Thursday, 3 November 2022

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध

 सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी

निधी उपलब्ध करुन द्यावा

- पालकमंत्री शंभूराज देसाई

            मुंबई, दि. 2 : सातारा जिल्ह्यातील पर्यटनाचा विकास होवून रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा व कोयनानगर या पर्यटन क्षेत्रातील सूक्ष्म पर्यटन विकास आराखडा नुसार विकास कामांना गती द्यावी. तसेच सातारा जिल्ह्यातील डोंगराळ, दुर्गम भागात येत्या पावसाळ्यापूर्वी दळण- वळणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार तातडीने कार्यवाही करावी, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील पर्यटन विकासाचा आढावा घेतलेल्या कामांना निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश साताराचे पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.


            महाबळेश्वर- पाचगणी व इतर परिसरातील पर्यटन विषयक प्रलंबित विविध कामांचा आढावा मंत्री श्री. देसाई, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी मंत्री श्री. देसाई बोलत होते.


            यावेळी पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, साताराचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे, कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, महसूल विभागाचे सहसचिव अतुल कोदे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी, महाबळेश्वर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. साताराचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.


            मंत्री श्री. देसाई म्हणाले, महाबळेश्वरच्या धर्तीवर तापोळा परिसराचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वंकष विकास आराखडा तयार करून तो तातडीने सादर करावा. या आराखड्यात तापोळ्याचे सौंदर्यीकरण आणि सुशोभिकरण वाढेल, असे नियोजन करावे. महाबळेश्वरच्या सौंदर्यीकरण आणि सुशोभिकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. त्यासाठी लवकरच पाहणी करून बैठक घेण्यात येईल. यावेळी मंत्री श्री. देसाई, खासदार डॉ. शिंदे यांनी पाचगणी, कास पठार, प्रतापगड पर्यटन विकासाचा सविस्तर आढावा घेतला. पर्यटन केंद्रांच्या परिसरात स्वच्छता व सांडपाण्याचे नियोजन करावे. सातारा जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात पावसाळ्यात नागरिकांच्या सोयीसाठी दळणवळण, पायाभूत आणि आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दरे येथे आदर्श आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित करावे. या उपकेंद्रांत आवश्यक औषधींचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. आवश्यक तेथे लहान पूल, रस्ते दुरुस्त करावेत. पावसाळ्यातही या भागाशी संपर्क होईल, असे नियोजन करावे. नागरिकांच्या सुविधेसाठी बार्ज घ्यावी. त्यासाठी आवश्यक तो निधी जिल्हा नियोजन समिती, राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल. शालेय मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी वॉटर टॅक्सी सुविधा कार्यान्वित करावी. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाच्या माध्यमातून सर्वेक्षण करावे.


            सातारा जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करावे. त्यासाठी १०८ या रुग्ण वाहिकांचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी करावे. त्यासाठीचा सविस्तर तपशील आठवडाभरात सादर करावा, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. महाबळेश्वर येथील सर्व शासकीय कार्यालय एकाच छताखाली आणण्यासाठी प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव सादर करावा. याशिवाय २२ तलाठी आणि चार मंडळाधिकारी कार्यालयांसाठी इमारतीचाही प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिले. यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी रस्ते, वाहतूक, आरोग्य, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम आदी विषयांचाही सविस्तर आढावा घेतला.


००००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi