Sunday, 6 March 2022

 🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

                     🕉️     *गीता चिंतन क्र २६१*                     

                             *अध्याय सहावा*

____________________________

*वाचकहो आणि तरुणांनो*

मन हे एक इंद्रिय आहे आणि ते फार महत्त्वाचे आहे.

या अध्यायाचे नावच मुळी आत्मसंयमयोग असे आहे.

ध्यानाच्या अभ्यासाने मनावर नियंत्रण कसे ठेवावे, हाच या अध्यायातील महत्त्वाचा मुद्दा.

*मन एव मनुष्याणां*

*कारणं बंध मोक्षयो:* ll

असे ब्रह्मबिंदू नावाच्या उपनिषदात म्हटले आहे. 

येथील एव हा शब्द महत्त्वाचा. मनुष्याच्या बंधनास आणि मोक्षास मन हेच कारण मानले गेले आहे. भागवतात पण काय म्हटले आहे पहा.

*चेत: खल्वस्य बन्धाय*

*मुक्तये चात्मनो मतम् |*

*गुणेषु सक्तं बन्धाय* 

*रतं वा पुंसि मुक्तये* ||   

                   भागवत ३.२५.१५.

या जीवाला बद्ध करण्यास आणि मोक्ष मिळवून देण्यास मनच कारण मानले गेले आहे. विषयात आसक्त झाल्यास ते बंधनाला कारणीभूत ठरते तर परमात्म्यात रत झाल्यास ते मोक्षाला कारण ठरते.

समर्थांनी म्हणूनच मनाला उपदेश करण्यासाठी २०५ श्लोक रचले. ते मनाला सांगतात की तू भक्तीपंथाने जा.

मन हे स्वभावत:च चंचल आहे. ते एकाच विषयाचे ठिकाणी स्थिर राहू शकत नाही आणि ते आत्म्यामध्ये स्थिर झाल्यावाचून परमार्थ सिद्धी नाही. त्यासाठी मनाच्या हालचालीकडे सतत लक्ष ठेवून त्याला नको त्या ठिकाणी जाण्यापासून आवरीत रहावे. 

त्या त्या विषयातले दोष दाखवून त्याला मागे ओढून आणावे आणि त्याला आत्म्याच्या स्वाधीन करावे. त्यासाठी अभ्यास हवा.


मन आत्म स्वरूपात स्थिर करण्याबाबत कठोपनिषदात एक सुंदर रूपक आहे.

*आत्मानं रथिनं विध्दि* 

*शरीरं रथमेव तु |*

*बुद्धिं तु सारथिं विध्दि*

*मन: प्रग्रहमेव च ||* 

                      कठो. १.३.३.

अर्थात् - तू आत्म्याला रथाचा स्वामी जाण. शरीर म्हणजे रथ. इंद्रिये म्हणजे त्या रथाचे घोडे. बुद्धी म्हणजे सारथी. मन हा लगाम. त्या मनरूपी लगामाने इंद्रियरुपी घोडे आवरून ठेवले जातात आणि त्यांना इष्ट स्थळी इष्ट मार्गाने जाण्यास प्रवृत्त केले जाते. 

वाचकहो, विचार करा. 

वरील विचार शालेय मुलांपर्यंत, कॉलेज तरुणांपर्यंत पोचवा. मनाच्या लगामाने इंद्रियरूपी घोडे आवरून धरले पाहिजेत. इंद्रियांना संयमित करणे अवघड. जरी ती नियंत्रणाखाली आली तरी ती स्थिती टिकवून ठेवणे आणखीनच अवघड. कारण अत्यंत चंचल आणि अस्थिर हा मनाचा स्थायीभाव होय. ते भटकणारच. मनाबरोबरच ज्ञानेंद्रिये पण भरकटणार. 

मन असे भरकटत राहिले तर ध्यानाभ्यासकाने निराश होऊ नये. त्याने त्या मनाच्या भरकटण्याकडे सतत लक्ष द्यावे. कुठल्या क्षणापर्यंत ते मुद्यांवर होते आणि कुठल्या क्षणी ते कसे भरकटले याचे निरीक्षण करावे. ते जिथे जेथे जाईल तेथून तेथून ते परत खेचून आणावे आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करावे. तेथून थोड्यावेळाने ते परत भरकटले तर परत त्याचेकडे लक्ष ठेवून त्याचा पाठलाग करावा आणि त्याला परत आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्थिर करावे. अशा प्रकारच्या सततच्या निरीक्षणाने, प्रयत्नाने आणि अभ्यासाने मनाची भटकण्याची सवय हळूहळू कमी होईल. भटकण्याचे प्रमाण कमी होईल आणि त्याचबरोबर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्याचा कालावधी वाढत जाईल. हा कालावधी वाढणे म्हणजेच मनावर नियंत्रण ठेवणे होय.  

मला एक साधी गोष्ट सांगा. 

एरवी आपण अगदी आरामदायी वाहनातून प्रवास केला तरी त्या भटकण्याने आपण थकतो.

तर मग मनाच्या भरकटण्याने ते दमत नसेल का ? 

अशा भटकण्याने मनाची कार्यक्षमता ‌क्षीण होते.

वाचकहो, हे चिंतन शाळा, कॉलेजच्या प्राध्यापकांना पाठवा. खाजगी क्लासच्या संचालकांना पाठवा व त्यांना ते पुढे मुलांपर्यंत पोहोचवण्याची विनंती करा. मनाचे भटकणे थांबले तर आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी आपोआप सुटतील.

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.                                           आपटे काका,      गीता फाउंडेशन , मिरज .                       भ्रणध्वनी क्र. ८६२५०३२०८२              || ॐ तत्सत् ||

🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚🦚

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi