसळलेला तो प्राजक्त फुलांचा स्वर्गीय वास..आजच्या घडीला पुन्हा ते सुख आपण घेऊ शकत नाही...कारण काळ खूप पुढे गेला..आयुष्यात असच होत काहीसं..काही गंध तसेच हवेत विरून जातात... छोट्या च असतात गोष्टी कधीकधी .अगदीच नगण्य.पण विसाव्याच्या क्षणी नेमक्या आठवतात..आम्ही मैत्रिणी १२ वी ते bsc ला असताना हॉस्टेल ला राहायचो. तेव्हा दुपारी दोन वाजता प्रॅक्टिकल सुटायच फॉर्मलिन, असिटोन, सल्फरडाय ओक्साईड असे भयंकर वास घेऊनच . रूम वर येऊन आम्ही त्या बंद खोलीचा वास घालवायचो ते पानडी नावाची उदबत्ती लावून.त्याच ब्रँड ची उडबत्ती हवी असा आमचा आग्रह असायचा. मग गरम गरम मॅगी करायचो. तीव्र भुकेच्या वेळी सुद्धा त्याचा तो मिश्र गंध आजही मनात दरवळतो.. आता तर त्या मैत्रिणींची भेट्सुद्धा होत नाही..गंध मनात ठेवून चिमण्या चार दिशांना आपापल्या घरट्यात उडून गेल्या.
आई रव्याचे- बेसनाचे लाडू करून द्यायची.पण बस मधून येताना त्याला एक वेगळाच वास लागायचा.आम्ही त्या वासाला *प्रवासी वास* अस नाव ठेवलं होत.
गणेश चतुर्थीच्यादरम्याने भात पिकाला फूलं येत असत..खूप दिवस मला ते फुल कधी दिसलच नाही..कारण ते आकाराने खूप लहान असत..मग त्या वासाचा शोध घेता घेता त्या नाजूक फुलाचा शोध मला लागला.दिवाळीतील पदार्थांचा खमंग गोडसर तळणीचा वास त्याची चव चाखण्यापूर्वीच नाकात शिरलेला असायचा .उटण्याचा, सुगंधी तेलाचा, मोती साबणाचा तो मोहक गंध दिवाळीची रंगत वाढवायचा..फटाके फोडल्यावरचा तो जळका वासही मनात ठाण मांडून बसला आहे..
गंध कोऱ्या पुस्तकाचा,पुस्तकात ठेवलेल्या बकुळीच्या गजऱ्याचा. अगदी उकळत असणाऱ्या चहाचा हवाहवासा गंध,कधी उदास सायंकाळी कॉफीचा दरवळ जीव मोहरतो नुसता... ..हा गंधवेडा जीव कुठे कुठे अडकतो.!!
ब्रुट नावाचं एक अत्तर आहे .ते लेडीज की जेंट्स या फंदात न पडता मी आवडलं म्हणून बिनधास्त वापरलेलं आहे.आता समजत की अत्तर सुद्धा वेगवेगळ असत..पण अजून कधी तो ब्रुट चा वास आला तर मन अलगद मागे रमून जात.
नव्या कोऱ्या साडीचा वास असो.की कॉस्मेटिक्स चा वास!! मनभावन गंध आहेत
श्रावण महिन्यातील धूप, कापूर उदबत्तीचे सात्विक वास,हळदीच्या पानातील उकडीच्या सुबक मोदकांचा दरवळ,
मार्गशीर्ष महिन्यात पडलेल्या दवाचा गंध. बागेतील फुलझाडावरची देवासाठी खुडून आणलेली फुल माझ्या हातावर वास ठेवून खुशाल देवाच्या चरणी रूजू व्हायची..
होळीच्या दरम्याने पेटलेल्या होमांचे वास,
चैत्र गौरी हळदी - कुंकू समारंभाच्या वेळचा जाई जुई मोगरा यांचा सुवास मनात अजूनही दरवळतो.
आंब्याच्या बागेतला -मोहोराचा वास,त्याच ऋतूत जंगलात कुठेतरी फुललेला सुवासिक करा (जंगली झाड)..किती दुरून मोकळ्या माळराना वरूनसुंगध
यायचा तो!!वाऱ्याच्या मंद झुळूकीना सुगंधाचं कोंदण!..समुद्राचा खारा वास.ताज्या मासळीचा वास, पेट्रोलचा वास ..हे सुद्धा आठवणीत रुतून बसलेत.. सगळ्या सुगंधी फुलांप्रमाणे निशिगंधाची आणि सोनचाफ्याची फुल मला खूपच आवडतात..
पुढे मी ठरवलं होत की माझ्या लग्नात निशिगंधाच्या फुलांचा हार असावा..त्या गंधाच्या साक्षीने जीवनातील महत्वाचा संस्कार पूर्ण करावा..पण प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशीची ती आई- वडील नातेवाईकांची लगीन घाई,सगळ्यांचे मोलाचे सल्ले,नवीन नवीन चेहरे, सासरच्या माणसांचे औत्सुक्य, आनंदाचे संवाद. आणि भटजींनी केलेली घाई. होमाचा डोळ्यात शिरणारा धूर, यात मी तो गंध नाकभरून घ्यायचं विसरूनच गेले.
नंतर पुढे काही काळ नव्या संसाराच्या नव्या जबाबदाऱ्या सांभाळताना गंध हे प्रकरणच विसरून गेले.बाळाच्या चाहुलींमधे तर काही वासांचा अक्षरशः त्रास होऊ लागला. नंतर मात्र धूप ,धुरीचा , बेबी पावडरचा, वेखंड पावडर चा असे काही नवेच गंध मला मोहवू लागले..
कधी इतरांच्या लग्नसमारंभात माळलेला मोगऱ्याचा गजरा हवाहवासा वाटू लागला.. स्री चं संपूर्ण आयुष्य हे गंधाने व्याप्त आहे .खाली गोव्याकडे , दक्षिण भारतात गेलो तर सगळ्या स्त्रियांच्या डोक्यात फुल माळलेली दिसणारच..खर तर सुगंध हे वाण आहे त्याची लूट करण म्हणजेच आनंदाची अनुभूती घेणं..आता मुलाबाळांच्या पुष्कळशा जबाबदाऱ्या कमी झाल्याने पुन्हा नव्याने मी माझं हे गंधवेड जोपासायच ठरवलं आहे..तर लेख लिहिण्याच कारण अस की परवा घटस्थापनेच्या दिवशी सकाळीच विंध्यवासिनीच्या मंदिरात गेले होते.मला एकदम
सोनचाफ्याची फुल घ्यावी अस वाटल.पण सोनचाफ्याची फुल अशी कुठे मिळणार अचानक ?
देवळात गेले..एक काकू विंध्यावासिनीच स्तवन गात होत्या .. सकाळी लवकर गेल्यामुळे अजिबात गर्दी नव्हती.मी डोळे मिटून स्तवन ऐकत होते..एवढ्यात मागून कुणीतरी आल..त्यांना गडबड असावी बहुतेक ..त्यांनी त्यांच्या हातातली भेट पुजाऱ्याकडे दिली ..देताना त्यातली दोन फुल माझ्या ओटीच्या ताटात पडली..ती चक्क
सोनचाफ्याची ताजी टपोरी सुवासिक फुल होती..मी देवीकडे भारावलेल्या डोळ्यांनी बघितल फक्त..
आणि पुन्हा एकदा नतमस्तक झाले..
©स्नेहा भागवत
No comments:
Post a Comment