✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
आगरी समाजातील
*खावाची पित्रा*
...डाॕ.संजीव म्हात्रे.
*"काव काव काव"* चा जणू गजरच घूमत होता. चिल्ल्यापिल्यांनी तर अगदी बेंबीच्या देठापासून काव काव सुरु केली होती. प्रत्येक घरात लगबग दिसत होती ती छपरावर "पित्रांचं पान" ठेवण्याची. गावं आगरी-कोळ्यांची असल्याने शांततेतला सण दुर्मिळच. "सर्वपित्री अमावस्या", खरं तर हा सण शांततेतच साजरा होणारा सण, शहरात अगदी कावळ्यालाही ऐकू येणार नाही एवढीच काव काव. पण आगरी समाजात हा एक मोठा सण म्हणून साजरा केला जातो. *"खावाची (खायची) पित्रा"* म्हणूनही या सणाला त्यांनी लाडिक नाव दिलं आहे. खरं आहे, कारण पित्रांसाठी तयार होणारं हे ताट पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटणार नाही ते फक्त खवैय्येगीरी जीभेवर नसणाऱ्यांनाच.
घराच्या पडवीला "निसन" (बांबूपासून बनलेली शिडी) लावून दादूस पित्रांचं पान (ताट) घेवून छपरावर चढला होता. खाली अंगणातील आगरी कुटुंबातील प्रमुख त्याला पान ठेवायची योग्य जागा दाखवत होते तर आयव लहानग्यांना सणाचं महत्व सांगत होती. "आथा आपले सर्गान जेलेलं डोखरं आज्जूस नं डोखऱ्या आज्जीस्सा आजचे दिसाला कावलं बनून भूकेलं येतान, मंग आपून त्यांना चांगला-चूंगला बनवून सकालचेपारा यो पित्रांचा पान वारून कौलावर ठेवतून. त्यावं टोकी(चोच) मारली, का मंग या सगला तुमाला हं." दादाने छपरावरून काव काव सुरू केली. मग खालच्या मंडळींनी पण त्याला साथ दिली. *"काव काव करा रं, मंग बगा नातवापतवासांना बगावला पित्रा कशी धावली येतीन."* केवढी ही भाबडी समजूत, परंतु तितकीच विरलेल्या आठवणींना उजाळा देणारी. पुन्हा कधीही फिरून न येणाऱ्या आपल्या माणसांचं मनात अस्तित्व टिकवण्याची. काकरूपी का होईना पूर्वजांची काल्पनिक भेट घेण्याची. याला अंधश्रद्धा म्हटल्यास पुर्वजांच्या पूनर्भेटीचा हा मार्ग बंद व्हावा असं कुणालाच वाटणार नाही.
आगरी समाजात अगदी घराघरात या सणाची तयारी जोरात सुरु असते. मासे खाण्यात पटाईत या समाजात आपल्या पित्रांच्या पानावर खाजणातून (समुद्रालगतची मासे पकडण्याची पाणथळी) स्वतः पकडून आणलेल्या माशांचा "निसोट" (कालवण) वाढणं हे जणू अपरिहार्य आहे असाच काय तो माहोल पहाटेस सर्वच गावांमधे असे. अधुनिक युगात मात्र तो रस्ता खाजणाकडे न जाता मच्छीमार्केट कडे जाताना पहायला मिळतो. पित्रांची ती पहाट जणू एखाद्या चित्रपटातील दृश्यच भासावे. गावातील लहान थोर आपल्या पारंपारिक वेशात अर्थात मासेमारी म्हटलं की अंगात फक्त बंडी आणि कमरेला "नंगोटा" (मोठ्ठा त्रिकोणी आकाराचा लंगोट) आणि खांद्यावर आसू (मासे पकडण्याचे जाळे), पाग, येंडी घेऊन गावापासून दूरवर असलेल्या खाजणात युद्धाला निघाल्याच्या आवेशात झपाझप पावलं टाकीत आक्रमण करीत. एकापाठोपाठ झुंडीच्या झुंडी खारींकडे (समुद्रकिनाऱ्यालगतची शेती व पाणथळी) कुच करीत. सराईत खाजणदार भराभर मासे पकडून कंबरेला बांधलेल्या डोंबली(बांबूपासून विणलेली गोलाकार लहान आकाराची हंडी)मधे टाकीत असे तर नवखे मात्र यथेच्छ पाण्यात व चिखलात चिंब होऊन या अनोख्या परवणीची मजा घेत. करफाल(मोठी कोळंबी), खऊल मासा, चिवना मासा, पेंदूरली(लहान आकाराचे खेकडे), चिंबोरी आणि जर कोणी नशीबवान असेल तर दुर्मिळ मासा जिताडा घेऊन घराकडे परतत.
बऱ्याच आगरी गावांमधे लोकांनी स्थापन केलेल्या वेशीवरील वा दूरवरील शेतांमधील दैवतांनाही या दिवशी नैवेद्य दाखवला जाई. पूर्वी उन्हातान्हात, वादळा-पावसात, थंडी-वाऱ्यात हे लोक शेती, आगर, खाजण अशा ठिकाणी कामे करीत. *आपल्या रक्षणास त्यांनी या दैवीशक्ती स्थापित केल्या होत्या व त्या देवतांची नावेही त्यांनीच ठेवली होती. या दैवीशक्तींची आजही पुजाअर्चा होत असते. भूत अर्थात भिती, या संकल्पनेतून भूताखेतांचा संहार करणाऱ्या या शक्ती त्यांना निर्भिड बनवतात.*
पित्रांचं पान छपरावर होतं तरी त्यातले पदार्थ सर्वांच्या सहनशिलतेची परिक्षाच पहात होते. सरासरी काढली तर क्वचितच ही कावळेसदृश पित्र तत्परतेने पानावर चोच मारीत अन्यथा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव ठसठशीत होईस्तवर ते पानाजवळ येत नसत. कोणीतरी कानात पुटपुटले, *"पयले धारंची हान, मंग बग कसं धावलं येतीन."* त्याकाळी बऱ्याच प्रमाणात आगरी पुरूषांमधे त्यांच्या व्यवसायातील श्रमांमुळे उत्तेजक द्रव्य अर्थात दारू पिण्याचं व्यसन अंगवळणी पडे. थंडी वा पावसात थरथरणाऱ्या शरीराला उभारी मिळण्यासाठी विडीचा आसरा घेत. तेंव्हा गरज म्हणून केलेलं व्यसन व आत्ताच्या पिढीत फॕशन म्हणून केलेलं व्यसन हळूहळू या समाजाच्या चिंतेचं कारण बनत चाललय हे मात्र खरं. आबवनी हा इंतजाम आधीच केला होता. वाटीत सोमरस आणून पानाजवळ ठेवला आणि पुन्हा सर्वांनी काव काव सुरू केली. आयव लहान मंडळींची समजूत काढी, "तो बग, ते निमाचे झारावर बसलाय नं तो आजूस, बग आथा वलखील आपलेला न यईल घास खावाला. मिनी सगला "रांदलाय"(स्वयंपाक बनवणे), पानगे(तांदळाच्या पिठात गुळ मिसळून तळलेले चपटे गोलाकार पानगे) नं आबारांच्या(परसातील) चवलीच्या शिंगा(शेंगा) उकरून पानान ठेवल्यान, नं त्यांचे आवरीची खीर केलीय." *आगरी समाजात ह्या तांदळाच्या खिरीचा सुगंध अगदी घराघरातून दरवळत असतो.* आजही प्रत्येक घरात अविट गोडीची ही तांदळाची खीर सणांतील पक्वान्नाचा अविभाज्य भाग बनून राहीली आहे. खीरीची ही पाककृती गावागावात व घराघरात विविधतेने नटलेली दिसते, आजच्या अन्नपूर्णेनेही ही कला आत्मसात केलेली पहायला मिळते.
कावळा पानाला शिवायला वेळ लागला तर कुटुंबातील बुजुर्ग मंडळींच्या जीवाची घालमेल होई. नानाविध शंकांचं काहूर मनात उठे. काही चुकलं असेल तर माफ कर म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या चूकांचं समर्थन करण्यास चूकत नसे. *श्रद्धा असो वा अंधश्रद्धा परंतू यापुढे जीवनात चांगलं वागण्याचा दृढनिश्चय करायला लावणारा हा सण नक्कीच श्रद्धेपलिकडला समजायला हरकत नाही.* योगायोग जुळला आणि कावळ्याने पानातील पदार्थावर चोच मारली आणि एकच कल्ला झाला, *"पित्रांनी पान उष्टवला, चला वारा(वाढा) रं पत्रावली".*
डाॕ.संजीव व्यंकटेश म्हात्रे.
खोपटे - उरण
9870561510
dr.sanjeev.ranjana@gmail.com
No comments:
Post a Comment