Friday, 7 April 2023

साहेब , ह्या वयात कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून*.......

 *साहेब , ह्या वयात कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून*.......

---------------------------------------------------

*सायंकाळचे ५.३० वाजले होते. नेहमीप्रमाणे ऑफिसचे काम आटोपून घरी जायला निघालो. येताना एकदम लक्षात आले की "ड्रायक्लिंनींगला टाकलेले कपडे घ्यायचेत" . मग सागरला गाडी प्रोफेसर चौकाकडे घ्यायला लावली. चौकात आलो तर तिथे जैन बांधवांची महावीर जयंतीच्या मिरवणूकीची तयारी सुरू होती. त्यामुळे तेथील वाहतूक ठप्प झाली होती. "गजराज" च्या दुकानात जाणे देखील अवघड झाले होते. सागरने गाडी तशीच पुढे घेतली आणि श्री क्षीरसागर महाराज दत्त मंदिरापाशी गाडी लावून तो चालत चालत गजराज मधून कपडे आणायला गेला. गर्दी जास्त असल्यामुळे त्याला वेळ लागत होता. मी गाडीत बसून कधी थोडा मोबाईल पाहत होतो तर कधी आजूबाजूचे निरिक्षण करत होतो. तेवढ्यात समोरच मला "सायकलीवर भाजलेले शेंगदाणे विकणारे" एक बाबा दिसले. मला शेंगदाणे खायची इच्छा झाली. मी गाडीतून खाली उतरलो आणि बाबाच्या जवळ गेलो*. 


*आणि म्हटलं, "बाबा एक शेंगदाण्याची पुडी द्या, किती पैसे ?*


 *ते म्हणाले, "वीस रुपये".*

 *मी वीस रुपये दिले आणि शेंगदाणे चावायला सुरुवात केली. सागर येईपर्यंत त्यांच्याशी तिथेच गप्पा मारत उभा राहिलो.*


 *मी म्हटलं," बाबा तुमचं वय काय ?".बाबा म्हणाले,"८० वर्षे ".*


*बाबांचा रापलेला चेहरा त्यांनी आयुष्यभर केलेल्या कष्टाच्या खुणा दर्शवीत होता*.


*मी त्यांच्या जवळ गेलो तेव्हा ते खिशातील दहावीस रुपयांच्या नोटा व्यवस्थित लावत होते. त्यातलीच एक नोट खाली पडली होती. मी ती नोट उचलून त्यांना दिली.*


*बाबा म्हणाले,"गिरहाईक आलं की नोटांचा गोंधळ होतो. म्हणून वेळ मिळाला की मी नोटा अशा लावुन ठेवतो, साहेब.*


 *मग माझा पुढचा प्रश्न*


.*"किती पैसे मिळतात रोज?"* 


*ते म्हणाले, "पैसे किती मिळतात हे महत्त्वाचं नाही साहेब .पण माझा चार पाच तासाचा वेळ चांगला जातो आणि पाच-पन्नास रुपयांची रोजची कमाई देखील होते. त्यामुळे घरी जाताना माझ्या किरकोळ खर्चाची सोय माझ्या हाताने मी करतो. कधी नातवंडांसाठी खाऊ तर कधी म्हातारीसाठी काही बाही घेऊन जातो. त्यासाठी कुणासमोर हात पसरायची वेळ येत नाही. बोलता बोलता ते सांगू लागले, "साहेब, परवाचच उदाहरण. पलीकडच्या गल्लीत शेंगदाणे विकण्यासाठी मी उभा होता. एक आजी आपल्या नातवाला घेऊन आली आणि "शेंगदाणे द्या म्हणाली". तीने मला देण्यासाठी पैसे काढले. तेवढ्यात घरातून बाहेर आलेलं तिचं पोरगं तिच्यावर वसकलं ." कशाला फालतू पैसे घालवतेस. घरात शेंगदाणे नाहीत काय? "*


.*ती बाई नाराज झाली आणि तिने शेंगदाणे घेतले नाहीत.मात्र तिच्या चेहऱ्यावर "नातवाला शेंगदाणे देऊ दिले नाही, याच दु:ख दिसत होतं. काही वेळाने मुलगा गेला. आजीने स्वतःच्या हातात ठेवलेले पैसे मला दिले आणि नातवासाठी शेंगदाणे घेतले.*


*साहेब ,या वयात स्वाभिमानाने जगण्यासाठी फार पैसे लागत नाहीत.पण थोडे का होईना आपले हक्काचे असावे लागतात*. 


 *आता माझंच बघा. दोन मुल आहेत, सुना आहेत, माझी बायको आहे घरी. मी दररोज साडेचार पाच वाजता शेंगदाणे विकायला बाहेर पडतो. आणि रात्री साडेआठला घरी जातो. घरी गेलो की जेवण करतो आणि लगेच शांत झोपतो. सकाळी मात्र निवांत उठतो. मला शुगर नाही, बीपी नाही. कुठलाच त्रास नाही. काही दिवसांपूर्वी पोरांनी गुडघ्याचे ऑपरेशन करून दिलं. तेवढ्या गुडघ्याच्या गोळ्या चालू आहेत. पूर्वी सायकल चालवत शेंगदाणे विकत असे. आता गुडघ्याच्या ऑपरेशन मुळे सायकल चालवता येत नाही. म्हणून सायकल हातात धरतो आणि पायी चालत शेंगदाणे विकतो.*


*बाबा माझ्याशी भरभरून बोलत होते. बहुधा अनेक दिवसांनी कुणीतरी त्यांच्याशी अशा व्यक्तिगत गप्पा मारत होते* 


 *बाबा सांगत होते, "साहेब, रोज पाच सहा किलोमीटर मी चालतो. आणि त्यामुळेच माझी तब्येत ठणठणीत राहते. मला किती नफा मिळतो, याच्यापेक्षा या वयात कुणासमोर हात पसरायची वेळ येत नाही आणि स्वाभिमानाने जगता येतं, याच्यातच मला खरा आनंद आहे.*


 *प्रसंग छोटासाच*......

 *मात्र या छोट्या प्रसंगाने विचाराला चालना दिली. परत परत एकच वाक्य आठवत होते*,


*"या वयात कुणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये, साहेब "*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi