Saturday, 2 April 2022


महाराष्ट्र देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

· वडाळा येथील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन.

              मुंबई, दि २ : वस्तू आणि सेवा कर विभाग हा राज्य आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाच्या एकूण उत्पन्नात सर्वाधिक योगदान देणारे महाराष्ट्र राज्य हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोठा आधार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

             मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, श्री. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली वडाळा येथे वस्तू आणि सेवा कर भवनाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन झाले.

             यावेळी नगर विकासमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) श्री. एकनाथ शिंदे, दूरदृष्यप्रणालीद्वारे तर वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री, मुंबई शहर श्री. अस्लम शेख, खासदार श्री. राहुल रमेश शेवाळे, आमदार श्री. कॅ. आर. तमिळ सेल्वन, मुख्य सचिव, श्री. मनुकुमार श्रीवास्तव, सीजीएसटीचे मुख्य आयुक्त अशोक कुमार मेहता तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, पोर्ट ट्रस्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक राजीव जलोटा, आयुक्त वस्तू आणि सेवा कर राजीव मित्तल, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

             यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आजच्या वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतीच्या भूमिपूजनाचे श्रेय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार तसेच विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे असून त्यांच्या पाठपुराव्यामुळेच सगळ्या परवानग्या मिळवून आज त्याचे काम सुरु होत आहे. इमारतीचे संकल्पचित्र अप्रतिम आहे. कोणतेही संकल्प पूर्ण करायला राज्याच्या तिजोरीत ‘अर्थबळ’ लागते ते वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून मिळत असल्याने राज्य अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा हा विभाग भक्कम झालाच पाहिजे. कर संकलनात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची बाब अभिमानास्पद आहे. आज भूमिपूजन होत असलेली वास्तू पर्यावरणपूरक असून ती २०२५ पर्यंत बांधून पूर्ण होईल असेही श्री ठाकरे म्हणाले. 

              मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, वस्तू आणि सेवा कर विभागाची ही इमारत इतकी देखणी व्हावी की ती पाहण्यासाठी नागरिकांनी येथे यावे, देशातील वस्तू आणि सेवा कर भवनाच्या इमारतींमध्ये ती सर्वोत्कृष्ट ठरावी.

            जो करदाता येथे कर भरण्यासाठी येईल त्याला आपण भरलेला कर राज्य विकासाच्या कामात योग्य पद्धतीने वापरला जात असल्याची खात्री मिळेल अशी ही इमारत असावी अशी अपेक्षाही श्री ठाकरे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी वस्तू आणि सेवा कर विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर दिला. तसेच प्रशिक्षणाबरोबरच कर्मचाऱ्यांनी येथे येणाऱ्या करदात्याशी, सर्वसामान्य माणसाशी सन्मानपूर्वक वागावे, तो येथून परत जातांना आनंदाने आणि समाधानाने गेला पाहिजे असे आवाहनही श्री ठाकरे यांनी केले.

जीएसटी करसंकलनात महाराष्ट्र अव्वल.

- उपमुख्यमंत्री अजित पवार

            उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, श्री. अजित पवार म्हणाले, कोरोनाविरुद्धची लढाई निश्चितच सोपी नव्हती. कोरोना संकटाशी राज्यातील सर्वजण ज्या एकजुटीने, निर्धाराने लढले, त्याची नोंद इतिहासात निश्चितच होईल.

            या लढाईला आर्थिक पाठबळ देण्याचे, फार मोठे आणि महत्वाचे काम, वस्तू व सेवा कर विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले. राज्य कर विभागाने, जीएसटी विभागाने, करसंकलनातून दिलेल्या आर्थिक पाठबळामुळेच कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी होऊ शकली. महाराष्ट्र हे, औद्योगिक व व्यापारीदृष्ट्या, देशातले सर्वाधिक विकसित राज्य असून देशाला जीएसटीद्वारे सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून जातो. आजमितीस देशाच्या एकूण जीएसटी वसुलीत महाराष्ट्राचा वाटा 14.70 टक्के आहे. राज्याची अर्थव्यवस्था भक्कम झाली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरु असून राज्यातील उद्योग, व्यापार, व्यवसाय क्षेत्राला प्रोत्साहन देत असतानांच, कर आकारणीसंदर्भातही मध्यममार्ग शोधला आहे. करआकारणीत संतुलन साधण्याचा, त्यातून कर उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे. यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात, राज्याची अर्थव्यवस्था 1 कोटी ट्रिलीयन डॉलरपर्यंत वाढवण्याचं उद्दीष्टं ठेवले आहे असे श्री पवार म्हणाले.

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, राज्याची अर्थव्यवस्था पुढे नेत असताना, राज्यातील जनतेवर अधिक कराचा बोजा पडणार नाही, याची काळजी घेतली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील जनतेवर 1 रुपयाचीही करवाढ केलेली नाही. उलट अनेक करसवलती दिल्या आहेत.मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. आपले राज्य, शेतीच्या, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन अशा सगळ्या क्षेत्रात देशातले पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम राखण्यासाठी, राज्य शासन करसवलती देण्यासह, इतर अनेक माध्यमातून प्रयत्न करत आहे. कोरोनाकाळात अडचणीत आलेल्या, राज्यातल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ‘महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क तडजोड - 2022’ ही अभय योजना लागू केली आहे. या अभय योजनेच्या माध्यमातून, कर कायद्यांतर्गत एका वर्षात वैधानिक आदेशान्वये 10 हजार रुपयांची थकबाकी असल्यास, थकबाकीची ती रक्कम पूर्णपणे माफ केली आहे. छोट्या व्यापाऱ्यांना सुमारे 1 लाख प्रकरणांमध्ये हा लाभ मिळणार आहे. उद्योग, व्यापार क्षेत्रातल्या बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.

नवीन जीएसटी भवन वैशिष्ट्यपूर्ण

            उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, राज्यातील प्रत्येक कार्यालय लोकाभिमुख झालं पाहिजे. राज्य शासनाच्या सर्वच विभागांची कार्यालये स्वत:च्या जागेत असली पाहिजेत, कार्यालयांच्या इमारती स्वच्छ, सुंदर, आकर्षक असल्या पाहिजेत यावर भर देण्यात येत आहे.

            राज्याला कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात राज्य कर विभागाचा वाटा जवळपास 65 टक्के आहे. मुंबईतील वडाळा या मध्यवर्ती ठिकाणी, नवीन जीएसटी भवनाचे भूमीपूजन होत आहे. जीएसटी हा राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणारा विभाग आहे.

            जीएसटीचे हे नवीन ऑफीस मुंबईत मध्यवर्ती ठिकाणी आहे. मुंबई लोकल, मेट्रो रेल्वे, मोनो रेल, बस, टॅक्सीनंही इथं सहज पोहचता येणार आहे. मेट्रोचं स्टेशन आपण, जीएसटी इमारत संकूलातंच देत आहे. नव्यानं उभ्या राहत असलेली इमारत वैशिष्ट्यपूर्ण व पर्यावरणपूरक असणार आहे. 

            नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृष्य माध्यमातून मनोगत व्यक्त केले. नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोरोनाच्या संकटावर सर्वांच्या सहकार्याने आपण मात केली असून राज्याची विकासातील घोडदौड वेगाने सुरु आहे. राज्यात पायाभूत सुविधांची अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. राज्याच्या विकासात करदात्यांचा वाटा मोलाचा आहे. वडाळा येथील नियोजित जीएसटी भवन सर्व सुविधायुक्त सुसज्ज व पर्यावरणपुरक असेल, असेही श्री.शिंदे म्हणाले.

            आयुक्त राजीव कुमार मित्तल यांनी प्रास्ताविक केले. आभार प्रदर्शन एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष श्री. राधेश्याम मोपलवार यांनी केले.

            नियोजित नवीन जीएसटी भवन इमारत २२ मजल्यांची असून , या इमारतीमध्ये एकाच वेळी ८००० पेक्षा अधिक कर्मचारी काम करू शकतील व १६०० पेक्षा अधिक लोक एकाच वेळी कार्यालयास भेट देऊ शकतील. या व्यतिरिक्त, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची इतर काही कार्यालये व निवासी सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच अधिकारी-कर्मचा-यांसाठी प्रशिक्षण केंद्रही येथे असणार आहे.

                 राष्ट्राच्या सर्वांगीण , विशेषतः आर्थिक जडणघडणींमध्ये महाराष्ट्राचे अमूल्य योगदान नेहमीच राहिले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत जीडीपी व करसंकलनाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे प्रमुख राज्य आहे. देशाच्या जीडीपीत राज्याचा हिस्सा १३.९% आहे. राज्याच्या आर्थिक सक्षमीकरणाचा कणा असलेल्या राज्यकर विभागाने राज्याच्या विकासात मोलाची भूमिका कायम बजावलेली आहे . राज्याच्या कराद्वारे मिळणाऱ्या एकूण महसुलात राज्यकर विभागाचा वाटा ६५% च्या जवळपास राहिला आहे. २०१७-१८ मध्ये देशाच्या जीएसटी करसंकलनात राज्याचा हिस्सा १४.२०% होता तो सध्या वाढून १४.७० % इतका झाला आहे . सन २०२१-२२ मध्ये फेब्रुवारीपर्यंत देशाचे एकूण जीएसटी करसंकलन ९,९५,५६२ कोटी असून मागील वर्षाच्या तुलनेत २९% वाढ साध्य झाली आहे. याच काळात महाराष्ट्र राज्याच्या जीएसटी करसंकलनातील वाढ ३३% असून आत्तापर्यंतचे एकूण करसंकलन २,१७,५८९ कोटी झाले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

-----०००-----

प्रबोधन गोरेगाव संस्थेकडून मराठी माणसाला एकत्र ठेवण्याचे काम समर्थपणे सुरु

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

            मुंबई, दि.२: एखादी संस्था स्थापन करणे, ती उभी करणे सोपे असते पण ती सातत्याने कार्यरत ठेवणे खूप अवघड काम आहे आणि हेच अवघड काम प्रबोधन गोरेगाव ही संस्था समर्थपणे करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी केले.

            मागील ५० वर्षे कला, क्रीडा, संस्कृती व आरोग्य या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या प्रबोधन गोरेगाव या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आपण या देशाचे काही देणे लागतो आणि ते देणे समाजाला देण्याचे काम प्रबोधन करत आहे. प्रत्येकाने हे वाक्य लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रबोधन गोरेगाव ही संस्था ५० वर्षांनंतर तेवढ्याच हिमतीने व दिमाखात सुरु आहे. मराठी माणसाला एकत्र ठेवणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे आणि तेच काम ही संस्था समर्थपणे करत आहे. याचे संपूर्ण श्रेय मराठी भाषा मंत्री आणि संस्थेचे संस्थापक सुभाष देसाई यांना जाते. श्री. देसाई यांनी अथकपणे काळानुरुप या संस्थेत सुधारणा केल्या. बाळासाहेबांचे ब्रीदवाक्य ८०℅ समाजकारण व २०% राजकारण श्री. देसाई यांनी सार्थ ठरवले आहे. फक्त नेतेगिरी करुन कुणीही मोठा नेता होत नाही, तर कार्यकर्त्यांना मोठं करणारे, त्यांच्यासमोर आपला आदर्श ठेवणारे खरे नेते असतात, हेच श्री. देसाईंनी संस्थेच्या कार्यातून दाखवले आहे. स्वातंत्र्याचे पावित्र्य जपणाऱ्या प्रबोधन या संस्थेचे कार्य ५० वर्षेच नाही तर पुढील अनेक वर्षे असेच अविरत सुरू राहावे, हीच त्यांना शुभेच्छा.

५० वर्षांपूर्वीच्या “प्रबोधन गोरेगाव” चा आज वटवृक्ष झाला - शरद पवार

            ५० वर्षांपूर्वी छोटेसे रोपटे लावलेल्या आणि गोरेगांवकरांशी समरस असलेल्या प्रबोधन गोरेगाव या एका चांगल्या संस्थेचा वटवृक्ष झाला असल्याचे गौरवोद्गार खासदार श्री. शरद पवार यांनी आज गोरेगावात काढले. संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता शुक्रवार दि. १ रोजी त्यांच्या हस्ते झाली. यावेळी श्री. पवार यांनी संस्थेचे संस्थापक व राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव केला. यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते प्रबोधनाची पन्नाशी या कॉफीबुक टेबलचे आणि या संस्थेच्या गेल्या ५० वर्षांच्या वाटचालीच्या चित्रफितीचे उद्घाटन झाले.

            खासदार श्री. शरद पवार म्हणाले की, प्रबोधकार ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक वाटचालीत एक वेगळी भूमिका मांडली. समाजातील वाईट प्रवृत्तीच्या विरोधात त्यांनी आपली लेखणी चालवली. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे ते पुरस्कर्ते होते. प्रबोधनकारांचा आदर्श ठेवून आणि त्यांच्या नावाचा उल्लेख असलेली प्रबोधन गोरेगाव या संस्थेने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे

            मुख्यमंत्री म्हणून राज्याचा प्रमुख असतांना अनेक क्रीडा संघटनांशी घनिष्ठ संबध आला. कब्बडी, खोखो या खेळांचे क्रीडामहर्षी शंकरबुवा साळवी यांच्याकडून प्रबोधन गोरेगावच्या कार्याची माहिती मिळत असे.

            गोरेगावात आमदार मृणालताई गोरे यांच्याकडे अनेक वेळा येत असे त्यावेळी त्यांच्याकडून समाजातील समस्यांना उत्तर देण्याचे काम ही संस्था करते त्याचे नाव प्रबोधन गोरेगाव आहे. अशी या संस्थेची ओळख असल्याचा किस्सा सांगितला. राज्यावर आलेल्या संकटाच्या प्रसंगी या संस्थेने मदतीचा हात पुढे केला असल्याचेही श्री. पवार म्हणाले.

            प्रबोधन गोरेगाव संस्थेचे संस्थापक सुभाष देसाई म्हणाले की, १९९० मध्ये पहिल्यांदा गोरेगावचा आमदार झालो तेव्हा, त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांना ५०००० रुपयांचे अनुदान द्या, अशी विनंती केली असता त्यांनी संस्थेला ५ लाख रुपयांचे अनुदान दिले आणि संस्था उभी राहिली. त्यांच्यासारखा मोठा नेता महाराष्ट्राला लाभला असे गौरवोद्गार त्यांनी काढले. शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आणि आपल्याला सहकार्य करणारे संस्थेचे सहकारी यामुळे संस्थेचे काम इतरत्र पोहचले असून या संस्थेची वाटचाल सुरू आहे. एकजुटीने आणि सातत्याने काम करत राहिल्यानेच प्रबोधन संस्था ५० वर्षांनंतर आजही जागी आहे आणि यशस्वीरित्या आपली वाटचाल करत आहे.

            हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरु झालेली प्रबोधन ही संस्था मागील ५० वर्षांपासून कला, क्रीडा, संस्कृती आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये सातत्याने काम करत आहे. शालेय विद्यार्थ्यांना खेळांच्या स्पर्धांमध्ये संधी उपलब्ध करून देणे, मीनाताई ठाकरे रक्तपेढीच्या माध्यमातून १८ वर्षांत ३ लाख रक्तपिशव्यांचे वाटप, प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाच्या माध्यमातून ७०,००० वाचकांची भूक भागवणे, डायलेसिसच्या रुग्णांना व हजारो पूरग्रस्तांना मदत अशा अनेक माध्यमातून प्रबोधन ही संस्था सातत्याने काम करत आहे. हे सर्व शक्य झाले ते सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यामुळेच. गटबाजी करणे, एकमेकांशी स्पर्धा करणे, राजकारणाची ओढ या अवगुणांचा लवलेशही प्रबोधन संस्थेला शिवला नाही. म्हणूनच प्रबोधन संस्था ५० वर्षांनंतर आजही जागी आहे आणि यशस्वीरित्या आपली वाटचाल करत आहे.

            एरव्ही मराठी संस्थांना लागणारा दुहीचा, फाटाफुटीचा शाप प्रबोधनाच्या जवळपासही फिरकला नाही व सर्वानी एकजुटीने काम केल्यामुळेच. प्रबोधन ही संस्था आजही जागी आहे आणि तरीही स्वप्ने पाहायची सवय कायम आहे. तसेच प्रबोधनतर्फे खेड्यातील मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण देणारे केंद्र सुद्धा स्थापन केले जाणार आहे. आणखीही अजून संकल्प आहेत. प्रबोधनच्या स्थापनेपासून दिवंगत बाळासाहेबांनी आशीर्वाद दिला, मार्गदर्शन केले. तेच प्रेम आणि जिव्हाळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुद्धा मिळत आहे. जेष्ठ कार्यकर्त्यांची ते नावानिशी विचारपूस करतात त्यामुळे हा प्रवास असाच जोमाने सुरु राहील असा विश्वास वाटतो.

            यावेळी मंचावर खासदार अरविंद सावंत, खासदार गजानन कीर्तिकर, प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, गायक अजय-अतुल यांनी सादर केलेल्या गाण्यांचा आनंद उपस्थित मान्यवरांनी घेतला.

००००



No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi