जन्मत: कर्णबधीर बालकांवरील कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेचापाच लाख रुपयांवरील खर्च राज्य शासन करणार
- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत
मुंबई, दि. 3 : जन्मतः कर्णबधीर आढळलेल्या 12 वर्षे पर्यंतच्या बालकांवर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यासाठी किमान सात लाख रुपये खर्च येतो. महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार केले जातात. त्यापुढील अशा बालकांच्या शस्त्रक्रियेचा खर्चाचा भारही राज्य शासन उचलेल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत दिली.
सदस्य समीर मेघे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री प्रा.डॉ. सावंत यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले की, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी करुन मुलांमध्ये आढळणा-या जन्मतः असलेले व्यंग, लहान मुलांमधील आजार, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार व अपंगत्व इत्यादी बाबींचे वेळेवर निदान करुन त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात येतात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी स्तरावर 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांची वर्षातून दोन वेळेस व शासकीय व निमशासकीय शाळेतील 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीमध्ये मुलांमध्ये आढळून आलेल्या आरोग्य विषय समस्या किंवा अडचणीसाठी योग्य त्या संदर्भ सेवा व सर्व प्रकारचे वैद्यकीय व शल्य चिकित्सक उपचार हे पूर्णतः मोफत पुरविले जातात, अशी माहिती मंत्री प्रा. डॉ.सावंत यांनी दिली.
अलियावर जंग संस्थेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारशी प्रमाणे जन्मतः कर्णबधीर आढळलेल्या 12 वर्षे पर्यंतच्या बालकांवर कॉक्लिअर इम्प्लंट शस्त्रक्रिया करण्याची अनुमती 31 व्या कार्यकारी समितीच्या मंजुरीने देण्यात आली होती. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनानुसार एक ते पाच वर्षे वयाच्या बालकांकरीता रु.7 लाख आणि वय वर्ष 5 ते 18 वर्षांपर्यंतच्या बालकांकरीता रु. 6 लक्ष निधीची तरतूद आहे. केंद्र शासनाकडून आरबीएसके कार्यक्रमासाठी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यातील जन्मतः कानाने ऐकू न येणा-या लहान बालकांवर वय वर्ष 2 पर्यंत कॉक्लिअर इम्प्लट शस्त्रक्रिया करण्यात यावी, असे कळविण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत करण्यात येणा-या कॉक्लिअर इम्प्लेट शस्त्रक्रियेच्या खर्चाकरीता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार (आरबीएसके मॉडेल कॉस्टिंग ) रु. 5.20 लाख निधीची तरतूद आहे. त्यापुढील आर्थिक भारही राज्य शासन उचलेल, असे त्यांनी सांगितले.
माहे जून 2023 पर्यंत 844 बालकांवर कॉक्लिअर इम्प्लंट शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या आहेत. हा लाभ जास्तीत जास्त बालकांना होण्यासाठी Cochlear Implant] शस्त्रक्रिये करीता वयोमर्यादा वय वर्ष 5 पर्यंत वाढविण्याबाबत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयालयाकडे विनंती करण्यात आली असून त्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असल्याचे मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले.
000
No comments:
Post a Comment